मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

।। बरे झाले स्वातंत्र्य मिळाले ।।

सचिन जाधव · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
बरे झाले आपणास स्वातंत्र्य मिळाले ते गोरे साले रस्त्यामध्ये थूंकू देत नव्हते वेड्यासारखे रोज पाण्याने... रस्ते धूत होते. आपण किती भाग्यवान गुटका पान तंबाकू खाऊन रस्त्यात कुठेही थूंकू शकतो. छान झाले स्वातंत्र्य मिळाले ते इंग्रज साले धान्यामध्ये भेसळ करू देत नव्हते मूर्खासारखे रेशनवर सकस धान्य देत होते. आपण किती पुण्यवान दूध अन्न औषधामध्ये बेमालूम भेसळ करू शकतो. बेस्ट झाले स्वातंत्र्य मिळाले ते ब्रिटीश साले शिक्षणाचा धंदा करू देत नव्हते अडाण्यासारखे दर्जेदार शिक्षण फुकटामध्ये देत होते आपण किती विद्वान शिक्षणाचा बाजार मांडून पिढ्या बरबाद करू शकतो चांगले झाले स्वातंत्र्य मिळाले ते जुलमी साले अनाथ मुलांना भीक मागू देत नव्हते दरिद्र्यासारखे त्यांच्याकरिता अनाथाश्रम चालवित होते आपण किती दयावान अनाथ मुलांना पांगळे करून भीक मागावयास लावू शकतो झकास झाले स्वातंत्र्य मिळाले ते मिशनरी साले गरिब रूग्णांस हलाखीत मरू देत नव्हते ईश्वरसेवा समजून त्यांची सेवाशुश्रुषा करीत होते आपण किती करूणावान डाॅक्टरांचा संप घडवून रूग्णांचे हाल करू शकतो उत्तम झाले स्वातंत्र्य मिळाले ते फिरंगी साले आपणाला लाच खाऊ देत नव्हते गाढवासारखे लाचखोरांस बूटांच्या लाथा घालीत होते आपण किती सचोटीवान लाचखोरांच्या मिळकतीमध्ये आपला वाटा ठरवू शकतो छान झाले स्वातंत्र्य मिळाले बरे झाले ते इंग्रज गेले पण जाता जाता साले आपले देशप्रेमही घेऊन गेले .

वाचने 2174 वाचनखूण प्रतिक्रिया 11

चिगो गुरुवार, 10/29/2015 - 16:18
तुमची का हो ही कविता? नाही मागील बरेच दिवसांपासून व्हॉट्सअ‍ॅपवर फिरतेय म्हणून विचारलं.. असो. ह्या कवितेतल्या 'ब्रिटीश लोक बाई कित्ती कित्ती गोड गोड' ह्या भावनेचा समाचार तिथंही घेतला होता, इथंही घेतो.. १. ब्रिटीशांच्या काळात भारत अत्यंत स्वच्छ होता आणि ते रोज रस्ते-बिस्ते धुवायचे हा शुद्ध फालतू ' नॉस्टॅल्जिक रोमँटीसिझ्म' आहे.. फक्त 'सिव्हील लाईन' एरीयातले रस्ते स्वच्छ असायचे बहुधा, तेपण तिथे भारतीय आणि कुत्र्यांना जायला परवानगी नव्हती म्हणून.. २. 'राशन/रेशन' ह्याचा अर्थ काय हो? युद्धकाळात आणि दुष्काळात सरकार खाण्यापिण्याच्या वस्तूंवर जो 'कंट्रोल' आणायची, ते 'रेशनिंग'.. सर्वसामान्य गरीबांपर्यंत माफक दरात अन्यधान्य पोहचवण्याची सोय म्हणून 'राशन'ची दुकाने स्वतंत्र भारतात सुरु झाली. ३. 'दुष्काळामुळे अन्नधान्याविना लोकांचा तडफडून मृत्यु' अशी बातमी कितीदा वाचलीय तुम्ही? जरा 'बंगालचा दुष्काळ' गुगलून बघा.. ब्रिटीशप्रेमाचा फुगा फुटेल. ४. अनाथपोरांना पोसायचे/ रुग्णांची सेवासुश्रुषा ही 'धर्मप्रसाराची सॉफ्त टॅक्टीक्स' होती, साहेब.. जनतेचा कळवळा वगैरे एकमेव कारण नव्हतं त्यामागे.. ५. आता जरा लाच/करप्शन ह्याकडे वळू.. सुमारे अडीच हजार वर्षांपुर्वी कौटील्य 'इंस्टीट्युशनालाईज्ड करप्शन' बद्दल लिहीन गेलेयत अर्थशास्त्रात. काही मुर्ख लोक 'लाच घेणे' हा प्रकार १५ ऑगस्ट, १९४७ला सुरु झाल्यासारखे वागतात/बोलतात. ('गब्बर इज बॅक' नावाच्या झालतू पिच्चरच्या पोस्टरवर 'करप्शन'ची मृत्युशिला होती. जन्म : १५ ऑगस्ट, १९४७ : मृत्यु: पिच्चरची रिलीज डेट) अनेक ब्रिटीशांसाठी भारतात काम करण्याची संधी ही गब्बर पैसा मिळवण्याची संधी होती. अगदी लॉर्ड कॉर्नवॉलिस पासूनची प्रदीर्घ परंपरा आहे.. 'लॉर्ड निओरीच' होते भारतात लाच/पैसा खाऊन श्रीमंत झालेले लोक ब्रिटींशासाठी.. तस्मात, वाढदिवसाच्या शुभेच्छा..

In reply to by चिगो

पगला गजोधर Fri, 10/30/2015 - 09:14
@सचिन, चांगला प्रयत्न आहे ! अजून थोडी धारदार करता येते का कविता, ते पहा.
काही मुर्ख लोक 'लाच घेणे' हा प्रकार १५ ऑगस्ट, १९४७ला सुरु झाल्यासारखे वागतात/बोलतात
@चीगो, बरोबर आहे तुमचे वाक्य, लाच घेणे/ देणे (देवाला सुद्धा सोडत नाही हा, भारतीय लोकं, नवस रुपी लाच देण्याच्या प्रकार तो अशाच, प्रकारात मोडावा.) भ्रष्टाचार हा खूप आधी पासून आहे, …पण १५ ऑगस्ट, १९४७ पासून पुढची ६० वर्षेच भ्रष्टाचार आला व फोफावला, आणि भारताची प्रगती केवळ गेल्या १४ महिन्यातच झाली, गेल्या १४ महिन्यातच भारताला अंतर राष्ट्रीय व्यासपीठावर कीर्ती लाभली, भारत आता प्रचंड वेगाने प्रगती करायला लागलाय, असे झाल्यासारखे वागतात/बोलतात काही लोकं

In reply to by पगला गजोधर

चिगो Fri, 10/30/2015 - 12:59
पण १५ ऑगस्ट, १९४७ पासून पुढची ६० वर्षेच भ्रष्टाचार आला व फोफावला, आणि भारताची प्रगती केवळ गेल्या १४ महिन्यातच झाली, गेल्या १४ महिन्यातच भारताला अंतर राष्ट्रीय व्यासपीठावर कीर्ती लाभली, भारत आता प्रचंड वेगाने प्रगती करायला लागलाय, असे झाल्यासारखे वागतात/बोलतात काही लोकं
तेही मुर्खच, गजोधरभाई.. 'अवताराची आणि चमत्काराची अपेक्षा' हा आपणां भारतीयांचा आवडता खेळ आहे.. मी स्वतः काही सुधरणार नाही, पण देश सुधारला पाहीजे.. म्हणजे 'भ्रष्टाचार संपलाच पाहीजे' वाले सिग्नलपण तोडतात आणि मग पकडल्या गेल्यावर चिरीमिरीच्या गोष्टीपण करणार. अर्थात साहेबांनी फुगाच एवढा फुगवला होता की थोडीही हवा गेली तरी लोक बोंब करणारच आता..

In reply to by चिगो

पगला गजोधर Fri, 10/30/2015 - 15:12
'अवताराची आणि चमत्काराची अपेक्षा' हा आपणां भारतीयांचा आवडता खेळ आहे.. मी स्वतः काही सुधरणार नाही, पण देश सुधारला पाहीजे.. म्हणजे 'भ्रष्टाचार संपलाच पाहीजे' वाले सिग्नलपण तोडतात आणि मग पकडल्या गेल्यावर चिरीमिरीच्या गोष्टीपण करणार.
१++ बरोबर बोललात प्रगोजी … म्हणूनच, स्वामी विवेकानंद, महात्मा गांधी, मदर तेरेसा, बाबा आमटे, गाडगे बाबा इत्यादी लोकांकडून आपण सर्वांनी आदर्श घेतला पाहिजे, (वरील व्यक्ती आणि इतर बरेच, आपल्या कृतीतून खूप शिकवून गेलेय !), आता स्वच्छता अभियानात सेल्फ्या काढून झाल्यावर, खराटे अडगळीत गेलेत आपल्या सर्वांचे.

In reply to by चिगो

असंका Fri, 10/30/2015 - 09:54
तुमची का हो ही कविता? नाही मागील बरेच दिवसांपासून व्हॉट्सअ‍ॅपवर फिरतेय म्हणून विचारलं
+१ बाकी प्रतिसादही अगदी योग्य. त्याबद्दल धन्यवाद!

In reply to by असंका

असंका Fri, 10/30/2015 - 09:58
अवांतरः सिविल लाइन तर एक वेगळं जगच आहे. एक नागपुरचा मुलगा वर्गात होता कळल्यावर त्याला विचारलं नाग नदीबद्दल तर म्हणे, अशी काही नदी बिदी नैये नागपुरात. तो सिविल लाइन्सला रहायचा कळल्यावर त्यातलं आश्चर्य अंमळ कमी झालं.

In reply to by चिगो

जबरा प्रतिसाद चिगो ! व्हॉट्सअ‍ॅपवर ही पोस्ट वाचल्यावर माझं पण असंच डोकं फ़िरलं होतं. अगदी जवळचा मित्र असुनही पोस्टकर्त्याला सॉलीड झोडून काढला होता मी.

सर्वसाक्षी Fri, 10/30/2015 - 15:37
जबरदस्त. लाखो देशभक्तांनी प्राणांची किंमत मोजून आणि घरादारावर निखारा ठेवून या गोर्‍यांना देशाबाहेर काढले खरे पण अजूनही ते काही भारतियांच्या मनात वास करुन आहेत.