मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

ओली हळद, मिरची, लसूण आणि लिंबू यांचे लोणचे

अनन्या वर्तक · · पाककृती
लागणारा वेळ: 3० मिनिटे लागणारे जिन्नस: • २५० ग्रॅ. ओली हळद • आले तुमच्या आवडीप्रमाणे घ्या • 3 लिंबू मध्यम आकाराचे • २ गजर मध्यम आकाराचे • १५ ते २० लसूण पाकळ्या (लसूण पाकळ्या लहान असतील तर आवडीप्रमाणे कमीजास्त करू शकता) • १० ते १५ स्वतःच्या आवडीप्रमाणे काही हिरव्या मिरच्या. • 3/4 कप लोणच्याचा मसाला (मी आईने घरी बनविलेला लोणच्याचा मसाला पाठवला होता तो वापरला आहे. तुम्ही रामदेव, बेडेकर, प्रवीण कोणताही लोणच्याचा मसाला वापरून सुद्धा करू शकता.) क्रमवार पाककृती: 1. हळद शक्यतो ओलसर असेल तर नीट कोरडी करून घ्या, मग तिचे लहान तुकडे करून घ्या. 2. आले शक्यतो कोवळे, बिनरेषांचे घ्या. त्याचेही तुकडे करून घ्या. 3. लिंबाच्या लहान फोडी करून घ्या. 4. गजर सुद्धा नीट कोरडे करून त्याचे सुद्धा हळदी प्रमाणे लहान तुकडे करून घ्या. 5. वरील हे सगळे जिन्नस एक काचेच्या डब्यात घेऊन त्यात थोडे मीठ टाकावे आणि रात्रभर तसेच बाहेर राहू ध्यावे. (मी मीठ अगदी थोडेसेच घातले कारण मला मिठाचा अंदाज नीट येणार नाही हे ओळखून लोणच्याच्या मसाल्यात आईने मीठ घालून पाठवले होते. माझ्या पाक कौशल्याबद्दल ती भलतीच जागरूक असते :) . 6. दुसऱ्या दिवशी एका भांड्यामध्ये दोन लहान चमचे तेल गरम करून त्यात लसूण आणि मिरची थोडावेळ मंद आचेवर तळून घ्यायची. शक्यतो रंग बदलू न देता तळून घ्यावे आणि बाजूला काढून ठेवावे. 7. त्याच भांड्यामध्ये पुन्हा तसेच दोन लहान चमचे तेल गरम करून त्यात लोणच्याचा मसाला मंद आचेवर तळून घ्यावा पण शक्यतो रंग बदलू न देता. 8. सगळे पदार्थ पूर्णतः थंड झाले की सर्व प्रथम मिरची, लसूण, ओली हळद, गजर, लिंबू, आले सर्व मिश्रण हलक्या हाताने एकत्र करा. हात, वाडगा, चमचा सगळे कोरडे असू द्या. अजिबात पाण्याचा अंश असता कामा नये. 9. आता वरील मिश्रणात थंड झालेला लोणच्याचा मसाला हलक्या हाताने एकत्र करा. 10. तुमच्या आवडीप्रमाणे वरून थोडेसे ऑलिव ऑइल टाकू शकता. 11. दोन दिवस बाहेरच झाकून ठेवा आणि दिवसातून एक दोन वेळा चमच्याने मिक्स करत रहा. तितक्या वेळात ते मुरेल. 12. आणि मग हे लोणचे काचेच्या बरणीत भरून फ्रीज मध्ये ठेवावे. १५ दिवसांनी हे लोणचे तुम्ही खाण्यासाठी घेऊ शकता. अधिक टिपा: • हे लोणचे मी स्वतः बनवले आणि माझा पहिलाच लोणचे बनवण्याचा प्रयोग सफल झाला. स्वयंपाकात अनुभवाने माझ्यापेक्षा खूप श्रेष्ठ अश्या माझ्या दोन मैत्रिणींकडून शाबासकी सुद्धा मिळवली. • हे लोणचे अगदी साधे वरणभात याबरोबर अप्रतिम लागते. • मी कधी कधी पास्ता अगदीच mild बनला असेल तर थोडीशी चव येण्यासाठी बरोबर घेऊन खाते. कदाचित आईच्या ह्या पारंपरिक लोणच्याचा हा अपमानच असावा. माहितीचा स्रोत आणि पाककृतीचे सारे श्रेय माझी आई शुद्धलेखना बाबत मदत करण्यासाठी श्रीरंग_जोशी ह्यांचे मनापासून आभार. पाककृतीचे लेखन आवडले असेल तर त्याचे पूर्ण श्रेय श्रीरंग_जोशी ह्यांना. Image 01 Image 02 Image 03 Image 04 Image 05 Image 06 हे माझे पहिलेच online मराठी लेखन आहे. माझ्या लेखनात काही चुका असतील तर मला नक्की सांगा.

वाचने 19565 वाचनखूण प्रतिक्रिया 38

वाह, लोणचे फारच आकर्षक दिसत आहे. आपल्या मातोश्रींना आमच्यातर्फे आभार कळवा. विकतचे लोणचे खाऊन फार कंटाळा आला आहे अन हिवाळ्याचाही कंटाळा आला आहे. उन्हाळा सुरू होताच हे लोणचे बनवायचा प्रयत्न करीन. माफ करा, या लेखनात माझे योगदान केवळ किरकोळ चुका दुरूस्त करण्याचे आहे. मूळ लेखनात शब्दप्रयोग व वाक्यरचना अगदी व्यवस्थित होते. त्यामुळे पाकॄच्या शेवटी मला श्रेय दिल्याने संकोचल्यासारखे वाटत आहे.

अभ्या.. 19/04/2013 - 03:14
अनन्यातै रेशिपी तर बेस्टच आहे पण... अप्रतिम फ्रेश फोटो आणि सुंदर सादरीकरणाचे पैकीच्या पैकी मार्क. :) अशाच येऊ द्या अजून नव्या नव्या पाकृ. शुभेच्छा. (आत्ता श्रीरंगाचे पण आभार पण नेक्स्ट टाईम स्वतः लिहा. या पाकृपेक्षा सोपे आहे ते, जमेल तुम्हाला)

मृत्युन्जय 19/04/2013 - 15:24
वा. मस्त फोटो एक्दम. तोंपासु. श्रीरंग जोशी यांचेदेखील अभिनंदन आणि शुद्धलेखनाच्या चुका करण्याऐवजी योग्य व्यक्तीकडुन चुका सुधारुन घेतल्याबद्दल लेखिकेचेही अभिनंदन.

आदूबाळ 19/04/2013 - 15:27
तोंपासु! आधी ओल्या हळदीचं लोणचं खाल्लं होतं पण त्यात लसूण नव्हता. आता लसणासह करून पहातो! यात मटारही घातले तर मजा येईल असं वाटतंय. एक बेसिक प्रश्न: ओली हळद कशी दिसते? ती खाण्यायोग्य आहे हे कसं ओळखायचं?

In reply to by आदूबाळ

सोबत इंटरनेट वरून मिळवलेला फोटो आहे त्यात जशी हळद दिसते तशीच हळद मी आणली होती. मला जास्त काही कल्पना नाही. लोणच नक्की करून पहा. इंटरनेट वरून मिळवलेला फोटो आहे इंटरनेट वरून मिळवलेला फोटो आहे

In reply to by मोदक

मी हे लोणचे (विकतचे) खाल्ले आहे. प्रत्यक्ष ओली हळद (बाळ हळकुंड) अशी दिसत असावी असा अंदाज आहे. प्रत्यक्ष पाहिलेली नाही. हे चित्र जालावरून साभार... ओली हळद

In reply to by श्रीरंग_जोशी

श्रीरंग कदाचित तुम्ही बरोबर बोलत आहात. मी आणलेल्या हळदीचा पिवळा रंग असाच होता वाटते. माझ्या फ्रीज मध्ये आहे अजून थोडी मी ती जमिनीत रुजवण्या साठी ठेवली आहे. घरी जाऊन त्याचा फोटो काढते आणि उद्या अडकवते इथे.

In reply to by मोदक

दोन्हीमध्ये नक्की काय फरक असतो..?
माफ करा, इतके मुलभूत प्रश्न विचारण्यापूर्वी प्रथम जालावर किंवा विकीवर शोध घ्यावा असा संकेत आहे. त्यानंतर काही विशिष्ट प्रश्न असल्यास मिपा आहेच की :-). मी वनस्पतीशास्त्र तर कधी शिकलो नाही. पण जालावर शोधले असता आंबे हळदची प्राथमिक ओळख ही औषधी वनस्पती अशी आहे तर हळदीची अन्नपदार्थ बनवतानाचा एक घटक पदार्थ अशी आहे. अर्थात हळदीचा वापर औषधशास्त्रातही मोठ्या प्रमाणावर केला जातोच.

In reply to by श्रीरंग_जोशी

मोदक 23/04/2013 - 09:07
लै खौट उत्तर देणार होतो प्रतिसादातले प्रत्येक वाक्य एकाखाली एक चिकटवून.. पण जौदे. ;-) १) आंबे हळदची प्राथमिक ओळख ही औषधी वनस्पती अशी आहे २) हळदीची अन्नपदार्थ बनवतानाचा एक घटक पदार्थ अशी आहे. ३) अर्थात हळदीचा वापर औषधशास्त्रातही मोठ्या प्रमाणावर केला जातोच. प्रणाम स्वीकारा हो!!! :-))

In reply to by मोदक

स्वीकारला. प्रति-प्रणाम स्वीकारा, राजे!! 'अर्थात' शब्दाने वाक्य सुरू करायची माझी (वाईट) सवय आहे, पहिल्या दोन वाक्यांचा संदर्भ नव्हता :-).

In reply to by यशोधरा

यशोधरा 19/04/2013 - 15:32
ओह कैरी नाहीये! लाल तिखटवाली कैरीच वाटली मला. हेपण घेऊन खायला बसायला हरकत नाही, भयानक टेंप्टिंग दिसते आहे :) माझ्या बाबाला ओल्या हळदीचे लोणचे अगदी प्रिय होते :)

का छळ मांडला आहे तुम्ही लोकांनी, माझ्या डायटच्या प्लानचे तीन तेरा आणि नऊ बारा होत आहेत. नका रे असे फोटू टाकत जाऊ तुम्ही, असे फोटो आणि पाकु पाहून कसे कुणी डायट करू शकते सांगा पाहु, त्रिवार निषेध. बाकी चवीला खूपच छान असेल नाही …

In reply to by यशोधरा

अग यशोताई, मागच्या धाग्यात सातारी कोंबडीचे फोटु आणि आता इथे असे लोणच्याचे, मग मला सांग अस्मादिकांनी कसा बरे ताबा ढेवावा ज्हीवा वर, आणि हे लोणचे असेल एक अपवाद, पण मी अशी नग आहे कि कोरडा भात हि नुसत्या लोणच्याच्या खाराबारोबर हि खाऊ शकते, मग तूच सांग नाही का वाढवयाचे वजन, आणि असे फोटू पाहून आमचे डायट आजचे उद्यावर जात आहे. जी ले जरा। जी ले ज़रा। कहता है दिल। जी ले ज़रा ।

In reply to by भावना कल्लोळ

भावनादि हि रेसिपी बनवताना मी सुद्धा माझा डायट प्लान पाहून बनवली आहे म्हणूनच लोणचे बनवताना तेलाचा वापर फक्त चार लहान चमचे तेल वापरले आहे. ( माझे तेलाचे प्रमाण 1 tablespoon (tbsp) = 2 teaspoons (tsp)) लोणचे पूर्ण थंड झाल्यानंतर मी त्यात मला हवे तेवढे Organic Extra Virgin Cold Pressed Olive Oil टाकले आहे. रेडीमेड लोणच्यात कोणते oil वापरतात ते आपण नक्की नाही सांगू शकत म्हणूनच हा लोणचे घरी बनवण्याचा खटाटोप.

दीपा माने 22/04/2013 - 03:27
खुपच आवडली रेसिपी. इथल्या भारतीय वाण्याच्या दुकानात मला ओली हळद मिळाली आहे. हे लोणचे आणि याआधीही ओल्या हळदीच्या लोणच्याची रेसिपी आली होती अशी दोन प्रकारची थोडी थोडी लोणची करुन पाहणार आहे.

In reply to by सानिकास्वप्निल

सानिकादि मला ओली हळद Natural Grocers (http://www.naturalgrocers.com/ ) मध्ये मिळाली. UK मध्ये कुठे मिळेल सांगू नाही शकत. रंग मला वाटते आईने मसाला बनवताना काश्मिरी मिरची वापरली आहे म्हणून इतका लाल रंग आला असावा.

तुम्हा सगळ्यांचे आभार. खूप मस्त वाटते आहे......माझा पहिलाच लेख आणि तुम्हा सगळ्यांकडून मिळालेल्या Encouraging प्रतिक्रिया. पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांचे मनापासून आभार.

अक्षया 23/04/2013 - 10:19
करते पण थोड्या वेगळ्या पद्धतीने. माझा माहिती प्रमाणे. अंबे हळद दिसायला आल्या प्रमाणे दिसते आणि कैरी प्रमाणे चव लागते आणि ओली हळद ही पिवळ्या रंगाची असते. जी वाळवुन हळकुंड तयार होतात. या प्रकारे लोणचे करुन बघेन. धन्यवाद. :)