मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

अंधेरी ते वसई..एक छोटेखानी प्रकटन.. :)

विसोबा खेचर · · जनातलं, मनातलं
लेखनप्रकार
काही स्थानकं आणि काही आठवणी.. आज जरा अंधेरी ते वसई हा पश्चिम रेल्वेचा पट्टा आला डोळ्यासमोर.. अंधेरीची माधुरी दीक्षित..योगीनगर, अंधेरी पूर्व. अगदी योगीनगरच्या गणेशोत्सव मंडळातला माधुरीचा नाचदेखील आम्ही प्रचंड गर्दीत जाऊन पाहिला.. पुढे ती एकदा अंधेरीच्या विजयनगरीतल्या नेहमी चट्टेरेपट्टेरी हाफ प्यँन्ट घालून सा-या विजयनगरीत वावरणा-या गोखल्यांकडे आली होती. सौ गोखले आणि माधुरीची आई म्हणे काहीतरी चुलत की मावस बहिणी-बहिणी.. पुढे माधुरी जाम फेमस झाली आणि मग तिचं गोखल्यांकडे येणंही बंद झालं.. गोखले वारले तेव्हा फक्त ५ मिनिटं कारमधून येऊन चटईवर निजलेल्या गोखल्यांना बघून गेली म्हणे.. माधुरी ६८ सालची. आम्ही ६९ चे. आमच्यापेक्षा एकाच वर्षाने मोठी..महाविद्यालयीन वर्षाच्या आसपासच तिचे परिंदा आणि तेजब आले. माधुरी तेव्हा आमच्या कॉलेजातलीच कुणी वाटायची.. साले आम्ही सगळेच तेव्हा माधुरीच्या पिरेमात पडलो होतो..! md गोरेगाव म्हटलं की जसं गोरेगाव पूर्वेला स्थानकाच्या बाहेरच असलेलं गाळवणकरशेठचं हॉटेल श्रीसत्कार आठवतं..तसंच गोरेगाव म्हटलं की मनाली दीक्षित आठवते.. ही मनाली फार पूर्वी मुंबै दूरदर्शनवर निवेदिका होती.. कुठल्याश्या अल्लड, नासमज वयात आम्ही साला या मनालीच्याच प्रेमात पडलो होतो.. काय प्रसन्नवदनी होती..! वा..! ९.१७ च्या ठाणा फास्ट गाडीला चित्रा जोशी असायची.. विलक्षण आकर्षक दिसायची.. मिश्किल होती. गाडी स्थानकात शिरता शिरताच पटकन उडी मारून खिडकी पकडायची! पुढे चित्राला कांदिवलीला दिल्याचं ऐकलं.. जळ्ळी कांदिवली ती..! आमचं ठाणं काय वैट होतं? राहिली असती चित्रा ठाण्यातल्या ठाण्यातच तर काय बिघडणार होतं..? पण मग केवळ चित्राला तिथे दिली म्हणून मग मला उगाचंच कांदिवली आवडू लागली..आता आयुष्यात जेव्हा जेव्हा कांदिवली क्रॉस करतो तेव्हा तेव्हा ९.१७ च्या ठाणा फास्ट मधली मिश्किल चित्रा आठवते आणि तात्यामामा उगाचंच गालातल्या गालात हसतो आणि कांदिवली स्टेशन नकळत मागे पडतं.. वसई.. माझं एक अतिशय लाडकं गाव. वसईची ताजी मच्छी, तिथली लोकल दारू, आणि वसईची खाडी.. कोणे एकेकाळी वसईच्या मर्लीन नावाच्या एका बाटग्या खिरिस्तावणीच्या पिरेमात पडलो होतो. काय रसरशीत दिसायची आमची मर्लीन..! प्लंबर फर्नांडिस हा माझा दोस्त. त्याचं गाव वसई, फर्नांडिसची आई घरीच दारू बनवायची. अगदी उत्तम चवीची आणि स्कॉचसारखीच लाईट..! (याच फर्नांडिसची सख्खी मावशी खारदांड्याला दारू बनवायची. तिला सगळे 'ज्यो आन्टी' म्हणायचे. धर्मेन्द्र, प्राण, अशोक कुमार ही मंडळी खारदांड्याच्या ज्यो आन्टीच्या खोपटवजा गुत्त्यात बसून दारू प्यायचे. विलक्षण होती ही खारदांड्याची ज्यो आन्टी. पूर्वी एकदा केव्हातरी तिचं खूप छान व्यक्तिचित्र लिहिलं होतं मी पण जळ्ळं कुठे सेव्ह केलंय ते आजही सापडत नाही. असो..) फर्नांडिसच्या आवशीला मर्लीन दारू बनवायला मदत करायची. मर्लीनचा बाबा हा होल्सेलर कोळी होता..बॉबीमधला प्रेमनाथ दिसतो तसाच दिसायचा आणि लुंगीही तशीच नेसायचा. वसईचा बाटगा कोळी होता मर्लीनचा बाबा .. आम्ही कधी वसईला गेलो की फर्नांडिसची आई मला प्रेमाने घरी बनवलेली दारू द्यायची.. आणि मर्लीन सुरमई तळून आणायची..! असतात अशा काही काही आठवणी. त्या त्या स्थानकांच्या आठवणी.. तसं म्हटलं तर अजून दादर आहे, डोंबिवली आहे, झालच तर परळही आहे.. अहो शेवटी आमच्या आवडीनिवडी मध्यमवर्गीय, त्यामुळे स्थानकंही मध्यमवर्गीयच.. खार वेस्टची कुणी पूनम अग्रवाल किंवा बँन्ड्राची कुणी दीपा गोयल किंवा पूजा ओबेरॉय आम्हाला कशाला माहिती असणारेत?! असो.. आज मात्र अचानक फर्नांडिसच्या आईने केलेल्या दारुची आणि मर्लीनच्या सुरमईची आठवण झाली. परंतु 'मर्लीन, की तिची ताजी फडफडीत सुरमई, यातलं जास्त रसरशीत कोण?' हा प्रश्न मात्र आजही सुटलेला नाही..! :) -- तात्या फर्नांडिस.

वाचने 10677 वाचनखूण प्रतिक्रिया 20

साला शब्द प्रसवावेत तर तात्यांच्या लेखणीनेच. आमचा तात्या लिहायला बसला, की शब्द न शब्द असे एका लायनीत आपला नंबर लागण्याचा नवस बोलत उभे राहतात. आलतू फालतू आंतरजालीय पांढर्‍यावर काळे करणार्‍यांचे ते कामच नाही. छोटेखानी पण सुरेख अशा लेखात शब्दबद्ध केलेल्या भावना हृदयाला भिडल्या. लेखन वाचताना कधी मनातल्या मनात ३/४ चेहरे हे चित्रा जोशी म्हणून तरळून पण गेले, तर कधी माशाचा वास आणि ग्लास ओतलेल्या दारुचा आवाज कानावर येऊन गेला. जियो तात्या !! आता लवकरात लवकर 'ज्यो आन्टी' आणि 'मर्लीन बाबा' वर लेखन येऊ द्या.

In reply to by Mrunalini

हसुन हसुन वाट लागली
अरे , हे प्रकटन तुम्हाला प्रचंड विनोदी वाटल की काय ? ............................................................................................................................................. बाकी तात्यांचा वार्म-अ संपून पुढे एकाहून सरस सुरेख खेळी पाहायला मिळणार अस दिसताय !

आदिजोशी Tue, 05/07/2013 - 17:09
च्यायला तात्या लिहायला बसले की किती वाचू आणि किती नको असं होतं. तुमची शैली ओघवती आहेच, पण त्यासोबत तुम्ही जे जिवंत वर्णन करता त्यामुळे ती घटना प्रत्यक्ष डोळ्यासमोर घडते आहे असं वाटतं. ज्यो आन्टीचं व्यक्तीचित्र शोधा लवकर. सापडत नसेल तर मी येतो टंकून द्यायला. घरी गाळलेली दारू पिण्याचं भाग्य एकदाच लाभलं आहे. साला बाकी सगळ्या नुसत्याच रंगित पाणी भरलेल्या बाटल्या वाटल्या होत्या तेव्हा. आणि एकंदरीत तुमच्यातला जातिवंत खवय्या माहिती असल्याने तुम्ही मर्लीनच्या प्रेमात पडण्यापेक्षा तळलेल्या सुरमईच्या प्रेमात पडण्याचीच शक्यता जास्त वाटते आहे :-) दादर आहे, डोंबिवली आहे, झालच तर परळही वा वा वा... येऊ द्या लवकर. जाता जाता एकच प्रश्न - रोशनी कधी पूर्ण करताय तात्या?

भावना कल्लोळ Tue, 05/07/2013 - 17:17
व्यक्तिचित्र रेखाटावे तर तात्यांनीच, लेखणीतून हि माणसे जिवंत करणे हे अद्वितीय काम तात्या फक्त आणि फक्त तुम्हीच करू शकता. अप्रतिम. आणि त्यातुन हि स्वतःच्या बद्दल आलेल्या, अनुभवलेल्या अनेक भावनांना असे जगजाहीर करण्यास हि जिगर लागते. सुखावतो तुमचे लेखन वाचून, प्रत्येकी शब्दात स्वतःला शोधत.

आजानुकर्ण Tue, 05/07/2013 - 18:59
माधुरी ६८ ची नसून ६७ ची आहे (माधुरीप्रेमी) आजानुकर्ण बाकी लेख वाचून शब्द संपले आणि डोळे पाणावले....!

टिव्हीवर किंवा कुठेही माधुरी दिक्षीत दिसली तरी अजुनही छातीतुन एक हलकीशी कळ जाते. प्रत्येकवेळा मनात येते..... जाउ दे. फक्त मनातल्या मनातच बोलायला जन्माला आलो आहोत आम्ही. साला प्रत्यक्ष बोलायची कुठे हिम्मतच झाली नाही. तात्याबा, झकास झाले आहे प्रकटन.