मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

अष्टवृक्षासौभाग्यवती

शिव कन्या · · जनातलं, मनातलं
महमूद दरवेश या पालेस्तिनी लेखकाच्या 'If Only the Young Were Trees!' या ललितलेखाचा मुक्त अनुवाद. झाड झाडांचे सहोदर. झाड झाडांचे शेजारी. मोठी झाडं छोट्या झाडांची काळजी घेतात. न बोलता, हळूवार त्यांच्यावर सावली धरतात. एखाद्या छोट्या झाडाला रात्री भीती वाटू नये , म्हणून आपल्या खांद्यावरचा इवला पक्षी त्याच्या खांद्यावर अलगद ठेवतात. एक झाड दुसऱ्या झाडाच्या फळावर हल्लाबोल करीत नाही. वांझोट्या झाडाला घेरून, त्याची कुचेष्टा करीत नाहीत. एक झाड दुसऱ्या झाडावर घाव घालत नाही. झाडं चुकूनही लाकुडतोड्याचे अनुकरण करीत नाहीत. झाडाची नाव होते, अन झाड आपसूक पोहायला शिकते. झाडाचा दरवाजा होतो, अन झाड सगळी गुपितं मुळापर्यंत शोषून घेते. झाडाची खुर्ची होते, तेव्हा एकेकाळच्या आपल्या माथ्यावरील असीम आकाशाला ते क्षणभरही विसरत नाही. झाडाचा टेबल होतो, तेव्हा लिहिणार्याला जीव तोडून सांगते, माझ्याबरोबर कधीही लाकुडतोड्या सारखा वागू नकोस. झाडं म्हणजे क्षमा. झाडं म्हणजे जागृति. झाडं बेगुमानपणे झोपत नाहीत. झाडं दिवास्वप्नात रमत नाहीत. माणसांच्या द्रष्टेपणाची ठेव म्हणजे झाडं. झाडं म्हणजे साक्षात तपश्चर्या. झाडं म्हणजे ऊर्ध्वगामी प्रार्थना. वादळवाऱ्यात लवतातही झाडं समृद्धपणे! एरवी उभी असतात झाडं, निष्कलंक योग्याप्रमाणे. 'अष्टपुत्रासौभाग्यवती' ऐवजी 'अष्टवृक्षासौभाग्यवती' असा आशीर्वाद देण्याचे किंचित औदार्य आपल्या पूर्वजांनी दाखवले असते तर........ !

वाचने 6760 वाचनखूण प्रतिक्रिया 29

यशोधरा 21/04/2015 - 20:29
सुंदर! हे मूळ भाषेत वाचायला किती छान वाटेल.. इथे सापडलं. http://bloggingfairtradelebanon.blogspot.in/2010/02/if-only-young-were-trees-by-mahmoud.html ह्या भाषांतरीत पुस्तकातला उतारा - http://www.amazon.in/River-Dies-Thirst-Mahmoud-Darwish/dp/0981955711

पैसा 21/04/2015 - 20:46
असे रूपांतर करताना मूळ लिखाणाचा उल्लेख करा! ज्याचे श्रेय त्याला दिले पाहिजेच!

In reply to by रुपी

श्रीरंग_जोशी 22/04/2015 - 00:02
रुपके आवडली. नववीमध्ये मराठी कुमारभारतीमध्ये असलेल्या संत ज्ञानेश्वरांच्या अभंगांमध्ये यासारखी रुपके होती. तुम्ही दिलेल्या दुव्यातील माहितीही आवडली. त्या लेखाच्या लेखिका काही दिवसांपूर्वीच हे जग सोडून गेल्या :-( .

सौन्दर्य 22/04/2015 - 00:40
फार सुंदर अनुवाद, अगदी हृदयाला भिडला. आम्ही घरी कोणाचाही वाढदिवस असला की त्याच्या हस्ते एखादं रोप लावतो. कधी फुलझाड तर कधी फळझाड ! शतवृक्षा भाग्यवान भव !!

शिव कन्या 22/04/2015 - 07:51
धन्यवाद . तुमचा हा उपक्रम ताडमाड वाढो. शुभेच्छा .

शिव कन्या 22/04/2015 - 07:52
धन्यवाद . तुमचा हा उपक्रम ताडमाड वाढो. शुभेच्छा .