मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

बैदा रोटी

गणपा · · पाककृती
गेल्या वर्षी पावसाळ्यातच एके रात्री बडेमियाँला भेट दिली. त्यावेळी हा पदार्थ पहिल्यांदा चाखला. खरपूस भाजलेली ती बैदा रोटी अन रिमझिम बरसणारा पाऊस कायम आठवणीत राहिल. काल ते जुने फोटो चाळताना, लेकीने फरमाईशवजा प्रश्न टाकला 'बाबा तुला बैदा रोटी येते का रे?' गेले दोन आठवडे इथे पाऊस ठाण मांडून बसलाय. मनात म्हटलं मौका है, मौसम भी है, फिर दस्तुर तो निभानाही पडेगा ना. :) साहित्यः रोटीसाठी  १ कप मैदा. १ लहान चमचा मीठ. १ अंडे २-३ चमचे तेल. सारणासाठी   २ मध्यम कांदे बारीक चिरलेले. २ लहान चमचे जीरं पुड, धणे पुड, लाल तिखट, मसाला, तेल, आलं-लसुण वाटण प्रत्येकी. कोथिंबीर, हिरव्या मिरच्या आवडी नुसार. १/२ किलो खिमा. २ अंडी.  पातीचा कांदा आणि टॉमेटो. (आवडत आसल्यास.) कृती :    एका भांड्यात मैदा चाळून घ्यावा. त्यात चवीनुसार मीठ घालून, एक अंडे फेटुन घालावे. थोडे थोडे पाणी घालत मैदा मळून घ्यावा. (मी अंड घालायला विसरलोय हे लेकीने नजरेस आणून दिले. ) मैदा ओल्या कापडाखाली झाकून, सारणाच्या तयारीला लागावे.   कढईत तेलावर कांदा मिरची परतून घ्यावी. आलं-लसणाचं वाटण टाकून त्याचा कच्चट वास जाई पर्यंत परतावं.   कांदा गुलाबी झाल्यावर मग त्यात सर्व मसाले टाकून बाजून तेल सुटेपर्यंत परतावं. चवीनुसार मीठ घालावं. नंतर त्यात खिमा टाकून मोठ्या आचेवर ४-५ मिनिटं ढवळावं. खिमा अन मसाला व्यवस्थित एकजीव झाला की आच लहान करावी. भांड्यावर झाकण ठेवून खिमा शिजवून घ्यावा.   झणझणीतपणा वाढवण्यासाठी मी २ चमचे कोल्हापुरी मसाला टाकला. झाकण काढल्यावर जर आत पाणी सुटलं असेल तर आच वाढवून पाणी आटवावं. वरुन कोथिंबीर पेरुन गॅस बंद करावा.   दोन अंडी फेटून बाजूला ठेवावी. आवडीनुसार पाती कांदा, टॉमेटो बारीक चिरुन ठेवावा.     ओट्यावर थोडं तेल लावून त्यावर मैद्याचा एक लहान गोळा ठेवून हाताने त्याची पातळ रोटी करावी. त्यावर डाव-दोन डाव(मोठा चमचा) खिमा पसरवावा. टॉमेटो, पातीच कांदा टाकावा. त्यावर २-४ चमचे फेटलेलं अंडं घालावं. रोटीच्या कडा आत मुडपून हवा तो आकार द्यावा.   ही रोटी अलगद उचलून तापलेया तव्यावर मध्यम आचेवर खरपूस भाजून घ्यावी. गरमागरम बैदा रोटी, आवडीच्या डीप सोबत सर्व्ह करावी.

वाचने 67035 वाचनखूण प्रतिक्रिया 94

In reply to by रुस्तम

प्रचेतस Mon, 07/04/2016 - 08:30
सादरीकरण नेहमीप्रमाणेच उत्कृष्ट.

In reply to by अनन्न्या

पिलीयन रायडर Mon, 07/04/2016 - 19:52
करुन पाहिला Paneer घरात मैदा नव्हता म्हणुन कणीक वापरुन पाहिली. अंड घातलं पण अर्थात त्याने फार असा फरक पडला नाही. पण पराठ्यांपेक्षा पटकन होणारा पदार्थ! आणि सारणाने पराठा फुटतो लाटताना, ते ही होत नाही. आवडेश!!

चंपाबाई Sun, 07/03/2016 - 20:40
वांग्याबटाट्याचा खिमा घालुन करणेत येईल

In reply to by गवि

बोका-ए-आझम Mon, 07/04/2016 - 10:49
त्याला फक्त बडे याच नावाने ओळखतात. Actually विचारायचीही गरज नाही. कबाबांच्या खरपूस वासाने समजतंच!

In reply to by नूतन सावंत

धनंजय माने Mon, 07/04/2016 - 11:56
अब क्या बताये मोहतरमा, नाचीज का दिल ही बड़ा है और उससे बड़ी है अपने गणपा मियां की पेशकश जो इनाम की हकदार और काबिले तारीफ़ है...

बोका-ए-आझम Mon, 07/04/2016 - 10:37
बडे मियां तो बडे मियां गणपामियां सुभानल्ला! मैद्याऐवजी नुसती कणीक नाही ना चालणार? मैदा म्हटल्यावर थोडं खटकतं.

In reply to by बोका-ए-आझम

गणपा Mon, 07/04/2016 - 11:20
चालेल काय धावेलही. पण आपण हे पदार्थ काही रोज बनवत वा खात नाही. त्यामुळे मी कधीतरीच्या खाण्यात बाबतीत फारसा हेल्थ काँशस होत नाही. :) हा पण ज्यांना पथ्य सांभाळायचं असतं त्यांनी आपापल्या सोईनुसार बदल नक्की करावे.

गणामास्तर Mon, 07/04/2016 - 12:22
लै भारी.लवकरचं करून बघण्यात येईल. सोमवारी सकाळी असले धागे बघायचे म्हणजे हाल आहेत राव नुसते. कालचं वाशी कट्ट्याला जाताना बडे मिया ची आठवण झाली होती. बाकी ज्यांना वांगे,बटाटे,पडवळ फिडवळ टाकून ही पाकृ करायचीये त्यांनी जरूर करून बघा पण फोटू मात्र टाकू नका ही नम्र विनंती ;)

बाळ सप्रे Mon, 07/04/2016 - 12:48
एकदम अहाहा .. तुमची रेसिपी जास्त चांगली की फोटो हे अजून ठरवता येत नाहीये.. अरे .. आम्ही काही करायला घेतलं की स्वयंपाकघरात सगळा पसारा होतो.. फोटो काढण्यालायक रहातच नाही काही... एकतर रेसिपी बिघडते किंवा फोटो फोटोसेशन वेगळं करून घेता का? पण सगळ्या स्टेजचे फोटो असतात ..

सस्नेह Mon, 07/04/2016 - 12:48
बुरा हाल बनाया इन फोटोने. पाक-साहित्याची रांगोळी डोळ्यांना गुदगुल्या करतेय. मैदा खूपच पातळ केलेला दिसतोय. त्याची पोळी कशी काय लाटली आणि सारण भरल्यावर फाटली कशी नाही ब्र.

इरसाल Mon, 07/04/2016 - 12:50
का छळतोस रे "बाबा" ! डीप फ्रीज केलेले अ‍ॅल्युमिनियम फॉईल मधे लपेटलेले गरम करुन खाल्ले तर कसे लागतील. (जर चान चान लागत असतील तर दे पाठवुन वाट बघतोय कुरियर्ची)

सूड Mon, 07/04/2016 - 15:43
सुंदर पाकृ!! (परंपरेनुसार विचारायला हवं म्हणून) ही पाकृ रोटीशिवाय करता येईल काय? ;)

In reply to by सरल मान

धनंजय माने Mon, 07/04/2016 - 18:19
हेमंत लाटकर यांच्याशी संपर्क साधावा. बाकी ही लाटत नाहीत. किचन ओटा स्वच्छ करुन तेल लावून घेऊन त्यावर तेलाच्या हाताने मैद्याचा गोळा हळू हळू पसरवत न्यायचा. पुन्हा पाकृ बघताना लक्षात आलं की अल्जीरिया मध्ये असला प्रकार खाल्ला आहे. निव्वळ टोमॅटो सॉस लावून रुमाली घडी करुन भाजलं जातं. याचाच एक प्रकार पण खालचि पोळी साध्या डोश्यासारखि पातळ पण मऊ आणि त्यावर उकडून mash केलेला बटाटा, कांदा, अंडें फोडून, चिकन चे बारीक तुकडे, चवीप्रमाणं मीठ घालून घडी घालून त्याला डीप फ्राय करतात. पूराक/पुऱ्याक असं काही म्हणतात. कालच रितसर 'जलेबयाँ' बघितली. अगदी केशरी छान. खाद्यपदार्थांचा उगम आणि प्रवास कुठून कसा झाला असावा ते समजून घेतलं पाहिजे.

In reply to by सरल मान

गणपा Tue, 07/05/2016 - 08:31
जर शक्य असेल तर रुमाली रोटीप्रमाणे हातावर फिरवत फिरवत रोटी मोठी करावी. ते शक्य नसेल तर मग ओट्यावर चमाचाभर तेल पसरवून त्यावर गोळा ठेवावा आणि कडेकडेने थापत रोटीचा आकार मोठा करत न्यावा. काठ शक्यतो पातळच ठेवावे. उत्तराला झालेल्या दिरंगाईबद्दल क्षमस्व.

दिगोचि Tue, 07/05/2016 - 07:40
मी गेली दहा वर्षे स्वयम्पाक करायला सुरवात केली आहे. या पूर्वी म्हणजे लग्न झाल्यापासून ४० वर्षे तरी स्वयम्पाक केला नव्हता आता मधुन मधुन करतो त्यामुळे फारसे कौशल्य नसल्याने नीट जमत नाही. पण मी काल रात्री हा प्रकार केला. थोडा फार जमला लाटायला पत्नीची मदत घेतली. रोटीची चव छान जमली. कणीक करण्यात काय चूक झाली ते समजले पुढल्या वेळी जमेल असे वाटते. त्म्व्हा सान्गेन.

दिगोचि Tue, 07/05/2016 - 07:41
मी गेली दहा वर्षे स्वयम्पाक करायला सुरवात केली आहे. या पूर्वी म्हणजे लग्न झाल्यापासून ४० वर्षे तरी स्वयम्पाक केला नव्हता आता मधुन मधुन करतो त्यामुळे फारसे कौशल्य नसल्याने नीट जमत नाही. पण मी काल रात्री हा प्रकार केला. थोडा फार जमला लाटायला पत्नीची मदत घेतली. रोटीची चव छान जमली. कणीक करण्यात काय चूक झाली ते समजले पुढल्या वेळी जमेल असे वाटते. तेम्व्हा सान्गेन.

In reply to by दिगोचि

दिगोचि Fri, 08/05/2016 - 09:02
एक तारखेला केली होति मगल्यपेक्शा चान्गली जमली. आता मी मुलाकडे जाणार आहे तेथे करेन. मुलाना आवडेल असे वाटल.

सुनील Fri, 07/08/2016 - 08:22
कालच केली ही पाकृ. दोन बदल केले - मैद्याऐवजी गव्हाचे पीठ वापरले आणि रोटीवर खिम्यासोबत पुन्हा फेटलेले अंडे घालण्याऐवजी कणिक मळतानाच सगळी अंडी फेटून घातली.

सूड Tue, 07/12/2016 - 14:23
मी कणीकेची रोटी आणि पनीरचं सारण वापरुन या वीकांती केली होती, अप्रतिम झाली. कणीक अ‍ॅल्युमिनियम फॉईल वर लाटून मग सोडवत सोडवत घडी केली त्यामुळे पातळ लाटता आलं.

In reply to by यशोधरा

सूड Tue, 07/12/2016 - 21:44
ज्या मोबिले मध्ये घेतला होता तो गंडला पावसात भिजून. बाय द वे, सातकापे करुन पाह्यले. चार थर झाले आणि आम्ही इति अलम म्हणून तव्यावरनं उतरवले. त्या धाग्यावर टाकतो फोटु.

तेजस आठवले Mon, 08/01/2016 - 19:56
अभक्ष्यभक्षण करत नसल्याने पास. परंतु पाककृती आणि सादरीकरण नेहमीसारखेच जबरदस्त. ते शेवटच्या चित्रातले कांद्याचे कमळ कसे केले सांगू शकाल काय ? फारच सुरेख दिसते आहे.

Nitin Palkar Mon, 08/01/2016 - 20:30
पाक क्रुति इत्केच सादरीकरण भन्नाट!गण्पा भाउ तुम्हाला सलाम!!

तिमा Wed, 08/03/2016 - 11:30
कुठल्या वेळेला वाचला हा धागा ? लाळ गळून सगळा की बोर्ड खराब झाला. आता बडेमियाँला भेट देणं आलं.

यशोधरा गुरुवार, 08/04/2016 - 07:18
काल बैदारोटी करुन पाहिली. आयत्या वेळेस खिमा हाताशी नसल्याने पनीर आणि अंडा भुर्जी वापरली. आणि मैद्याऐवजी कणिक. तेलाचा वापर अतिशय कमी केला, कण्केची पाती लाटतानाही तेल नाही वापरलं. पातळ लाटून, त्यात सारण भरुन, कडा मुडपून तव्यावर जी बाजू येणार तिथे थोडं फेटलेलं अंडं लावलं. ती बाजू भाजून झाल्यावर, दुसृया बाजूसाठी तसंच केलं. . . . घरी आवडल्या ह्या रोट्या, त्यासाठी गणपा, तुला अनेक धन्यवाद. आता एकदा खिम्याच्याही बनवून पाहीन.

In reply to by यशोधरा

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे गुरुवार, 08/04/2016 - 09:55
कधी पुण्याला कट्टा झाला आणि आम्ही असलोच तर तर गरमा गरम आना प्लीज. भारी झाली बैदा रोटी सकाळी सकाळी तोपासू. -दिलीप बिरुटे