मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

"बाई गेली"

अमेय६३७७ · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
बाई गावापुढं गेली, बांबू-काठीची कमान. खाल्ला नाही धड घास, चूल रांधताना जिनं, तिच्या तोंडामधे सोनं. बाई अहेवपणीची, लाल माखलेली टाळू. अंगी नेसलं जुनेरं, जिणं जगताना जिनं, तिला मरताना शालू. बाई लाकडावरती, तूप-तेल ओघळलं. एका गजऱ्याची नाही, आस माळलेली जिनं, तिच्या अंगभर फुलं. बाई चंदनाची हवा, जाळ भणाणून फार. माप ओलांडलं नाही, दारावेशीतलं जिनं, पापापुण्याच्या ती पार. -- अमेय

वाचन 10903 प्रतिक्रिया 0