पडघम २०१४-भाग ८: बॅटलग्राऊंड स्टेट-महाराष्ट्र (पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाडा)

क्लिंटन's picture
क्लिंटन in राजकारण
1 May 2014 - 9:53 pm

यापूर्वीचे लेखन

भाग १: राज्य विधानसभा आणि लोकसभा निवडणुकांमधील मतदानामधील फरक
भाग २: क्रिटिकल मास
भाग ३: बॅटलग्राऊंड स्टेट- मध्य प्रदेश
भाग ४: बॅटलग्राऊंड स्टेट-कर्नाटक
भाग ५: बॅटलग्राऊंड स्टेट- राजस्थान
भाग ६: बॅटलग्राऊंड स्टेट- केरळ
भाग ७: बॅटलग्राऊंड स्टेट-महाराष्ट्र: मुंबई परिसर आणि कोकण

पश्चिम महाराष्ट्र

पश्चिम महाराष्ट्रात अहमदनगर, बारामती, हातकणंगले, कोल्हापूर, माढा, मावळ, पुणे,सांगली, सातारा, शिर्डी, शिरूर आणि सोलापूर या १२ लोकसभा मतदारसंघांचा समावेश होतो.

अहमदनगर: २००९ मध्ये अहमदनगरमधून भाजपचे दिलीप गांधी निवडून आले.त्यावेळी आमदार राजीव राजळे यांनी बंडखोरी केली आणि राष्ट्रवादीचे उमेदवार शिवाजी कर्डिले यांची मते फोडली त्याचा फायदा दिलीप गांधींना झाला. यावेळी राजीव राजळे राष्ट्रवादीचे उमेदवार आहेत तर भाजपकडून दिलीप गांधी आहेत. या मतदारसंघातून आघाडीच्या मतांमध्ये फूट पडली तर भाजपला संधी मिळते अन्यथा आघाडीला हरविणे कठिण आहे.यावेळी तशी फूट आघाडीच्या मतांमध्ये पाडायला कोणी तगडा उमेदवार नाही.तेव्हा अहमदनगरमधून राष्ट्रवादी नक्की.

बारामती: राष्ट्रवादीच्या सुप्रिया सुळे नक्की.

हातकणंगले: या मतदारसंघात महायुतीकडून स्वाभिमानी पक्षाचे राजू शेट्टी तर कॉंग्रेसकडून ज्येष्ठ नेते कलाप्पा आवाडे आहेत.आवाडे रिंगणात आल्यामुळे राजू शेट्टींना निवडणुक २००९ इतकी सोपी नक्कीच जाणार नाही.तरी त्यांचा पराभव होईल असे वाटत नाही. तेव्हा हातकणंगलेमधून स्वाभिमानी पक्ष.

कोल्हापूर: या मतदारसंघात राष्ट्रवादीकडून धनंजय महाडिक, शिवसेनेकडून सदाशिवराव मंडलीक यांचे चिरंजीव संजय मंडलीक तर शेकापकडून संपतराव पवार उभे आहेत.या मतदारसंघात शिवसेनेची ताकद स्वबळावर निवडून यायला पुरेशी नाही.आयात केलेला उमेदवार असला तर शिवसेना चांगली टक्कर देते अन्यथा २०% च्या आसपास मते शिवसेनेला मिळतात.यावेळी सदाशिवराव मंडलीक त्यांची ताकद मुलामागे लावणार हे नक्की. २००९ मध्ये सदाशिवराव मंडलीक अपक्ष म्हणून स्वबळावर निवडून गेले होते. त्यामुळे लढत अगदी चुरशीची होईल.त्यातून मतदारसंघात शेतकऱ्यांची स्वाभिमानी पक्षाची मते शिवसेनेलाच मिळतील.राष्ट्रवादीचे उमेदवार धनंजय महाडिक सुध्दा तगडेच उमेदवार आहेत.तरीही शिवसेनेची कोल्हापूर शहरातील मते, सदाशिवराव मंडलीकांची साथ आणि स्वाभिमानी पक्ष या जोरावर संजय मंडलीक निवडून आले तरी आश्चर्य वाटू नये.तेव्हा कोल्हापूरमध्ये शिवसेना.

माढा:या मतदारसंघात राष्ट्रवादीकडून ज्येष्ठ नेते विजयसिंह मोहिते पाटील, त्यांच्याविरूध्द त्यांचे बंधू प्रतापसिंह मोहिते पाटील तर महायुतीकडून स्वाभिमानी पक्षाचे सदाभाऊ खोत उभे आहेत.सदाभाऊ खोतांना उमेदवारी देऊन महायुतीने या मतदारसंघात थोडी तरी लढत द्यायचा प्रयत्न केला आहे.तरीही मुख्य लढत मोहिते पाटील बंधूंमध्ये होईल असे वाटते. विजयसिंह मोहिते पाटील हे नक्कीच मोठे प्रस्थ आहे.त्यांच्या पराभव करणे तसे कठिणच आहे.तेव्हा माढामधून राष्ट्रवादी.

मावळ: या मतदारसंघातून शिवसेनेतून राष्ट्रवादीमध्ये गेलेले राहुल नार्वेकर राष्ट्रवादीकडून, शिवसेनेकडून गजानन बाबर तर शेकापकडून लक्ष्मण जगताप निवडणुक लढवत आहेत. २००९ मध्ये शेकापचे शिवसेनेला समर्थन होते त्यामुळे शिवसेनेच्या गजानन बाबर यांना विजय मिळवता आला.हा मतदारसंघ अर्धा कोकणात (उरण, पनवेल आणि कर्जत) तर अर्धा पश्चिम महाराष्ट्रात (मावळ, चिंचवड आणि पिंपरी) आहे.शेकापने सोडलेली साथ शिवसेनेला महागात पडेल हे नक्की.यावेळी शेकाप कोकणातून शिवसेनेची मते फोडणार हे नक्की.यावेळी या मतदारसंघातून राष्ट्रवादी बाजी मारणार असे दिसते.

पुणे: या मतदारसंघातून भाजपकडून अनील शिरोळे, कॉंग्रेसचे विश्वजीत कदम, मनसेकडून दिपक पायगुडे आणि आआपकडून सुभाष वारे निवडणुक लढवत आहेत.या मतदारसंघात अनील शिरोळेंचे काम आणि जनसंपर्क दोन्ही चांगले आहेत.तसेच कलमाडींच्या कृत्यांमुळे कॉंग्रेसला रोषाचा सामना करावा लागेल हे नक्की.तसेच विश्वजीत कदम हे बाहेरचे उमेदवार आहेत.२००९ मध्ये भाजपची मते मनसेने खाल्लीच.त्याचबरोबर बसपाकडून विख्यात बांधकाम व्यावसायिक डी.एस.कुलकर्णी रिंगणात होते.त्यांनीही युतीच्या समर्थकवर्गातील काही मते नक्कीच घेतली.यावेळी ते रिंगणात नाहीत.मनसेची ताकद २००९ च्या तुलनेत कमी आहे हे नक्कीच. तेव्हा या मतदारसंघातून भाजपला विजय मिळवायला जड जाऊ नये.मतदारयादीतून नावे वगळली गेली ती नक्की किती आणि कुठली हे समजल्याशिवाय या प्रकाराचा निकालावर किती परिणाम होईल हे सांगता येणार नाही.तेव्हा पुण्यातून भाजप

सांगली: या मतदारसंघातून कॉंग्रेसकडून वसंतदादा पाटील यांचे नातू प्रतीक पाटील रिंगणात आहेत.त्यांच्याविरूध्द भाजपचे संजय पाटील आहेत.तरीही सांगलीत वसंतदादांच्या पुण्याईवर त्यांच्या कुटुंबातील कोणाचाही पराभव करणे कठिणच आहे.तेव्हा सांगलीतून कॉंग्रेस.

सातारा: या मतदारसंघातून राष्ट्रवादीच्या उदयनराजेंचा पराभव करणे कठिणच आहे.तेव्हा साताऱ्यातून राष्ट्रवादी.

शिर्डी: या मतदारसंघात २००९ मध्ये शिवसेनेचे उमेदवार म्हणून विजयी झालेले भाऊसाहेब वाकचौरे कॉंग्रेसचे उमेदवार आहेत.त्यांनी रामदास आठवलेंचा पराभव केला होता आणि त्याचा दोष आठवलेंनी कॉंग्रेसला दिला होता. शिवसेनेचे उमेदवार म्हणून सदाशिव लोखंडे आहेत.शिर्डीमधून यावेळी कॉंग्रेसला हरविणे कठिणच वाटते. तेव्हा शिर्डीमधून कॉंग्रेस.

शिरूर: या मतदारसंघात शिवसेनेकडून खासदार शिवाजीराव आढळराव पाटील तर राष्ट्रवादीकडून देवदत्त निकम रिंगणात आहेत.या मतदारसंघात शिवाजीराव आढळराव पाटील यांचे काम आणि जनसंपर्क चांगला आहे.तसेच पुण्याचे भाग असलेल्या भोसरी आणि हडपसरमधून त्यांना ’मोदी लाटेमुळे’ नक्कीच फायदा मिळेल.जुन्नर, आंबेगाव, खेड-आळंदी आणि शिरूरमधून त्यांना स्वत:च्या कामाचा नक्कीच फायदा होईल.त्यातून राष्ट्रवादीने खूप तगडा उमेदवार दिलेला नाही.त्यामुळे यावेळी शिरूरमधून आढळराव पाटील हॅट-ट्रीक करणार असे वाटते.तेव्हा शिरूरमधून शिवसेना.

सोलापूर: या मतदारसंघातून कॉंग्रेसच्या सुशीलकुमार शिंदे यांचा पराभव करता येणे कठिणच.तेव्हा सोलापूरमधून कॉंग्रेस.

तेव्हा पश्चिम महाराष्ट्रात पुढील परिस्थिती असेल असे वाटते:

एकूण जागा: १२
आघाडी: ८
महायुती: ४

उत्तर महाराष्ट्र
उत्तर महाराष्ट्रात नंदूरबार, धुळे, जळगाव, रावेर, दिंडोरी आणि नाशिक या सहा मतदारसंघांचा समावेश आहे.

नंदूरबार: या मतदारसंघातून कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते माणिकराव गावीत तर भाजपकडून विजयकुमार गावितांची कन्या हिना गावीत उमेदवार आहेत.मला वाटते की माणिकराव गावीत यांचा पराभव करता येणे थोडे कठिणच आहे.तेव्हा नंदूरबारमधून कॉंग्रेस.

धुळे: धुळ्यात भाजपकडून सुभाष भामरे, कॉंग्रेसकडून अमरिष पटेल तर आआपकडून हारून अन्सारी उमेदवार आहेत.२००९ मध्ये अनील गोटे आणि निहाल अहमद यांनी चांगली मते घेतली.यावेळी निहाल अहमद रिंगणात नाहीत.मालेगावमधून आआप चांगली मते घेईल तरीही निहाल अहमद यांच्याइतकी मते घेईल असे वाटत नाही.तेव्हा धुळ्यात लढत चुरशीची होईल.पण देशातील वातावरण लक्षात घेता धुळ्यात भाजप असे वाटते.

जळगाव आणि रावेर: या मतदारसंघांमधून भाजप नक्कीच जिंकेल असे वाटते. जळगाव जिल्ह्यात भाजप बऱ्यापैकी बळकट आहे.यावेळी खूप फरक पडावा असे वाटत नाही.

दिंडोरी: या मतदारसंघातील आदिवासी भागांमधून कम्युनिस्ट पक्ष चांगली मते घेतो.त्यातून मतविभागणी होऊन भाजपला फायदा होईल असे वाटते. तेव्हा दिंडोरीमधून भाजप.

नाशिक: या मतदारसंघातून राष्ट्रवादीकडून छगन भुजबळ, शिवसेनेकडून हेमंत गोडसे, आआपकडून विजय पांढरे तर मनसेकडून प्रदीप पवार रिंगणात आहेत.यावेळी राष्ट्रवादीकडून भुजबळांसारखा तगडा उमेदवार आहे.तसेच मनसे मतविभागणी करायला आहेच.तेव्हा नाशिकमधून राष्ट्रवादी नक्की.

मला मराठवाडा आणि विदर्भातील मतदारसंघनिहाय माहिती नाही.त्यामुळे एकूण अंदाज लिहित आहे.

मराठवाड्यात हिंगोली, नांदेड,परभणी,जालना, औरंगाबाद, बीड,उस्मानाबाद आणि लातूर हे ८ मतदारसंघ आहेत. मला वाटते की नांदेड (अशोक चव्हाण) मधून कॉंग्रेस नक्की.बाकी ७ ठिकाणी महायुतीला जिंकायला हरकत नसावी.

विदर्भात बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा, रामटेक, नागपूर, भंडारा-गोंदिया, गडचिरोली-चिमूर, चंद्रपूर आणि यवतमाळ-वाशिम हे १० मतदारसंघ आहेत. यापैकी नागपूर मतदारसंघात लक्षवेधी निवडणुक आहे.भाजपकडून नितीन गडकरी, कॉंग्रेसकडून विलास मुत्तेमवार आणि आआपकडून अंजली दमानिया उमेदवार आहेत. इथून अंजली दमानिया गडकरीविरोधी मते फोडतील.या मतदारसंघातून भाजप एकदाच (१९९६) मध्ये यशस्वी झाला आहे आणि तोही बनवारीलाल पुरोहित या मुळच्या कॉंग्रेस नेत्याला उभे करून.यावेळी नितीन गडकरी रिंगणात आहेत.तसेच शहरी भागातील नरेन्द्र मोदी लाटेचा गडकरींना नक्कीच फायदा होईल.तेव्हा नागपूरमधून भाजप. भंडारा-गोंदियामधून राष्ट्रवादीच्या प्रफुल पटेलांना जिंकायला हरकत नसावी.गडचिरोली-चिमूरमधूनही कॉंग्रेसला जिंकायला हरकत नसावी. चंद्रपूरमधून भाजपचे हंसराज अहिर यांना निवडून यायला हरकत नसावी. तेव्हा विदर्भातील १० पैकी ८ जागा महायुतीला तर २ जागा आघाडीला असे मानतो.

तेव्हा महाराष्ट्रात पुढीलप्रमाणे चित्र उभे राहिल असे वाटते.

table.tableizer-table {
border: 1px solid #CCC; font-family: Arial, Helvetica, sans-serif
font-size: 12px;
}
.tableizer-table td {
padding: 4px;
margin: 3px;
border: 1px solid #ccc;
}
.tableizer-table th {
background-color: #104E8B;
color: #FFF;
font-weight: bold;
}

    
 एकूण जागामहायुतीआघाडी मनसे
मुंबई+ठाणे१०६३१
कोकण२२००
पश्चिम महाराष्ट्र१२४८०
उत्तर महाराष्ट्र६४२०
मराठवाडा८७१०
विदर्भ१०८२०
एकूण४८३११६१

प्रतिक्रिया

प्रचेतस's picture

1 May 2014 - 10:01 pm | प्रचेतस

उत्तम विश्लेषण.
मावळ बद्दल मात्र असहमत.
लक्ष्मण जगताप हे राष्ट्रवादीचे छुपे आणि पॉवरफुल उमेदवार समजले जातात. पिंपरी चिंचवडमधील ३५ नगरसेवकांची यंत्रणा ही जगतापांच्या मागे होती. राष्ट्रवादीचे तिकीट त्यांनी नाकारले नसते तर सरळ लढतीत ते नक्कीच निवडून आले असते. आता मात्र शेकाप व राष्ट्रवादी यांच्या विभागणीचा फायदा शिवसेनेचे श्रीरंग बारणे यांना मिळेल. तर राष्ट्रवादी तिसर्‍या क्रमांकावर फेकली जाईल.
तेव्हा माझे मत मावळमध्ये शिवसेना.

चौकटराजा's picture

3 May 2014 - 5:04 pm | चौकटराजा

एका मताने होईना बारणे निवडून येतील.

मालोजीराव's picture

7 May 2014 - 2:02 pm | मालोजीराव

न्हाय र वल्ल्या... यंदा आपल लक्शुमन भाउच येनार... शेकाप+मनसे+राष्ट्रवादी(समदे नगरशेवक)+शिवसेना(बाबर गट)= लक्शुमन भाऊ

आता कळेलच १६ तारखेला भाऊ का अप्पा ते :)

धर्मराजमुटके's picture

1 May 2014 - 10:22 pm | धर्मराजमुटके

भाऊसाहेब वाकचौरे यांनी निवडणूकीच्या तोंडावर दलबदल केल्यामुळे त्यांच्याविरोधात असंतोष आहे. शिवसेनेला विजयाची संधी आहे असे वाटते.

शैलेन्द्र's picture

2 May 2014 - 4:33 pm | शैलेन्द्र

भाऊसाहेब वाकचौरे यांनी निवडणूकीच्या तोंडावर दलबदल केल्यामुळे त्यांच्याविरोधात असंतोष आहे. शिवसेनेला विजयाची संधी आहे असे वाटते.

थोरात आणि विखेंनी मिळून मागच्या वेळी आठवलेंना पाडले, यावेळी, याच दुकलीने, वाकचौरेंना राष्ट्रवादीत पडण्यासाठी पाठवलय. शरद पवारांच्या पक्षाचा उमेदवार काँग्रेसवाले नक्की पाडणार.. शिर्डीत शिवसेनाच..

श्रीरंग_जोशी's picture

1 May 2014 - 10:31 pm | श्रीरंग_जोशी

या अंदाजांनुसार आघाडीचे वृत्तवाहिन्यांनी वर्तवलेल्या अंदाजांपेक्षा कमी नुकसान होईल असे दिसत आहे.

असे झाल्यास यंदाच्या विधानसभेत आघाडीचे पारडे जड राहील (२००४ व २००९ च्या लोकसभा वि. विधानसभा निकालांमधील प्रवाहानुसार).

तपशीलातील एक चूक - मावळ मतदारसंघात सेनेकडून यावेळी श्रीरंग बारणे हे उमेदवार आहेत. सध्याचे खासदार गजानन बाबर यांना सेनेने यंदा तिकिट नाकारल्याने त्यांनी मनसेत प्रवेश करून प्रतिस्पर्धी उमेदवाराला (लक्ष्मण जगताप) पाठिंबा घोषित केला आहे.

घन निल's picture

2 May 2014 - 12:03 pm | घन निल

तेच म्हणत होतो !

पुण्यामध्ये शिरोळ्यांची मतं पायगुडे आणि वारे खातील असं वाटतंय. अर्थात ती किती प्रमाणात यावर विश्वजीतचं भवितव्य अवलंबून आहे.

पुणे भाजपांतर्गत असलेल्या लाथाळ्या हाही एक फॅक्टर आहे. मुंडेसमर्थक वि गडकरीसमर्थक, मोदी वि अडवानी समर्थक, ब्राह्मण वि ब्राह्मणेतर या लॉब्यांतून उमेदवार निवडतानाच त्यांची दमछाक झाली. तरी शिरोळ्यांच्या रूपाने चांगला समतोल साधला गेला आहे.

क्रिकेटमध्ये "टच अँड गो" म्हणतात तशी परिस्थिती आहे. विजेत्याचं मताधिक्य फार थोडं असणार हे नक्की.

मालोजीराव's picture

7 May 2014 - 2:23 pm | मालोजीराव

पैशाचा पडलेला पाउस, Faulty वोटिंग मशीन आणि लाखभर बोगस मतदान या पार्श्वभूमीवर शिरोळे निवडून आले तर आश्चर्य नक्कीच वाटेल

विकास's picture

1 May 2014 - 11:28 pm | विकास

बारामती: राष्ट्रवादीच्या सुप्रिया सुळे नक्की.

या एकोळी अंदाजावरून सिध्द झाले की तुम्ही विश्लेषण न करता अंदाज करत आहात म्हणून! ;) (अर्थात तेथे कुणाला विश्लेषणाची खरच गरज लागत असेल तर काय म्हणणार! जय महाराष्ट्र! :) )

असो. गंमतीचा भाग सोडून देऊयात. विश्लेषण आवडले! आता (आज १ मे आहे) हे १५ दिवस उत्कंठावर्धक राहणार हे नक्की!

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

1 May 2014 - 11:43 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

बारामतीत काही चमत्कार होईल असे वाटत नाही पण का कोणासठाऊक रासप चे आणि महायुतीचे महादेव जानकर चांगलीच टक्कर देतील असे वाटते. (व्हावा चमत्कार)

-दिलीप बिरुटे

श्रीरंग_जोशी's picture

1 May 2014 - 11:53 pm | श्रीरंग_जोशी

मी स्वतः अडीच वर्षे बारामतीमध्ये राहिलोय. २००४ च्या लोकसभा व विधानसभा निवडणुका त्या दरम्यान होत्या. मधल्या काळात तेथील लोकमत किती बदलले ते ठाऊक नाही पण ते थोड्याफार फरकाने तसेच असेल तर कुठल्याही चमत्काराची आशा वाटत नाही.

वृत्तपत्रांतील बातम्यांनुसार यंदा राष्ट्रवादीचे मताधिक्य कमी होईल असा अंदाज आहे.

अवांतर - गेल्या महिन्यातच भारतात परतलेले एक मूळचे बारामतीकर मिपाकर यांनी आपली ताकद कुणामागे उभी केली हे कळल्यास अंदाज वर्तवणे अधिक सोपे होईल ;-).

सुहास झेले's picture

1 May 2014 - 11:28 pm | सुहास झेले

एकदम अभ्यासू विश्लेषण... शिर्डीतून सेना येईल असे वाटते.

यंदा मोठ्या प्रमाणावर मतदारांची नाव गायब झाल्याने, किती फरक पडेल असे वाटते?

अन्या दातार's picture

1 May 2014 - 11:40 pm | अन्या दातार

मावळमधून यंदा सेनेचे गजानन बाबर यांना तिकीट न मिळाल्याने त्यांनी मनसेचा रस्ता धरला. सेनेकडून श्रीरंग बारणे यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे बाबर नक्कीच आपली ताकत सेनेच्या विरोधात लावतील (कृष्णकुंजवरुन मिळालेल्या आदेशाबरहुकूम)

हातकणंगले: ऊस उत्पादक शेतकर्‍यांच्या भल्यासाठी (खरंच??) केल्या गेलेल्या आंदोलनातून राजू शेट्टींची ताकत काँग्रेसला खिंडार पाडू शकली. या दरम्यान यंत्रमाग कामगार व व्यावसायिक यांच्याकडे दुर्लक्ष झाले. त्याचाच फायदा घेण्यासाठी काँग्रेसने कल्लापाण्णा आवाडेंसारख्या ज्येष्ठ मातब्बरास उमेदवारी दिली. साखर कारखाना लॉबीची ताकतही त्यांच्या मागे आहे. इतके असूनही ऊस उत्पादक व यंत्रमाग व्यावसायिक यांचा कल शेट्टींच्या बाजूनेच जाईल असे वाटते.

कोल्हापूरः प्रचंड गुंतागुंतीचे राजकारण असणारा जिल्हा! राष्ट्रवादीचे उमेदवार मुन्ना महाडीक यांच्या पाठीशी किती नेते खरोखर ताकत लावतात हे बघणे रोचक ठरले. मुन्ना महाडीकांचे काका, आमदार महादेवराव महाडीक यांना कोणत्याच प्रचार सभेत बघितल्याचे/वाचल्याचे आठवत नाही. कामगारमंत्री हसन मुश्रीफ यांना औद्योगिक क्षेत्राकडून तितका सपोर्ट यंदा नाही. मुश्रीफांनी मुन्नाच्या प्रचाराची धुरा वाहिली असे म्हणणे वावगे ठरु नये. (कुठेतरी बोलता बोलता, "मी भोळेपणाने मुन्नांना तिकिट द्यावे असे म्हणालो" असे ऐकल्यामुळे खरंच त्यांचा पाठिंबा मुन्ना महाडिकांना आहे का अशी शंका येते). गृहराज्यमंत्री बंटी पाटील व मुन्ना महाडीक यांच्यात विस्तवही जात नाही हे वास्तव पुसायचा प्रयत्न या निवडणुकीच्या तोंडावर झाला. प्रचाराच्या शेवटच्या दिवशी काँग्रेस - राष्ट्रवादी काँग्रेसमधील विधानसभा उत्सुक उमेदवारांच्यात झालेल्या राड्यामुळे मतदारात काय संदेश गेला याची कल्पना करता येईल. ग्रामीण भागात चुरशीने मतदान झाल्याने कदाचित मुन्ना महाडिक निवडून येईलही असे काही शिवसैनिकही खासगीत बोलतात. १६ मे रोजीच काय ते पाहाणे औत्सुक्याचे ठरेल.

पैसा's picture

2 May 2014 - 12:07 am | पैसा

मला फक्त एकच शंका आहे. महाराष्ट्रातल्या सुमारे ६० लाख ते ७४ लाख मतदारांची नावे गायब असल्याचे निवडणूक आयोगाकडून सांगितले गेले. या मतांमुळे सगळेच निकाल उलटेपालटे होण्याची शक्यता आहे.

श्रीरंग_जोशी's picture

2 May 2014 - 12:27 am | श्रीरंग_जोशी

ज्या मतदारसंघात अटीतटीची लढत आहे (द्वितिय क्रमांकाची मते घेणार्‍या उमेदवाराला विजयी उमेदवाराच्या मतांच्या ९८% किंवा अधिक मते मिळणे) अशा मतदारसंघात या कारणाने निकालावर परिणाम होईल याची शक्यता वाटते.

अन्यथा मतदारयादीतून नाव गहाळ झालेल्या बहुतांश मतदारांनी त्या ठिकाणच्या द्वितिय क्रमांकाची मते मिळवणार्‍या उमेदवारालाच मत दिले असते हे गृहितक पटत नाही.

पैसा's picture

2 May 2014 - 9:24 am | पैसा

हे गृहीतक नाही. हा "जर-तर" चा प्रकार आहे. या मतांचा अंदाज करता येणार नाही. २००९ ला एकूण ३ कोटी ६८ लाख मते महाराष्ट्रातून दिली गेली होती. हे प्रमाण एकूण मतदारांच्या ५०.५% आहे. म्हणजे एकूण मतदारांपैकी सुमारे १०% नावे गहाळ आहेत. २००९ साली २८ जागी १०% हून कमी मार्जिनने निकाल लागले होते.

ही गहाळ झालेली मते कोणत्या दिशेला गेली असती याचा अंदाज लावता येणार नाही. पण "जर" शेवटच्या एका टोकाला गेली "तर" बर्‍याच निकालांवर परिणाम होऊ शकतो. यापैकी १८ जागी तर विजयाचे मार्जिन ५% हून कमी आहे. तिथे काय होऊ शकलं असतं आणि प्रत्यक्षात काय झालं असेल हे १६ मेलाच समजेल.

सांगलीबद्दल असहमत. प्रतीक पाटील अन संजय पाटील दोघेही एकाच खानदानातले आहेत अन यावेळी मद्दानास गेलो असताना वातावरण प्रो-भाजप बर्‍यापैकी दिसले, तस्मात सांगलीतून भाजप येणार असे वाटते आहे.

बाकी अभ्यासपूर्ण लेख यात शंकाच नाही. घरबसल्या अख्ख्या महाराष्ट्राचेच का, अख्ख्या देशाचे अंदाज वाचायला मिळणे हे लै जबरी काम आहे.

चावटमेला's picture

2 May 2014 - 7:25 pm | चावटमेला

प्रतीक पाटील अन संजय पाटील दोघेही एकाच खानदानातले आहेत

हे माहीत नव्ह्तं

भुमन्यु's picture

2 May 2014 - 12:22 pm | भुमन्यु

छगन भुजबळ यांना ही निवडणूक वाटली होती तितकी सोपी जाणार नाही. छगन भुजबळ राष्ट्रवादीचे स्टार प्रचारक असूनही त्यांना प्रचारासाठी नासिकच्या बाहेर पडता आलेले नाही यावरूनच अंदाज येतो की त्यांना निवडणूक सोपी जाणार नव्हती. यावेळेस मनसे २००९ सारखी प्रगती निश्चितच करू शकणार नाही . याला कारणीभूत ठरेल ती नाशिक महानगर पालिकेतील निष्क्रियता. २.५ वर्षांपासून सत्ता असूनही नाशिकमध्ये मनसेने काही विशेष कामगिरी केलेली नाही आणि त्याचा फटका निश्चितच बसेल. मोदी लहरीचा परिणाम ग्रामीण भागातही दिसून आला. छगन भुजबळांना आघाडीतील बिघाडाचा ही फटका बसू शकतो. त्यामुळे नाशिकमधला सामना रंगतदार झालाय हे निश्चित. त्यामुळे भुजबळांचा विजय सरसकट ग्रुहित धरणे शक्य नाही.

राहुल

श्रीगुरुजी's picture

2 May 2014 - 12:35 pm | श्रीगुरुजी

बराचसा सहमत! काही अंदाज चुकीचे वाटतात.

(१) नांदेडमधून अशोक चव्हाणांचा पराभव अशक्य वाटतो.
(२) कोकणात सिंधुदुर्गमधून साम,दाम,दंड्,भेद इ. सर्व आयुधे वापरून नारायण राणे मुलाला निवडून आणतील. तसेच रायगडमधून सुनील तटकरे नक्की येतील असे वाटते.
(३) नागपूरमधून गडकरी येतील असे वाटत नाही. मुळात तिथे भाजप एकदाच निवडून आलेला होता. दरबारी राजकारण करणारे गडकरी नक्कीच पडतील व मुत्तेमवार निवडून येतील.
(४) नगर, माढा, मावळ व शिर्डी येथून युतीचे उमेदवार लागतील.

एकूण तुमच्या अंदाजातील आकड्याशी सहमत (युती ३१ व आघाडी १६), परंतु जागांच्या निकालाशी संपूर्ण सहमत नाही.

सोलापुर : शिन्देना हि निवडणुक अवघड गेलेलि आहे . शहर मधले काहि भाग वगलता सगलिकडे भाजपाला मते गेलि आहेत जरि तगडा उमेदवार नसला तरि (मोदि प्रभाव). जर माननिय ग्रहमन्त्रि पडले तरि आश्च र्य वाटु नये
सांगली : संजय पाटील येनार असे मला वाटते. मोदी प्लस घराणेशहि, काँग्रेस विरोधि वातावरण

समीरसूर's picture

2 May 2014 - 2:25 pm | समीरसूर

पुण्यात कदम येतील असे वाटते. अशोक चव्हाण, भुजबळ, तटकरे, शिंदे, सुळे ही मातब्बर मंडळी निवडून येतील असे वाटते. उमेदवारांनी किती पैसे वाटले हे अंदाजामध्ये लक्षात घेतले आहे काय? पुण्यात कोट्यवधी रुपये वाटले गेल्याचे ऐकले. तशीच परिस्थिती नाशिक आणि इतर बर्‍याच मतदारसंघात असल्याचे ऐकीवात आले आहे. हजार-दोन हजार रुपये एका मताला देऊन मते विकत घेणे आपल्याकडे नवे नाही आणि हा फॅक्टर दुर्लक्षून चालणार नाही.

युती ३१ आणि आघाडी १६ हे समीकरण थोडे मोदीलाटेने प्रभावित झाल्यासारखे वाटते. आघाडीची अशी पडझड होईल असे वाटत नाही. आघाडी २०-२१ च्या पुढे नक्कीच जाईल असे वाटते. अर्थात हा माझा अंदाज आहे. आपल्या इतका अभ्यास या अंदाजामागे खचितच नाही. त्यामुळे चुकल्यास क्षमस्व! :-)

कपिलमुनी's picture

2 May 2014 - 3:35 pm | कपिलमुनी

मावळ मध्ये धनुष्यबाण चालणार असा अंदाज आहे .
१. बाहेरचा राष्ट्रवादीचा उमेदवार .. त्यामुळे गोंधळलेले कार्यकर्ते ..
२. जगताप यांना असलेला अंतर्गत विरोध ..आझमभाई पानसरेंनी 'जगताप नको' असा उघड प्रचार केल्या मुळे मुस्लीम मते आणि पानसरे समर्थकांची (शेट्टी इ.) मते जगताप यांना मिळणार नाही..
३. विद्यमान आमदार विलास लांडे यांचा पण जगताप यांना विरोध आहे..त्याचा फटका बसेल.
४. मनसे आणि शेकाप ची घाटावर ताकद खुपच मर्यादित आहे..
५. गजानन बाबर यांच्यामुळे फार फरक पडेल असा वाटत नाही .. स्वतची ताकद खुप कमी आहे. आणि त्यांच्या सोबत कोणी बाहेर पडले नाही..
६. दादा पवारांनी कॉग्रेस च्या कार्यकर्त्यांना एवढा दुखावला आहे की ते जगताप नको आणि कोणी नको असेच म्हणतात.
७. बसप आणि आप , दलीत आणि मुस्लीम ट़क्का घेणार..(१००००-२००००) मतांचा फरक मोठा असणार आहे..
.............
या मतदार संघात खरी मजा घाटाखालच्या वाढलेल्या मतदारांमुळे येणार आहे ..
सध्या शेकापची ताकद मर्यादीत आहे..पूर्वी ती बरीच असली तरी नेत्यांच्या कोलांट्या उड्या मुळे ती कमी झाली आहे..
आणि शिवसेनेची ताकद चांगली आहे .. मनसे चा अधिकृत उमेदवार नाही .. त्यामुळे ती मते शिवसेनेला जातील असा अंदाज आहे ..

एकूण पैसे आ॑णि पॉवर दोन्हीकडून लावले आहेत..
बारणे आणि जगताप यांच्यात बारणे यांची मत विभागणी कमी आहे ..म्हणून ते येतील असेच वाटते..

विटेकर's picture

2 May 2014 - 3:48 pm | विटेकर

पण आघाडीला जरा जास्त जाग दिल्यात असे वाटते. माझ्या मते युती ३५-३६ वर जाईल.
नाशिक - सांगली - मावळ - नगर - शिर्डी या तुमच्या अंदाजापेक्षा माझे अंदाज अगदी उलटे आहेत.
बाकी फक्त महाराष्ट्राबद्द्ल बोलायचे झाल्यास युती जि़ंकणार यापेक्षा आघाडी हरणार हे अधिक सत्य आहे. दगडापेक्षा वीट मऊ म्हणून लोक युतीला निवडतील. बाकी युतीचे महाराष्ट्रातील कर्तृत्व शून्य आहे.
काही नेते हारावेत असे मनापासून वाट्ते -
१. गोपीनाथ मुंडे
२. सुप्रिया सुळे
३. छगन भुजबळ
४. राणे पुत्र
५. अशोक चव्हाण
६. वंशज - उदयनसिंह राजे
७. वाकचौरे
८. राहुल नार्वेकर
यांच्या विरोधात दगड निवडून आले तरी चालतील. पण हे होणार नाही !

उदयनमहाराज आणि बाकी नेते यात खुप फरक आहे. गेल्या निवडणुकीत पहिला निकाल सातारा लागला होता, अन् तेही विक्रमी सगळ्यात जास्त आघाडीने, हेच सगळे सांगुन जाते..
भ्रष्टाचार, ऩिधी न वापरणे किंवा सामान्य माणसानां न भेटणे इ. कारणे असल्यास समजु शकतो विरोध पण फक्त छञपतीचां वशंज म्हणुन, मोठा मराठा नेता म्हणुन विरोध, द्वेष असेल तर निषेधच...!
असो तुम्ही अन् मी काय, सातारकरच सांगतील..।

।। छञपतीशी निष्ठा हीच आमची प्रतिष्ठा।।

हाडक्या's picture

3 May 2014 - 8:30 pm | हाडक्या

तुमच्या सहीमध्येच तुमचे अंधत्व दिसते आहे. उदयनराजेनी सातार्‍यासाठी काहीही केलेले नाही, हे सातार्‍याचा नागरिक म्हणून सांगू शकतो. वरून संघटित गुंडगिरी आणि विरोधी आवाज काढला की शिवाजी महाराजांचे नाव वापरून भावना दुखावल्याच्या गळा काढणारे, ठोकशाहीला लोकशाही म्हणणारे आणि त्याचे निर्लज्ज समर्थन करणारे तुमच्यासारखे समर्थक असल्यावर अजून काय होणार ?

लेवे खून खटल्याबद्दल सातारकरांना काही सांगण्याची गरज नाही आणि न्यायालयाने क्लीन चीट दिली आहे हा तर इथे मोठा विनोद असेल .
विरोध करणार्‍यांना ऊचलून घेऊन जायचे आणि ठोकून फेकून द्यायचे नित्याचेच आहे. अगदी डोळ्यासमोर पाहिले आहे.
दारु पिऊन दंगा आणि इतर तर्‍हा बाजूलाच ठेऊ.. पण एका तरी समस्येसाठी, सुनियोजित कामासाठी काही केले आहे का त्यांनी ?

>> छञपतीचां वशंज म्हणुन, मोठा मराठा नेता म्हणुन विरोध, द्वेष असेल तर निषेधच...!

छञपतीचां वशंज म्हणुन, मराठा नेता म्हणुन आदर करण्यासारखे जरातरी वागावे की मग.. कर्तव्यशून्यता कमीत कमी आदर वाटण्यासारख्या व्यक्तिमत्वाने तरी झाकून न्यावी तर ते ही नाही.

त्यांच्या अशा वागण्यापेक्षा तुमच्यासारख्या समर्थकांबद्दल कीव येते..
बाकी त्यांना कसे जगायचे तसे त्यांनी जगावे, कमीत कमी शिवाजी महाराजांचे (दत्तक) वारस असलेल्या या मंडळींनी त्यांचे नाव वापरू नये असे वाटते..

श्रीगुरुजी's picture

3 May 2014 - 8:38 pm | श्रीगुरुजी

जोपर्यंत उदयन भोसलेंना छत्रपती, राजर्षि, महाराज इ. बिरूदे लावणारी मंडळी आहेत, तोपर्यंत त्यांनी काहीही केले किंवा काहीच केले नाही तरी तेच निवडून येणार. अमेठी, रायबरेलीची उदाहरणे डोळ्यासमोर आहेतच. अमेठीत फक्त ७-८ तास वीज असते, बहुतेक रस्ते कच्चे मातीचे रस्ते आहेत. मातीची कच्ची घरे व पोट खपाटीला गेलेले उघडेबंब नागरिक आहेत. तरीसुद्धा आम्ही राहुललाच मत देणार असे अभिमानाने सांगितले जाते. तोच न्याय सातार्‍यातही लागू.

दुश्यन्त's picture

3 May 2014 - 9:00 pm | दुश्यन्त

उदयनराजे निवडून येईपर्यंत पवार, राष्ट्रवादी, कॉंग्रेसचे गुणगान गटात एकदा निवडून आले कि पक्ष बिक्ष गेला चुलीत असली विधाने दारू पिवून करतात.अजित पवारांचा आणि यांचा ३६चा आकडा आहे.युट्यूबवर यांची विनोदी भाषणे उपलब्ध आहेत.मात्र त्यांना लोकांचा बर्यापैकी पाठींबा आहे. महायुतीने(शिवसेनेने)पण मुद्दाम यांच्यासमोर दुबळा उमेदवार दिला आहे.राजे नक्की निवडून येणार.या आधी ते भाजपा, कॉंग्रेस असे फिरून आले आहेत.खासदार झाल्यावर भाजपकडे वळले तरी आश्चर्य वाटायला नको.

प्रसाद१९७१'s picture

7 May 2014 - 3:39 pm | प्रसाद१९७१

ह्या लिस्ट मधे हे पण पाहिजेत

तटकरे
गुरुदास कामत
परांजपे
अण्णांना धमकीची पत्रे पाठवणारे, नाव आठवत नाही.

दुश्यन्त's picture

7 May 2014 - 4:12 pm | दुश्यन्त

अण्णांना धमकीची पत्रे पाठवणारे, नाव आठवत नाही.
उस्मानाबादचे पद्मसिंह पाटील. धमकीचे पत्र यांनी स्वतः पाठवले नसेल त्यांच्या कार्यकर्त्यांनी मात्र धमकीची पत्रे, फोन वगैरे केले आहे. पद्मसिंह पाटील स्वताच्या मावस भावाच्या (पवनराजे निंबाळकर) खूनप्रकरणात जेलची हवा खावून आले आहेत.केसचा निकाल अजून लागला नाही.मागे अण्णा हजारेनी यांच्या विरोधात आंदोलन केल्याने यांचे मंत्रीपद गेले होते. अण्णा हजारेंच्या हत्येची सुपारी दिल्याबद्दल पण यांच्यावर आरोप आहे.बहुदा ही पण केस अजून चालू आहे. या निवडणुकीत अण्णा हजारेनी पद्म्सिन्हाविरुद्ध मतदान करा अश्या आशयाची पत्रके वाटली होती.

अण्णानां धमकी पत्र जिवनराव गोरे( उ.जि.प चे माजी अध्यक्ष यांच्या लेटरहेडवर पाठवले. यामागे पाटिल नक्कीच आहे.
गोरे सध्या एसटी महामंडळाचे अध्यक्ष आहेत. पारनेर पोलीसात याबाबत गुन्हा दाखल झाला आहे.

मावळमध्ये शिवसेना नक्की येणार. शेकापचा उमेदवार (जगताप) हा मुळचा एनसीपीचा आहे (तिथे एनसीपीने नार्वेकर हा डमी उमेदवार दिल्याचे त्यांचेच कार्यकर्ते ,हाणत होते).एनसीपीचे अनेक कार्यकर्ते दिवसा एनसीपीचा प्रचार आणि रात्री शेकापच्या गोटात जात यावरून खुद्द अजित पवार आणि शरद पवारांनी नाराजी व्यक्त केली होती.पिंची भागात मनपा निवडणुकीत एनसीपीला पडणारी मते विधानसभा आणि लोकसभेला कमी कमी होत जातात असा अनुभव आहे. तेव्हा मावळमध्ये शिवसेनेचे धनुष्यबाण चालणार आणि बारणे निवडून येणार.यंदा सांगलीमध्ये कमळ फुलेल.कोल्हापुरात जोरात चुरस होईल मात्र मांडलिक येतील असेच वाटतेय.माढ्यात एनसीपी येईल मात्र अ'नगर आणि शिर्डीत महायुती आणि कॉंग्रेसला समान संधी आहे. अ'नगर मध्ये यंदा निवृत्त न्यायाधीश कोळसे पाटील अपक्ष म्हणून उभे होते त्यांना विखे पाटलांचा पाठींबा असल्याचे बोलले जातेय तेव्हा तिथेही तिरंगी लढत होवून भाजपला फायदा होवू शकतो.शिर्डीत वाक्चौरेना जोरात विरोध झाला होता मात्र विखे पाटील त्यांच्या मागे उभे आहेत तरीही निकाल सांगणे अवघड आहे.मराठवाड्यात कॉंग्रेसला नांदेड नंतर लातूर मध्ये पण थोड्याफार आशा आहेत. बाकी औरंगाबाद, जालना, उस्मानाबाद, परभणी मध्ये शिवसेना-भाजप महायुती येईल.
महायुतीला राज्यात ३५च्या आसपास जागा मिळू शकतील.

दुश्यन्त's picture

2 May 2014 - 4:17 pm | दुश्यन्त

रत्नागिरी-सिंधुदुर्गात शिवसेना जिंकेल कारण तिथे राणेंच्या दादागिरीला कंटाळून राष्ट्रवादी (आमदार केसरकर वगैरे ) तसेच कॉंग्रेसचा एक गट (आमदार विजय सावंत) वगैरेनी उघडपणे राणेविरोधात काम केले त्याचा फायदा सेनेच्या विनायक राउतांना होईल. नाशिकमध्ये भुजबळ यांना निवडणूक अजिबात सोपी नव्हती.भुजबळ काठावर निवडून येतील किंवा राज्यातला सर्वात धक्कादायक निकाल तिथे लागून सेना जिंकूही शकते.सोलापुरात मतदानाच्या दिवशी भाजपला मिळालेला प्रतिसाद पाहून कॉंग्रेस हबकून गेली आहे.तेव्हा नाशिक आणि सोलपुर कॉंग्रेस आघाडीला आधी वाटले तेवढे सोप्पे नक्कीच नसणार आहेत.पुण्यात यंदा कमळ फुलणार.कदमांना अपेक्षित असणार्या भागात कमी मतदान झाल्यामुळे तसेच ते पुण्याबाहेरचे उमेदवार असल्याने भाजपचे शिरोळे नक्की निवडून येतील.

श्रीरंग_जोशी- २००४ला राज्यात ४८ लोकसभा पैकी युतीकडे २५ तर कॉंग्रेस आघाडी २३ असे चुरशीचे चित्र होते. २००९ मध्ये युतीला २०, कॉंग्रेस आघाडी-२५ , अपक्ष-२ (यांनी नंतर कॉंग्रेसला समर्थन दिले) आणि स्वाभिमानीचे राजू शेट्टी -१ असे चित्र होते. २००९ला मनसेने युतीची जास्त मते खाल्ली होती तसेच दोन्ही वेळेस केंद्रात कॉंग्रेसचे सरकार आल्याने आघाडी जोरात होती. आता युतीमध्ये स्वाभिमानी, रासप, आरपीआय आल्याने महायुती झाली आहे.लोकसभेत जर महायुतीला चांगले यश मिळाले तर विधानसभेला त्याचा त्यांना नक्कीच फायदा होणार आहे. राज्यात गेली १५ वर्षे कॉंग्रेस आघाडी आहे आणि केंद्रातल्या सरकारपेक्षाही जास्त नाराजी राज्य सरकारबद्दल आहे. अश्या स्थितीत योग्य जागावाटप आणि प्रचार केल्यास २०१४च्य विधानसभेत सेना-भाजप महायुती येवू शकते अर्थात त्याला अजून ६ महिन्याचा अवकाश मोठा आहे.६ महिन्यात बर्याच घडामोडी घडू शकतात मात्र राज्यातला एकंदर कल महायुतीच्या बाजूने आहे.

श्रीरंग_जोशी's picture

2 May 2014 - 6:02 pm | श्रीरंग_जोशी

गेल्या दोन्ही वेळी लोकसभेचे निकाल लागल्यानंतर अन विधानसभेची आचारसंहिता लागू होण्यापूर्वी आघाडी सरकारने युक्त्या प्रयुक्त्या वापरून (जसे शेतकर्‍यांना शुन्य बिले इ.) अन विशेषकरून राष्ट्रवादीने निवडणुकीचे उत्कृष्ट व्यवस्थापन (त्यांना हे लोकसभेपेक्षा विधानसभेत उत्तम जमते) करून विधानसभा निवडणुकीचे निकाल त्यांच्याकडे झुकवले होते.

गेल्या दोन दिवसांच्या बातम्यांवरून काही महिन्यांसाठी राज्यात टोलमुक्त वातावरण बनेल अशी शक्यता वाटत आहे. तसेच स्थानिक स्वराज्य संस्था कराबाबतही होऊ शकते.

गेल्या दोन वेळी केंद्रातही संपुआ सरकार होते ते यंदा नसण्याची शक्यता असल्याने तेवढा एक घटक युतीच्या बाजुने आहे. लोकसभेच्या निकालांनंतर त्यांनी फाजिल आत्मविश्वास न बाळगल्यास पुढचे राज्यसरकार त्यांचेच.

दुश्यन्त's picture

3 May 2014 - 9:17 pm | दुश्यन्त

बरोबर आहे.सत्ताधारी आघाडी पूर्ण प्रयत्न करणार मात्र लोक कितपत भुलणार याची शंका आहे.२००४ ला शेतकर्यांचे वीज बिल माफ करू म्हणाले नंतर म्हणाले ती प्रिंटींग मिस्टेक होती अशी अनेक उदाहरणे आहेत.१५ वर्षांची anti incumbency आहे. नुकत्याच झालेल्या राजस्थान, मप्र. वगैरे विधानसभा निवडणुकीत कॉंग्रेसने आश्वासनांचा पावूस पाडून पडून लोक भुलले नाहीत (राजस्थानात सरकार कॉंग्रेसचेच होते). महाराष्ट्रात कॉंग्रेस-एनसीपी मराठा आरक्षण, टोल, एलबीटी वगैरेंचे निर्णय घेणार. आरक्षणाचा मुद्दा कोर्टात कितपत टिकेल हे माहित नसले तरी निर्णय घेवून मोकळे होतील.उद्या कोर्टाने फटकारले तरी आमच काम आम्ही केल म्हणायला मोकळे आणि पुढचे सरकार कॉंग्रेस आघाडीचे येणार नाही तेव्हा येणारे सरकार काय ते पाहून घेईल असा विचार असू शकतो.दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे लोकसभेत कॉंग्रेस आघाडीला मोठे अपयश आले तर कॉंग्रेस आणि एनसीपी एकमेकांवर तोफ डागत राहतील. आघाडी विधानसभा एकत्र लढेल की स्वतंत्र हे पण सांगता येत नाही. खास करून एनसीपीला पक्ष वाढायचा असेल, मुख्यमंत्रीपद स्वतःकडे घ्यायचे तर स्वबळावर लढण्याशिवाय पर्याय नाही. शरद पवार एनडीएकडे वळनार नाहीतच असे कोणी सांगू शकत नाही.महाराष्ट्राच्या राजकारणात काय घडेल याचा नेम नाही. १६मेला निकाल लागल्यावर हळूहळू सगळे पक्ष आपले पत्ते उघड करतील.

श्रीगुरुजी's picture

2 May 2014 - 8:42 pm | श्रीगुरुजी

निवडणुकीचा आता कंटाळा आला आहे. गेले अनेक महिने तेच तेच नेते, तीच तीच छापील भाषणे, तेच तेच चर्चेचे गुर्‍हाळ, असभ्य भाषणे इ. चा आता वीट आला आहे. भारताच्या इतिहासातील ही सर्वाधिक लांबलेली निवडणुक आहे (७ अप्रिल ते १६ मे व मतदानाचे एकूण ९ टप्पे). २००९ मध्ये हाच कालावधी १३ एप्रिल ते १६ मे असा होता (एकूण ५ टप्पे). २००४ मध्ये व त्यापूर्वी याहूनही कमी होता. अपवाद १९९१ चा (त्यावेळी राजीव गांधींच्या हत्येमुळे काही राज्यातील निवडणुक १ महिना पुढे ढकलली होती).

१९९९ पर्यंत मतपत्रिका हाताने मोजत असत. तरीसुद्धा मतदानाचे टप्पे व कालावधी कमी होता व मतदानानंतर ३-४ दिवस वाट न बघता लगेच मतमोजणीला सुरूवात होत असे. आता इलेक्ट्रॉनिक मतयंत्रे असूनही १२ मे ला मतदान संपल्यावर ४ थ्या दिवशी मतमोजणी आहे.

एकंदरीत हा तमाशा लवकर संपुष्टात यावा अशी इच्छा आहे.

समीरसूर's picture

6 May 2014 - 9:29 am | समीरसूर

कधी एकदा हा तमाशा संपेल असं झालंय. सामान्यांच्या आयुष्यात कुठलही सरकार आल्याने काही विशेष फरक पडण्याची सुतराम शक्यता नाही. निवडून आलेले खासदार खर्च केलेले कोट्यवधी रुपये दामदुपटीनं वसूल करण्यासाठी हातात खोरी घेऊन जनतेच्या पैशावर डल्ला मारणारच आहेत. ते काही टळणार नाही. सरकार काँग्रेसचं असो अथवा भाजपचं अथवा तिसर्‍या आघाडीचं, आपले प्रश्न तसेच राहणार यात शंका नाही. आपण तमाशा बघून टाळ्या पिटायच्या आणि 'जनतेचे सेवक' 'जनतेचे सेवक' म्हणून नेत्यांनी गुंडगिरी करून शेकडो-हजारो कोटी कमवायचे हे काही आपल्याला नवीन नाही. आयपीएलचा धंदा आणि निवडणूकीचा धंदा काही फार वेगळा नाही. आयपीएलमध्येदेखील खेळाडू, प्रायोजक, संघमालक कोट्यवधी रुपये कमवतात आणि मूर्ख जनता तो फालतू, नीरस, आधीच निर्णय ठरलेला, किळसवाण्या भ्रष्टाचाराने बरबटलेला, सगळी नीतीमत्ता धाब्यावर बसवून नुसत्या छनछन पैशाच्या मागे लागलेला तमाशा आवडीने बघून स्वतःचा अमूल्य वेळ व्यर्थ दवडते. जो सामान्य जनतेला नादी लावू शकतो तो आपल्याकडे अतिश्रीमंत होतो. सामान्य माणूस मात्र तसाच राहतो; टाळ्या पिटणारा आणि घराच्या हप्त्यांखाली दबलेला, झुकलेला.

निवडणूक आता तसाच तमाशा झालेला आहे. भ्रष्टाचार हेच एकमेव सूत्र आहे आता राजकारणाचे. नीतीमत्ता, मुल्ये, देशाचा विकास, स्वच्छ प्रशासन, वगैरे बाता आहेत आणि सगळेच पक्ष सारखे आहेत. कुठलाच पक्ष चांगला वगैरे अजिबात नाहीये. सोयीस्कर मतदारसंघ बनवणे, मतदान यंत्रे बिघडवून ठेवणे, मुद्दाम दीड-दोन महिन्याचा कालावधी ठेवणे, मतदारांची नावे गायब करणे, जनतेवर पैशाची खैरात करून मते विकत घेणे, आणि निवडून आल्यावर गळ्यात गळे घालून स्वतःची तुंबडी भरण्याचे काम करणे याखेरीज आपल्या निवडणुकांमध्ये आणि राजकाराणात दुसरे काही घडत नाही. कंटाळवाणी भाषणे आणि हास्यास्पद असे बालिश आरोप-प्रत्यारोप, तेच तेच पोकळ वादे-इरादे, आणि समाज अस्वस्थ करणारी वक्तव्ये हे सगळे ऐकून कान विटले आहेत हे खरे! :-(

रामटेक आणि वर्ध्यामधून पण कॉंग्रेस येईल.
रामटेक - मुकुल वासनिक
वर्धा - सागर मेघे

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

5 May 2014 - 7:47 am | कॅप्टन जॅक स्पॅरो

मावळ ला यंदा खुप जास्त मारामारी आहे. बारणे, जगताप आणि नार्वेकर ह्यांच्यामधे खरी चुरस आहे.

यंदा भरपुर नावं वगळली गेल्यानी नेमका अंदाज बांधणं कठीण आहे. तिन्ही उमेदवार मातब्बर आहेत. त्यातुन बारणे किंवा जगताप निवडुन यायची शक्यता जास्त आहे.

जेपी's picture

5 May 2014 - 1:28 pm | जेपी

लातुरमध्ये कांग्रेस भाजपला समान विजयाची संधि आहे.
उस्मानाबाद मध्ये कडी टक्कर आहे. रोहन देशमुख मुळे युतिच्या मतात फुट पडलिये.पद्मसिंह पाटलांने भयानक आर्थिक जोर लावलाय.एकुणच युतीसाठी कठिण आहे

दुश्यन्त's picture

7 May 2014 - 3:22 pm | दुश्यन्त

उस्मानाबादेत गेल्या वेळेस पण काट्याची टक्कर होवून शेवटी पद्मसिंह पाटील थोडक्यात निवडून आले होते. या वेळेस रोहन देशमुख अपक्ष आहेत त्यांचा तोटा शिवसेनेला होईल तसेच कॉंग्रेसने राष्ट्रवादीला सहकार्य न केल्याने त्याचा फटका आघाडीला पण बसेल. बार्शीचे कॉंग्रेसचे माजी आमदार राजेंद्र राउत महायुतीला मदत कारत होते. गेल्या वेळेस बार्शीत आजी-माजी आमदार आघाडीला मदत करत होते आणि बार्शीमुळे राष्ट्रवादी निवडून आली होती यंदा तशी स्थिती नाही.पद्मसिंह पाटील स्वतःच्या मावस भावाच्या खुनातले आरोपी आहेत. त्यात मोदी घटक महायुतीला फायदा करून देईल. लढत अटीतटीची आहे मात्र महायुती येईल असे वाटतेय.२००९ विधानसभेत पद्मिसिन्हाचा मुलगा (राणा जगजितसिंह) सेनेकडून हरला होता.
बाकी पद्मसिंह पाटील स्वतःच्या मावस भावाच्या खुनातले आरोपी आहेत.तुरुंगाची हवा खावून आले आहेत. अण्णा हजारेंच्या हत्येची सुपारी दिल्याचा आरोप पण त्यांच्यावर आहे.ते शरद पवारांच्या नात्यातले असले तरी अश्या गुन्हेगारी रेकोर्ड असलेल्याला उमेदवारी द्यायला नको होती.

श्रीगुरुजी's picture

6 May 2014 - 12:32 pm | श्रीगुरुजी

क्लिंटनराव,

१६ मे रोजी निकाल आहेत. तुम्ही निकालासाठी नवीन धागा सुरू करणार आहात का? १२ मे ला शेवटचे मतदान संपल्यावर त्याच दिवशी मतदानोत्तर चाचणीचे विविध वाहिन्याचे निकाल प्रदर्शित होतील. नवीन धाग्यात काही वाहिन्यांच्या मतदानपूर्व चाचणीचे निकाल, मतदानोत्तर चाचण्यांचे निकाल व तुमचे स्वतःचे अंदाज हे सविस्तर लिहिलेले असावेत. प्रत्यक्ष मतमोजणी झाल्यावर तीनही अंदाजांची व प्रत्यक्ष निकालांची तुलना करता येईल.

१६ मे रोजी निकाल आहेत. तुम्ही निकालासाठी नवीन धागा सुरू करणार आहात का?

हो तसे करायला नक्कीच आवडेल.पण १६ मे रोजी मला रजा मिळेल याची खात्री नाही.तरीही वेळ मिळेल त्याप्रमाणे निवडणुकांविषयक लिखाण करणारच आहे.गुजरात, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, दिल्ली, छत्तिसगड या राज्यांमधील मतदारसंघनिहाय तर उत्तर प्रदेश, ओरिसा, पश्चिम बंगाल, आंध्र प्रदेश आणि तामिळनाडू या राज्यांमधील एकूण अंदाज आणि शेवटी पूर्ण देशातील चित्र कसे असेल याचे अंदाज हे लेख अजून लिहायचे आहेत. मतमोजणी १६ ऐवजी १८ मे रोजी असती तर किती बहार आली असती :)

आपल्या प्रोत्साहनाबद्दल आभारी आहे.

क्लिंटन's picture

6 May 2014 - 10:15 pm | क्लिंटन

सर्वांना धन्यवाद. काही मतदारसंघांमधील काही गोष्टी मला माहित नव्हत्या त्या तुम्हा सर्वांच्या प्रतिसादातून कळल्या. शेवटी मी राहायला मुंबईत आहे आणि महाराष्ट्रातील कोकण, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि नाशिक सोडून इतर एकही ठिकाण मी बघितलेलेही नाही.त्यामुळे मतदारसंघांमधील ग्राऊंड रिऍलिटी मला कळणे शक्य नाही.विविध वर्तमानपत्रे आणि इतर मिडिया यामध्ये आलेल्या बातम्या आणि गेली अनेक वर्षे राजकारण फॉलो करायच्या सवयीतून काही गोष्टी माहित झाल्या यातून कितपत मते फिरतील हा अंदाज घेऊन हे आडाखे लिहिले आहेत. बघू अंदाज कितपत बरोबर येतात ते.

सर्वांना परत एकदा धन्यवाद.

सह्यमित्र's picture

7 May 2014 - 7:32 pm | सह्यमित्र

सर्व भाग वाचले. सखोल अभ्यास आणि उत्तम analysis!!

दादा पेंगट's picture

11 May 2014 - 11:15 pm | दादा पेंगट

भंडारा-गोंदियातून भाईजी जिंकून येण्याची शक्यता कमी आहे. ते याआधी पण हरले आहेत, शिशुपाल पटले या नवख्या उमेदवाराने भाजपाच्या तिकिटावर हरवले होते.हां संघ तसा भाजपाचा आहे. श्रीकांत जिचकार पण अनोळखी भाजप उमेदवाराकडुन हरले होते. मागच्या खेपेलासुद्धा प्रफुल्ल पटेलांनी जिंकायला बराच घाम,पैसा आणि दारु गाळली होती. तेव्हा अपक्ष नानाभाऊ पटोले(कांग्रेस चे बंडखोर आमदार) भाजपच्या शिशुपाल पटलेंना तिसर्या क्रमांकावर फेकून दुसरे आले होते. नानाभाऊञ्चा एक मोठा चाहता वर्ग आहे, ती मते आहेत. यंदा ते भाजपाच्या तिकिटावर उभे आहेत. ती मते त्यांना जाणार. त्यांची एकगठ्ठा कुणबी-मराठा मतेही आहेत आणि मोदी factor आणि कांग्रेस विरोध ह्या सगळ्या गोष्टी ध्यानात घेतल्या तर भाईजीचे यंदा कठीण आहे(दोन मोठे उद्योग आणूनही आणि इतर काही विकासकामे करूनही). भंडारा-गोंदिया नानाभाऊ पटोले.