Skip to main content

"बाई गेली"

लेखक अमेय६३७७ यांनी शुक्रवार, 25/10/2013 या दिवशी प्रकाशित केले.
बाई गावापुढं गेली, बांबू-काठीची कमान. खाल्ला नाही धड घास, चूल रांधताना जिनं, तिच्या तोंडामधे सोनं. बाई अहेवपणीची, लाल माखलेली टाळू. अंगी नेसलं जुनेरं, जिणं जगताना जिनं, तिला मरताना शालू. बाई लाकडावरती, तूप-तेल ओघळलं. एका गजऱ्याची नाही, आस माळलेली जिनं, तिच्या अंगभर फुलं. बाई चंदनाची हवा, जाळ भणाणून फार. माप ओलांडलं नाही, दारावेशीतलं जिनं, पापापुण्याच्या ती पार. -- अमेय
लेखनविषय:

वाचने 10907
प्रतिक्रिया 51

प्रतिक्रिया

"बाई लाकडावरती, तूप-तेल ओघळलं. एका गजऱ्याची नाही, आस माळलेली जिनं, तिच्या अंगभर फुलं." खिन्न...

no comments

ही वस्तुस्थिती आहे. एखाद्याला जीवंतपनी आयुष्यभर उपेक्षित राहावं लागतं आणि मृत्युनंतर त्यांच्या मरणाचाही सोहळा होतो. खूप अस्वस्थ करणारी कविता

:(

बर्‍याच दिवसांनी एक उत्तम कविता वाचली. हे विशेष आवडलं आणि पटलंही; बाई अहेवपणीची, लाल माखलेली टाळू. अंगी नेसलं जुनेरं, जिणं जगताना जिनं, तिला मरताना शालू.

+१

एकदम जहाल वस्तुस्थिती मांडली आहे तुम्ही.

आशय भिडतोय. शब्दरचना अतिशय सुंदर आहे. अजून येउ द्यात.

मोजक्या शब्दात मांडलेलं भयाण वास्तव. हल्लीच याबद्दल एक शतशब्दकथा वाचली होती तिची आठवण झाली.

याच्या अगदी उलट देखील झालेले बघितले आहे. ज्यांचे शिष्य आंतरराष्ट्रीय ख्याति मिळवते झाले, असे जुन्या काळचे अतिशय श्रेष्ठ, उच्चशिक्षित, प्रसिद्ध, राजवैभव भोगलेले चित्रकार, त्यांच्या अंत्ययात्रेला चित्रकारांपैकी फक्त मी एकटा (ते माझ्या गुरुंच्या गुरुंचे गुरु), आणि चार-पाच त्यांचे शेजारी. आम्ही कुणी वीस, कुणी दहा कुणी पन्नास रुपये जमवून कसाबसा त्यांचा अंत्यविधी केला. (ही घटना साधारणतः १९७८ सालची) ...कविता आवडली. ....कुदरत की गत न्यारी न्यारी....

सुंदर रचना... __/\__!!

बापरे ! तुमची गुज हि पहिलीच कविता जी मी वाचली खुपच सुंदर रीत्या मांडता भावना हॅट्स ऑफ

_/\_

दाहक वास्तवदर्शी अन काळजाला भिडणारी ! शीर्षक वाचून गैरसमज झाला होता. आणीबाणीनंतरच्या निवड्णुकीच्या निकालाच्या दिवशी,पुण्यात होतो. भल्या पहाटे पन्नासएक माणसे 'बाई गेली,बाई पडली' असे ओरडत धावत गेल्याचे स्मरते.

In reply to by जेपी

अप्रतिम कविता ! अशा कविता वाचल्या की मिपावर आल्याचे अन काही तरी क्लासिक वाचायला मिळाल्याचे समाधान मिळते :) अवांतर : जेपी , एक अप्रतिम कविता वर काढल्या बद्दल मना पासुन आभार ! आपल्याला आवडलेल्या अशाच अजुन कविता वर काढाव्यात अशी विनंती करीत आहे :)

:(

सुन्न करनार वास्तव असाच एकदा घाटावरचा संवाद आठवला. "ते बुढी जिती व्हती तर कोणी तिले पाणी बी पाजत नव्हते. आता आले तिच्या नावाने भादरायला

सुंदर कविता शिर्षक विसंगत विसंगत अनुभवही तेव्हडेच आमच्या परिसरतल्या एक बाई अचानक गेल्या एकदम स्मार्ट ,तडफदार, चैतन्यशील बाई, दपारपरयंत कसंतरी मुलं सुना इकड पोचले सुना जीन मद्धयेच ड्रेसात नो अंन्त्य संस्कार नथिंग ऑफ़ द सॉर्ट डेड बॉडी उचलली देह दान करुन टाकली बाईंची तशी ईच्छा असेलहि तशी कदाचित पण सगलं जे झालं त रुढी परंपरा सोडून मुलं सुना संद्धयाकाली पुण्याला परत सुगंधाचा शिडकावा करणारी बाई अनाथ असल्यासारखी गेल्या सारखा लोक बोलत होते

हे सगळं एकदम असंच समोर होतांना बघितलेलं आहे गावाकडं. आणि त्या आज्जिंचं घरचं नाव बाईंच होतं. कविता त्यांना समोर ठेवून लिहिली आहे असं वाटलं. अर्थात अश्या किती तरी "बाई" असणार. अवघड परिस्थितीत ४ लेकरांना मोठं केलं, आयुष्यभर कष्ट केले (शब्द्शः मरेपर्यंत) पण त्याच तिच्या लेकांना तिच्याकडे बघायला सुध्धा वेळ नसायचा. प्यायला मागितलेलं पाणी तिच्या चिरंजिवाने (जे पंढरीच्या वारीला जातात) तांब्या ऊलटा करून ओतून दिलं आणि त्या रात्रीच त्या माऊलीनं जीव सोडला. त्याच तिच्या पराक्रमी चिरंजिवांनी दहाव्याला कथा सांगायला मोठा गुरुजी बोलावला, उपास असणार्‍यांसाठी वेगळं, नसणार्‍यांसाठी वेगळं असं गावातल्यांसाठी जेवण बनवलं. आईला मात्र एव्हढं प्रेमानं शिळ्या भाकरी साठी विचारलं नसेल कधी .....

खाल्ला नाही धड घास, चूल रांधताना जिनं, तिच्या तोंडामधे सोनं.
उत्तम कविता