मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

शार्दूलविक्रीडित

राजघराणं · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
(शार्दूल म्हणजे सिंह. शार्दूलविक्रीडित म्हणजे सिंहाचा खेळ. हे मराठीतील एक सुंदर अक्षरगणवृत्त आहे. प्रत्येक ओळीत १९ अक्षरे आणी म स ज त त ग हे गण येतात. अक्षरगणव्रुत्तात एका ओळीत किती अक्षरे येतात आणी त्यांचा र्‍हस्व दीर्घ अक्षरांचा क्रम लघु गुरू ठरलेला असतो. उदा म म्हणजे तिन्ही गुरू अक्षरे. त्यामुळे व्रुत्ताची चाल ठरलेली असते. शार्दूलविक्रीडित वृत्ताचे प्रसिद्ध उदाहरण म्हणजे -आम्ही कोण म्हणून काय पुसता ? ही कविता होय. ही चाल लग्नातल्या मंगलाष्टकालाही चालते.) कवितेचे नाव : शार्दूलविक्रीडित वृत्त : शार्दूलविक्रीडित कवितेचा विषय :शार्दूलविक्रीडित. ..सिंहाचा खेळ. धाडसाचे वारे वाहत होते. वृद्ध झाडे जोर जोरात हलत होती. ठिणग्या उडत होत्या ... वणवा पेटणार होता.. अशाच एका ठिणगीकडे सिंहाच्या एका छाव्याची नजर गेली. आणी मग ...... वारे वाहत धाडसी धडधडे ; कल्लोळ ज्वालाग्रही झाडे घासत ही परस्पर उडे ; तो जाळ भूमीवरी सिंहाचा सुकुमार पुत्र अवघा ; झेपावला त्यावरी खेळाया गवसे पहाच भलते ; शार्दूल क्रीडा करी. ॥ छावा त्या विस्तवास खेळ समजी ; जाळात घेई उडी दाहाची न मला क्षिती उब हवी ; गर्जोन ऐसे कथी छातीशी कवटाळुनी हृदय ते ; उन्माद ज्वाला पिते आगीचे अवघे शरीर बनते ; खेळे नसातून ती ॥ अंगारा सम नेत्र जाळच नखे ; हा पोत पंजा बने जीभेची जणू हो मशाल जळती ; भाषाच ज्वालामुखे वाटे तो नर स्वाभिमान जळता ; आगीस वाटे जनी ज्वाला चित्त बने शरीर जळते ; आत्माच यज्ञाहुती ॥ पेटोनी हर चंदनी वृक्ष उठे ; त्यांचा सुवासी हवी त्या रानात घुमे पवित्र बनले ; युद्धात गेले बळी ऐसा हा वणवा जळे धडधडा ; ज्वालाहुती पेटल्या ज्वाला सिंह पळे धडाड वनी हो ; शार्दूल क्रीडा पहा ॥ ही शार्दूल मशाल जाळ जळती ; धावे वनी वाटण्या आत्म्यातील जहाल तेज दिधण्या ; रानातल्या बांधवा साक्षात्कार ज्वलंततेच मधला ; सर्वांस दर्शावण्या आत्मा ना बनतो ज्वलंत कधिही ; दाहास घेण्याविना ॥ चीं चित्कार उठे नभात - गगनी ; ती माकडे भ्याडशी सैरावैर पळा पळाच जनहो ; शार्दूल ज्वाला वनी भ्यालेली हरणी पळेच घुबडे ; डोळे मिटोनी खरी धावोनी वटवाघुळांसह वनी ; ती शोधती बोळकी ॥ सिंहाचे हृदयी स्वगर्व वसतो ; शार्दूल ज्वाला जशी शार्दूलासम पाहिजे हृदयही स्वीकारण्या आग ती ज्वालासिंह विचार आग जळती; भ्यांडास भीती तिची जाळोनि स्वशरीर काय घुबडे ; घालीत अत्माहुती ? शार्दूला सम धैर्य ना वसतसे : प्राण्यांतही जाणत्या दोषी का म्हणता गरीब घुबडा ? मूर्खास बुद्धी किती ? ज्वालासिंह परंतु व्यर्थ जळला ; शार्दूल क्रीडा वृथा राखेच्या सम ते शरीर बनले ; शार्दूल राखे जसा ॥ येता एक झुळुक चंदनमयी; मंत्रावली राख ही राखेतून पुनः उठेल उडण्या ; शार्दूल पेटोनिया निद्रेचा लखलाभ होत घुबडा ; शार्दूल जागा खडा रजेही घुबडे असोत वनिची शार्दूल नेता खरा . . . . . . . . झेपावेल सदा अवध्य नर तो ; शार्दूल क्रीडा पहा ॥ अभिराम दीक्षित. श्रीलंका २००५

वाचने 18281 वाचनखूण प्रतिक्रिया 54

निश Mon, 06/04/2012 - 17:47
राजघराण साहेब, अप्रतिम व निव्वळ लाजवाब. शार्दूलविक्रीडितचा तुम्ही इतक्या चांगल्या प्रकारे माहीत करुन दिल्या बद्दल तुमचे मनापासुन आभार. व चित्र एकदम जिवंत वाटता हेत. सुंदर.

स्पंदना Mon, 06/04/2012 - 18:05
कवी अभिराम दीक्षित . श्रीलंका २००५?? प्रभाकरनवर लिहिल आहे का? की श्रीलंकेच ध्वजचिन्ह सिंह, यावर आहे ही कविता? बाकि इतक सुंदर काव्य अन इतक वृत्त धरुन लिहिण ...मति गुंग झाली. इतक च्छान काव्य इथ पोहोचवल्या बद्दल धन्यवाद राजघराण साहेब. अन त्याबरोबरची चित्र तर लाजवाब!

पैसा Mon, 06/04/2012 - 18:09
काव्य आणि सोबतची चित्रे सगळंच फार सुंदर! अपर्णा, अभिराम दीक्षित म्हणजेच राजघराणं!!

In reply to by पैसा

स्पंदना Mon, 06/04/2012 - 18:44
आधी ठाउक असत तर एव्हढी तारीफ नसती केली. उगा छान प्रयत्न वग्गैरे म्हंटल असत. पण काही म्हणा अतिशय सुरेख . आता सांगा कविता कुणावर आहे, की खरच शार्दुलावर आहे?

नरेंद्र गोळे Mon, 06/04/2012 - 18:26
वा! अभिराम सुरेख!! कविता आवडली. मानावा समरा जनास समरा ताराप ताराप गा छाव्याचे हृदि काय ते उमजणे, हे ना असे खेळणे शार्दूलासम वन्हिला डिवचणे, हे ना मुळातच उणे भासावा वणवा खराच भडके, तैसे दिसे दृश्य हे जाणे तो अभिराम दीक्षित करू सारे असे नेटके

चौकटराजा Mon, 06/04/2012 - 18:32
शार्दूल विक्रिडित मधे काव्य करणे यासाठी चार अक्षरी व तीन अक्षरी शब्दांचा मोठा साठा डोक्यात असावा लागतो. सबब यात लिहिणे तसे सोपे नाही. तेंव्हा प्रथम कवि राजास मानवंदना ! आणि कल्पकतेपलीकडील चित्रे जोडीला. कशाला जास्त चांगले आहे असे म्हणावे हे कळत नाही ! स्तब्ध !

बॅटमॅन Mon, 06/04/2012 - 18:58
आहे वृत्त विशाल त्यास म्हणती शार्दूलविक्रीडित | पैं हे वृत्त कवींस सर्वसमयी साचे करे पीडित| त्याच्या आवळुनी समस्त मुसक्या जे हिंडवीले तया| खासा डौलचि केसरीगतिचिया रे दीक्षितांच्या अभ्या** || **वृत्तरचनेच्या बंधनामुळे असे संबोधन वापरले आहे, तदुपरि लेखकाचिया कवण्याही हेतुचेया उपसर्गू जाहला नसे हे आत्ताचि नमूद करोन ठेवितो. बाकी सेतुमाधवराव पगडींच्या आत्मचरित्रात एक मजेशीर कविता त्यांनी उद्धृत केलीये(मूळ कवीचे नाव विसरलो, कविता जशी/जेवढी आठवली तेवढी दिली आहे). वृत्तांचे तप आचरी निशिदिनी -------- ------------------------------------ (कुणी एक कवी कायम वृत्तबद्ध कविता करायचा हा इत्यर्थ) (एकदा काय झाले) आप्ते पत्र लिहूनि एक घरुनी, त्याच्याकडे धाडिले| काही वृत्त अलीकडे न कळले,-------------| चिंता घोरचि लागली बहु अम्हां, झालो पुरे पीडित| त्याचे उत्तर हा लगेच कळवी, शार्दूलविक्रीडित!!!!

In reply to by बॅटमॅन

राजघराणं Tue, 06/05/2012 - 16:51
दुष्टारी पुरता भारी | अवतरला गॉथम शहरी| वाल्गुदेय हा निर्धारी| विदूषका जाण पां|| विदुषक उवाच : रात्रीच्या वटवाघळा हलकटा ; द्वाडा धरू का तुला ? ओढूका शेपटीस खेचुनी दिवा दाव्वीन तुला अता ॥ (हसण्यावारी घ्यावे - केवळ जुगलबंदी आहे. :-) )

In reply to by राजघराणं

बॅटमॅन Tue, 06/05/2012 - 18:24
दुसर्‍या ओळीत एक सुधारणा: ओढू का तव चर्म** खेचुनि तुला नेतो दिव्याशी चला| **वटवाघळाला शेपटी नसते आणि त्याचे पंख हे पिसांचे नसून कातड्याचे बनलेले असतात. आता यावर प्रत्युत्तरः हा हा! गॉथमराज मी, मज कसे आव्हान देशी असे | मी आहे जरि येकुटा तरि तुला मी धाकुटा पैं नसे | जल्दीने तव ही विदूषकगिरी त्वां थांबवी ते बरे | नस्तां वल्गुदक्रोधवन्हि तुजला जाळील हेची खरे || येता वीस जुलै, थिएटरिं पहा संघर्षगाथा खरी :)

In reply to by बॅटमॅन

जेनी... Tue, 06/05/2012 - 19:16
अहो बॅटमॅन यालाच तर ' शार्दुलविक्रिडित म्हणतात ..:( अलंकारिक भाषेत आहे त्यापेक्षा चढवुन ,नसलेल्या गोष्टिंचा आव आणुन बोलण . मला तर एवढच कळतय . बाकि आपण जास्त ज्ञानी आहात :)....( पाजळवा ) :P

In reply to by बॅटमॅन

राजघराणं Tue, 06/05/2012 - 20:11
दुष्टारी पुरता भारी | अवतरला गॉथम शहरी| वाल्गुदेय हा निर्धारी| विदूषका जाण पां|| विदुषक उवाच : रात्रीच्या वटवाघळा हलकटा ; द्वाडा धरू का तुला ? ओढू का तव चर्म खेचुनि तुला नेतो दिव्याशी चला| वाग्लुदेय उवाच : हा हा! गॉथमराज मी, मज कसे आव्हान देशी असे | मी आहे जरि येकुटा तरि तुला मी धाकुटा पैं नसे | जल्दीने तव ही विदूषकगिरी त्वां थांबवी ते बरे | नस्तां वल्गुदक्रोधवन्हि तुजला जाळील हेची खरे || विदूषक उवाच ही ही! गॉथम पुत्र मानवच चांडाळासवे गाठ रे। ही जाती असते तुझी स्खलनशाली मात्र ध्यानी रहे । ऐ वाल्ग्या भय भूक मैथुन धर्मी कीडे कुत्रे जाण रे । मानव्यास हवा विदूषक गुन्हेगारी हवी मानवे ॥

In reply to by राजघराणं

बॅटमॅन Tue, 06/05/2012 - 23:06
@ वल्ली: मुद्दा नोंदविला युरॉनर मनीं, टंकोनि थँकीतसे ;) @पूजा पवारः हल्के घ्या, बघताय ना कितिकसा घेतो कुणी ताण ते :) वाल्गुदेय उवाच भेटू लौकरि गॉथमात इथल्या मत् होम ग्रौंडावरी | चिंता तू न करी तुला झडकरी धाडीन फासावरी | किंवा आर्खम नाम त्या भयपरी कारागृहीं सत्वरी | थांबे तैंचि पुरी विदूषकगिरी या गॉथमीं शाहरी || पेंग्विन् बेन विदूषकू रिडलरू, टू फेस हे सर्वही | आय्व्ही ती विष घेवुनी बघ सवे आहे सदा सज्जही | सर्वांसी पुरुनी उरे, परि झुरे, बॅट्मॅन तो येकटा | वेन ब्रूस असोनिही जणु नसे , हे जाणितो येकटा ||

रमताराम Mon, 06/04/2012 - 19:02
तुमचे पाय कुठे आहेत हो, करा इकडे जरा. _/\_. प्रचंड आवडली. भाषेवरचे प्रभुत्व अचाट आहे हो. आणि छातीशी कवटाळुनी हृदय ते ; उन्माद ज्वाला पिते आगीचे अवघे शरीर बनते ; खेळे नसातून ती ॥ शार्दूला सम धैर्य ना वसतसे : प्राण्यांतही जाणत्या दोषी का म्हणता गरीब घुबडा ? मूर्खास बुद्धी किती ? ज्वालासिंह परंतु व्यर्थ जळला ; शार्दूल क्रीडा वृथा राखेच्या सम ते शरीर बनले ; शार्दूल राखे जसा ॥ टोपी काढली आहे. एकदोन लहानशा गोष्टी: शार्दुल या शब्दात पहिला उकार आहे. तुमच्या कवितेत मात्रांचे तंत्र (आम्हाला त्यात शष्प कळत नाही) बिघडत नसेल तर बदल करायला हरकत नसावी. पेटोनी हर चंदनी वृक्ष उठे ; त्यांचा सुवासी हवी त्या रानात घुमे पवित्र बनले ; युद्धात गेले बळी हवी ऐवजी हवि हा शब्द हवा. दीर्घ ईकारान्त शब्दाचा अर्थ वेगळा असल्याने इथे कविचे स्वातंत्र्य जरा गोंधळात पाडणारे होते आहे. जीभेची जणू हो मशाल जळती ; भाषाच ज्वालामुखे जिव्हेची जणू.... असा बदल समर्पक वाटतोय का नि वृत्तात बसतोय का पहा. दादानुं, कं लिवलंय कं लिवलंय तुमी. एरवी कवितेकडे ढुंकून न पाहणार्‍या माझ्यासारख्याला गद्य माणसाला इतकी बारकाईने वाचायला लावलीत हेच मोठे श्रेय कवितेचे. रच्याकने इतकी समर्पक चित्रे कुठून मिळवलीत हो? (की तुम्हीच काढली आहेत? मग ही कलाही येऊ द्या की समोर.)

पिवळा डांबिस Mon, 06/04/2012 - 23:55
चित्रे सुरेख, काव्य तर त्याहून सुरेख! आणखी शब्द वापरून वाचनानुभव डागाळत नाही. जियो!!!!!

अक्षया Tue, 06/05/2012 - 09:43
सुंदर माहिती, कविता आणि चित्रे.. शाळेत अक्षरगणवृत्त शिकली त्याची आठवण झाली..:)

In reply to by ऋषिकेश

मेघवेडा Wed, 06/06/2012 - 14:20
सुरेख जमली आहे!
सिंहाचे हृदयी स्वगर्व वसतो ; शार्दूल ज्वाला जशी शार्दूलासम पाहिजे हृदयही स्वीकारण्या आग ती ज्वालासिंह विचार आग जळती; भ्यांडास भीती तिची जाळोनि स्वशरीर काय घुबडे ; घालीत अत्माहुती ?
या ओळी विशेष आवडल्या. वृत्तावरची पकड वाखाणण्याजोगी आहे मालक. आणखी येऊ द्या. :)

मनीषा Tue, 06/05/2012 - 16:12
पेटोनी हर चंदनी वृक्ष उठे ; त्यांचा सुवासी हवी त्या रानात घुमे पवित्र बनले ; युद्धात गेले बळी ऐसा हा वणवा जळे धडधडा ; ज्वालाहुती पेटल्या ज्वाला सिंह पळे धडाड वनी हो ; शार्दूल क्रीडा पहा ॥ अप्रतिम ..! वृत्तबद्ध , चित्रमय काव्य .

मृगनयनी Tue, 06/05/2012 - 19:08
चीं चित्कार उठे नभात - गगनी ; ती माकडे भ्याडशी सैरावैर पळा पळाच जनहो ; शार्दूल ज्वाला वनी भ्यालेली हरणी पळेच घुबडे ; डोळे मिटोनी खरी धावोनी वटवाघुळांसह वनी ; ती शोधती बोळकी ॥ ज ब र द स्त !!!!!!!..... अप्रतिम!!!!!!!! आज हाही पैलू पाहायला मिळाला!!!! :)

चिगो Tue, 06/05/2012 - 19:44
भन्नाट कविता आणि चित्रे.. एक सुंदर काव्यानुभव देण्यासाठी धन्यवाद..

कसं काय जमतं राव......!!!! आयुष्यात एक छान कविता जमली तर घर डोक्यावर घेऊन नाचेन मी!!!!!!!!!! _____________________________________________________-- _______________________________________________________-

एस गुरुवार, 12/24/2015 - 10:56
कैसी ही कविता न दृष्टि पडली लाभा मुकलो हत!