काकणे आणि गाळ
लेखनविषय:
काळोखभरल्या वाटेवर
पाऊल जपून टाक
अनाहूत पडलेल्या उल्केचा
खडा पायात शिरेल
अन्
तुझ्या अस्फुट हुंदक्याने
संभोगनिद्रेतले गाव जागे होईल.
कासाराच्या उकिरंड्यातल्या
फुटक्या काकणांची पोरींनी
तोरणे केलीत
वा-याच्या झुळकीला चुकवून
पुढे हो
वारा वळला तर काकणे
किनकिनतील अन्
मन मारणा-या विधवांना
शृंगारस्वप्ने पडतील.
लुगडे जरा वर उचल
लाजेचे भय तुला आहे
अंधारास नाही
चुकुन पाय अडकेल
अन्
धुळीचे लोट उठुन
वखवखलेल्या कुत्र्याना
जागे करतील
तेव्हा मात्र अंधारपण लाजेल.
नदीत पाय रेट
उचलून टाकु नकोस
खळखळाटात सोनेरी माश्यांबरोबर
मनुष्य मांसाला चटावलेल्या
सुसरीही उठतील
मग मात्र गाव सोडणे अवघड होईल.
वेशीतल्या गावदेवाकडे
बघुही नकोस
त्याची नजर असतीच तर
असे विटाळलेले शरीर घेऊन
तुला गाव सोडावेच लागले नसते.
पिके भरलेल्या शेताडीतुन
हळूच चाल
ओल्या लोंब्या उगाच
दाणे ओघळतील
ते पायाखाली चिरडताच
त्यातील दुधाळ स्पर्शाने तुला
मातृत्वाची जाणीव होईल
मग हेतू साध्य होणार नाही.
आता समोर आहे घाटिव विहीर,
कित्येक शतकांपासून इथे
सतींनी पावित्र्य अर्पण केलय
तुही कर !
कुंकू मातिमोल झालं
असतानादेखील, तू
फुलं माळलीस भाळी
तो मोहगंध अन्
विटाळलेले शरीर,
त्याग
ह्या विहिरीत
तुझा कित्ता गिरवत
कितीतरी नासलेली शरीरे
पवित्र होतील
अन्
समाज पापे करण्यासाठी
ह्या विहिरीतला गाळ काढील
तेव्हा मात्र पिचलेली
काकणे खणखाणतील.
विजयकुमार..............
१२ / ०४ / २००९ , मुंबई
वाचने
4233
वाचनखूण
प्रतिक्रिया
22
हरिओम!
भयानक आहे सगळ! :-/
काही प्रश्न मनात आहेत...
हे असलंच लिहिता का तुम्ही?
कधीपासून लिहिता?
कुठे पुस्तकरूपात प्रसिद्ध केलेत का?
अशा प्रकारच्या लेखनाची प्रेरणा कुठे मिळाली तुम्हाला?
इथेच तुम्हाला संमिश्र प्रतिक्रिया मिळताना पाहिल्यात, टोकाच्या प्रतिक्रिया आल्यावर तुम्हाला नेमके काय वाटते?
वेगळ काही लिहिण्याचा प्रयत्न केला आहे का? भविष्यात करणार का?
अजून आहेत पण थांबतो... (एकदम परेश रावल टाईप (जुदाई) व्हायला लागलंय!)
उत्सुकता म्हणुन विचारतोय...
Sandy
In reply to हरिओम! by चांदणे संदीप
हम्म.
यईच सवाल.
In reply to हरिओम! by चांदणे संदीप
मी असे का लिहितो ? मलाच माहिती नाही. एकमात्र ठामपणे सांगीन जगण्याकडे मी तटस्थ वृत्तीने बघतो, कोणताही चष्मा न लावता. मुळात माझे बालपण ७ते ८ वर्षे गावात गेले तेही कर्मठ वातावरणात. पुन्हा शहरात आलो. इथेल नि गावाकडचे जगण्याचे संदर्भ वेगळे होते. त्यातून घुसमट वाढली. नको त्या वयात बरेच कळायला लागले. प्रेरणा म्हणाल तर माझे जगणे आणि माझ्या आजूबाजूला घडणा-या घटना हे होय. काही जरुरी नाही कि हे सगळे माझ्या बाबतीत घडलेले असेल परंतु माझी सभोवती जे घडत होते त्याचे प्रतिबिंब कवितेत उठणे स्वाभाविक होते.
फार पूर्वीपासून लिहित आहे परंतु असले कोण वाचेल ? लोक टिका करतील ह्या भीतीतून नंतर ते नष्ट करयचो. मला खरा सूर सापडला ओर्कुटवर . ओर्कुट वरच्या तुमच्या सारख्या मित्रांचे आणि अविनाश काका सारख्या लोकांचे आभार.
नाही पुस्तक रूपाने प्रसिध्द करावेसे वाटले नाही कारण एक लोक पैसे मागून प्रसिध्द करतो म्हणतात ते मला जमत नाही आणि आहो कविता वाचणारे तेही विकत घेवून असे किती लोक आहेत आपल्या मराठी समाजात ?
तुम्ही म्हणता तश्या प्रतिक्रिया ओर्कुट वर पण येत होत्याच कि पण तिकडे कसे सगळे कवितेचे वाचक होते. इथे थोडी मिसळ आहे. काही लोक खरोखर कविता वाचतात. प्रतिक्रिया देतात. मी प्रतिक्रियेवरून काही ठरवत नाही पण चुकीची पर्त्क्रिया चुकीच्या माणसाने दिली तर उत्तर जरूर देतो.
खरे सांगू तुम्हास माहिती हि आहे इतक्या कविता लिहिल्यात आता इतक्या कमी शब्दात लिहावेसे वाटत नहि. बहुतेक मी आता गद्यात लिहिणार आहे . लवकरच सुरुवात करणार. तेही माझ्या जीवनावर, आजुबाजूच्या घटनांवर आधारित असेल इतकेच
In reply to संदीप by पालीचा खंडोबा १
कविता वाचणारे तेही विकत घेवून असे किती लोक आहेत आपल्या मराठी समाजात ?मी एक त्यातला आहे हे नम्रपणाने सांगू इच्छितो! तुमच्याही कवितांचे पुस्तक व्हावे अन ते माझ्या संग्रही असावे असे मला वाटते. सगळ्याच नाही पण काही कविता पुन:पुन्हा वाटेल तेव्हा हातात घेऊन वाचायला आवडतील. लिहित राहा!
बहुतेक मी आता गद्यात लिहिणार आहे . लवकरच सुरुवात करणार.यासाठी तुम्हाला खूप शुभेच्छा! तेही माझ्या जीवनावर, आजुबाजूच्या घटनांवर आधारित असेल इतकेच हेच हवं आहे! जे दिसत, जाणीवेस शिवत ते लिहावं याच मताचा मीही आहे! आपल्या उत्तराबद्दल धन्यवाद! Sandy
In reply to आवडले! by चांदणे संदीप
खूप इछा आहे पुस्तक करावे परंतु करणार कोण ? आणि पैसे देवून प्रकाशित करणे म्हणजे bollywood झाले आपल्याच मुलाला आपणच सिनेमा काढून प्रसिद्धी देणे. बघू या भेटले तर प्रकाशित करीन पण ! पण एक नक्की गद्य लिखाण प्रसिध्द करणारच . लिहिणे लवकरच चालू करीन
कविता पुनःपुन्हा वाचली. एकएक कडवे वाचताना अंगावर शहारे आले. 'गोलपिठा' आठवलं. मन घट्ट करून ऐकलेल्या काही कथा पुन्हा आठवल्या.
फक्त एक सुचवतो - विटाळ हाच मुळात वाईट नाही. त्यातही शरीर किंवा मन हे विटाळू शकत नाही. तुमच्यावर हे जे आघात होतात त्यांच्या जखमा मनात कायम ठसठसत ठेवत रोजच मरणं चुकीचं असतं. त्यातून बाहेर यायला हवं. समाजात काही चांगले, सहृदय लोकही असतात. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे, स्वतःला दोष देणं थांबवलं पाहिजे.
असो... लिहीत रहा. फक्त 'ढसाळ' आणि 'ग्रेस' या दोन्ही स्कूल्स ऑफ पोएट्रींचा मेळ घालू नका. वाचक अचंब्यात पडतो. हाती धड हेही लागत नाही की तेही. आपुलकीने सांगितलं. राग मानू नका.
____/\____
निशब्द.
मस्तच!!
खल्लास!!
पण सगळ्या कविता जुन्या आहेत राव! तुमच्याकडे भरपुर स्टॉक असणार त्यांचा!
नवीन , सध्या काही लिहीलेले पण येऊ द्या की राव!
प्रथम माफी मागतो..पण कविता वाचून उत्तर द्यावेसे वाटले...किती दिवस विहिरी जवळ करायच्या..
;(
तुमची कविता फारच disturbing आहे..आणि खूपच उच्च दर्जाची आहे..मी फक्त तळतळ बाहेर काढतोय..
काळोखभरल्या वाटेवर
खुशाल उमटव
तुझ्या तप्त, जळणार्या पावलांचे ठसे
जाळून टाक पायातल्या सर्व काट्यांना
आणि तुझ्या कर्णभेदी आक्रोशाने
संभोगनिद्रेतल्या गावाच्या सोंगाचे होउदेत चिथडे..
ठाम उभी रहा आपल्या वाटेवर
पदर कमरेला खोचून...
पुढल्या वेळी जेव्हा...
कुत्र्यांचे पाय तुझ्याकडे वळतील
तेव्हा तिथे..
एक वावटळ उभी दिसू दे त्यांना
आणि अजून एक नक्की कर..
गावाबाहेरची पण तरीही जवळची वाटणारी ती विहीर आहे ना..
ध्वस्त करून टाक ती..
एक एक वीट तिची जशी निखळेल..
तशी वर्षानुवर्षे पिचत पडलेली आतली काकणे
खणाणून बळ देतील तुला...
सार्या गावाची पापे जाळायला
In reply to कविता फारच अंगावर आली!! by सटक
सटक जी, फारच चांगलं लिहिलेत तुम्ही. किती दिवस समाजाचे पाप आपल्या माथ्यावर घेऊन विहिरी जवळ करायच्या ? आणि कशासाठी ? काही गरज नाही. ज्याचं माप (की पाप ?) त्याच्याच पदरात टाकणे हेच उत्तर पाहिजे.
In reply to ये हुई न बात ! by सौन्दर्य
धन्यवाद! थोडे अस्थानी असले तरी स्वीकारतो!! खरोखरच संताप झाला वाचून म्हणून लिहिले... हे मूळ कवितेचेच यश आहे!
उत्तम आहे.
-दिलीप बिरुटे
तरी पण त्रास देऊन गेली.
कविता चांगली आहे. पण आता ट्रॅक खरंच बदला काही दिवस. सटक यांची कविता जास्त आवडली. खरंच आहे, किती दिवस, किती वर्षे विहीर जवळ करणार? कधीतरी त्या विहिरी बुजवून टाकल्या पाहिजेत. आणि काकणं पिचवणारा हात दुसर्या कोणीतरी पुढे होऊन अडवला पाहिजे.
In reply to कविता चांगली आहे by पैसा
काकण पिचवणारा हात आपणच पिरगाळून तोडून टाकला पाहिजे!
खरं आहे सटक.
एक कविता खंतावुन टाकते तर एक तेजस्वी.
In reply to खरं आहे सटक. by अजया
धन्यवाद अजया!
व्य(वस्थे)थेला "सटक"लेली परतफेड ही आवडली...
सत्याभिलाषी नाखु
In reply to अटकलेल्या by नाखु
हेच म्हणते.
In reply to अटकलेल्या by नाखु
धन्यवाद!
कविता म्हणून चांगली आहे. पण विहीर का जवळ करायची म्हणे?
हरिओम!