काळा-गोरा
लेखनविषय:
काळा-गोरा
गोऱ्या रंगाचे फार कौतुक; काळा रंग तितकासा कधी कुणाला आवडत नाही,
या आवड-निवडीला कंटाळून; वैतागून काळा रंग गोऱ्या रंगाला काय म्हणतो .......
नाही कसला फरक देवाला, कसले काळे-गोरे
जरा हटकूनच वागतो रंग गोरा, हे नाही बरे!!! ll १ ll
आकाशात चमचम रात्री, शोभती अनेक तारे
झालर पाठीमागे काळी, म्हणून सगळे तोरे ll २ ll
आभाळात चांदोमामा, झळकतो किती छान
काळे दोन डाग जणू, शोभती ससुल्याचे कान ll ३ ll
कसे आकाश निळे, पसरले अनंत अथांग
नसेल मेघ काळा तर, दिसेल कसे सांग? ll ४ ll
दिवसभर प्रकाशात सारे, राबत जग असते
निजायला मस्त-शांत, काळी रात्रच हवी असते ll ५ ll
स्वाद छान तांदूळ पांढरा, हवा सगळ्यांना असतो
परी काळ्या मातीमध्ये, अंकुर त्याचा रुजतो ll ६ ll
शुभ्र-निळे कोणाचे डोळे, रूपडे सुंदर असते
जपायाला शोभायाला, परी हवे काजळ असते ll ७ ll
दु:ख होता कोणी कधी, चालत एकटेच असते
नसेल सोबत तरी सावली, साथ सोडत नसते ll ८ ll
गोरा रंगच फक्त छान, हा समज आहे भोळा
जीवाचा राम-श्याम, अन् माझा विठ्ठल सावळा ll ९ ll
नको दाखवू गोऱ्या रंगा, फुशारकी मला तुझी
तीट लावून माझीच मग, दृष्ट काढतात तुझी ll १० ll
- सार्थबोध
वाचने
2443
वाचनखूण
प्रतिक्रिया
7
अतिगोरा वा अति़काळा दोन्ही रंगाची कातडी बरोबर दिसत नाही. हे झाले कातडीचे पण काळा व पांढरा याना एकमेकाशिवाय शोभा नाही हे त्रिवार सत्य आहे. बरीचशी उदाहरणे पटण्यासारखी आहेत. शेवटच्या ओळीत तीट असा शब्द हवा राव ! बाकी आणखी येउ द्या !
In reply to एकदम आवडली ! by चौकटराजा
मस्त कविता ! :)
काळे दोन डाग जणू, शोभती ससुल्याचे कान
हे वाचुन मात्र मला गब्दुल गालाच्या ससुल्या आठवल्या... ;) सतत तोबरा भरुन कुरु कुरु चरण चालु असत ! पुष्ट असण्या मागच हेचं खरं कारण असावं काय ? ;)
शेवटच्या ओळीत तीट असा शब्द हवा राव ! बाकी आणखी येउ द्या !
चौकट रावांशी प्रचंड सहमत ! हो मग ! उगाच गैरसमज नको ! ;)
टीट बद्दल मनापासून दिलगिरी … लिखाण चूक लक्षात आणून दिलेबद्दल आणि आपल्या प्रतिक्रियेबद्दल आभारी आहे… इथे दुरुस्ती करता येईल का? असल्यास कशी करावी?
रात्र काळी,घागर काळी,यमुना जळे ती काळी हो माय || बुंथ काळी,बिलवर काळे, गळामोती एकावळी काळी हो माय || मी काळी, कांचोळी काळी, कांसे कांसिली ती काळी हो माय|| एकली पाणीया नच जाय साजणी, सवे पाठवा मूर्ती सावळी हो माय || विष्णुदास नाम्याची स्वामिनी काळी, कृष्ण्मूर्ति बहु काळी हो माय ||शरद काकांचा हा धागा पहा.
In reply to रात्र काळी,घागर काळी,यमुना by आदूबाळ
हे माझं फार आवडतं गीत आपण इथे दिले आहे. मी बर्याच वेळा हे गीत सकाळ सकाळी की बोर्डवर वाजवितो.बहुदा याच्या
जोडीनेच " काय सांगू देवा ज्ञानोबाची ख्याती " हे गीत ही वाजवले जाते.
In reply to रात्र काळी,घागर काळी,यमुना by आदूबाळ
हे माझं फार आवडतं गीत आपण इथे दिले आहे. मी बर्याच वेळा हे गीत सकाळ सकाळी की बोर्डवर वाजवितो.बहुदा याच्या
जोडीनेच " काय सांगू देवा ज्ञानोबाची ख्याती " हे गीत ही वाजवले जाते.
कविता छान आहे, आवडली.
एकदम आवडली !