मनमोहक बाली : ०३ : 'पुरा बेसाकी', अगुंग पर्वतावर वसलेली बालीतील मंदिरांची माता
...समुद्राच्या लाटांपासून दोन हाताच्या अंतरावर असलेल्या वाळूवर टाकलेल्या टेबलांवर बालीच्या समुद्रान्नाची चव घेताना आजचा दिवस सार्थकी लागल्याचे समाधान मनात होते.
कालच्या अर्ध्या दिवसाच्या फेरीच्या अनुभवानेच बाली पर्यटकांचे इतके आवडते ठिकाण का आहे हा प्रश्नच निकालात निघाला होता. त्यामुळे सकाळी न्याहारी वगैरे करून तयार होऊन उत्सुकतेने लॉबीत पोहोचलो. कार्तिक त्याचा हसरा चेहरा आणि खेळकर स्वभाव घेऊन आमची वाट पाहत होता. तेव्हा वेळ न घालवता त्वरीत बाहेर पडलो.
शहराच्या बाहेर पडलो आणि बाली तिचे सौंदर्य मोकळेपणे उलगडू लागली. बालीला निसर्गाने हिरवेगार डोंगर, दाट झाडी, लहान-मोठी तळी यांच्या रूपाने सौंदर्य भरभरून दिले आहे. लोकांनीही त्या सौंदर्याची नीट जपणूक करून वर त्यात आपल्या कलाकृतींची आणि सणसमारंभांची भर घालून ते अधिक खुलवले आहे. गावां-शहरांतील स्वच्छता आणि नीटनेटकेपणा लक्षणीय आहे.
वातावरण ढगाळ आणि कुंद होते. पण शहर मागे पडल्या पडल्या हिरवी झाडी व भाताची शेते असलेला परिसर सुरू झाला आणि मनावरचे तरी मळभ दूर झाले...
बेसाकी गावातली पारंपरिक घरे
घराच्या आवारातली देवांची आणि पूर्वजांची देवळे
बालीतील मंदिरे
बालीतील मंदिरांची रचना इतर ठिकाणच्या बंदिस्त खोल्यांच्या मंदिरांसारखी नसते, तर उघड्या आकाशाखालील कूस असलेले एक आवार अशी असते. बेसाकीसारखे मोठे मंदिर असल्यास त्यातल्या अनेक उपमंदिरांची आवारे एकमेकाला अनेक कोरीव व्दारांनी जोडलेली असतात. प्रकार: बालीत मंदिरांच्या स्थानावरून त्यांचे खालीलप्रमाणे प्रकार पडतात : १. पुरा काह्यांगन जगद् (Pura kahyangan jagad): ही मंदिरे पर्वतांच्या अथवा ज्वालामुखींच्या उतारावर बांधलेली आहेत. पर्वत आणि विषेशत: ज्वालामुखी यांना बाली हिंदू धर्मात असलेल्या उच्च स्थानामुळे या मंदिरांचा दर्जा सर्वात वरचा आहे. पुरा बेसाखी या प्रकारातले सर्वोच्च मंदिर आहे. २. पुरा सेगारा (Pura segara): ही मंदिरे सागरकिनार्यावर बांधलेली आहेत. ३. पुरा देसा (Pura desa): ही मंदिरे बेटाच्या (देशाच्या) अंतर्भागात सपाटीवर बांधलेली आहेत. ४. पुरा तिर्ता (Pura tirta): ही मंदिरे पाण्याचा स्रोत (झरा, नदी, तळे, इ) असलेल्या (म्हणजे तीर्थाच्या) ठिकाणी बांधलेली आहेत. या मंदिरांच्या पुजार्यांना शेतीकरिता पाणीवाटप करण्यासाठी बनवलेल्या "सुबक" नावाच्या प्राचीन जलनियोजन व्यवस्थेत महत्त्वाचे स्थान असते. ही प्राचीन धार्मिक-सामाजिक-आर्थिक व्यवस्था अजूनही बालीच्या काही विभागांत व्यवस्थितपणे चालू आहे !रचना:
मंदिरांची रचना सर्वसाधारणपणे पवित्र त्रिमंडल सूत्रावर बेतलेली असते: १. निस्तामंडल उर्फ जबा पिसान: या सर्वात बाहेरच्या आणि कमी उंचीच्या आवारात सुशोभित बाग असते. तेथे मंदिरांतील समारंभांची तयारी करण्यासाठी लागणारी जागा राखीव ठेवलेली असते. धार्मिक समारंभातील नृत्य इत्यादी कार्यक्रमांसाठीही ही जागा वापरली जाते. २. मद्यमंडल उर्फ जबा तेंगा: हे मध्यभागातील आवार भाविकांनी करण्याच्या धार्मिक विधींसाठी वापरले जाते. तेथे मंदिराचा मुदपाकखाना, भाविकांना पुजार्यांशी संवाद करण्यासाठीची जागा आणि मंदिराची वाद्ये ठेवण्याची जागा असते. ३. उतममंडल उर्फ जेरो: हे आवार मंदिराचा सर्वात पवित्र आणि सर्वात उंचीवरचा भाग असतो. तेथे अचिंत्यचे पद्मासन, पॅगोडासारखे एकावर एक अनेक छपरे असलेले "पेलिंग्गी मेरू" नावाचे मनोरे आणि वेदपठणासाठी राखीव जागा असते.व्दारे:
बाली स्थापत्यकलेत मंदिरांची मुख्यतः दोन प्रकारची व्दारे असतात : १. चंडी बेंतार (Candi bentar) म्हणजे दुभंगलेले व्दार. बालीत हे सतत दिसत राहते कारण मंदिराच्या सर्वात बाहेरच्या निस्तमंडलात प्रवेश करण्याच्या मार्गावर ते असते. २. कोरी अगुंग किंवा पदुरक्ष (kori agung or Paduraksa) प्रकारचे व्दार मध्यमंडल आणि उत्तममंडलाला जोडते. वर छप्पर असलेल्या या व्दारावरचे कोरीवकाम आणि रंगरंगोटी अतिशय कलापूर्ण असते.
कोरी अगुंग
अगुंग पर्वतावरची मंदिरमाता पुरा बेसाकी
पुरा बेसाकी हे बालीतील सर्वात पवित्र आणि आकाराने सर्वात मोठे मंदिर आहे. याला बालीतील सर्व मंदिरांची माता समजले जाते. या मंदिराचे बेसाकी हे नाव ज्याचा समुद्रमंथनात दोरीसारखा उपयोग केला होता त्या सर्पराज बासुकी (वासुकी) याच्या नावावरून पडले आहे. हे मंदिर सर्वप्रथम केव्हा स्थापित केले गेले याबाबत नक्की माहिती नाही. पण "पुरा पेनातरान अगुंग" या त्याच्या मुख्य भागातील दगडी चौथर्याच्या मेगॅलिथिक पिरॅमिडसारख्या रचनेवरून ते मंदिर कमीतकमी २००० वर्षांपूर्वीपासून अस्तित्वात असावे असे मत आहे. बालीतील धर्मग्रंथांप्रमाणे बालीत हिंदू धर्म सर्वप्रथम मार्कंडेय आणि अगस्ती ऋषींनी आणला. त्यापेकी मार्कंडेय ऋषींनी बेसाकीच्या प्राचीन मंदिराला हिंदू मंदिर बनवले असे मानले जाते. पुरा बेसाकीमध्ये हिंदू उपासना १२८४ साली जावातील हिंदू साम्राज्याच्या बालीवरील यशस्वी आक्रमणांच्या सुरुवातीने सुरू झाली असेही मानले जाते. पंधराव्या शतकामध्ये बालीमधिल गेलगेल या हिंदू राजघराण्याने त्याला राजमंदिराचा दर्जा दिला. हे मंदिर बालीतील सर्वात उंच (३०३१ मीटर) आणि सर्वात पवित्र अश्या अगुंग पर्वताच्या (गुनुंग अगुंगच्या) दक्षिणपश्चिम उतारावर १००० मीटर उंचीवर वसलेले आहे. बाली पुराणे व लोककथांप्रमाणे अगुंग पर्वत ही विश्वाचा मध्य समजल्या जाणार्या मेरू पर्वताची प्रतिकृती आहे. काहींच्या मते "मेरू पर्वताचे पामीरचे पठार -> भारत -> पूर्व जावा -> पश्चिम जावा असे विस्थापन होताना अगुंग पर्वत हा त्याचा बालीमध्ये पडलेला एक तुकडा आहे". तर इतर काहींच्या मते "तो हिंदूंनी बालीत येताना बरोबर आणलेला मेरूचा तुकडा आहे". पर्वत आपल्या जागेवरून हलून / हलवून हजारो किलोमीटर दूर जाणे / नेणे हे वास्तवात शक्य नाही. त्यामुळे, ही कथा बहुतेक "दूरवर स्थलांतरीत होणार्या लोकांनी स्वतःची संस्कृती / मायभूमीची मूठभर माती बरोबर आणणे आणि ती नवीन जागेत रुजविणे / जागेच्या मातीत मिसळणे" या कृतीचे प्रतिकात्मक रूप असावे. ते काहीही असले तरी अगुंग पर्वताचे बालीच्या धर्मात आणि समाजजीवनात अनन्यसाधारण महत्त्व आहे. (समुद्रमंथन : मानवाचे प्राचीन जलप्रवास या लेखात मी "मेरू हे प्राचीन काळातील समुद्रप्रवासाच्या आणि म्हणूनच सांस्कृतिक-व्यापारी-आर्थिक-राजकीय-दृष्ट्या महत्त्वाच्या केंद्राचे नाव असावे आणि त्या केंद्राची जागा काळाबरोबर बदलणार्या वस्तुस्थितीबरोबर बदलत गेली असावी." या कल्पनेच्या बाजूचे काही पुरावे मांडले होते. या केंद्राची नंतर पुराणांत आणि लोककथांत विश्वाचे केंद्र अशी "सुधारून वाढवलेली" आवृत्ती झाली असावी.) अगुंग पर्वत त्याच्या उंचीमुळे पश्चिमेकडील समुद्रावरून आलेले ढग पूर्णपणे रोखून धरतो. त्यामुळे पुरा बेसाकी असलेला त्याचा दक्षिणपश्चिम उतार वर्षभर ढगांनी वेढलेला, थंड आणि हिरवागार असतो, तर त्याचा उत्तरेकडील उतार बाष्पाअभावी कोरडा आणि रखरखीत असतो. अगुंग पर्वतावर बालीतील सर्वात मोठा जिवंत ज्वालामुखी आहे. त्याच्या १९६३-६४ मध्ये झालेल्या उद्रेकात १७०० लोक मृत्युमुखी पडले होते. त्यावेळी लाव्हाचा ओघ मंदिरापासून केवळ काही मीटर दुरून गेला आणि (बालीकरांच्या मते दैवी चमत्कारामुळे) मंदिराला अजिबात धोका पोहोचला नाही. बालीचे धार्मिक वर्ष २१० दिवसांचे असते. अश्या प्रत्येक वर्षात या मंदिरात कमीत कमी सत्तर मोठे सणसमारंभ साजरे केले जातात ! पर्वताच्या पायथ्याजवळ गाडीतून पायउतार होऊन चालू लागताच आजूबाजूचा सुंदर असलेला आणि "सुंदर राखलेला" परिसर आपले लक्ष वेधून घेतो...
पुरा बेसाकीकडे जाणार्या रस्त्यावर टिपलेले एक दृश्य
पुरा बेसाकीचा आराखडा
पुरा बेसाकीचे प्रथमदर्शन
...
...
पुरा बेसाकीचे काही संरक्षक
पुरा बेसाकी : पहिल्या स्तरावरच्या मुख्य चंडी बेंतार प्रकारच्या व्दाराकडे नेणार्या पायर्या
पुरा बेसाखीतील दोन स्तरांमधली पायर्या-पायर्यांची आकर्षक रचना
पुरा बेसाखीतील दोन स्तरांमधल्या रचनेतील बागा आणि बाहेरून दिसणारी उंच कोरीव पद्मासने आणि व्दारे
पुरा बेसाकीच्या उतममंडलात प्रवेश करण्यासाठी असलेले कोरी अगुंग (जालावरून साभार)
पुरा बेसाकीचा अंतर्भाग : ०१
पुरा बेसाकीचा अंतर्भाग : ०२ : पॅगोडासारखे दिसणारे मनोरे (पेलिंग्गी मेरू)
पुरा बेसाकीचा अंतर्भाग : ०३
पुरा बेसाकीचा अंतर्भाग : ०४
पुरा बेसाकीचा अंतर्भाग : ०५
पुरा बेसाकीचा अंतर्भाग : ०६
पुरा बेसाकीचा अंतर्भाग : ०७ : पुजारी मंडळींच्या नावाची यादी... मोबाईल फोन नंबर सकट
पुरा बेसाकीचा अंतर्भाग : ०८ : मंदिरातली खास बालीनीज वाद्ये
पुरा बेसाकीचा अंतर्भाग : ०९ : पार्श्वभूमीवर दिसणारा पर्वतराज अगुंग... क्षणभर ढगाआडून डोकावून दर्शन देताना
पुरा बेसाकीचा अंतर्भाग : १० : अचिंत्यची पद्मासने
पुरा बेसाकीचा अंतर्भाग : ११
पुरा बेसाकीचा अंतर्भाग : १२