Skip to main content

दाल खिचडा / खिचडी.

लेखक गणपा यांनी रविवार, 23/09/2012 या दिवशी प्रकाशित केले.
मित्रांबरोबरच्या ओल्या कट्ट्याची सांगता करताना हटकुन मागवले जाणारे जे दोन पदार्थ आहेत त्यापैकी पहिला म्हणजे जीरा राईस + तडका मारलेली डाळ आणि दुसरा हा दाल खिचडा. पैकी उपहार गृहातला दाल खिचडा मी हल्ली हल्ली पर्यंत टाळत आलोय. अहो हाटिलात जाउन काय ती पचपचीत पिवळी खिचडी मागवायची? एकदा मित्राला विचारलेही की 'का लेका ती पचपचीत खिचडी मागवतोस?' त्यावर हवेत गिरक्या घेणार्‍या आपल्या पतंगाला सावरत तो म्हणाला 'आता आणि चावायचे कष्ट कोण घेणार?' असो, यावेळी अश्याच एका कट्ट्या नंतर चुकुन दाल खिचडा माझ्या पुढ्यात आला. एकदा का ताटात अन्न आलं की मी त्याचा अपमान करत नाही मग ती अगदी शेपुची भाजी असो. पहिला चमचा तोंडात गेल्यावर एखाद्या ४-५ वर्षाच्या पोराने घसरगुंडीवरुन स्वतःला झोकुन द्यावे त्या प्रमाणे तो घास माझ्या बत्तीशीला कसलेही कष्ट न देता जीभेवरुन जो घरंगळला तो थेट जठरातच जाउन विसावला. आणि मला माझ्या मित्राच्या मुक्ताफळाचा अर्थ कळला. तर अशी ही दाल खिचडी/खिचडा आज (चक्क रैवार असुन) खाण्याचा मुड आला. साहित्य :  १ वाटी तांदुळ. (आंबे मोहर/कोलम) (शक्यतो बासमती तांदुळ टाळा.) १/२ वाटी मुगडाळ. (साला सकट मिळाली तर उत्तम.) २ मोठे चमचे तुर डाळ. (ऑप्शनल.)  १ मध्यम कांदा चिरलेला. २ मध्यम टॉमेटो चिरलेला. २-३ हिरव्या मिरच्या उभ्या चिरुन. १ इंच आलं बारीक चिरलेलं. ५-६ पाकळ्या लसुण बारीक चिरलेला. कोथिंबीर.  २ तमाल पत्रं. १/२ लहान चमचा हळद. २ लहान चमचे लाल तिखट. २ लहान चमचे जीरं. चिमुटभर हिंग. कडीपत्त्याची दोन पानं ३ मोठे चमचे साजुक तुप. मीठ चवीनुसार. कृती : तांदुळ आणि डाळी किमान अर्धा तास पाण्यात भिजत ठेवावे.  एका भांड्यात एक चमचा साजुक तुप तापवुन त्यात भिजवलेल्या डाळी आणि तांदुळ परतुन घ्यावे.  अंदाजे डाळ आणि तांदळाच्या अडिच ते तीन पट गरम पाणी त्यात घालावं. हळद हिरव्या मिरच्या आणि चवी नुसार मीठ घालावं.  झाकण ठेवुन मध्याम आचेवर शिजवत ठेवाव. अधुन मधुन पाण्याचा अंदाज घ्यावा. गरज वाटलीच तर १/२ वाटी गरम पाणी वाढवावे.  खिचडी शिजतेय तो वर एका कढईत २ चमचे साजुक तुप तापवून त्यात तमालपत्र, जीरं, हिंग, आलं-लसुण, कडीपत्ता यांची फोडणी करावी.   नंतर त्यात कांदा घालुन तो पारदर्शक होईस्तव परतुन घ्यावा. नंतर त्यात लाल तिखट आणि टॉमेटो घालुन शिजवावं.   टॉमेटो पार शिजला की त्यात ७-८ मोठे चमचे तयार खिचडी घालुन परतुन घ्यावं. आच बंद करवी.   तयार फोडणी खिचडीत ओतुन खिचडी घोटुन घ्यावी जेणेकरुन भाताची कणी मोडेल. वरुन भरपुर कोथिंबीर घालावी. वरुन तुपाची धार सोडावी. तो लो तैयार है खिचडी संग तीन यार दही, पापड और अचार.

वाचने 37051
प्रतिक्रिया 60

प्रतिक्रिया

In reply to by प्रास

धागा पहायला आवडला.... बाकी मसूरीची, शेवळांची, कोलंबीची, मटणाची, आणि खास करून सोड्याची खिचडी खाल्लेली असल्यामुळे............................................. पास!!!!!!!!!!!!! स्वाद चढत्या क्रमाने घ्यावा!!!! (ही ह्या धाग्याची कमतरता नाही तर आमच्या रां*च्च्या जिभेची खोड आहे!!!!!!!!!!!!) :) हा गणप्या लेकाचा ठाकूरांच्या नांवाला जागणार्‍या रेसेपी टाकणार कधी, देव जाणे!!!!!!!!!!!! :(

In reply to by पिवळा डांबिस

>> हा गणप्या लेकाचा ठाकूरांच्या नांवाला जागणार्‍या रेसेपी टाकणार कधी, देव जाणे!!!!!!!!!!!! +1 एकदम सहमत! - (ठाकूरांच्या नांवाला जागणार्‍या रेसेपीची वाट बघणारा ) सोकाजी

काय जबरी झालीय पाकृ. आता केव्हा दाल खिचडा खातोय असे झालेय.

माझ्यासारख्या आळशी लोकांचा आवडता पदार्थ! ;) आज साधारण अशीच खिचडी केली होती. पण सालवाली मूगडाळ आणि पातीचा कान्दा होता.

बाकी प्रतिक्रिया नेहमीचीच! हीच पाक्रु .... वगैरे वगैरे...

In reply to by स्पंदना

आज केलीच मी खिचडी आणि कढी! या तै संपादिका झाल्यापासून आम्ही घाबरलोय. होय, मॅडम, रोजचा स्वयंपाक आता मीच करीन, भांडी घासीन. ;)

मुगाच्या सालासकट डाळीची थलथलीत, गरमागरम, खिचडी ताटात घ्यायची वर साजुक तुप (कोणी बघत नाही पाहून जरा जास्तच) आणि झणझणीत लोणचं अर्थात साथीला तळलेला पापड आणि बुक्की मारून कांदा. असीम स्वर्गसुखाची बेगमी जणू.

In reply to by यशोधरा

>>>स्वतःची पोस्ट अजून संपादन करता येत नाही वाटते. नाय ना!! अजून त्यात वालाची खिचडी द्यायची राहिली!!!!!! ;)

झक्कास ! ही पाकृ अजुन धम्याने पाहिलेली दिसत नाही ;) ( ते पुनमवाले वेटर लोक्स धम्याचे तोंड पाहिले तरी लगेच दाल -खिचडी करायला घेतात ;) )

In reply to by सुहास..

गप की बे. :D बाकी हे खिचडी म्ह णजे आमची बोलतीच बंद की हो :-)

In reply to by सुहास..

नुसती खिचडी नाही. डब्बल की ट्रिप्पल तेज!

अशा प्रकारे हि करतात हे माहित नव्हते! आजच करुन बघणार! :) धन्स!

कम्फर्ट फूड :)

आहा.. हेच्च... फक्त वरुन ताजं खोवलेलं ओलं खोबरं ... आतल्या आत्मारामाला शांतता मिळते खाऊन... पण इथे नुसत्या फोटोबाने पोटोबा शांत होईना....

In reply to by प्रभो

+१. शेपूची भाजी मला भारी आवडते. तसेच टाकळ्याची बाकी काहीही न घालता केवळ मोहरीची फोडणी घालून परतलेली. या दोन्ही भाज्या मऊ पांढरे लोणी आणि भाकरीबरोबर खाण्यातले सुख वर्णन करता येत नाही.

In reply to by चित्रा

+१ शेपूची भाजी मला पण खुप आवडते. थोडीशी भिजवलेली मुग डाळ, लाल मिरची आणी भरपुर लसणी वर परतवलेली भाजी नुसती खायला पण मस्त लागते.

In reply to by सुर

अर्रर्र समस्त 'शेपु'प्रेमी मंडळींच्या भावना दुखावल्या बद्दल मंडळ अंमळ दिलगीर आहे. :) आणि त्यांना विनंती आहे की शेपुची चविष्ट भाजी कशी करावी याचे सचित्र मार्गदर्शन करावे.

डाळीची खिचडी मला भयंकर आवडते. ही पाककृती तर झकासच. आणि त्या करताना कसलाही पसारा न घालण्यात, आणि त्या सुबकपणे करून वाढण्यात गणपा यांचा हात कोण धरणार?

झकास. -दिलीप बिरुटे

गणपा दादा लैच भारी त्यातच पेठकर काकांची जुगलबंदी काय वर्णावी. दोन पट्टीचे बल्लवाचार्य मग काय विचारायचे. (त्यात साजूक तूप म्हणले की काकांचा प्राण) लगे रहो. आम्ही दर्शनानंद घेतोय सध्या.

पाकृ नेहमीप्रमाणेच चविष्ट .. विशेष उल्लेख : टॉमेटो काय मस्त कापलाय! बरेचदा टोमेटो कापताना खून झाल्यासारखा सीन असतो आम्च्या स्वैपाकघरात.

झकास पाकृ

मी पण अशीच करते.बटाटा पण घालते.

व्वा! थंडीच्या दिवसात अशी गरमागरम खिचडी म्हणजे स्वर्गच वाटेल. पहिले मिळणारा गावराण शेपू त्याच्या उग्र चव आणि वासामुळे मलाही आवडायचा नाही. पण हल्ली जो हायब्रिड शेपू मिळतो त्याच्यात उग्रता कमी असते आणि तो खायला सुसह्य होतो. इकडे शेपू मिळत नाही नाहीतर सचित्र पाकृ दिली असती.

गेल्या आठवड्यात माझी आणि माझ्या नवऱ्याची तब्ब्येत ठीक नव्हती त्यामुळे जवळपास ३-४ वेळा लागोपाठ केली. खूप आवडली आणि खाताना पण बरं वाटल. धन्यवाद!!!

पण हा पदार्थ करताना पाण्याचे प्रमाण काही जमत नाही अजून खात्रीपूर्वक.फोटो हि छान.

मी याच रविवारी दुपारी बेदम जेवण झाल्याने रात्री हलकाच आहार घ्यावा म्हणून ही खिचडी अध्याप्रकारात केली! एकाही प्रमाणात, इन्ग्रेडियन्ट्समध्ये, पद्धतीत जराही बदल केला नाही अहाहा! इतकी अप्रतिम झाली होती म्हणून सांगू (की पुन्हा एकदा बेदम चापली ;) )