एक संघ मैदानातला - भाग ६
लेखनप्रकार
वाँर्मअप झाल्यावर मँचसाठी प्लानिंग करण्यासाठी आम्ही एकत्र गोळा झालो. आपापल्या प्लेस ठरवल्या, कोणी कशा रेड मारायच्या, साधारण पहिल्या ५ मिनिटांत काय करायचे, गेमचा स्पीड कसा कंट्रोल करायचा वैगरे ठरवून झाले. आता ग्राउंडच्या पाया पडून आम्ही उतरणार तेव्हढ्यात जागुने परत बोलावले आणि आत अजून एक टी-शर्ट घातला आहे ना विचारले. हे ऐकल्यावर गीताचं डोकच गरम झालं, " ऐ आक्का आता चल ना... का बाहेरच डोक पिकवतेस ?? ती पोर खेळायला आली आहे.. तुला मला घरी न्यायला नाही.." त्यावर जागुने जळजळीत नजरेने तिला उत्तर द्यायचा प्रयत्न केला पण गीताने नजरच वळवली. मात्र हे ऐकून दीप्ती मध्येच पचकली, " तुम्हाला घरी न्यायला काय दिवस भरलेत त्यांचे.. आणि तसही तुम्हाला नेउन त्यांना मिळणार काय लाथा आणि शिव्या.." ऐ... गपंय मोडके... जास्त बोलू नको.. तू काय वकील आहेस का त्यांची कि तुझा कोणी छावा आहे तिथं..." गीतानं दीप्तीला भोसडलं. दीप्ती एकदम गपगार झाली. दीदी शांतपणे सगळ ऐकत होती. सगळे मैदानात आलो मैदानाला नमस्कार करून उतरलो. टॉस उडवला तो आम्ही जिंकला… आम्ही ग्राउंड घेतलं म्हणजे पहिली रेड ते करणार होते. दोन्ही टीमने कव्हर फिरवली. रेफ्री म्हणून बापू उभे होते.
शिटी वाजली आणि रेडला सुरुवात झाली. त्यांचा मेन रेडर आला कव्हर नाचवून बोनस टाकून गेला. आमच्याकडून पहिली रेड रूपाने केली. तिनेही कव्हर नाचवली आणि जशास तसं उत्तर देत बोनस करून आली. मग पुढच्या काही रेड एकमेकांचा अंदाज घेत नील गेल्या. १-१ स्कोर बोर्ड तसाच होता. आम्ही टाईम आउट घेतला. त्यात हाफ टाईम पर्यंत थोडा गेम स्पीड करूया असे ठरवले. मला राईट कॉर्नरवरून काही पकडी करता येण्याजोग्या होत्या मला त्याची कल्पना संजूला द्यायला गेले तर संजा परत हवेत तरंगायला लागली होती सालीच मँच मध्ये लक्षच नव्हतं, " ऐ चंपा.. इकडे बघा ना.. आपली मँच इथे सुरु आहे गं... तुझी मँच खेळना नंतर.." संजूने माझ्याकडे पाहत म्हंटलं "हा बोल काय म्हणतेस..." " अग मला तो लंबू सेकंडला स्टेपिंग करताना मिळतोय... मी तुला काँल करते तयार राहा" संजूने मान डोलावली खरी पण ती येईल का नाही मला शंका होती. टाईम आउट संपला गेम परत सुरु झाला. आमची रेड होती, रेश्मा रेडला गेली, ह्यावेळी मात्र राईट टर्नने तिला डँश दिला आणि १ पाँइन्ट घेतला. बहुतेक दोन्ही संघाचे प्लान सेम होते. आमच्या रेड नंतर त्यांची रेड सुरु झाली. माझ्या रेंजमध्ये तो लंबू येताच मी त्याला शाँर्टब्लॉक लावला. पकड सक्सेसफुल झाली. असेच एक एक पाँइन्ट घेत हाफ टाईमला स्कोर १२-१३ होता म्हणजे मुलांची टीम १ ने लीड करत होती. आम्हाला वाटलं होत कि आमचं ह्या पोरांबरोबर पानिपत होणार त्यापेक्षा आमचा खेळ बराच बरा होत होता. खर तर खेळाच्या आधी आपल्याला मुलांबरोबर खेळायचं आहे किंवा जागूने दिलेल्या कपड्यांच्या सूचनांमुळे थोडंस दडपण आलं होत. पण समोर आपल्यासारखे फक्त प्लेयर्स आहेत आणि आपल्याला त्यांना हरवायचं आहे असा विचार केल्यावर मग तो मुलगा आहे कि मुलगी हा विचार मनातून बाजूलाच झाला. संपूर्ण ग्राउंडवर फक्त कबड्डी ... कबड्डी असा दमचा आवाज, शिटीचा, मांड्यांवर पडणाऱ्या थापा, मुलींचा " हिssss बघ" किंवा "हिssss घे" आणि मुलांचा " हाssss " एवढाच आवाज होता.
हाफ टाईमनंतर गेम सुरु झाला. आप्पांनी आम्हाला प्लेस बदलून खेळण्याची सूचना केली. आम्ही त्यानुसार प्लेस बदलल्या पण पुढच्याच रेडला आमचा पकडीचा प्रयत्न फेल गेला आणि आमची कव्हर ३ ची झाली. आता हाणामारीला सुरुवात करावीच लागणार होती नाही तर लोण अटळ होता. पण सुदैवाने रुपाला २ पाँइन्ट मिळाले. असेच पाँइन्ट देऊन तर कधी घेऊन शेवटच्या मिनिटाला २ चा लीड घेत मुलं पुढे होती. शेवटच्या मिनिटात आम्हाला २ रेड मिळणार होत्या आणि त्यांना १. सगळा भर बोनसवर द्यायचा असं आम्ही टाईम आउट घेऊन ठरवलं. पहिली रेड रेशमाने केली तिने पटकन बोनस टाकला आणि परत आली. आता त्यांची रेड सुरु झाली. तो स्टेपिंग करत असताना दिप्तीने घाई केली आणि त्याचा पट काढायला गेली आणि आमच्याकडून १ पाँइन्ट गेला अणि परत २ चा लीड झाला. लास्ट रेडला दीदी गेली तिने बोनस केला आणि अजून १ पाँइन्टसाठी प्रयत्नात असताना ती फसली. मागून कव्हर आली तिचे लक्ष नव्हते त्यामुळे ती फसली आणि त्याच वेळी शिटी वाजली. १ पाँइन्टने ते जिंकले आणि आम्ही हरलो. एकमेकांना शेकहेन्ड केला आणि ग्राउंडच्या बाहेर पडलो. आपण अगदीच बेकार खेळलो नाही ह्याच समाधान होत पण थोडं अजून जोर लावला असता तर नक्की जिंकलो असतो हा विचार प्रत्येकाच्या मनात होता. एकमेकींच्या पाठीवर कौतुकाच्या आणि शाबासकीच्या थापा मारल्यावर दीप्तीच्या डोक्यात आगाउपणाबद्दल टपल्या देखील मारल्या. तिच्या पट काढायच्या घाईमुळे आम्ही हरलो होतो ना.. ! पण एकूण खेळ समाधानकारक झाला होता. ज्या पोरांसमोर अगदी आमचं भुस्कट पडणार असं वाटल होत त्यांना देखील जिंकायला धूर काढावा लागला ह्याचंच समाधान होत. जागुला वाटत होत तशी मुलं नाही खेळली ती अगदी प्लेयर्स सारखंच खेळली. कलकलाट करत आम्ही चेंज करायला गेलो.
आता उद्याची प्रँक्टीस आणि परवा निघायचं…
क्रमशः
एक संघ मैदानातला - भाग १ http://www.misalpav.com/node/35830
एक संघ मैदानातला - भाग २ http://www.misalpav.com/node/35846
एक संघ मैदानातला - भाग ३ http://www.misalpav.com/node/35878
एक संघ मैदानातला - भाग ४ http://www.misalpav.com/node/35893
एक संघ मैदानातला - भाग ५ http://www.misalpav.com/node/35924
वाचने
3773
वाचनखूण
प्रतिक्रिया
16
चलो, गुड. आता स्पर्धेतल्या मोठ्या सामन्यासाठी संघाला शुभेच्छा!
छान लेखण. हा पण भाग आवडला.
कुणी खेळातले जाणकार ह्यातल्या काही अनोळखी वक्प्रचारांचा अर्थ प्रतिसादांतून सांगेल तर अजून समजण्यास मदत होईल.
जसं की ??
In reply to जसं की ?? by शि बि आय
ग्राउंड घेतलं
कव्हर नाचवून
सेकंडला स्टेपिंग करताना
शाँर्टब्लॉक
लोण अटळ होता.
नाही मिळाले तरी हरकत नाही. तुमचं लेखन असंच प्रवाही आणि तुमच्याच भाषेत असूद्यात. नुसतं शब्दांच्या साउंडींगवरुनही चित्र उभी राहतात. मी इथे असं विचारायला घाबरत होतो कारण तुमच्या लिखाणाच्या मूडमधे "वाचकांना समजेल काय?" ही भावना लूडबुड करु नये असे वाटते.
In reply to ग्राउंड घेतलं by तर्राट जोकर
बघा. खरोखर चांगली commentary असते. शिवाय visuals असतात त्यामुळे ते लगेच समजतंही.
In reply to प्रो कबड्डी लीग by बोका-ए-आझम
कबड्डी या अस्सल खेळाला समजून घेण्यासाठी प्रो कबड्डी नामक सर्कशीचा आसरा घ्यावा लागतोय का काय? ;)
(आयपीएल सारखं आहे ना काही?)
In reply to कबड्डी या अस्सल खेळाला समजून by वैभव जाधव
आयपीएल म्हणजे आधीच लोकप्रिय असलेल्या क्रिकेटला अजून लोकप्रिय करण्यासाठी आयोजित करण्यात आलेलं असल्यामुळे त्यात सर्कस जाणवते पण प्रो कबड्डी किंवा क्रिकेट सोडून इतर कुठल्याही खेळाच्या league format मध्ये ती सर्कस वाटली नाही.
In reply to ग्राउंड घेतलं by तर्राट जोकर
लोण अटळ होता.लोण बोले तो एका टीमचे सातही प्लेअर्स आउट होणे/बाहेर जाणे. हे झालं की विरोधी टीमला २ अधिकचे पॉइंट्स मिळतात आणि या टीमचे सगळे प्लेअर्स परत आत येतात.
शाँर्टब्लॉकरेडरची पकड करण्याची एक मूव्ह.
In reply to लोण अटळ होता. by अनुप ढेरे
धन्यवाद अनुपजी. :)
लेखमाला छान सुरु आहे.
आत्येबहिण राज्यस्तरीय ला खेळली होती.
कबड्डी सामने बघितले आहेत त्यामुळे सगळं चित्र डोळ्यासमोर दिसतंय. मस्तच!
आवडलय लेखन..
पुढच्या भागाची उत्सुकता वाढली आहे..
जबरदस्तं! सगळं डोळ्यासमोर उभं राहिलं!
भारीच. डायरेक्ट मॅचच येइल बहुतेक आता. इंटरेस्टींग झालीय लेखमाला.
वाचायला मजा येतिये. पुढच्या भागांच्या प्रतीक्षेत. तर्राट जोकर म्हणाले त्याप्रमाणे खास कबड्डीच्या शाब्दांचे अर्थ टाका म्हणजे आम्हाला जास्त मजा येईल वाचायला.
अगदी थेट मैदानावरून "आंखो देखा" वाटले..
पु भा प्र नाखु
तुमच्या प्रतिसादाबद्दल खूप धन्यवाद.. ! ह्यापुढे अशा की हटके शब्दांचे अर्थ सांगायचा नक्की प्रयत्न करेन.
ग्राउंड घेतलं - टॉस उडवल्यावर एखाद्या संघाकडे २ ऑप्शन असतात
१) चढाई करणे किंवा २) क्षेत्ररक्षण स्वीकारणे म्हणजेच ग्राउंड घेणे
कव्हर नाचवून - चढाई करणारा खेळाडू बोनस करण्यासाठी किंवा खेळाडू आउट करण्यासाठी क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाची कव्हर डीसबँलेंस करतो किंवा ती डीसबँलेंस करायच्या दृष्टीने स्टेपिंग करणे
चलो, गुड. आता स्पर्धेतल्या