मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

अविस्मरणीय ग्रीस - भाग २ - अथेन्स

सानिकास्वप्निल · · भटकंती
अविस्मरणीय ग्रीस - प्रस्तावना अविस्मरणीय ग्रीस - भाग १ - अथेन्स . सकाळी उठून, नाश्ता करून आम्ही हॉटेल खालूनचं टॅक्सी पकडली आणि अरिस्तेप्पू स्ट्रीटवरच्या लायकाबेट्टस टेलेफेरीकला पोहोचलो. टेलेफेरीक ही एक केबल रेल्वे आहे जी तुम्हाला डोंगरमाथ्यावर घेऊन जाते. ह्याला फनीक्युलर रेल्वे असे ही म्हटले जाते. ह्याचे बांधकाम १९६० मध्ये पूर्ण झाले व १९६५ ला हिचे उद्घाटन झाले. . टेलेफेरीक प्रवेशद्वार . फनीक्युलर रेल्वेतून जाताना . फनीक्युलर रेल्वे. वरिल चित्र आंजावरुन साभार इथे जाण्यास तुम्ही लायकाबेट्टस रंगमंचापर्यंत टॅक्सी करु शकता व तिथून तुम्ही वर डोंगरावर पायी चढून ही जाऊ शकता. लायकाबेट्टस डोंगर हा चुनखडीचा डोंगर आहे. समुद्रसपाटीपासून ९०८ फीट उंच असा हा डोंगर आहे ज्याचे अधम सर्व बाजुंनी पाईन झाडांनी वेढलेले आहे. ग्रीक पुराणानुसार अथेनादेवी जेव्हा अॅक्रोपोलिसवरच्या तिच्या मंदिराचा बांधकामासाठी शिळा घेऊन जात होती तेव्हा तिच्या हातून त्यातील जो दगड खाली पडला त्याचा हा डोंगर तयार झाला. एकेकाळी तिथे लांडगे वावरत असलेले अरण्य होते आणि ग्रीक भाषेत लांडग्याला लायकोस म्हणतात म्हणून ह्या डोंगराला लायकाबेट्टस असे नाव पडले. ह्या डोंगरावर सेंट.जॉर्ज चे एक चर्च / चॅपल आहे. पांढर्‍या शुभ्र रंगाचे चर्च अत्यंत साधे पण तितकेच सुंदर दिसते. इथे आत फोटो काढायला मनाई आहे. असे मानले जाते की राणी ओल्गाला ह्या चर्चचे भग्नावशेष सापडले होते. तिने त्याचा जीर्णोद्धार केला. संपूर्ण परिसर संगमरवराने सजलेला आहे आणि तेथेच राणी ओल्गाने एक बेल टॉवर बांधला आहे. सेंट.जॉर्ज चॅपल . बेल टॉवर . इथून संपूर्ण अथेन्स शहराचे मोहक दृश्य दिसते. . लायकाबेट्टसवरुन दिसणारा अॅक्रोपोलिस. . अथेन्स शहराचे दृश्य. . खाली एक भले मोठे गार्डन रेस्टॉरंट आहे आणि थोडं खाली उतरून गेलं की लायकाबेट्टस रंगमंच आहे. . . गार्डन रेस्टॉरंट . लायकाबेट्टस रंगमंच लायकाबेट्टसवरून आम्ही खाली उतरलो व थेट ग्रीक पार्लमेंट बघायला गेलो. आम्ही सिंतागामा स्क्वेअरला पोहोचलो , पुरातन ग्रीक भाषेनुसार सिंतागामा म्हणजे "आखणी", "करार" तर आधुनिक ग्रीक भाषेनुसार सिंतागामा म्हणजे "राज्यघटना". ३ सप्टेंबर १८४३ मध्ये ऑट्टो राजाने मान्यता दिलेली ग्रीक राज्यघटना, म्हणजेच सिंतगामा. तर ह्या सिंतागामा स्क्वेअरला पोहोचताच त्याच्या मेट्रो स्टेशनाच्या पलीकडे आहे ग्रीक पार्लमेंट जिथे दर तासाला चेंज ऑफ गार्ड्स होतं Tomb of the Unknown Soldiers समोर. . Tomb of the Unknown Soldiers ग्रीक सैनिकांना Evzones किंवा Evzoni असे म्हटले जाते. सैन्यात भरती होण्यासाठी ह्या सैनिकांची उंची कमीतकमी ६'१ फी. असावी लागते. त्यांचा पेहराव/ गणवेष ही खासचं असतो. भल्या मोठ्या बाह्यांचा पांढरा किंवा खाकी अंगरखा असतो, त्याखाली लोकरीची घट्ट विजार. डोक्यावर लाल टोपी आणि त्या टोपीला भला मोठा काळा रेशमी गोंडा. लाल चामडी बुट ज्याच्या सोलला बुटाच्या मापाप्रमाणे ६० ते १२० खिळे असतात ह्या बुटांना Tsarouhi असे म्हणतात. Tsarouhi . त्यांची मार्च पास्ट करण्याची एक विशिष्ट पद्ध्त आहे. नेहमीप्रमाणे मार्चींग सुरु करुन हळु हळू एक-एक पाय उचलून मार्च पास्ट करायचे आणि मग उजवा पाय जोरात आपटत चालायचे. त्यांच्या बुटांवर काळ्या रंगाचा मोठ गोंडा असतो ज्याला पॉम पॉम म्हण्ट्ले जाते. हे एव्हझोन्स एकमेकांसोबत दर पंधरा मिनिटांनी जागा बदलतात व इतरवेळी नि:स्तब्ध उभे असतात. . चेंज ऑफ गार्ड्स . चेंज ऑफ गार्ड्स अनेक पर्यटक त्यांच्याबरोबर फोटो काढायला उत्सुक असतात , फोटोग्राफीला परवानगी आहे देखील पण कुठल्याही प्रकारच्या खाणाखुणा उदा: व्हिक्टरीसाईन किंवा त्यांना हात लावायला मनाई आहे. एव्हझोन्स ना कुणी त्रास देत नाही ना ह्यावर लक्ष ठ्वणारे दुसरे सैनिक तेथे हजर असतात. . एव्हझोन्स . एव्हझोन्स तेथून आम्ही प्लाका मार्केटला फिरायला गेलो. वेगवेगळ्या प्रकाराचे कॅफे, सोव्हेनियरची दुकाने , ग्रीक मिठाया - बकालावा, कतैफीची दुकाने, ऑलिव्ह ऑईलची दुकाने, ग्रीक हस्तकलेची दुकाने एक ना अनेक . . प्लाका . विविध उपहारगृह . दुकाने . दुकाने . गणपतींची चादर विकणारा स्टॉल प्लाका मध्ये फिरता फिरता खरेदी करता करता वेळ कसा गेला समजले नाही. फिरता फिरता आम्ही Monastiraki ला येऊन पोहोचलो. तिथे आम्हाला अनेक दुकाने , उपहारगृह दिसली आता भुक ही लागली होती, वाटेत एक माणूस ओल्या नारळाचे तुकडे विकत होता, त्या उन्हात तो थंडगार नारळाचा तुकडा खाताना काय आनंद झाला म्हणून सांगू. . Monastiraki तिथून पुढे एका दुकानात गेलो आणि तिथून अ‍ॅलेक्झँडर दी ग्रेटचा पुतळा खरेदी केला. त्या दुकानासमोर रोमन हाड्रियनच्या ग्रंथालयाचे भग्नावशेष दिसत होते. . हाड्रियनच्या ग्रंथालयाचे भग्नावशेष . हाड्रियनच्या ग्रंथालयाचे भग्नावशेष आता भुक ही लागली होती म्हणून तिथल्याच स्केवरमधल्या एका उपहारगृहात आम्ही ग्रीक चिकन सुवालाकी खाल्लं. पिटामध्ये ग्रील्ड चिकन, सॅलॅड्स, त्झात्झिकि , चिली-मेयो, ऑलिव्ह्स, फ्रेंच फ्राईज असे रोल करुन देतात. त्याच बरोबर आम्ही लेमोनेड आणि पुरुषांनी तिकडची प्रसिद्ध मिथोस बियर आणि Courgette पॅटिस विथ त्झात्झिकी डिप मागवले. . ग्रीक सुवालाकी बसल्या बसल्या तिकडच्या उपहारागृहात ठेवलेल्या तिळाचा ब्रेड दिसला :) त्याला Koulóuria म्हणतात . . Koulóuria आता Monastiraki पर्यंत आलोच होतो म्हणून तसेच तेथून आम्ही पिराऊसला जाण्यासाठी मेट्रो पकडली. २०-२५ मिनिटांत आम्ही पिरऊसला पोहोचलो. पिराऊसला जाऊन आम्ही ब्ल्यु स्टार फेरीजच्या कार्यालयात जाऊन आमची नॅक्सोस व सॅंटोरीनीची बूक केलेली तिकिट कंफर्म केली. . पिराऊस बंदरावर दिसणारी नॅक्सोसची बोट. उद्या आम्हाला सकाळी सातची बोट पकडायची होती नॅक्सोससाठी. आजचा दिवस पण मस्तं मजेत गेला होता. आम्ही पिराऊसवरुन ओमोनियाला जाणारी मेट्रो पकडली आणि हॉटेलला पोहोचलो. मस्तं हॉटेलवरच जेवण मागावले आणि कालसारखेच हॉटेलच्या गच्चीवर लायकाबेट्ट्सला न्याहाळत, गप्पा मारत मस्तं जेवलो :) . पहाटे ५:४५ ला हॉटेल सोडायचे होते म्हणून लवकर जेवणं आटोपून आम्ही रुममध्ये आलो आणि गादीवर पडल्या पडल्या गाढ झोपी गेलो. क्रमशः

वाचन 8955 प्रतिक्रिया 20