Skip to main content

ड्रायफ्रूट हलवा

लेखक स्वाती दिनेश यांनी शनिवार, 17/10/2015 या दिवशी प्रकाशित केले.
. . दिवाळी म्हणजे दिव्यांची आरास, रांगोळ्या, आकाशदिवे, नवे कपडे, फटाके, फराळ, मिठाई आणि दिवाळी अंक! लाडू, चिवडा, चकली, कडबोळी, करंज्या, शेव, शंकरपाळे असे नेहमीचे फराळाचे पदार्थ तर असतातच. शिवाय हे एक खास कॅलरीबाँब डेझर्ट - खास दिवाळीसाठी! साहित्य - सुके अंजीर, बदाम, काजू - प्रत्येकी ५० ग्रॅम खारीक पावडर ५० ग्रॅम अक्रोड २५ ग्रॅम खजूर २५ ग्रॅम खवा २५० ग्रॅम साजूक तूप - ४ ते ५ टेबलस्पून दूध - १२५ मि.ली. (साधारण १ कप) साखर - सपाट २ वाट्या वेलदोडे किवा केशर वेलची सिरप - चवीसाठी कृती - काजू, बदाम, अक्रोड यांची वेगवेगळी भरड पावडर करून घ्या. अंजीर व खजूर मिक्सरमधून फिरवून घ्या. खवा मोकळा करून भाजून घ्या. काजू, बदाम, अक्रोड यांच्या पावडरी प्रत्येकी चमचाभर तुपावर वेगवेगळ्या परतून घ्या. अंजीर व खजूरही तुपावर परतून घ्या. खवा आणि सर्व ड्रायफ्रूट्स एकत्र करून मंद आचेवर भाजा. त्यात कपभर दूध घालून घोटत राहा. मिश्रण थोडे घट्ट होऊ लागले की साखर घाला. साखर विरघळेस्तोवर सतत घोटत राहा. हलवा लागू देऊ नका. चमचाभर वेलदोडे पावडर किवा केशर वेलची सिरप घाला. थोड्य वेळाने कडांनी हलव्याचे मिश्रण सुटू लागेल. तेव्हा आच बंद करा. बदाम/पिस्त्याच्या कापांनी सजवा. ड्रायफ्रूट हलवा तयार आहे. . .

वाचने 13837
प्रतिक्रिया 20

प्रतिक्रिया

जीवघेणा फोटो आहे. आवडला हलवा.

In reply to by दिपक.कुवेत

+१

सोपी कृती , पौष्टीक खरोखर कॅलरीबाँब पण थंडीत चालेल :)

अगदी पौष्टिक, चविष्ट आणि सोप्पी पाकृ !