मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

नवमी

सूड · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
काव्यरस
वडे घारगे पुर्‍या कधी नाजूकशा सांजोर्‍या दिंडे निवगर्‍या तूप काठोकाठी खमंग अळवड्या कधी तांदुळ कुरवड्या सुरळी पाटवड्या कधी देठीगाठी अबोली वळेसर कधी केवडा त्यावर अनंत नि तगर मोगर्‍याची दाटी असोल नारळ ओटी इंद्रायणी तांदूळ सुपारी तांबूल खण जरीकाठी जितेपणी याचा कधी केला नाही सोस आज सारे खास अविधवेसाठी

वाचने 11351 वाचनखूण प्रतिक्रिया 63

सतिश गावडे Wed, 10/07/2015 - 19:14
मन भुतकाळाच्या प्रवासाला निघाले की वाटेत कोणत्या आठवणींचे गांव लागेल आणि मन कुठे हळवे होईल हे सांगता येत नाही.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

डॉ सुहास म्हात्रे गुरुवार, 10/08/2015 - 14:01
"अविधवेसाठी" ऐवजी "सवाष्णीसाठी" असते तर शेवटच्या ओळीचा अर्थ लावताना लागणारी छोsssटीशी ठेच चुकली असती.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

स्रुजा गुरुवार, 10/08/2015 - 19:27
+१ :( शेवटच्या कडव्यापर्यंत पत्ता लागला नाही, अस्वस्थ करुन गेली कविता तुमची. खरंच शेवटच्या कडव्याने अगदी वेगळी उंची गाठली

अजया Wed, 10/07/2015 - 21:18
असे विचार मनात येऊन जात असतात खरे.त्यांना चपखल शब्दात पकडून कवितेत नेमकेपणाने व्यक्त झालंय.कविता आवडलीच.

नीलमोहर गुरुवार, 10/08/2015 - 10:43
या दिवसाशी, प्रथेशी व्यक्तिगतरित्या जोडले गेल्याने जास्त दुखावून गेली. अश्वत्थामा सारखी ती ठसठसती जखम आयुष्यभर मिरवण्याशिवाय इतर पर्याय नाही..

नाखु गुरुवार, 10/08/2015 - 11:10
जितेपणी याचा कधी केला नाही सोस आज सारे खास अविधवेसाठी
_________________/\__________________________

In reply to by तर्राट जोकर

प्यारे१ गुरुवार, 10/08/2015 - 14:13
सध्या पितृपक्ष सुरु आहे. गणपतीनंतरच्या पौर्णिमे नंतर प्रतिपदेपासून ते अमावस्येपर्यंत. पितरं म्हणजे आपले पूर्वज यांना श्रद्धांजलि वाहण्याचा एक प्रकार. यात पितरांना जेवू घालतात. नवमी तिथीला स्पेशली ज्या स्त्रिया नवरा जिवंत असताना मेल्या त्यांचं श्राद्ध असतं. त्याला अविधवा नवमी म्हणतात. काही कारणानं या धाग्यावर कृपया अवांतर चर्चा करु नये असं वैयक्तिक मत आहे. बाकी मिपाकर सूज्ञ आहेत असा विश्वास आहे.

In reply to by प्यारे१

तर्राट जोकर गुरुवार, 10/08/2015 - 14:42
नवमी तिथीला स्पेशली ज्या स्त्रिया नवरा जिवंत असताना मेल्या त्यांचं श्राद्ध असतं. त्याला अविधवा नवमी म्हणतात.
ह्याबद्दल माहिती नव्हती. धन्यवाद! आता कळले कवीला काय म्हणायचे ते. इतरांच्या वरील सर्व प्रतिसादांमधे जो भाव आहे तो माझाही.....

मीता Fri, 10/09/2015 - 10:47
:( माझी आजी आठवली . खूप टोचली कविता.

सूड Fri, 10/09/2015 - 14:48
प्रतिक्रियांसाठी सर्वांचे आभार. अविधवा शब्दावर बरीच चर्चा झाली आहे म्हणून थोडंसं त्याबद्दल. वर उल्लेख असलेली तिथी अविधवानवमी म्हणून मला माहीत आहे. घरच्या क्यालेंडरमध्येही तेच वाचायची सवय झालीय, त्यामुळे हा शब्दच लिहीला गेला. पैजारबुवा, ठरवून लिहीलेली नाही.

माहितगार Fri, 10/09/2015 - 17:34
बर्‍याच तिथ्या माझ्यासाठी केवळ कालनिर्णय वाचताना दिसतात त्यातल्या या तिथी विषयी माहितीपूर्ण आणि समर्पक कविता पोचली, आणि जराशी टोचलीही. माहिती नसलेल्या माहितगारास खालील (म्हणजेच वरील!) शब्दांचे अर्थ माहित करून हवे आहेत. कुठे पदार्थ विषयक मिपा दुवा असल्यास त्या सहीत *अर्थ आणि पदार्थांच्या बाबतीत मिपा अथवा आंजावर पाकृ असल्यास दुवे हवेत: :सांजोर्‍या, दिंडे, निवगर्‍या, देठीगाठी, अबोली वळेसर कधी केवडा त्यावर, अनंत नि तगर, असोल नारळ, इंद्रायणी तांदूळ *मिपा अथवा आंजावर पाकृ असल्यास दुवे हवेत: वडे, घारगे, पुर्‍या, अळवड्या, तांदुळ कुरवड्या, सुरळी पाटवड्या, तांबूल

In reply to by माहितगार

स्रुजा Sat, 10/10/2015 - 08:20
सांजोर्‍या: सांज्याच्या पोळ्या म्हणजे शिर्‍याच्या पोळ्यांना आमच्याकडे सांजोर्‍या म्हणतात. गोड शिरा पुरणासारखा पोळ्यां मध्ये भरुन करतात, दिंडे : पुरणपोळ्याच पण तव्यावर भाजत नाहीत. हा पदार्थ खास नागपंचमी साठी करतात. नागपंचमीला तवा तापवणं, चिरणं वगैरे करत नाहीत म्हणुन नेहमीसारख्या पुरणपोळ्या लाटुन, केळीच्या पानात वाफवल्या जातात. त्याला म्हणतात दिंडं. निवगर्‍या: उकडीच्या मोदकांची उकड उरली (आणि सारण संपलं ) की जिरं, मिरची , मीठ वाटुन उकडीत मिसळतात आणि त्याच्या छोट्या छोट्या पुर्‍या थापुन मोदकांसारख्याच उकडतात, मोदकांपेक्षाही लोकप्रिय प्रकार आहे हा, देठीगाठी, अबोली वळेसर: अबोलीचा गजरा. वळेसर हा शब्द गजरा कसा बांधला त्यावरुन आला असावा. अबोलीची वेणी थोडक्यात कधी केवडा त्यावर : केवड्याचं पान अंबाड्यात खोचायची पद्धत होती, ती गजर्‍याबरोबर पण मिळतात, अनंत नि तगर : हे फुलांचे प्रकार आहेत. तगर पांढरी शुभ्र असते हा फोटो: a आणि अनंताचं झाड पांढर्‍या फुलांचं असतं , मंद सुवास असतो याला. त्याचा बहर साधारण पावसाळ्यात असतो पण नक्की माहिती नाही. हा त्याचा फोटो: b असोल नारळ: न सोललेला नारळ, याचं काही पुजांमध्ये खास महत्त्व असतं. इंद्रायणी तांदूळ: उत्तम प्रतीच्या तांदुळाचा एक ब्रँड आहे इंद्रायणी. काही चुकलं असेल तर सुड आणि इतरांनी करेक्ट करावे. दुवे मिळाले तर देते या माहितीचे.

माहितगार Sat, 10/10/2015 - 07:56
हे अविधवा नवमी प्रकरण पतिच्या मृत्यूपुर्वी पत्नीचा मृत्यू या संकल्पनेच्या उदात्तीकरणातून आले असेल का ? विधवा म्हणून अनमानाच जिवन जगणे किंवा सती जाणे या पेक्षा पतिच्या आधीच मृत्यू यावा या अविधवेला आला तसाच आणि म्हणून हि अविधवा नवमी असे काही प्रकरण आहे का ? (चुभूदेघे) आज समाज सुधारणा झालेल्या काळात पुर्नविवाह आणि विधवेसही सवाष्ण स्त्री एवढा समान मान हे समाज सावकाशीने का होईना स्विकारत आहे (बराच समाज अजून बदलावयाचा बाकीही असेल ह्याचा ह्या कवितेतून अंदाजही येतो); पुर्वजांची आठवण काढून अगदी गोड धोडही खाण्यासही विरोध नाही कारण तुमचे पुर्वज तुमच्याकुटूंबाच्या (अदृष्यपणे) भेटीस येऊन (ज्याच्या त्याच्या श्रद्धेचा प्रश्न) आशिर्वाद देत असतील तर काय हरकत आहे (इथल्या प्रतिसादातील भावनांपेक्षा वेगळा विचार मांडत असल्यामुळे क्षमस्व) पण आशिर्वाद केवळ अविधवेचाच चालावा आणि विधवा चांगला आशिर्वाद देणार नाहीत हे अती असुरक्षीत मानसिकतेचे लक्षण झाले म्हणून जे काही श्राद्धपक्ष करावयाचे असेल ते घराण्यातील सर्व पुर्वज स्त्रीयांच्या नावे करावे त्यात विधवा अविधवा हा भेद काळानुसार मिटवला जाण्याची गरज असेल का ? तसे मी ह्या तिथ्या वगैरे पाळत नाही. मी जेव्हा केव्हा गोडधोड खातो त्या प्रत्येक प्रसंगी माझ्या सर्व पुर्वजांना माझ्या र्‍हुदयात-माझ्या सर्व कै शेअर करण्यास आणि मला आशिर्वाद देण्यास पुर्ण अनुमती असते आणि तसे माझे पुर्वज मला चांगलाच आशिर्वाद देत असणार याची मला पूर्ण खात्री आहे. बाकी पुर्वजांचा आदर म्हणून आणि स्वसमाधानासाठी जेव्हा केव्हा वाटेल तेव्हा महादेवाच्या मंदीरात जाऊन एखादी अभिषेकाची पावती फाडतो आणि पुर्वजांचे नाव घेऊन देवा समोर मनोभावे नमस्कार करतो एवढेच. अँटीमाई मोड ऑन आता जो काही या श्रद्धा पाळत नाही त्याने उपदेश करण्याचा आटापिटा का करावा ? कोणत्या तरी नवमीच्या नावाने चार भजी तळून खाल्ली काय आणि आइस्क्रीम खाल्ले काय, काय फरक पडत नाही. :) अँटीमाई मोड ऑफ (या धाग्यावर मंडळी हळवी आणि भावूक झाली आहेत तेव्हा ह. घ्या.)