मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

सांगलीकरांचे काही खास शब्द

दा विन्ची · · जनातलं, मनातलं
लेखनप्रकार
प्रत्येक गावाच्या बोली भाषेचा एक विशिष्ट ढंग /लहेजा असतो. बऱ्याचदा हे काही खास शब्द ऐकल्यावर आपल्याला आपल्या गावाला गेल्याची अनुभूती येते. मिपा वरती तसे पुणेकर , मुंबईकर, कोल्हापूरकर आणि नागपूरकर व त्यांची भाषा आणि खास ढंग यावर बरेच धागे आहेत . खाली काही खास सांगलीचे शब्द आहेत. कोल्हापूर अगदीच शेजारी असल्याने काही शब्द दोन्हीकडेही असणे शक्य आहे . वरकी = बटर डबरा= खड्डा डोस्क = डोके इस्कुट = खेळ खंडोबा बाउ = मटण वज्ज = ओझे शिप्पारस = शहाणपणा गबस = गप्प बस लांबड = साप कानुला = करंजी आदुगर = आधी आडग = वेडा निवद = नैवैद्य गुलमाट = गोड हाणबडिव = मार धाम्पी = फांदी शिस्तात = हळु कड कडन सुट = परत जा बारडी =बादली दाम्ब = खांब गुडघ्यात मेंदू = अर्धवट रिक्स = रिस्क काय टाटाय लागलैस = माज दाखवायला लागला आहेस लज्गरि = आराम बस ताम्यातु = टोमेटो हरकने = आनंदी होणे हरकुन टूम = खूप आनंदात टक्कुर = डोके साळूता = झाडू वळक बगु = ओळख पाहु डोस्क्यात यीना = आठवत नाही घुमीव = फिरव रगात = रक्त गप गार = अगदी शांत लय रागु वानी बोलू नगस = जास्त मस्का मारू नकोस बुंडू कला = अगदी छोटा हेंगाड = वेडपट भसका =भगदाड हुडक = शोध सावधगिरीची सूचना : काही शंका असल्यास ब्याट मन साहेब परस्पर उत्तर देतील . मी मिपा वरील सगळे धागे वाचलेले नसल्यामुळे जर पुनरावृत्ती झाली असेल तर आधीच क्षमस्व . आणि टंकायला जी मेल वापरली असल्याने काही चुका असतील तर समजून घ्या .

वाचने 31930 वाचनखूण प्रतिक्रिया 159

रेवती Sat, 08/29/2015 - 00:44
वरील साताठ शब्द वगळता बाकीचे नेहमीच्या वापरातले आहेत. ;) उद्या या शब्दासाठी बरेच्जण उद्याच्याला म्हणतात तेही सांगली मिरजेकडेच की काय?

रेवती Sat, 08/29/2015 - 00:50
उपमा करताना रवा आधी भाजून घेतला जात नाही. तिखटामिठाचा सांजा करताना रवा तेलावर भाजला जातो व हळद घातली जाते. या मूळ पद्धती झाल्या पण थोडे बदल प्रत्येक कुटुंबानुसार होतात. जसे, काहीजण उपमा करतानाही रवा कोरडा भाजतात. काहीजण सांजा करताना फोडणीत कांदा, सुक्या लाल मिरच्या परतून त्यात रवा भाजतात. काहीजण ओला नारळ वापरतात तर काहीजणांकडे सुके खोबरे आधणाच्या पाण्यात घातले जाते. यापैकी कशालाही नंतर नंतर उपमा, उप्पीट, सांजा, उप्पीठ म्हणत असलेले ऐकलेत. शेवटी समोर येईल ते खायचे. ;) असंख्य व्हेरिएशने आहेत.

शिवोऽहम् Sat, 08/29/2015 - 04:22
मी पहिल्यांदा सांगलीत आलो तेव्हा काकांनी सांगितलेले आठवते, सांगलीतले, त्यातही विश्रामबागेतले लोक म्हणजे 'तिखट' हा शब्दही अगदी गोऽड, मवाळ करून म्हणतील. त्याची प्रचितीही आली, पण कोल्हापुरापेक्षा फार काही भाषिक बदल जाणवला नाही हेही खरे. असो, विषयाकडे वळतो. खांब = डांब भाव न देणे = हिंगलत नाय नातेवाईक = पाव्हणे केंव्हापासुन = कवाच्यान् खिळा = मोळा डावरा = चपणं (चपणा) आचारी = सवळंकरी भाजीची जुडी = मोदळा कसं काय? या प्रश्नाचे उत्तर 'तुमच्याकडं' हे फक्त कोल्लापुर/सांगलीकडेच शक्य आहे!

दा विन्ची Sat, 08/29/2015 - 07:30
शिवोऽहम् 'पाक' च्या काळात, गोळे सरांसमोर मंदीरात 'ही माझी बहीण, मी हीचा भाऊ' म्हणालेला.. एफ ई १९९२ (कॉम्प्युटर) हे बहुतेक अगदी ताजे ताजे असताना ऐकल्यावर ह .ह . पु. वा . झालो होतो . अवांतर : गोळे सरांचा आणि माझा महिनाभरा पूर्वीच फोन झाला होत. मेमरी रिफ्रेश करायची आहे काय? सध्या काय चालू आहे ?

चतुरंग Sat, 08/29/2015 - 08:07
'पाक'च्या जमान्यात वॉलचंद कालीजात आम्ही एक वर्ष मास्तरकी केली होती इलेक्ट्रॉनिक्सला. मजा आली होती. बर्‍याचशा शब्दांचा वरती 'बुकणा' पडलेला दिसतोच आहे. बाकी भरपूर आठवणी आहेत..... -चतुरंग

कंजूस Sat, 08/29/2015 - 13:16
तिकडे कोल्हाटी नावाची एक आदिवासी जमात होती बहुतेक.ती लोक बारीक सारीक कामं करायचे आणि गावाबाहेरच्या माळरानावर राहायचे.बायका ,मुले भीक मागायला येत असत तेव्हा "कोरड्यास वाढा माय" म्हणायचे.कोरड्यास म्हणजे भाकरी खाण्यासाठी लागणारी आमटी ,भाजी,चटणी वगैरे.कित्येकवेळा भीक नसायची कारण ते त्याबदल्यात काही रानातल्या वस्तू आण सांगितले की आणून देत.आंगण सारवायला शेण,मुलींना खेळायला सागरगोटे,कवठे( फळं),पिकलेली बेलफळं,बोरं,मोराची पिसं वगैरे.

In reply to by आदूबाळ

बॅटमॅन Sat, 08/29/2015 - 15:38
सांगलीच्या संस्थापक चिंतामणरावांची डायरी प्रकाशित केलीये य न केळकरांनी. बाकी चरित्र वगैरे पाहून सांगतो.

सस्नेह Sat, 08/29/2015 - 14:14
सदर शब्द सांगली नव्हे तर कोल्हापूर भागातील आहेत. सांगलीच्या आसपास ग्रामीण भागातही वापरले जातात. खुद्द सांगली मात्र ब्राम्हणी संस्थान असल्याने भाषा शुद्ध वापरली जाते.

कंजूस Sat, 08/29/2015 - 15:18
आदूबाळ, पेशव्यांकडे पटवर्धन सरदार होते त्यांच्या वंशावळीत सांगली ,जमखिंडी ,तासगाव ही वेगळी छोटी छोटी संस्थानं निर्माण झाली. स्नेहांकिता,तुमचं म्हणणं बरोबर आहे परंतू सदर शब्दांचा या भागात बोली भाषेत वापर होतो आणि त्याचा अर्थ कळतो. दुसरं एक लक्षात येईल की तिथे आढळणारी दैवतं-गणपती आणि दत्त या बरोबरच ज्योतिबा,शिदोबा आहेथ.

Sanjay Uwach Sat, 08/29/2015 - 16:59
कोल्हापूर व सांगली एकमेकाच्या जवळ आसल्याने बरेच बोली भाषेतील शब्दात एकसारखे पणा आहे .त्यात इंग्रजी शब्दांचा वापर बऱ्याच वेळी केला जातो उदा: लई पॉवरबाज माणूस ,अहो ! कुठल्याही गोष्टीचा मध्य सेंटर काढा की,सॅगशनिला मंजुरी मिळाली आहे .लग्न ठरले कि लग्नांचा जथ्था कुठ काढणार . मुलाचे कपडे आम्ही काढतो. समजणार्‍यालाच समजते , नवीन माणसाना वेगळे वाटते. गेलेलो (गेलो होतो ) केलेलो (केले होतो ) हे तर शार्ट्कट नेहमीचेच ."या माध्यमातुन हि प्रगतीची प्रक्रिया चालू आहे " माध्यमातुन व प्रक्रिया हे शब्द वारंवार म्हणणारी व्यक्ती हमखास सांगली किंव्हा कोल्हापुरातील राजकीय पुढारी समजावा . एखादी कामाची मोलकरीण " मी लवकर घरी जातो,किंव्हा मी उध्द्या लवकर येतो " असे म्हणाली तर घाबरून जाऊ नका ,हि आमची नेहमीचीच बोली भाषा आहे .विशेष करुन हे सर्व शब्द ग्रामिण भागात बोलले जातात.शहरी भागात बोलले जात नाहीत.

1)खटक्यावर बोट, जाग्याला पलटी. 2)विषयच हार्ड(hard) 3)नाद खुळा ही वरील काही वाक्ये आणि तंबाकू=तंबाखू चुन्ना=चुना इट=वीट(बांधकामाची) धोंडा=दगड च्या=चहा म्होरं=पुढे

सव्यसाची Sat, 08/29/2015 - 18:28
माझ्या गावापासून मिरज हे ९०-९५ किमी. त्यामुळे आमच्या गावातील लोक दवाखाना वगैरे करायचा असेल तर सोलापूर ऐवजी मिरजेला जाणे कधीही जवळ म्हणतात. धाग्यामध्ये आलेले सगळेच शब्द आमच्याकडे (सोलापूर जिल्ह्यामधील सांगलीला लागून असलेली गावे) तसेच्या तसे वापरले जातात. शिवाय काही कन्नड शब्द हि अपभ्रंश होऊन वापरले जातात. उदा: कारहुणवी == कारवणी किंवा कारूणी 'बेंदूर' हा शब्दही खास याच भागातील असावा असे वाटते. आम्ही लहान असताना कायम घरी विचारायचो कि आपल्याकडे 'पोळा' का होत नाही. उत्तर यायचे कि नदी असते तिथे पोळा होतो आणि जिथे नदी नाही तिथे 'कारवणी' किंवा 'कर्नाटकी बेंदूर'. अजून काही आठवत असलेले शब्द: इब्लिस कार्टे = खोडकर लेकरू (गाबड्या ही पण एक अशीच शिवी होती आणि जास्ती करून पोराटोरांनाच वापरली जायची. कधी मोठ्यांचा भांडणात या शिवीचा वापर ऐकला नाही. ) इस्माळ्या किंवा अमनधपक्या = अचानक डाग किंवा डागाड = जमिनीच्या तुकड्यातील काही काळी माती असलेला भाग. तो डागासारखा दिसतो म्हणून लिमलेट = लिंबू सरबत वडाप हे जीप साठी पण वापरतात. पण सिक्स सीटर साठी टमटम किंवा डमडम हे पण वापरतात.

In reply to by सव्यसाची

बॅटमॅन Mon, 08/31/2015 - 03:02
इस्माळ्या शब्द प्रथमच ऐकतो आहे. अमनधपक्या किंवा अनमानधपक्या हा शब्द फक्त पुस्तकांतूनच माहिती आहे. बाकी लिमलेटची गोळी असते ना?

दा विन्ची Sat, 08/29/2015 - 21:28
सांगलीत सरकार मान्य स्वस्त धान्य दुकानाला कंट्रोल म्हणतात. हा बहुधा रेशनिंगला समानार्थी शब्द. आणि सगळ्यात भारी म्हणजे तीर्थ प्राशनाला चक्क "सत्संग" असा नवीन शब्द हल्ली रुळू घातलाय. सत्संगाबरोबरच लेझीम खेळायला जाणे हा पण तरुणाई मध्ये लोकप्रिय आहे.

सिरुसेरि Sat, 08/29/2015 - 22:48
यांवरुन आठवले . सांगली - मिरज रोडवरचा १३ नंबरचा बस स्टॉप व तिथला लाल रंगाचा दिवा प्रसिद्ध आहे . "शिस्तात जा" , "डबरा पाडला" असेही शब्द प्रयोग ऐकायला मिळतात . आनंदरावचा अड्डा , सरोवर या ठिकाणी गर्दी असते . गोरे , भोरे , गडकरी , कपाले यांच्याबरोबरच सांगली भडंगही प्रसिद्ध आहे .

प्यारे१ Sun, 08/30/2015 - 18:42
अशा रितिने धाग्यानं शतक गाठल्याबद्दल दा विन्ची सरांचा छिन्नी हातोडा, पेन्टींगचा ब्रश विथ रंगपेटी आणि मोनालिसा लुव्र म्युझियम वाले यांचे १२"*७.५" चित्र देऊन तसेच सांगली- पुणे विनावाहकविनाथांबाची २ तिकटं देऊन सत्कार करण्यात येत आहे. -हलकंघ्यातुमचाचविद्यार्थीआहेसर.

दा विन्ची Sun, 08/30/2015 - 20:30
प्यारे १ , इतक्या लांब जाऊन बसलायस कि लवकर भेट होणार नाही. एखादी शाल पण मिळाली तर जरा बर होईल. आणि हलकेच घेतले आहे. उद्या पासून आठ दिवस पुण्यात आहे. भेट योग आहे काय?

In reply to by दा विन्ची

दा विन्ची Sun, 08/30/2015 - 20:32
अवांतर : तोहीद मुजावर (माजी शापूरजी पालनजी) ओळखता काय ?अरे मित्रा बहुधा मी तुला ग्राफिक्स किंवा मानेजमेंत शिकवले असेल. मी शरद गायकवाड सर - यांत्रिकी विभाग . तुझे नाव काय? सध्या काय करतोस ?

सिरुसेरि Sun, 08/30/2015 - 21:15
सांगली - कोल्हापुर भागामध्ये 'सकाळ', 'म. टा.' पेक्षा 'पुढारी' या वर्तमानपत्राचा खप जास्त असतो . 'पुढारी'ची रविवारची पुरवणी खुप लोकप्रिय असायची . त्यामध्ये प्रा. महादेव मोरे यांनी लिहिलेली व्यक्तीचित्रे खुप वाचनीय असत. बाकी , मिरजेमध्ये पुर्वी एका निवडणुकीच्या प्रचाराला खुद्द युसुफसाब ( दिलिपकुमार ) येउन गेल्याचे वाचले होते.

In reply to by सिरुसेरि

दा विन्ची Sun, 08/30/2015 - 21:46
होय. महादेव मोरेंच्या ग्रामीण कथांचा एक वेगळाच बाज होता. सांगली आणि जयसिंगपूर, अंकली, कृष्णाकाठच्या पार्श्वभूमीवर देवदत्त पाटील सुद्धा छान लिहितात. तारा भवाळकर सुद्धा सांगलीच्याच.

In reply to by सिरुसेरि

बॅटमॅन Mon, 08/31/2015 - 03:00
इंडीड. पुढारीच्या विश्वसंचार सदराने आणि भरारी नामक गुरुवारच्या पुरवणीने इतक्या नवनवीन विषयांची माहिती दिली की ते लै भारी वाटायचं वाचायला. त्यातील अनेक गोष्टी निव्वळ फेक नसल्याचा साक्षात्कार पुढे नेटच्या जमान्यात विदा खणताना झाला. पुढारीला संध्यानंदच्या पंगतीत बसवणार्‍यांची त्यामुळेच कीव यायची. असो.

In reply to by बॅटमॅन

गॅरी ट्रुमन Mon, 08/31/2015 - 11:00
पुढारीला संध्यानंदच्या पंगतीत बसवणार्‍यांची त्यामुळेच कीव यायची.
+१०००००. पुढारीला संध्यानंदच्या पंगतीत बसविणारे लोक आहेतच.त्यांनी पुढारीचे अग्रलेख जरूर वाचावेत असा अनाहूत सल्ला द्यावासा वाटतो. कारगील युध्दाच्या वेळी पुढारीने मदतनिधी गोळा केला होता तो टाईम्स ऑफ इंडियाने मदतनिधी गोळा केला होता त्यापेक्षा जास्त होता असे त्यावेळी वाचल्याचे आठवते.त्या पैशातून २००१ मध्ये सीयाचीनला आपल्या सैनिकांसाठी हॉस्पिटल बांधले गेले आहे. हे काम नक्कीच महत्वाचे आहे.

In reply to by बॅटमॅन

नाखु Mon, 08/31/2015 - 13:53
पुढारी विषयी !!! फडणवीस-ठाकरेंचे जिथे पाहिजे तिथे कान उपटण्याबरोबर चांगल्या निर्णयांचे कौतुक केलेले पाहिले आहे. जे इतरत्र आढळत नाही.(लोकसत्तकडून अपे़क्षा सोडून बरेच दिस अझाले)

गॅरी ट्रुमन Mon, 08/31/2015 - 10:57
मी सांगलीत असताना "फाफलत" हा एक शब्द ऐकला होता.त्या शब्दाचा अर्थ आहे विनाकारण हेलपाटा. म्हणजे समजा एखादा माणूस एखाद तास प्रवास करून कोणाला भेटायला गेला आणि जे काम करायचे होते ते झाले नाही तर तो म्हणणार---"मी इतका फाफलत गेलो तरी काम झाले नाही"!! माझी वहिनी तो शब्द वापरते. ती मुळची कोकणातली असल्यामुळे तो शब्द कोकणातला आहे की सांगलीचा हे माहित नाही.पण तो शब्द कुठलाही असला तरी तो शब्द मला खूपच आवडतो.

सिरुसेरि Mon, 08/31/2015 - 11:30
"संथ वाहते कृष्णामाई" या चित्रपटाचे चित्रिकरण अंकली परिसरात आणि अंकलीच्या रेल्वे पुलावर झाले होते . प्रसिद्ध लेखक प्रा. म. द. हातकणंगलेकर व गीतकार जगदिश खेबुडकर हे सुद्धा सांगलीचेच . पु. ल. देशपांडे यांनी त्यांचे एम. ए. चे शिक्षण सांगलीच्या विलिंग्डन कॉलेजमध्ये पुर्ण केले . त्यावेळेस कवी गिरीश (प्रा. वसंत कानेटकर यांचे वडील ) हे तिथे प्राचार्य होते . श्री दत्ताची भजने लिहिणारे कवी सुधांशु हे सांगलीजवळील औदुंबरचे .

स्वधर्म Mon, 08/31/2015 - 12:06
ही एक अफलातून गोष्ट अाहे. फक्त क्रियापद हिंदी असंलं, की काम झालं. ‘ए जरा वो नटा बटा पटापटा! कत्ते देरसे घोळ घालने लगई!!’ असं एखादा मौलामेस्त्री अापल्या बारक्याला म्हणणार.

In reply to by बॅटमॅन

स्वधर्म Mon, 08/31/2015 - 12:53
मेस्त्री हा master या शब्दाचा अपभ्रंष असावा, असे वाटते. पण ते पारशी अाणि मराठी कुटुंबांचे अाडनावही अाहे. सांगलीत मात्र हा शब्द खास वरीष्ठ तांत्रिक कारागिरांसाठी वापरतात.

In reply to by बॅटमॅन

नाव आडनाव Mon, 08/31/2015 - 13:24
नगरला पण आहे हा शब्द वापरात. मेस्त्री / मिस्त्री ( मिसरी नाही :) ) असे उच्चार मला आठवतात. माझे चुलते दुष्काळात तळ्याच्या कामावर जायचे तिथे काम करणारे त्यांना म्हणायचे. "साहेब" अश्या अर्थाने . नंतर ते बँकेत कामाला लागले तरी लोक त्यांना ते होते तेंव्हापर्यंत मेस्त्री / मिस्त्री च म्हणायचे.

गवि Mon, 08/31/2015 - 17:25
उत्तम शब्दसंग्रह आहे. शिवाय, "पण" या शब्दाऐवजी "खरं" हा शब्द वापरणं ही गोष्ट नोंदवली गेलेली दिसत नाहीये.. सूक्ष्मच आहे, पण कोणालातरी जाणवेल. ताप उतरलाय पण डोकं दुखतं आहे. ऐवजी ताप उतरलाय, खरं डोकं दुखायलंय.. किंवा, (सायकलची) चेन फिरतेय पण व्हील फिरत नाही. चेन फिरतेय खरं व्हील फिरेना झालंय.. इत्यादि..

सिरुसेरि Mon, 08/31/2015 - 19:41
पुढारी विषयी आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे शंकर सारडा , वि. आ. बुवा , भा. ल. महाबळ , अशोक जैन अशा मान्यवरांचे वाचनीय लेख .

In reply to by सूड

स्वधर्म गुरुवार, 09/03/2015 - 13:01
क्रियापद हे नेहमी कर्त्याप्रमाणेच चालवत जा हो श्याम!!
असं केलं तर अवघड अाहे. म्हणजे मी गाडी मारलो, ती अांबा पाडली, असं तर नव्हे ना? सांगली व कर्नाटकच्या सीमाभागात बोलतातच. बहुधा कानडीच्या प्रभावामुळे. उलट मराठीत क्रियापद कर्माप्रमाणे चालवतात - तिने अांबा खाल्ला, त्याने मिसळ खाल्ली.

In reply to by स्वधर्म

सूड गुरुवार, 09/03/2015 - 14:12
तिने अांबा खाल्ला, त्याने मिसळ खाल्ली.
तो गाडी चालवतो, ती आंबा खाते... कर्मणि प्रयोग, कर्तरि प्रयोग, भावे प्रयोग कशाशी खातात हे माहीत आहे का? नसल्यास माहीत करुन घ्यावे.

In reply to by सूड

स्वधर्म गुरुवार, 09/03/2015 - 14:54
तुंम्ही अाधी सुयश यांना दिलेला सल्ला: क्रियापद हे नेहमी कर्त्याप्रमाणेच चालवत जा हो श्याम!! नेहमी? जाऊ दे. तुंम्हाला तर सगळंच माहिती अाहे, इतकंच नव्हे, तर इतरांना काहीच माहिती नाही, हे पण तुंम्हाला माहिती अाहे. त्यामुळे अामचा पास.

घाटावरचे भट गुरुवार, 09/03/2015 - 17:25
विषय हा शब्द तिकडे खूपदा ऐकू येतो. 'तिकडं जायाचा विषयच नाही' वगैरे. दुसरा शब्द म्हणजे 'नीट जा'. नीट म्हणजे सरळ!! - ('नीट जा' म्हणजे 'सरळ जा' हे न कळल्याने रस्ता चुकलेला) भट

गवि Fri, 03/09/2018 - 13:57
भुरटं. भुरट्यागत. मिल्या यडं झालंय. धुरळाच पाडतंय. बुकणाच पाडतंय. झळ आहे ते. बाकी शब्दांंच्या पलीकडले बोले तो: पैप्रकाशची कानपुरी मिसळ, ग्रीनपीस ऑमलेट कै. मार्टिन्स कॉर्नरची एस्प्रेसो कॉफी आणि चिकन क्लब सैंडविच. सुरभिची पावभाजी. टेक्सास ओली भेळ. भगवानलाल कंदी पेढे. आणि त्यापुढे.. मिरजेच्या जुन्या विहिरीतली कासवं. कृष्णाकाठची घाटावरची दुर्गंधी. नळाचं मचूळ पाणी. स्टार गुटखा. आणि बरंच काही. :-)

दिपस्तंभ Sun, 03/11/2018 - 04:18
खाल्लीकडं, वरलीकडं, म्होरं, व्हाण-पायतान, कोरड्यास-आमटी/भाजी, फवं-पोहे, वांड-आगाऊ, भन-बहीण, मारतुल-स्क्रू ड्रायवर, श्याक- कटाची आमटी,