मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

गोठान (वर्‍हाडी) (मराठी भाषा दिन २०१६)

ऊध्दव गावंडे · · लेखमाला
माया गावाचं गोठानं हाये किती शानदारं मोठ्ठं झाळं पिपयाचं त्याची सावली भर्दारं माया गावाचं गोठानं थंड हवेचं ठिकानं ढोरं, मान्सं उनायातं झोपं घेतातं सुखानं माया गावाचं गोठानं हौदं भरला पान्यानं ढोरं, वासरं पेतातं पानी मोकाट मनानं माया गावाचं गोठानं काई लोकाचं मायेरं ऊभा दिवसं तथीसा सारे हायेतं तयारं उनं चित्याले कोनाचं नाई दुसरं ठिकानं मनं मोकयं पनानं माया गावाचं गोठानं खोळ्या कर्याले कोनाच्या नाई दुसरं ठिकानं चिट्या चिकोर्या कर्याले माया गावाचं गोठानं तंटे भांडन कर्याले नाई दुसरं ठिकानं मायं बहिनं काळ्याले माया गावाचं गोठानं माया गावाचं गोठान आक्क्या बनलं मोकाटं सज्जनाईले ते आता नाई टोचू देतं नाथं

वाचने 19124 वाचनखूण प्रतिक्रिया 25

नीलमोहर Fri, 02/26/2016 - 17:14
किती गोड वाटते ही भाषा , खानदेशी असूनही एवढी सुंदर भाषा नीट येत नाही याचं फार दु:ख होतंय.

अहिराणी ही भाषा खान्देशात वेगवेगळ्या प्रकारे बोलली जाते,सटाना साक्री भागाची वेगळी,जळगाव भुसावळ चोपडया ला वेगळी,शिरपुर शहादा जिथे पावरा आदिवासींचे प्रमाण लक्षणीय आहे तिथे पावरी गुजराथी अहिराणी मिक्स।गावंडे साहेबांची ही कविता जळगाव च्या बोलीभाषेत आहे वाटते, मला अहिराणी येत असली तरी त्याबद्दल जास्तीची माहिती नाही, गावंडे साहेब खांदेशी दिसताहेत त्यांना जर ह्यबद्दल जास्तीची माहिती असेल तर त्यांनी ती द्यावी.

चांदणे संदीप Fri, 02/26/2016 - 19:10
उत्तम कविता. बहिणाबाईञ्चा वारसा गावंडे साहेब समर्थपणे पुढे नेत आहेत. दुसर कोणी अशा भाषेत आणी इतक दमदार लिहिणार माझ्यातरी पाहण्यात नाही!
तंटे भांडन कर्याले नाई दुसरं ठिकानं मायं बहिनं काळ्याले माया गावाचं गोठानं
सर्वच गोष्टी अगदी मोकळेपणाने कवितेत आणल्याबद्दल विशेष कौतुक! Sandy

ऊध्दव गावंडे Fri, 02/26/2016 - 20:25
धन्यवाद! मित्रांनो... ही वर्हाडी बोली आहे, जी प्रामुख्याने अकोला,अमरावती,वाशीम,बुलढाणा,यवतमाळ जिल्ह्यात बोलली जाते. वर्हाडी आणि खानदेशी बोली मध्ये बरंचसं साम्य आहे. काही मित्रांना शेवटच्या कडव्या मधील शब्दांनी अडवून ठेवलय त्यांची सुटका करु या. आक्क्या - गावात मोकाट सुटलेला सांड नाथ - वेसन शेती कसण्या करिता आपण बैल उपयोगात आणतो त्यांना वेळ प्रसंगी आवरण्या साठी त्यांच्या नाकातून सुती धाग्यांपासुन बनवलेली वेसन कामात येते. परंतु या आक्क्यांच्या नाकात असे काहीच नसते.त्या मुळे आपण त्यांना आवर घालू शकत नाही. पुन्हा एकदा धन्यवाद!