धुकट सकाळ

धनंजय's picture
धनंजय in जे न देखे रवी...
2 Feb 2009 - 8:30 am

धुकट सकाळ

(आमच्या गावात नेहमीपेक्षा थोडासुद्धा अधिक बर्फ पडला, तर सगळे काही ठप्प होते. अशा एका सकाळचे हे चित्र)
picture
(पुढील शब्द वाचण्यापूर्वी, जमले तर ते ऐकावेत - नाहीतर मात्रा/वृत्त या बाबतीत तुम्हाला पटणार नाहीत. **म्हणूनच कविता "वाद" प्रकारात घातली आहे. ठेका दाखवण्यासाठी टाळ्या देणारे मेट्रोनोम यंत्र ८०/मिनिट टाळ्या देत आहे.**)
Get this widget | Track details | eSnips Social DNA
धुकट सकाळ

***
किती बर्फ पडला पहाटे बघितले
कि वातावरण स्तब्ध नि:शब्द होते
सुटीच्या सकाळी असावे तसे हे
पहा गप्प रस्ते रिकामे रिकामे

*
धुरांड्यांवरून आकृती या धुराच्या
अकल्पित जशी गूढ पिशाच्चे असावीत
नि मागे धुक्याच्या कुणी गुप्त छद्मी
असेल का? विचारून शहारलो मनात मी
***
.

कवितावाद

प्रतिक्रिया

सहज's picture

2 Feb 2009 - 8:46 am | सहज

पण पांस्थस्ताने जसे मिपावर पाकृ चित्रमय करुन टाकले तसे कविता आता धनंजय नादमय / श्राव्य करणार. मनासज्जनाचा ठेका लावुन हे शब्द म्हणायचे काही झेपले नसते. :-)

बाकी कवीता वगैरे काय ते जाणकार सांगतील.

धनंजय's picture

2 Feb 2009 - 9:05 am | धनंजय

पहाटे पहाटे मला जाग आली
तुझी रेशमाची मिठी सैल झाली
मला आठवेना तुला आठवेना
कशी रात्र गेली कुणाला कळेना
... (कवी : सुरेश भट)

हेसुद्धा भुजंगप्रयातातच आहे. हे वृत्त खूप लोकांनी वापरले आहे, वेगवेगळ्या "विषया"बाबतही...

पण बर्‍याच लोकांची याची पहिली ओळख मनाच्या श्लोकांमधून होते.

"वाद" मात्रा मोजण्याबाबत आहे - मी मेट्रोनोम लावून दाखवले आहे की वृत्त कटेकोरपणे पाळले आहे. (मागच्या कवितेच्या बाबतीत वृत्त पाळले नव्हते, अशी शंका व्यक्त झाली होती.)

प्रकाश घाटपांडे's picture

2 Feb 2009 - 9:32 am | प्रकाश घाटपांडे

या धनंजयाने सकाळी सकाळी आमची फ्रिक्वेन्सीच बदलली. अगोदर चित्र पाहिले. मग कविता वाचली. मग कविता ऐकली. तसा कविता आमचा प्रांत नाही. पण पहाणे ,वाचणे, ऐकणे या क्रमाने गेल्यावर आमच्यातला बदल आम्ही टिपत गेलो. चि. बिट्टुभुभु प्रकाश घाटपांडे याचा आज प्रथम स्मृती दिन. स्मृतींच्या असंख्य पोकळ्या मनात फेर धरुन होत्या. डॉक्टरांनी त्याला शांत मृत्युसाठी इ़ंजेक्शन दिले. माझ्याकडे बघता बघता त्याचे डोळे निष्प्राण झाले. डॉक्टरांनी त्याच्या पापण्या मिटवल्या. हुंदका आवरला नाही. टंकतानाही आवरत नाही.

नि मागे धुक्याच्या कुणी गुप्त छद्मी
असेल का? विचारून शहारलो मनात मी

शहारलो मनी मी अधिक नादमय वाटते.
प्रकाश घाटपांडे

प्रमोद देव's picture

2 Feb 2009 - 9:32 am | प्रमोद देव

'मना सज्जनाच्या' चालीवर दुसरी चारोळी चक्क फसलेय. विशेष करून दुसरी आणि चौथी ओळ.
पहिली चारोळी मात्र अगदी व्यवस्थित जमलेय.

धनंजय's picture

2 Feb 2009 - 10:43 am | धनंजय

मेट्रोनोमच्या टाळ्या बरोबर
लगागा | लगागा | लगागा | लगागा
वरती येत आहेत.
(दुसरी ओळ)
अकल्पीज्ज़शीगूढ्पिशाच्चेयसावीत्
(मेट्रोनोमशिवायच्या, आणि मेट्रोनोमबरोबरच्या, दोन्ही वाचनांत मी उच्चार असाच केला आहे.)
तुम्ही या मराठी वाक्याचा यावेगळा उच्चार कराल काय?

(येथे मेट्रोनोम, आणि "गा"वर टाळी "लगागा | लगागा | ", हे कालमापन करण्यासाठी आहेत, आघातस्वर [सम] सांगण्यासाठी नव्हेत)

मना सज् | जना भक् | तिपंथे | चिजावे
असे आघातस्वर मराठीत त्या ठिकाणी येत नाहीत.

तसेच :
अकल्पीज् | ज़शीगूढ् | पिशाच्चे | यसावीत्

सुरेश वाडकर यांच्या "पहाटे पहाटे तुला जाग आली" गाण्यात सम (आघातस्वर) अशा तीन-तीन अक्षरांवर येत नाही, कधी 'ल' वर येते, तर कधी 'गा' वर येते. अक्षरांना दिलेल्या टाळ्याही कमी-जास्त लांबीच्या आहेत.
Get this widget | Track details | eSnips Social DNA

प्रमोद देव's picture

2 Feb 2009 - 11:06 am | प्रमोद देव

त्यामुळे तुम्ही केलेला खुलासा डोक्यावरून गेला. त्याबद्दल माफी असावी.
पण मी जसे मनाचे श्लोक पाठ केलेले होते त्या चालीत आणि ठेक्यात मात्र , दुसर्‍या चारोळीतलली दुसरी आणि चौथी ओळ मला म्हणता येत नाहीये. तिथे फारच ओढाताण होतेय.

प्रमोद देव's picture

2 Feb 2009 - 11:09 am | प्रमोद देव

दोनदा प्रकाशित झाल्यामुळे प्रकाटाआ.

विसोबा खेचर's picture

2 Feb 2009 - 9:33 am | विसोबा खेचर

अकल्पित जशी गूढ पिशाच्चे असावीत
नि मागे धुक्याच्या कुणी गुप्त छद्मी
असेल का? विचारून शहारलो मनात मी

लूक! नाऊ धीस इज धनंजय'ज कविता..! यू सी..! :)

जबरा कविता रे धन्या. तुझ्याकडून अश्याच कविता मला अपेक्षित आहेत.. कविता वाचनही क्लास, अगदी नाट्यमय..

धन्या, तुझं कविता वाचन विशेष सुंदर असतं!

तात्या.

विसुनाना's picture

2 Feb 2009 - 11:03 am | विसुनाना

कविता आवडली. का..? वगैरे ते सांगणार नाही.
गरज नसली तरीही काही बदल सुचवतो.
न पटल्यास का..? वगैरे ते सांगावे.

धुकट सकाळ
***
किती बर्फ पडला पहाटे बघितला
आसमंत हा स्तब्ध नि:शब्द झाला
सुटीच्या सकाळी असावा तसा हा
दिसे गप्प रस्ता रिकामा रिकामा
*
धुराड्यांतून फुटती धुमारे धुराचे
जशी गूढ धूसर असावी पिशाच्चे
नि मागे धुक्याच्या कुणी गुप्त छद्मी
आहे का? विचारून शहारे मनी मी

धनंजय's picture

2 Feb 2009 - 11:57 am | धनंजय

> किती बर्फ पडला पहाटे बघितला
ठीक

> आसमंत हा स्तब्ध नि:शब्द झाला
वृत्तभंग - "आसमंत" याचा काय उच्चार अपेक्षित आहे? "आस्मंत" - काही का असेना "आ" दीर्घ आहे, आणि प्रथम अक्षर लघू हवे.

> सुटीच्या सकाळी असावा तसा हा
ठीक

> दिसे गप्प रस्ता रिकामा रिकामा
ठीक

*
> धुराड्यांतून फुटती धुमारे धुराचे
वृत्तभंग. लगागा असे हवे.

> जशी गूढ धूसर असावी पिशाच्चे
उच्चार कसा अपेक्षित आहे?
"जशी गूढ्धूसर्रसावी पिशाच्चे" असा उच्चार आहे का?
असे असल्यास अधोरेखित खंडाच्या आधी एक लघू अक्षर कमी पडते आहे.

> नि मागे धुक्याच्या कुणी गुप्त छद्मी
(हे बदललेले नाही)

> आहे का? विचारून शहारे मनी मी
वृत्तभंग - सुरुवातीचे अक्षर लघू हवे.

अर्थात, तुम्ही जिथे बदल केला आहे, शैली वेगळी आहे. काही ठिकाणी अर्थ बदलला आहे. त्यामुळे वेगळी कविता म्हणून त्यात काहीच दोष नाही.

१. "आसमंत" म्हणजे आजूबाजूचा प्रदेश; वातावरण म्हणजे "आजूबाजूचे" पण "हवेचे आवरण" हा अर्थ अधिक स्पष्ट असतो. (म्हणजे "आसमंत" स्वतंत्र अर्थ म्हणून चुकला असे मुळीच म्हणायचे नाही. तुम्हाला तेच दृश्य बघून तो मथितार्थ वाचकाला सांगायचा असेल.

२. धुराड्यांवरून धुमारे धुराचे हा अनुप्रास छान साधला आहे
धुमारा म्हणजे झाडाला फुटलेला [मोठा] कोंभ. हे नवे रूपक तुम्ही वापरायचे ठरवले. धुमारा हा साधारणपणे चांगला असतो. त्याला पुढे पिशाच्च म्हणून आणखी एक उपमा देऊन तुम्हाला विरोधाभास अधिक गडद करायचा असेल. (पण मला सुरुवातीपासूनच "आकृती" ठेवून एकच "पिशाच्च" ही उपमा द्यायची आहे. माझ्या पूर्ण कवितेत फक्त एकच उपमा आहे, तीच उत्प्रेक्षा पद्धतीने रंगवली आहे, हे लक्षात आलेच असेल.)

३. "आहे का?"/"असेल का?" हे अर्थ वेगवेगळे आहेत. त्यामुळे कुठला चुकला आहे, असे म्हणायचे नाही.

४. मनी मी/ मनात मी : माझ्या (या) कवितेत पूर्णपणे आधुनिक शब्दप्रयोग वापरायचे मी ठरवले आहे. म्हणजे वाटल्यास साधा संवाद म्हणून ती वाचता यावी. पण तुम्ही मनीं हा काव्य-किंवा-पुराणमराठी प्रयोग वापरण्यास काहीच हरकत नाही. (म्हणूनच 'मी शहारे', 'धुमारे फुटती' हे प्रयोग मी [या कवितेत] वापरले नसते [अन्यत्र वापरेनही], पण तुम्ही वापरण्यास काहीच हरकत नाही.)

पण काही बदल समजले नाहीत. मला अनेक रस्ते रिकामे दिसलेत, बदललेल्या कवितेत एकच दिसतो - चूक बरोबर कुठलेच नाही, पण हा बदल कशासाठी केला असावा? "अकल्पित"च्या ऐवजी "धूसर" पिशाच्चे का बदलली असावीत? "अकल्पित" मधली स्वतःची भलावणी करण्याची प्रवृत्ती तुम्हाला पटली नाही का? (भित्यापाठचा ब्रह्मराक्षस खरेच अकल्पित नसतो, पण त्या व्यक्तीला विचारल्यास "छे, मुद्दामून का हवी मला भीती" असेच मनापासून म्हणतो.) त्या मानाने "धूसर पिशाच्चे" मागची कथा वेगळी काही असावी.

अशा प्रकारे, तुमची कविता वेगळे अर्थ आणि संदर्भ घेऊन येते. ते ठीकच आहे. त्यामुळे "पटले नाही" असे मुळीच म्हणत नाही (वृत्तभंग सोडला तर).

अनेक कल्पना शब्दात मांडताना सर्वात योग्य अर्थछटा असलेले शब्द केवळ अक्षरगणवृत्तात बसत नाहीत
म्हणून बदलावे लागतात.
त्यामानाने मात्रावृत्ते थोडी सुटसुटीत आहेत. गेयतेलाही धक्का लागत नाही.
परंतु प्रयोग म्हणून भुजंगप्रयात अथवा मंदाक्रांता यासारख्या पारंपारिक वृत्तात आधुनिक (पक्षी असंस्कृतोद्भव) शब्द वापरणे हे ऍबस्ट्रॅक्ट पेंटिंग रियालिस्टीक पद्धतीने केल्यासारखे वाटते.
(मागे एका चर्चेत तुम्ही नवी कवितांत लगक्रम कसा ठरवावा याबद्दल नवे विचार मांडण्याचा प्रयत्न केला होता.)

आधुनिकतेला (आधुनिक शब्दांना) योग्य न्याय द्यायचा असेल आणि तरीही कवितेची लय सांभाळायची असेल तर यमक अष्टाक्षरी उत्तम. (पायलॉन्स, फलाटदादा, पंक्चरली - असे शब्दही सहज वापरता येतील.)

माझ्या (या) कवितेत पूर्णपणे आधुनिक शब्दप्रयोग वापरायचे मी ठरवले आहे. म्हणजे वाटल्यास साधा संवाद म्हणून ती वाचता यावी.

असे असेल तर मुक्तछंदात का लिहू नये? मुक्तछंदात लयबद्ध आधुनिकता आहे. गेयता हा निकष न लावता केवळ अर्थ थेट पोहोचवणारे शब्द वापरता येतील.

श्रावण मोडक's picture

2 Feb 2009 - 3:46 pm | श्रावण मोडक

ठेका, वृत्त, ताल वगैरेच्या पलीकडे दोन्ही रचना स्वतंत्रपणे आवडल्या.
दोन्हीमध्ये गुणगुणतांना काही छोट्या जागा धोका देतात, पण ते ठीक आहे.

धनंजय's picture

2 Feb 2009 - 10:08 pm | धनंजय

बरोबर आहे.

म्हणून या प्रकारची पहिली कविता "अजूनही प्रेम तसेच आहे का?"
६ | ६ (यमक) | ६ (यमक) | ४
या छंदात रचली होती.

मला वाटते, एखादी कविता सुचताना सुरुवातीला एखादी लय मनाची पकड घेते. मग अक्षर-छंद असो, की मात्रा-वृत्त, ते जे काय मनाची पकड घेते, ते वापरावे.

"मुक्तछंदात का लिहू नये?"

जरूर लिहावे. पण मुक्तछंदातच लिहावे असा काही नियम नाही. वाटल्यास साधा संवाद म्हणून वाचता यावी.

असे दुहेरी लिहायची पद्धत प्राचीन काळापासून प्रचलित आहे.
धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेता युयुत्सवा मामका: पाण्डवाश्चैव किमकुर्वत, संजय?
हे साधा संवाद म्हणून हेल देऊन सहज वाचता येते. आणि अनुष्टुभ् श्लोकासाठी तुमची काही विशिष्ट चाल असेल, तर त्या चालीत आळवता येते.

आणि बरोबर आहे, मर्ढेकरांमुळे असे लिहिण्याचे मी धाडस केले.

ते एका कवितेत लिहितात :
दण्.कट दंडस्नायू जैसे
लोखंडाचे वळले नाग
कभिन्न काळ्या मांड्या जैसा
पोलादाचा चिरला साग
...

(इथे त्यांनी मात्रावृत्त वापरले आहे, हे लक्षात येईलच. बाकी सर्व ठिकाणी संवादासारखे किंवा पुराणमराठी शैलीने वाचले तरी चालते :
"वळ्ळे" किंवा "व ळ ले" दोन्हींनी लय जमते

पण दण्.कटकिंवा द ण क ट मध्ये लयीत फरक पडतो. पैकी कवीला कुठला एकच उच्चार अभिप्रेत आहे, ते कवीला स्पष्ट सांगायचे आहे. म्हणूनच कवीने नेहमीपेक्षा वेगळा असा तो शब्द लिहिला आहे.

पुष्कर's picture

5 Feb 2009 - 1:29 pm | पुष्कर

मर्ढेकरांच्या लाडूत 'दणकट' हा शब्द बेदाण्यासारखा वाटतो. तुम्ही मात्र बेदाण्यांचाच लाडू केलेला दिसतो.
असो. मात्रांमध्ये बोली शब्द बसवण्याचे अतिस्वातंत्र्य असले तरी प्रयोग म्हणून चांगले आहे.

नेहमीच्या बोलण्यातले उच्चार लयबद्ध स्वरूपात पूर्ण कविता रचणे हे गेले काही दशके होत आहे. हल्लीच मिसळपावावर "देणार्‍याचे हात घ्यावे" हा लेख आला.

करंदीकरांच्या त्या कवितेतील एक कडवे येथे देत आहे :
उसळलेल्या दर्याकडून
पिसाळलेली आयाळ घ्यावी;
भरलेल्याश्या भीमेकडून
तुकोबाची माळ घ्यावी

याचा उच्चार नेहमीच्या बोलण्याप्रमाणे केला तर्च लय साधते, प्रत्येक अक्षर लिहिल्याप्रमाणे मात्रा देऊन उच्चारले तर लय बिघडते. उच्चार असाच करावा लागतो :
उसळ्.लेल्या दर्याकडून्
पिसाळ्.लेली आयाळ् घ्यावी;
भर्.लेल्याश्या भीमेकडून्
तुकोबाची माळ् घ्यावी

असा उच्चार केला तर विचित्र वाटते :
उसळऽलेल्या दर्याकडूनऽ
पिसाळऽलेली आयाळऽ घ्यावी;
भरऽलेल्याश्या भीमेकडूनऽ
तुकोबाची माळऽ घ्यावी

मंगेश पाडगांवकरांच्या बहुतेक कविता तशाच असतात. परंतु त्या कवितांच्या छंद-शास्त्रात आघातस्वरांची संख्या प्रत्येक ओळीमधे ठरलेली असते.
येथे मात्र मी मात्रांचा क्रम राखला आहे, इतकेच काय नवीन आहे.

बेदाण्यांचा लाडू असे न म्हणता मी "पोह्यांचा लाडू" म्हणेन. गोडमिट्ट (नेहमीच्या जेवणापेक्षा गोड) अशा बेसनाच्या लाडवात कोणी कुरकुरीतपणासाठी थोडेसे पोहे घालतात. पण थोडेच गोड असे पोह्यांचे लाडूसुद्धा करता येतात. कधी बेसनाचा लाडू खावा, कधी पोह्याचा लाडू खावा...

कविता बोलीच (ध्वन्याश्रित) असली पाहिजे, लेखी "शुद्धलेखनाच्या नियमांच्या मात्रा" गौण असतात, हा विचारही नवीन नव्हे. मराठीत अनाघात जोडाक्षराच्या आधीचे ह्रस्व लघूच राहाते, "जोडाक्षरा-आधीचे" म्हणून उगाच गुरू होत नाही.
तर्‍हेचा = लगागा
तर्रीचा = गागागा
लयीत लिहिण्या-वाचण्याचा सराव असलेला कोणीही मात्रा अशाच मोजेल.

सुक्या's picture

2 Feb 2009 - 11:18 am | सुक्या

तसं मला कविता अन् नाद / मात्रा वगेरे काही कळत नाही. सहज म्हनुन 'पहाटे पहाटे मला जाग आली' च्या चालीवर ही कवीता म्हनुन पाहीली (मनातच. मी गायला लागल्यावर सगळे दचकतात). सुंदर जमलीय.

सुक्या (बोंबील)
मु. पो. डोंबलेवाडी ( आमच्या गावात पोस्ट हापीस नाय. लिवायचं म्हुन लिवलं.)

फुस्स's picture

2 Feb 2009 - 12:30 pm | फुस्स

असेल्का विचारुन्शहार्लोमनात्मी

जसे म्हटले आहे तसे लिहिले असते तर अर्थच कळला नसता. शेवटची ओळ सुधारायला हवी.

च्या मारी.
चांगल्या कवितेची वाट लागत्ये फूटपट्टीने मोजमापे घेऊन. कविता चांगलीच आहे.

दशानन's picture

2 Feb 2009 - 1:24 pm | दशानन

बापरे किती ही चिरफाड =))

मस्त कविता !

आपल्याला तर आवडली बॉ... ते छंद / राग / यमक काही समजत नाहि.. पण मनाला भावली म्हणजे आवडली हा एकच नियम माहीत आहे.

*******

वाटते खरडावे इतके की कंटाळा तुला यावा
वाचता वाचता एकाएकी तोल तुझा जावा
धुमसत संतापाने लाखोली तू मला वहावी
त्या शिव्यांची ती खरड मी
जणू स्मृतीचिन्हांपरी जपावी -

फुस्स's picture

2 Feb 2009 - 1:37 pm | फुस्स

सहमत.

जेव्हा कविता आवडते तेव्हा ते ताल छंद वगैरे बाजूला ठेवायला हरकत नाही.

धनंजय यानी ते मेट्रो.. का काय ते इथे आणले नसते तर कदाचित एवढी चिरफाड झाली नसती.

संदीप चित्रे's picture

2 Feb 2009 - 7:59 pm | संदीप चित्रे

>> नि मागे धुक्याच्या कुणी गुप्त छद्मी
असेल का? विचारून शहारलो मनात मी

या ओळी तर खासच आहेत धनंजय.
कविता अजून ऐकू शकलो नाहीये पण जमेल तेव्हा लगेच ऐकीन.

चतुरंग's picture

2 Feb 2009 - 9:44 pm | चतुरंग

एका धुकट, बर्फाळ सकाळच्या कुंद वातावरणात तुला सुचलेली ही कविता भुजंगप्रयातात आणि लयीत बसवण्याचा प्रयत्न अतिशय स्तुत्य आहे. अभिनंदन!

चतुरंग

बेसनलाडू's picture

2 Feb 2009 - 10:14 pm | बेसनलाडू

कविता चांगली वाटली. दुसर्‍या कडव्यातील कल्पना विशेष भावली नि पहिल्या कडव्यातील साधेपणा आणि/किंवा चित्रमयता.
मात्रावृत्त, गेयतादी बाबींबद्दल सध्या तरी चर्चा करावीशी वाटत नाही; मात्र मात्रावृत्त गेयसुलभतेच्या दृष्टीने कल्पकतेने वापरण्याचा, त्यांच्या सुटसुटीतपणाबद्दलचा विसुनानांचा मुद्दा नक्कीच विचार करण्यासारखा वाटला.
(वृत्तबद्ध)बेसनलाडू

लिखाळ's picture

2 Feb 2009 - 10:23 pm | लिखाळ

कवितेतली पिशाच्चाची कल्पना आवडली. कविता मनात रुंजी घालत राहिल अशी नाही. विसूनानांनी बनवलेली आवृत्ती अधीक चांगली वाटली.
कविता वाचन छानच :)
-- लिखाळ.

सुवर्णमयी's picture

2 Feb 2009 - 10:26 pm | सुवर्णमयी

कवितेतला पंच माझ्यापर्यंत पोहोचला नाही. कविता चित्रदर्शी असली तरी ही कविता आधीच्या कवितांच्या तुलनेत कमी पडते असे मला वाटले. (इथे बर्फाळलेली सकाळ इत्यादी मी पाहिले आहे. त्यामुळे अपेक्षा उंचावली असेल.) आधुनिक कल्पना आणि शब्दाकरता भुजंगप्रयात इतर वृत्तांपेक्षा सोपे ठरावे. कवितेची फेरमांडणी धनंजय नक्की करू शकतील . ( मात्रावृत्त आणि मुक्तछंद हे नंतरचे पर्याय- त्याची गरज पडेल असे वाटत नाही. )

विसोबा खेचर's picture

2 Feb 2009 - 10:50 pm | विसोबा खेचर

आधुनिक कल्पना आणि शब्दाकरता भुजंगप्रयात इतर वृत्तांपेक्षा सोपे ठरावे. कवितेची फेरमांडणी धनंजय नक्की करू शकतील .

हम्म! च्यामारी आता आमच्या धन्याला कविता कशी करावी हेही तूच शिकव! :)

(एक्स मनोगती) तात्या.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

2 Feb 2009 - 11:18 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

छायाचित्र, कविता, काव्यवाचन आणि मना सज्जनाचा ठेका मस्तच !
येऊ दे अजून !

-दिलीप बिरुटे

llपुण्याचे पेशवेll's picture

2 Feb 2009 - 11:19 pm | llपुण्याचे पेशवेll

छान कविता. आवडली. आणि घाटपांडेकाकांचा प्रतिसाद मनाला चटका लावून गेला.

पुण्याचे पेशवे
एरवी सगळे कागद सारखेच. फक्त कागदाला अहंकार चिकटला की त्याचे सर्टीफिकेट होते.
Since 1984

रामदास's picture

2 Feb 2009 - 11:50 pm | रामदास

प्रांत नसल्यामुळे त्याबद्दल काही बोलू शकत नाही.मला कविता आवडली.मुक्तकासारखी असती तरी आवडली असती.
अवांतरःधुक्याचा पडदा नेहमीच गूढ वाटतो.(अर्थात आमच्याकडे मुंबईत धुके पडणार ते काय ?)
त्यामुळे शॉवर कर्टनवरचे धुके माझ्या कल्पनाशक्तीला आव्हान देते.

मीनल's picture

3 Feb 2009 - 12:09 am | मीनल

चित्र पहायला मिळण , कविता वाचायला मिळण आणि मग ती ऐकायला ही मिळण ....
एकूणच सर्व मस्त आहे.

शिवाय त्या कविता लेखनाच्या विषयी माहिती ....

मला अश्या लोकांचा हेवा वाटतो.
कस काय जमत सगळ?
ग्रेट.

कविते बद्दल ...
कल्पना मस्त आहे. पण वाटत की ती मात्रा,वृत्त त्या मुळे सहज झाली नाही. कल्पना ओढून ताणून शब्दात बसवल्यासारखी वाटते.
मी हे ही मान्य करते की मला हे जमत नाही.
कल्पनाच येत नाही .ओढाताण तिथ पासूनच सुरू होती.
त्यामुळे मला दुस-यांचे कौतुक वाटते.

मीनल.

प्राजु's picture

3 Feb 2009 - 12:18 am | प्राजु

कविता आणि त्यावरची चर्चा.. दोन्ही इंटरेस्टींग.
कविता गूढ आहे.. पण कल्पना सुंदर आहे.
दुसरे कडवे थोडे खेचा खेची केल्यासारखे वाटते आहे.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

विसोबा खेचर's picture

3 Feb 2009 - 12:40 am | विसोबा खेचर

चाचणी प्रतिसाद..

सभासदांच्या 'प्रतिसाद टाकता येत नाही..' या तक्रारीनुसार हा चाचणी प्रतिसाद. क्षमस्व..

तात्या.

ऋषिकेश's picture

23 Feb 2010 - 9:33 am | ऋषिकेश

कविता चांगली.. दुसरे कडवे काहिसे फसले आहे (त्यावरचे एक्प्लनेशन वाचले पण कळले नाहि) ह्या प्रमोदकाकांच्या मताशी सहमत

ऋषिकेश
------------------
इथे दुसर्‍यांच्या ब्लॉगची जाहिरात करून मिळेल. योग्य बोलीसह संपर्क साधावा.

sur_nair's picture

25 Feb 2010 - 6:57 am | sur_nair

पदार्धाची चव अनुभवण्यापेक्षा recipe पाळली का नाही याची चर्चा करण्यात काय अर्थ आहे? आवडलं तर खावं नाहीतर नको म्हणावं आणि पचेल ते खावं. बंधनांच्या चौकोनातच सदैव बसवायचे ठरवले तर नवीन कलाविष्कार वगैरे कधी शक्यच नाही होणार, मग ते काव्य असो वा पाककला.

अक्षय पुर्णपात्रे's picture

25 Feb 2010 - 9:22 am | अक्षय पुर्णपात्रे

कविता पहिल्यांदाच वाचली. दुसरे कडवे कृत्रिम वाटले.