मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

मुळ्याचे पराठे

स्वाती दिनेश · · पाककृती
सध्या आमच्याकडे इतकी बेक्कार करडी,ढगाळ,कंटाळवाणी हवा आहे,फारसं करता येण्यासारखं काही नाही म्हणून एखादा जुना हिंदी सिनेमा टाइमपास म्हणून लावावा असं मनात आलं आणि मग तेच केलं.. आणि कोणत्याही पॅकेज डिल मध्ये येतात तसे 'बी ए पास' आणि बेटे के लिए खाँस 'मुली के पराठे','गाजर का हलवा','खीर' इ. इ... आलेच त्याबरोबर.. खूप खूप दिवसात हे 'मुली के पराठे' आपणही केले नसल्याचा साक्षात्कार झाला आणि मग लागलेच मी मुळा किसायला.. तर पेश है हिंदी सिनेमाने फेमस केलेले 'मुली के पराठे'.. साहित्य- मुळ्याचा किस २ वाट्या, १ लहान सिमला मिरची किसून(हा माझा शोध- भोपळी मिरचीमुळे एक वेगळाच फ्लेवर येतो.) १ ते १.५ चमचा तिखट,१/२ चमचा हळद,१ चमचा ओवा,१ चमचा धनेपूड, फोडणीचे साहित्य, तेल, मीठ, डाळीचे पीठ,कणिक कृती- मुळा किसून घ्या, सिमला मिरची किसून घ्या. त्यात तिखट,हळद,ओवा,धनेपूड,मीठ घालून मिक्स करुन घ्या. एका कढईत १ ते १.५ टेबल स्पून तेल गरम करुन फोडणी करुन घ्या. त्यात हे मुळ्याचे मिश्रण घाला व परता. अंदाजाने २ ते २.५ चमचे डाळीचे पीठ घालून परता, व झाकण ठेवून वाफ काढा. म्हणजेच चक्क मुळ्याची पीठ पेरुन भाजी करुन घ्या. ती पूर्ण थंड होऊ द्या. पोळ्यांना भिजवतो तशी कणिक भिजवा. भाजी गार झाली की पराठे करायला घ्या. नेहमीच्या पुरीवढ्या दोन पुर्‍या लाटून घ्या. एका पुरीवर सारण घाला. दुसरी पुरी त्यावर ठेवून दाब देऊन बंद करा. हलक्या हाताने पराठा लाटा. तव्यावर तेल सोडून भाजा. दही+ चाट मसाला, लोणचे, चटणी, सॉस.. हवे त्याबरोबर खा. . जोडीला त्याबरोबर हवा असला तर गाजर का हलवा

वाचने 9737 वाचनखूण प्रतिक्रिया 24

आदूबाळ Wed, 02/05/2014 - 18:13
"तुम्हारे फूफाजी को मूली के पराठे बहुत पसंद थे. एक बार मैने बडी मेहेनत कर के उनके लिए बनाए. एक पराठा खा के वो टेबल पे ही चल बसे. एक बार तुम्हारी शादी हो जाय, मै हर रोज तुम्हारे लिए मूली के पराठे बनाऊंगी" कोणता चित्रपट??

गणपा Wed, 02/05/2014 - 18:32
असले सारणाला आपल्या आतं कैद करुन ठेवलेले पराठे(पुरणपोळ्या आदी पदार्थ ) करायचे तर स्त्रीच्या जन्मालाच यावं लागतं बहुतेक. आमचं म्हणजे शर्ट्च्या बटणांतुन सुटलेली ढेरी हळुच डोकावावी तसला प्रकार असतो. ;) परांठे झक्कास. :)

In reply to by गणपा

प्यारे१ Wed, 02/05/2014 - 22:03
>>>आमचं म्हणजे शर्ट्च्या बटणांतुन सुटलेली ढेरी हळुच डोकावावी तसला प्रकार असतो. त्याशिवाय काय खाल्लं ते कळणार कसं? ;) -कुकनं बनवलेल्या सगळ्या पदार्थांची सारखीच चव खाऊन कावलेला आवला आपलं आवले!

In reply to by प्यारे१

सूड Wed, 02/05/2014 - 22:23
असं कसं? असं कसं? पुरणपोळीत व्यवस्थित पुरण भरुनही ते जराही बाहेर दिसू न देणं यात खरं कौशल्य आहे. जे नेहमी बर्‍याचदा आपल्या आदल्या किंवा त्याच्याही आदल्या पिढीलाच अवगत असतं. (अजूनही पुरण बाहेर न दिसणारी पुरणपोळी बनवायचा प्रयत्न करणारा) सूड ;)

In reply to by सूड

प्यारे१ गुरुवार, 02/06/2014 - 01:38
>>>जे नेहमी बर्‍याचदा आपल्या आदल्या किंवा त्याच्याही आदल्या पिढीलाच अवगत असतं. ह्याच्याशी सहमत! तुला नाही जमायचं म्हणून घरातली फक्त वयानुसार निवृत्तीकडं झुकलेली बाई तब्बेत बरी नसताना मग पदर खोवते , होत नसताना उसनं अवसान आणते नि काय काय होत रहातं. पोळी आणखीच गोड लागते. मावळतीकडं ढळता सूर्य हे मुख्य कारण असतं. चक्र सुरुच राहतं...! असो. नैतर स्वाती तै हाणायची!

दिपक.कुवेत Wed, 02/05/2014 - 20:01
फोटो काय देखणा आलाय. असं वाटतय त्यातला एक पराठा लगेच उचलुन खावा. पराठा बनवायची (नविन) पद्धत पण आवडली. पण सीमला मिरची किसली जाते?

मुक्त विहारि Wed, 02/05/2014 - 21:40
पीठातच किसलेला मूळा घालते. बाकी, तुमची रेशीपी तिला दाखवली.किसलेल्या सिमल्या मिरचीची कल्पना तिला आवडली आहे. (आता ह्या पीठात ती काय काय किसून घालेल , काही सांगता येत नाही.)

पैसा Wed, 02/05/2014 - 22:03
मस्तच! वेगळा प्रकार! करून बघायला हवेत.

प्रभाकर पेठकर गुरुवार, 02/06/2014 - 03:33
सारणवाले मुळ्याचे परोठे कधी केले नाहीत. आता करून पाहीन. माझी पाककृती म्हणजे. मुळा किसून घ्यायचा त्याला थोडे मिठ लावून १० मिनिटे ठेवून द्यायचं. नंतर किस पिळून मुळ्याचे पाणी एका वाडग्यात काढून घ्यायचं. मुळ्याच्या पानांमधील जाड देठ वेगळा काढून मिक्सरवर वाटून घ्यायचा. बाकी पाने बारीक चिरुन घ्यायची. कणकेत वाटलेला देठ, बारीक चिरलेली पाने, आलं, लसूण, हिरव्या मिरच्यांची पेस्ट आणि चवीपुरतं मीठ (पाण्यात आधीच आहे हे विसरायचं नाही) घालून पिठ मुळ्याच्या रसात/पाण्यात भिजवायचं. आता ह्याचे परोठे/ठेपले लाटायचे आणि भाजायचे. पाणी पिळलेल्या मुळ्यात बारीक चिरलेल्या मिरच्या, दाण्याचा कूट, कोथिंबीर, दही घालून कोशिंबीर करायची आणि वरील परोठ्यांबरोबर मजेत खायची.