मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

अधूरी सख्या रे तुझ्यावाचुनी मी..

आनंदमयी · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
नभी काजळी दाटता सूर ओला उरा अंतरातून बरसून गेला झरा आत वाहे,तरीही सुनी मी अधूरी सख्या रे तुझ्यावाचुनी मी कुणी हासते वा कुणी गीत गाते कुणी प्रेमरंगात रंगून जाते उभी एकटी दूर सार्‍याहुनी मी अधूरी सख्या रे तुझ्यावाचुनी मी झरावे किती मेघ आतून सारे फुलावे किती अंतरंगी शहारे फिरो गार वारा किती आसमंती तरी कोरडासा उरे जीव अंती नव्याने नटो ही धरा मेघवेडी नवी बावरी लाजुदे सांज थोडी उभी पायथ्याशी नव्याने जुनी मी अधूरी सख्या रे तुझ्यावाचुनी मी सख्या,एकदा जीव ऐसा झुरावा सुटावे जिणे,श्वास माझा सरावा उरो शेवटाला तुझी होवुनी मी अधूरी सख्या रे तुझ्यावाचुनी मी © डॉ.अदिती शरद जोशी

वाचने 3543 वाचनखूण प्रतिक्रिया 20

पद्मश्री चित्रे 23/07/2014 - 09:57
सुंदर ,मनाला भिडणारी कविता

एस 23/07/2014 - 12:05
कविता मीटरवर म्हणायला मजा आली. पण अर्थाचे म्हणाल तर त्यातल्या सखीची आर्तता तितकीशी भिडली नाही. थोडे अलंकारिक लिहिण्याच्या नादात कदाचित थोडा विस्कळीतपणा आलाय की काय असे वाटले. राग मानू नका हो. हे कदाचित फक्त मलाच जाणवले असेल. इतरांना आवडलीय म्हणजे तसे नसेलही. पुकशु.

In reply to by एस

असंका 25/07/2014 - 12:15
+१ व्याकरणाला बांधून तरीही अगदी करकचून छंदबद्ध अशी ही कविता केली आहे (कविता मीटर!! :-)) ). पण ती फारच क्लीष्ट झाली आहे वाचायला...

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे 23/07/2014 - 14:27
झरावे किती मेघ आतून सारे फुलावे किती अंतरंगी शहारे फिरो गार वारा किती आसमंती तरी कोरडासा उरे जीव अंती खासच..! -दिलीप बिरुटे

In reply to by इनिगोय

राघव 04/08/2014 - 18:56
असेच म्हणतो. सुंदर रचना. तसेच शेवटचे कडवे वेगळ्या दृष्टीनं बघीतलं तर आणिक सुंदर भासतंय..! खूप छान! :)

बहुगुणी 23/07/2014 - 23:42
(अवांतरः आनंदमयींच्या कवितांमुळे मिपावर याआधी लयदार कविता लिहिणार्‍या प्राजुची आठवण होते.)

मिसळलेला काव्यप्रेमी 24/07/2014 - 12:40
अतिशय सुंदर रचना.... आवडली.

बॅटमॅन 25/07/2014 - 13:13
असे वाचुनी जाहले दीस फार अभिव्यक्ति केली पहा जोरदार अशी येउद्या येथ काव्ये अपार भुजंगप्रयाती 'य' येतात चार ||