भूनंदनवन काश्मीर - भाग १

के.के.'s picture
के.के. in भटकंती
1 Dec 2016 - 4:03 pm

====================================================
भूनंदनवन काश्मीर - भाग-१ भाग-२ भाग-३ भाग-४
====================================================

भूनंदनवन काश्मीर – पूर्वतयारी

यंदाच्या ऊन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये कुठे ट्रीपला जायचे याचा विचार बरेच दिवस डोक्यात घोळत होता. २००८ साली काश्मीरला जायचे अगदी ठरलेच होते, पण काही कारणास्तव ऐनवेळी ती ट्रीप रद्द करावी लागली होती. तेव्हापासून काश्मीरला कधी जायला मिळेल ह्याची संधी शोधत होतो. मागच्या वर्षी उत्तराखंडची ट्रीप केली आणि हिमालय भलताच आवडला. तेव्हा यंदा काश्मीर करता येईल काय याची चाचपणी सुरु केली. आता काश्मीर म्हणले की आपल्या मनात ज्या प्राथमिक शंका येतात, खरेतर तशीच सुरुवात झाली. म्हणजे, तिथले वातावरण कसे असेल, सुरक्षित असेल ना वगैरे वगैरे. प्रश्न काश्मीरचा होता, म्हणुन स्वतःचे स्वतः प्लॅन करून जावे का केसरी/वीणा वर्ल्ड वगैरे बरोबर जावे हे काही ठरेना. आणि ह्यातच खूप वेळ गेला. केसरी/वीणा वर्ल्ड कडून माहितीपत्रक आणले तसेच इंटरनेटवर देखिल माहिती बघत होतो. त्यावरून बरेच लोक स्वतःचे स्वतः प्लॅन करून तिथे जातात हे कळत होते. पण आमच्या ट्रीपचे काय करावे हे कळत नव्हते. शेवटी ठरवले की ही ट्रीप आपली आपणच करायची. एकुण १०दिवस व ९रात्री असा भरगच्च कार्यक्रम ठरवला. तो खालीलप्रमाणे:

श्रीनगर -> दूधपथरी -> युसमर्ग -> पहलगाम -> गुलमर्ग -> सोनमर्ग -> गान्देरबल -> मानसबल -> श्रीनगर -> परतीचा प्रवास

श्रीनगर हे मध्यवर्ती ठिकाण असल्याने आमच्या ९ रात्रींपैकी तब्बल ६ रात्री आम्ही श्रीनगर मध्ये राहणार होतो. उर्वरीत रात्री गुलमर्ग, पहलगाम व अजुन एका ठिकाणी घालवणार होतो. मूळ प्लॅनमध्ये दूधपाथरी नव्हते. पण आंतरजालावरील माहितीनुसार हे एक छान ठिकाण आहे असे कळले होते म्हणुन त्याचादेखिल समावेश केला. केसरी/वीणा च्या प्लॅनमधे दूधपथरी/युसमर्ग/मानसबल असे काहीही नसते. पण आता आमचे आम्ही जाणार असल्याने आम्हाला जे आणि जसे पहायचे होते तसे करु शकत होतो. श्रीनगरमधे एक रात्र साधरणपणे हाऊसबोटमधे घालवतात. पण आम्हाला हाऊसबोटचे विशेष आकर्षण नसल्याने आम्ही आमच्या सर्व मुक्कामांसाठी हॉटेलच निवडले होते. गुलमर्ग व सोनमर्ग येथे बर्फ असतो. तिथे उबदार कपड्यांची आवश्यकता असते. पण, तिथेच जॅकेट, गमबूट्स, ग्लोव्ह्स हे सगळे भाड्याने मिळते. ते सगळे इथुन घेउन जायची आवश्यकता नाही.

अशा प्रकारे सगळी तयारी करुन आम्ही आमच्या काश्मीर ट्रीपसाठी सज्ज झालो.
ह्या ट्रीपचे प्रवासी – मी, बायको व आमचा सहा वर्षाचा मुलगा.

भूनंदनवन काश्मीर – आगमन

प्रचंड उत्सुकतेने आमचा काश्मीर प्रवास सुरु झाला. दिल्लीवरून निघताना विमानतळावर जेव्हा गेटपाशी विमानाची वाट पाहत थांबलो होतो तेव्हादेखिल आजुबाजूला कोणकोण आहे, त्यातले आमच्यासारखे पर्यटक किती, त्यात मराठी कुटुंबे आहेत का, मूळचे काश्मीरी कोणी आहेत का, वगैरे निरीक्षणे चालली होती. विमान जेव्हा काश्मीर भागात पोचले तेव्हा मात्र बाहेर दिसणारे द्रुश्य अत्यंत विलोभनीय होते. चहुबाजूने बर्फाच्छादित पर्वतरांगांमधिल काश्मीर खोरे फार म्हणजे फारच सुंदर दिसत होते. त्याचे वर्णन करणे थोडे कठीण आहे पण मी प्रयत्न करतो. कल्पना करा की तुमचे विमान दिल्ली-पंजाबच्या मैदानी भागाकडून उत्तरेकडे चालले आहे. हिमालयाच्या पीरपांजाळ पर्वतरांगांमधून तुम्ही थोडे पुढे आल्यावर तुम्हाला एक मोठ्ठा हिरवागार मैदानी भाग दिसतो. त्यात उंचच उंच गर्द झाडी आहे, शेतीचे पट्टे आहेत, रंगीबेरंगी घरे आहेत, मधुन मधुन दिसणार्‍या वळणे वळणे घेत चाललेल्या नद्या आहेत. त्या नदीच्या पाण्यावरुन परावर्तीत होणारा सूर्यप्रकाश चुकवताना तुम्ही आजुबाजूला बघता. तुम्हाला दिसते की तो खोर्‍याचा भाग चहुबाजूने बर्फाच्छादीत पर्वतांनी वेढलेला आहे आणि तुमचे विमान सावकाश गोल फेर्‍या मारत हळुहळु खाली उतरत आहे. अश्यावेळी खरेतर वैमानिकाला “Statue!!” म्हणायची परवानगी असायला हवी होती. म्हणजे तो देखावा तुम्ही मनसोक्‍त पाहू शकला असता आणि नंतर कॅमेर्‍यात उतरवू शकला असता. पण ह्यातले मी काही करू शकलो नाही. एक मात्र आहे की जसजसे तुम्ही खोर्‍यात उतरू लागता तसतसे तुम्ही काश्मीरच्या प्रेमात पडू लागता!!
यथावकाश आमचे विमान व्यवस्थित खाली उतरले. धावपट्टी तसेच आजुबाजूला बंकर्स व सैन्य दिसत होते. अर्थात हे अपेक्षितच होते. एका वेगळ्या ठिकाणी आल्याचे जाणवत होते. विमानतळावर व्हरांडा, मुख्य दालन व जागोजागी लाकडी कलाकुसरीची कामे केलेली होती. विमानतळ तसे सामन्यच होते. सामान घेईपर्यंत आमच्या ड्रायव्हरचा फोन आला. बाहेर गेल्यावर पाहतो तर जो आम्हाला घ्यायला आला होता तो एक धिप्पाड, उंचपुरा तरुण होता. त्याचे नाव सोहैल होते. कोरलेली दाढी, स्पाईक्स केलेले केस, टी-शर्ट जीन्स परिधान केलेला सोहैल कोणा मॉडेलपेक्षा कमी दिसत नव्हता. हा खरेच ड्रायव्हर असेल? विश्वासच बसत नव्हता. (त्याला ‘ड्रायव्हर’ म्हणुन संबोधणे बरोबर वाटत नाही म्हणुन उर्वरीत लेखात ‘सोहैल' असाच उल्लेख केला आहे.)
काश्मीरमध्ये गेल्यावर काय काय करायचे आणि काय काय नाही हे आम्ही आधीच ठरवले होते. ‘दहशतवाद, सैन्य व राजकारण' हे विषय कटाक्षाने टाळायचे हे नक्की ठरवले होते. सोहैलशी बोलताना देखिल ही काळजी घ्यायची होती. काश्मीरबद्दल प्रचंड कुतुहल असल्याने विमानतळावरुन निघाल्यावर नजर सगळीकडे भिरभिरत होती. घरे, दुकाने, शाळा पाहता पाहता आम्ही मुख्य शहराकडे चाललो होतो. वाटेत रेल्वेमार्ग आडवा आला तेव्हा सहज सोहैलला विचारले “कश्मीरमे रेल्वे है?” माझ्या माहितीनुसार जम्मू-उधमपूर-कटरा पर्यंतच रेल्वे आहे आणि पुढचे काम अजुन चालू आहे. सोहैल म्हणाला “हां हां बिलकूल है| लेकिन अभी वो जम्मूसे जुडी नही है| अभी सिर्फ कश्मीर के कुछ गांवो के बीच चलती है|” नंतर सहज विचारले की “यहां पे ICICI ATM होंगे?” तेव्हा सोहैलने उत्तर दिले की “जो जो आपको आपके शहर मे मिलता है वो सब आपको श्रीनगर मे मिलेगा|” हे एकदम सदाशिव पेठेत मिळणार्‍या उत्तरासारखे टोकदार उत्तर होते. सोहैलच्या या उत्तरातून त्याला काय सांगायचय ते मला चांगलेच समजले. त्यामुळे असे प्रश्न त्याला परत विचारायचे नाही हे तत्क्षणी ठरवून टाकले. कारमधुन बाहेर काय काय दिसते ते बघत बसलो.
श्रीनगर हे इतर शहरांसारखेच आहे. बरीचशी घरे बैठी अथवा एक-दोन मजली होती. रस्त्यावर बरेच ट्राफिक होते. ठीकठीकाणी होमलोन्सच्या जाहीराती लागलेल्या होत्या. पुण्या-मुंबईसारख्या उंच इमारती तर दिसत नव्हत्या मग एवढ्या होमलोन्सच्या जाहीराती का बरे असतील असा प्रश्न पडला खरे. पण सोहैलला विचारण्याचे टाळले. घरे मात्र मस्त होती. छान रंगवलेली, सजवलेली टुमदार अशी घरे होती. मी व बायको त्याचीच चर्चा करत असताना सोहैलनेच सांगीतले की इथे इमारती उभारायला सुरुवात केली होती पण काश्मीरी लोकांना स्वत:च्या जागेत बांधलेल्या घरात रहायला आवडते त्यामुळे ह्या होमलोन्सच्या योजना फारशा यशस्वी झाल्या नाहीत. वाटेत एक उड्डाणपुल लागला तसेच अजुन एके ठिकाणी उड्डाणपुलाचे बांधकाम सुरु असलेले दिसले. म्हणजे विकासकामे सुरु होती तर. पण जाणवण्यासारखी एक प्रमुख गोष्ट होती ती म्हणजे रस्त्यावर व शहरात दिसणारा सैन्याचा वावर. दर थोड्या अंतरावर शस्त्रधारी सैनिक हमखास दिसत होता/होते.
मुख्य शहर खूपच गजबजलेले होते. सोहैलेने बोळाबोळातून गाडी काढत आम्हाला आमच्या मुक्कामाच्या स्थळी पोहोचवले. हे हॉटेल रहिवासी भागात होते. हॉटेल नुकतेच बांधलेले असावे. सगळ्या गोष्टी नविन व फ्रेश दिसत होत्या. फक्‍त एक होते की रहिवासी भागात असल्यामुळे हॉटेलला काही चांगले व्ह्यू नव्हते. हॉटेलला पोचेपर्यंत संध्याकाळ झालेली होती. नंतर आम्ही विश्रांती घेणे पसंत केले.
काश्मीरमधला आमचा पहिला दिवस तर नक्कीच चांगला गेला.

====================================================
भूनंदनवन काश्मीर - भाग-१ भाग-२ भाग-३ भाग-४
====================================================

प्रतिक्रिया

एस's picture

1 Dec 2016 - 4:12 pm | एस

वाचतोय. पुभाप्र.

कोणत्या महिन्यात गेला होता?

के.के.'s picture

1 Dec 2016 - 4:44 pm | के.के.

मे महिन्यात गेलो होतो.

अगदीच पीक सीझन. विमानतळावरही बदल झालेले दिसतात.

संजय पाटिल's picture

1 Dec 2016 - 5:06 pm | संजय पाटिल

वर्णन शैलि चांगलि आहे.
फोटो टाका..

पैसा's picture

6 Dec 2016 - 6:26 pm | पैसा

ओघवते लिहिताय