वासंती भाटकर आणि स्त्री-मुक्ती

पैसा's picture
पैसा in जनातलं, मनातलं
25 Aug 2012 - 9:47 pm

बर्‍याच वर्षांपूर्वीची हकीकत आहे. तेव्हा मी प्राथमिक शाळेत जात होते आणि रत्नागिरीजवळच्या बसणी नावाच्या एका खेड्यात रहात होते. हे इतकं लहान खेडेगाव होतं, की रत्नागिरी फक्त ५ मैलांवर असून तिथे जायला थेट रस्ता नव्हता. मधे साखरतरची खूप मोठी खाडी होती. रत्नागिरीला जायचं तर आधी बैलगाडीने तरीपर्यंत जायचं, मग तरीने खाडी ओलांडायची आणि मग बस मिळायची. गावात दुपारी १२ वाजता वगैरे पेपर यायचा. म्हणजे महाराष्ट्र टाईम्स. सगळ्यात मोठी करमणूक म्हणजे रेडिओवरची खरखरत्या आवाजातली सुशील दोशीची कॉमेंट्री नाहीतर सिलोन रेडिओवरची बिनाका. त्यासाठी आम्ही बुधवार रात्रीची वाट बघायचो.

माझे आईवडील गावातल्या हायस्कूलवर नोकरी करायचे. एक नात्याने लांबचे पण मनाने जवळचे काका काकू पण त्याच शाळेत नोकरी करायचे. त्यांची मुलं मी आणि माझा धाकटा भाऊ, आमच्याच आगेमागेच्या वयाची. तेव्हा दर शनवार रविवार आम्ही तरी काकांकडे नाहीतर दोघं चुलत भावंडं आमच्याकडे मुक्काम टाकून उनाडत असायची. डोंगरावर जाऊन दिवस दिवस उन्हातान्हात फिरून कैर्‍या काजू खात बसा वगैरे सुटीचे उद्योग, तर एरवी आम्ही चौघंजणं शेजारच्या पोरांना गोळा करून क्रिकेट, लगोर्‍या वगैरे खेळायचो.

गावात एकूण वातावरण बर्‍यापैकी जुन्या पद्धतीचं. गावातले अनेक पुरुष मुंबईत किंवा बोटीवर नोकर्‍या करायचे आणि त्यांच्या बायका हिंमतीने घरं चालवायच्या, शेती करायच्या आणि मुलांवर आणि गुराढोरांवर पण लक्ष ठेवायच्या. गावात एक पटवर्धन आजी होत्या. त्या कीर्तन करायच्या म्हणून त्यांना लोक "बुवा" म्हणायचे. त्या खर्‍या मुंबईतल्या पण पटवर्धन आजोबा रिटायर होऊन गावाला आले तशा आजी पण त्यांच्याबरोबर आल्या. आणखी एक गोरे बाई होत्या. त्या खूप श्रीमंत. पण सासरी त्यांचं पटलं नाही म्हणून घटस्फोट झाला होता. आणखी एक अलका म्हणून घटस्फोट झालेली बाई होती, ती तर वडाची पूजा वगैरे पण करायची. सगळे प्रकार होते, पण आम्हाला त्यात काही विशेष वाटायचं नाही. स्त्रीमुक्ती वगैरे शब्द तर कधी कानावर पण आले नव्हते.

ही पार्श्वभूमी का सांगतेय तर वासंती भाटकरची चित्तरकथा सांगण्यासाठी. आम्ही नेहमी काकांकडे रहायला जायचो, तेव्हा एकदा एक साधारण आमच्याच वयाची मुलगी घासलेली भांडी काकूच्या स्वयंपाकघरात ठेवून पटकन आमच्याबरोबर खेळायला आली. बहिणीने सांगितलं ती "आशी" म्हणजे आशा. मग हळूहळू कळलं की आशाची आई वासंती भाटकर काकूकडे घरकाम करायला यायची. आशाला आणखी तीन भावंडं होती. मोठा पक्या, नंतर कुंदा, नंतर आशा आणि मग पिंट्या. या पोरांचा बाप वसंता भाटकर. तो एक स्पेशल नग होता. ही मंडळी रस्त्यापलीकडे काही अंतरावर रहायची. काकूकडे जाताना त्यांचं केंबळी घर दिसायचं.

वसंता भाटकर नावापुरती एका गलबतावर खलाशाची नोकरी करायचा. ती नोकरी बहुधा ६-८ महिने असावी. मग उरलेल्या वेळात वसंता घरी असायचा. घरी म्हणजे काय गुत्त्यात. वसंता अट्टल दारुड्या होता. गावठी प्यायचा. शुद्धीवर आला की परत गुत्त्याची वाट धरायचा. वासंतीचं आयुष्य इतर गरीब बायकांसारखंचं कमी अधिक प्रमाणात चाललेलं. दोन तीन घरची धुणी भांडी करून किडूकमिडूक जोडत होती. काकूचा तिला बराच आधार होता. वासंतीची मुलं पास-नापास होतं थोडंफार शिकत होती. जरा वेगळेपण म्हणजे वसंता पिऊन आला की वासंतीला भरपूर मारायचा. नाहीतर दारूला पैसे हवेत म्हणून मारायचा. शेजारचे लोक बघत असायचे. त्याना तरी दुसरी करमणूक काय? वासंतीला जास्तच मार पडला की कुंदा नाहीतर आशा काकूकडे कामाला यायच्या. बहुतेकवेळा संध्याकाळी कोणतरी पोरं सांगत यायची वसंता पिऊन कुठेतरी पडलाय म्हणून. मग वासंती आणि तिची पोरं शिव्याशाप देत त्याला कशीबशी घरी आणायची.

हे नेहमीचं झाल्यानंतर हळूहळू कही बदल व्हायला लागले. म्हणजे वसंताची तब्ब्येत उतरत चालली. एकदा वसंता वासंतीला मारता मारता पक्याने कंटाळून त्याला ढकलून दिलं आणि तो पडला. मग यांच्या लक्षात आलं की आता वसंताला घाबरायचं कारण नाही. मग हळूहळू कधीतरी वसंताला ढकलून गप्प बसवणं नेहमीचं झालं. रस्त्यात पडला तर पोरं त्याला ढकलत घरी आणून टाकायला लागली. पोरं नाहीतर वासंती कधीतरी वसंतावर हात उचलायला लागली. शेजार्‍यांना तीही करमणूक झाली. पावसाळा संपला की वसंता गलबतावर कामाला जायचा. मग वासंतीला जरा शांतता मिळायची.

अशीच वर्षं चालली होती. दरम्यान आणीबाणी येऊन गेली. जनता पार्टीचं सरकार येऊन गेलं. गावात बर्‍याच जणांकडे रेडिओ आले. साखरतरवर पूल झाला. रत्नागिरीला थेट बस सुरू झाल्या. मग काका काकू मुलांच्या शिक्षणासाठी रत्नागिरीला जाऊन राहिले. आमच्याही आयुष्यात बरेच बदल झाले. आणि आम्ही पण रत्नागिरीला रहायला गेलो. तरी आई आणि काका काकू बसणीला रोज नोकरीसाठी जायचे त्यामुळे गावात काय चालू आहे याच्या बातम्या मिळायच्या. अशीच आणखी काही वर्षं गेली. आमची कॉलेज शिक्षणं संपली. नोकर्‍या वगैरे सुरू झाल्या. बसणीतले पटवर्धन आजोबा गेले. आणखी काही लोक गेले. अशीच एकदा बातमी मिळाली की वसंता भाटकर पण दारू पिऊन मरून गेला. जरा हळहळ वाटली.

आता वासंती काय करत असेल? काकू रत्नागिरीत रहायला आली आता तिला कोणाचा आधार असेल? मग हळूहळू वासंती भाटकर मनाच्या कोपर्‍यात कुठेतरी मागे राहून गेली. एकदा कुणाच्या तरी मंगळागौरीसाठी बसणीला जायचा योग आला. काका काकू पूर्वी रहायचे तिथेच शेजारी माझ्या वर्गातली सख्खी मैत्रीण रहायची. बसणीला गेलेच होते तर तिच्याकडे पण गेले. जाताना वाटेत वासंतीचं घर होतं तिथे एक चांगलं कौलारू रंगीत घर दिसलं. जरा चुटपुट लागली. नवरा मेल्यावर वासंती देशोधडीला लागली की काय? त्या घरात आता कोण रहात होतं? मैत्रिणीकडे चौकशी केली. तर ती हसायला लागली.

"अग, ते वासंतीचं घर आहे."

"म्हणजे? वसंता मेल्यावर त्यांची परिस्थिती एकदम सुधारली की काय?"

"हो. तसं म्हणायला हरकत नाही. म्हणजे असं की वसंता मेला. वासंतीच्या दोन कामांवर त्यांचं काही भागेना. पक्याची शाळा दहावीत संपली. मग काय! वासंतीने हातभट्टीची गाळायचा धंदा सुरू केला! गावातले बाकी गुत्ते पार बसले."

मी थक्कच झाले. नवर्‍याच्या पाठीमागे हिंमतीने मुलांना शिकवल्याच्या वगैरे कहाण्या आपण खूप ऐकतो. पण ज्या दारूने नवर्‍याचा बळी घेतला, तिचाच धंदा करून पैसे कमवायचे आणि त्या धंद्यातल्या आधीच्या लोकांना घरी बसवायचं हे प्रकरण जबरदस्तच! अशा प्रकारे वसंती भाटकर यशस्वी उद्योजक झाली आणि तिच्यापुरती बसणीत झाली एकदाची स्त्रीमुक्ती!

समाजजीवनमानअनुभवविरंगुळा

प्रतिक्रिया

तर्री's picture

25 Aug 2012 - 9:56 pm | तर्री

मस्तच लिहिलंय !बाकी स्त्रिया "कोणत्याही" क्षेत्रात पुरुषांच्या मागे नाहीत.

मस्त ! स्त्रीमुक्तीचा हा नवीन पैलू पाहून थक्क झाले .
बहुधा हे एकच क्षेत्र स्त्रीने काबीज करायचे बाकी राहिले होते.

प्रभाकर पेठकर's picture

26 Aug 2012 - 12:37 am | प्रभाकर पेठकर

बहुधा हे एकच क्षेत्र स्त्रीने काबीज करायचे बाकी राहिले होते.

गैरसमज नसावा. ख्रिश्चन आणि आगरी बायका ह्या क्षेत्रात गेली अनेक वर्षे आघाडीवर आहेत. 'आँटीचा अड्डा' हा शब्दप्रयोग स्त्रियांच्या ह्या व्यवसायातील सहभागामुळेच वापरात आलेला आहे.

परिकथेतील राजकुमार's picture

4 Sep 2012 - 7:28 pm | परिकथेतील राजकुमार

साला आमच्या क्यांपातल्या आंटीचा अड्डा म्हणजे एक नंबर, आणि दोन दोन पेग झाल्यावर तिचे आणि नानाचे संवाद म्हणजे अगदी चार चांद लावतात सुखाला. ;)

हो काय नाय रे डान्या ?

पक पक पक's picture

25 Aug 2012 - 10:11 pm | पक पक पक

वाहवा... छान लिहीले आहे..

पांथस्थ's picture

25 Aug 2012 - 10:17 pm | पांथस्थ

मस्त किस्सा आहे!

अन्या दातार's picture

26 Aug 2012 - 9:52 am | अन्या दातार

आयच्या गावात!
एकाच वेळेस सुन्न, थक्क असं काय काय झालो मी.

------------------------------------------------------------
जरा धक्क्यातून सावरल्याने शीर्षकात बदल सुचवत आहे. स्त्रीमुक्ती या शब्दाऐवजी स्त्री-सबलीकरण हा शब्द जास्त शोभला असता.

मितभाषी's picture

5 Sep 2012 - 11:42 pm | मितभाषी

हेच बोल्तो.

मन१'s picture

26 Aug 2012 - 10:20 am | मन१

अवघड आहे.
माझाच एक धागा http://www.misalpav.com/node/22447

सानिकास्वप्निल's picture

26 Aug 2012 - 12:18 am | सानिकास्वप्निल

किस्सा भलताच अजब आहे
एकदम आश्चर्यचं वाटले....
पैसाताई खूप छान लिहीले आहे.

रेवती's picture

26 Aug 2012 - 12:33 am | रेवती

पहिल्या धारेची गोष्ट! ;)
वासंतीबद्दल जरा कुठं अनुकंपा वाटेपर्यंत वेगळच घडलं.

झकास लेखाला समर्पक प्रतिसाद..

(लोकं नॉनव्हेज का खातात या प्रश्नासारखाच लोकं दारू का पीतात हा प्रश्न पडलेला*) मोदक

* "पिवून बघा उत्तर मिळेल" / "पिवून बघा प्रश्नच पडणार नाही" ही उत्तरे जुनी झाली आहेत. ;-)

बॅटमॅन's picture

26 Aug 2012 - 1:08 am | बॅटमॅन

लोकं नॉनव्हेज का खातात हा तुला प्रश्न पडतो की काय मोदका ;)

मोदक's picture

26 Aug 2012 - 1:50 am | मोदक

मी नाय रे तो..

आपल्या एका मित्राला प्रश्न पडला होता / अजून पडला असावा... पार धागा बिगा निघाला होता त्यासाठी. :-p

(अवांतर नको - खरडवहीत गफ्फा हाणू.)

तिमा's picture

26 Aug 2012 - 10:45 am | तिमा

वासंतीबद्दल जरा कुठं अनुकंपा वाटेपर्यंत वेगळच घडलं.

कदाचित वासंतीने, ज्या गुत्तावाल्यांनी तिचा संसार उध्वस्त केला त्यांचा, सूड घेण्यासाठीही हे केले असेल!

प्रभाकर पेठकर's picture

26 Aug 2012 - 12:47 am | प्रभाकर पेठकर

उत्कृष्ट वर्णन शैली, उत्कंठावर्धक मांडणी आणि सोज्वळ शीर्षकाआडून कथाशेवटात साधले धक्कातंत्र. अभिनंदन.

ह्याला म्हणतात 'काट्याने काटा काढणे'. वासंती भाटकर ह्यांनी बेवड्यांचा (घरातच अभ्यासवस्तू असल्याने) सखोल अभ्यास करून अडचणींवर मात केली आहे. त्यांच्या चिकाटीला आणि 'अभ्यासूवृत्ती'ला सलाम.

सोत्रि's picture

26 Aug 2012 - 12:57 am | सोत्रि

उत्कृष्ट वर्णन शैली, उत्कंठावर्धक मांडणी आणि सोज्वळ शीर्षकाआडून कथाशेवटात साधले धक्कातंत्र. अभिनंदन.

प्रचंड सहमत.

धाग्याचे शिर्षक वाचून (आणि तेही एका पाशवी आयडीकडून) धागा उघडावा की नाही ह्या विचारात होतो. पण शेवटी धागा नजरेखालून घालावाच म्हणून उघडला तर एक जबरदस्त लेख गवसला.

पैसातै, एकदम भारी लिहीले आहेस. हा धागा फक्त एक किस्सा किंवा अनुभव म्हणूनच वाचला आहे.
उगा स्त्री-मुक्ती वगैरे चर्चेची गुर्‍हाळे सुरु नाही झाली म्हणजे मिळवली!

- (आंटीच्या गुत्त्यावर अजुनही न गेलेला) सोकाजी

बॅटमॅन's picture

26 Aug 2012 - 1:07 am | बॅटमॅन

खल्लास किस्सा!!! लैच भारी.

मूकवाचक's picture

27 Aug 2012 - 2:41 pm | मूकवाचक

खल्लास किस्सा!!!
शेवटी दिलेली कलाटणी जेफ्री आर्चर यांच्या 'A Twist in the Tale' या लघुकथासंग्रहाची आठवण करून देणारी ...

संपत's picture

26 Aug 2012 - 1:41 am | संपत

आमच्या शेजारी एक ख्रिश्चन कुटुंब राहायचे. आई वडील वारलेले, मोठा भाऊ आणि चार बहिणी. मोठा भाऊ पक्का दारुड्या. दारू पियून नाही तर पैश्यासाठी नेहमी बहिणींशी हाणामारी करायचा. शेवटी मधली बहिण ( जी सगळ्यात धीट आणि भावाशी मारामारी करण्यात पुढे असायची) ह्या रोज रोजच्या तमाशाला आणि पैशाच्या तंगीला वैतागली आणि घरातच भट्टी सुरु केली. भावाच्या ओळखीने गिऱ्हाईकही चांगले मिळायचे, भावाला फुकट दारू मिळायची, त्यामुळे तो बहिणींशी भांडणे करण्यापेक्षा गल्लीत भांडत बसायचा.. हे सर्व तिच्या लग्नापर्यंत व्यवस्थित चालले.. धाकट्या बहिणींमध्ये इतकी उद्यमक्षमता नसल्याने मधल्या बहिणेचे लग्न झाल्यावर पुन्हा येरे माझ्या मागल्या..

तुमच्या किस्स्याने जुन्या आठवणी जाग्या झाल्या. मस्त किस्सा हे वेगळे सांगायला नकोच.

नगरीनिरंजन's picture

26 Aug 2012 - 7:07 am | नगरीनिरंजन

फारच भारी किस्सा आणि ट्विस्ट मजेदार!

शीर्षक वाचून वासंती भाटकर या कोणी स्त्रियांच्या प्रश्नांसाठी लढणार्‍या कार्यकर्त्या असतील असे वाटले पण लेख वाचल्यावर त्यांनी स्वतःपुरते तरी सगळे प्रश्न निकालात काढले आहेत हे कळले!

किसन शिंदे's picture

26 Aug 2012 - 10:14 am | किसन शिंदे

अगदी अगदी!!
मलाही असंच वाटलं कि वासंती भाटकर या 'पाटकरां'सारख्या कोणीतरी कार्यकर्त्या असाव्यात पण लेखाचा शेवट वाचून अनपेक्शित धक्का बसला.
पैसातैंची मांडणी आवडली.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

26 Aug 2012 - 9:20 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

रत्नागीरीकडील गावाचे वर्णन आवडलं. लेखनातील वर्णनाची शैली तर खासच.

स्त्रीमुक्ती चळवळीच्या निमित्तानं वासंती भाटकर यांचं नाव कधी डोळ्याखालून गेलं नाही. वासंती भाटकरांचं स्त्रीमुक्तीचं कार्य कसं आणि कुठे सुरु झालं असेल हे आणि असे अनेक प्रश्न पडले होते. त्याचबरोबर मिपावर पुन्हा स्त्री विरुद्ध पुरुष असा ट्वेंटी ट्वेटीचा सामन्याची सुरुवात आहे की असेही वाटले होते.

बाकी, वासंती भाटकरांनी निवडलेला मार्ग भारीच होता. असो, नित्यनियमाने असेच लिहित राहा. शुभेच्छा.

-दिलीप बिरुटे

शिल्पा ब's picture

26 Aug 2012 - 10:43 am | शिल्पा ब

है शाब्बास !
बाकी हे हातभट्टी प्रकरण काय असतं ? -- कॉलिंग सोकाजी

अन्या दातार's picture

26 Aug 2012 - 10:53 am | अन्या दातार

बाकी हे हातभट्टी प्रकरण काय असतं ?

हातभट्टी म्हणजे गावठी दारु हो! कंट्री कंट्री! नारिंगी वगैरे... :D

इस मौके पे एक चारोळी पेश है:
व्याधीने जर्जर होते मती
पेदाडांची जमते गुत्त्यावरती गट्टी
पाण्याच्या डबक्याशेजारी
पेटलेली असते हातभट्टी!

५० फक्त's picture

27 Aug 2012 - 8:26 am | ५० फक्त

ओ हात भट्टी आणि कंट्री हे दोन्ही वेगळे प्रकार आहेत, उगा हातभट्टीचा औमान करु नका कंट्री अन नारंगी म्हणुन.

जयनीत's picture

28 Aug 2012 - 3:39 pm | जयनीत

बरोबर आहे, माणसाचीच नाही प्रत्येक गोष्टीची सुद्धा अस्मिता जपावी हेच बरं.

विनायक प्रभू's picture

26 Aug 2012 - 11:05 am | विनायक प्रभू

मस्त लेख.
लेखन शैली अ+

प्रचेतस's picture

26 Aug 2012 - 11:51 am | प्रचेतस

मस्त किस्सा, लेखनशैली पण सुरेख.

या निमित्ताने पैसाताई परत एकदा लिहिती झाली.

कवितानागेश's picture

26 Aug 2012 - 3:14 pm | कवितानागेश

कमाल आहे!

स्पा's picture

26 Aug 2012 - 5:53 pm | स्पा

चायला..
हे म्हंजे लैच ...

असो.. पैका तै लीवती झालेली पाहून आणंद झाल्या गेला आहे

प्रास's picture

26 Aug 2012 - 6:06 pm | प्रास

हे भारीच की...

मस्त लिखाण, पैसातै....!

इरसाल's picture

26 Aug 2012 - 8:37 pm | इरसाल

जवळुन पाहीला आहे.
फायदा नं १ हिवाळ्यात फुकट गरम पाणी मिळत असे.
फायदा नं २ गोर्‍या/मळी किंवा दारु बनवुन झाल्यावर डब्यातले लेफ्टओव्हर हे तांब्याची भांडी चकाचक करतात.पितांबरी वगैरे झक मारते.
त्यावेळेस(८६-८७ ला) पेटती दारु १७ रु. बाटली (सध्या ज्या बियरच्या बाटल्या मिळतात ती साइज)
आणी डायलुटेड ८ रु. बाटली.

पेटती म्हणजे थोडी दारु बोटांवर घेवुन चुलीतल्या जाळावर धरायची मस्तपैकी मंद निळसर ज्योत जळते.
९० घरांच्या गावात ७० घरे दारु पाडायची. ७० घरातील बराचसा भार स्रियाच सांभाळायच्या.
रॉ मटेरियल, पर्चेस, प्रॉडक्शन, सेल्स हे काम स्रियाच करायच्या.

स्पंदना's picture

27 Aug 2012 - 7:32 am | स्पंदना

वा! एकदम ष्ट्राँग लेखन.

पैसाताई लिहायला लागल्या हे फार चांगलं झालं, लेखन एकदम मस्त. माझापण गैरसमज झाला होता शीर्षकावरुन.

सूड's picture

27 Aug 2012 - 3:45 pm | सूड

मस्तच !!

काय बोलू... विलक्षण लेख आहे..

त्यातल्या धक्क्यासोबत, किंवा तो धक्का बसण्याच्याही आधी, बसणी, साखरतर, तिथे न बनलेला पूल आणि तर करुन पलीकडे जाणं हे सगळं लहानपणच आठवलं. बसणीचा किनारा हा एकदम मनुष्यस्पर्शविरहीत म्हणावा असा बीच होता. तिथे बाबांसोबत पोहायला जाणं आठवलं. बसणीला राहणारी पण खाडीमुळे रोज येता-जाता न आल्याने रत्नागिरीत कोणाच्या आश्रयाने राहिलेली शाळेतली मित्रपोरं.. एका कहाणीच्या निमित्ताने ही सगळी पार्श्वभूमी जिवंत झाली.

दोन महिन्यापूर्वीच्या रत्नागिरी व्हिजिटेत भाट्ये सुरुबनात निघालेल्या एका बीच रिसॉर्टमधे मुक्काम टाकला. तिथे एका वेटर पोर्‍याची ओळख झाली. कुठे राहतोस, तर म्हणे बसणी.. तेव्हा एकदा ते शांत बसणी गाव आठवलं.

बसणी, रानपार अशा व्हर्जिन समुद्रकिनार्‍यांचा अक्षरशः "शोध" त्याकाळी लागला होता. आता दोन्ही ठिकाणी पार चौपाटी झाली आहे असं दिसतं. रनपारला तर मोठी इंडस्ट्री झाली आहे. माझ्या लहानपणी त्या किनार्‍यावर दिवसेंदिवस कोणी फिरकायचं नाही. इतकं शांत आणि एकलकोंडं होतं की त्या अभयामुळे समुद्रातून काही ओटर / सी-लायन सारखे दिसणारे लांबडे प्राणी किनार्‍यावर येऊन मोठ्ठा कळप करुन पडलेले दिसायचे. ते नेमके कोणते प्राणी हे त्यावेळी माहीत नव्हतं / आता कळणं कठीण आहे.. पण त्यांचं तिथे असणं इतकं नैसर्गिक होतं की त्यांच्याविषयी शास्त्रीय माहितीचा खास करुन काही शोध घ्यावा असंही वाटायचं नाही..

लेख मस्तच आहे आणि कोंकणात घेऊन गेल्याबद्दलही अनेकोत्तम धन्यवाद पैसाताई.

विकास's picture

27 Aug 2012 - 11:27 pm | विकास

इतका मस्त लेख, लेखनशैली अगदी अथपासून इतिपर्यंत वाचत गेलो. उत्सुकता ताणली गेली आणि एकदम अँटीक्लायमॅक्स झाला! - लेखनशैली मुळे नाही तर त्या बाईने काय केले हे वाचून! परीस्थिती माणसाला घडवते अथवा बिघडवते... असेच काहीसे! पण हे वास्तवदर्शी चित्र एकदम आवडले.

आता स्त्रीमुक्तीचा नविनच अर्थ समजला! ;)

प्रदीप's picture

4 Sep 2012 - 8:25 pm | प्रदीप

अगदी सहजरीत्या ह्या लेखातून समोर आले आहे. लेखनशैली, जागांची, प्रसंगाची वर्णने, लेखाच्या नायिकेच्या भवितव्याविषयी वाचकाच्या मनात कुतुहूल निर्माण होते न होते तितक्यात त्याला मुळापासूनच हलवून टाकण्यारा 'शेवट'-- सगळे सुंदर जमून आले आहे.

पण असे अनुभव मुळापासूनच हलवून टाकतात. माणसे मुलाबाळांना विकावयास का तयार होतात? आईच आपल्या मुलीला 'धंद्याला' का लावते? अलिकडेच एका आत्मकथेचे पुस्तक परिक्षण वाचले होते. तिचा लेखक उ. कोरीयाचा नागरीक होता, सुदैवाने देशाबाहेर पळून गेला. त्याचे सगळे कुटुंबच, इतर अनेक कुटुंबाप्रमाणेच, वर्षांनूवर्षे तुरूंगातच रहात होते. त्याच्या विस्तारीत कुटुंबातील कुणीतरी, कधीतरी काही 'आगळीक' केली होती त्याची ती शिक्षा होती. इथे तुरूंगात प्रत्येकजण स्वतःसाठी जगे, कारण ते वातावरणच तसे होते. कुणीही पळून जायचा प्रयत्न केला, व ती व्यक्ति पकडली गेली तर तिची काही धडगत नसेच, पण तिच्या पलायनाबाबत माहिती आहे, असा संशय असलेल्यांचीही तशी ती नसे. ह्यामुळे एकाच कुटुंबातील व्यतिच एकमेकांबाबत चुगल्या करीत. तीव्र भुकेने कासावीस झाल्याने एका स्त्रीने स्वतःच्या लहान मुलाचाच बळी घेऊन, त्याचे मास शिजवून खाल्याच्या एका घटनेचाही पुस्तकात उल्लेख आहे, म्हणे.

हे सगळे परिस्थिती घडवून आणत असते. तेव्हा, स्वतःविषयीच्या अवास्तव कल्पनांना गोंजारत कुणीही बसू नये, हेच शेवटी खरे! आपली स्वतःची लिमीट नक्की कुठे असते, ह्याचा विचार करवत नाही.

सहज's picture

28 Aug 2012 - 8:39 am | सहज

लेख, त्यातला शेवट मस्तच आहे फक्त त्या मुक्ती शब्दापाशी अडखळल्याने प्रतिसाद द्यायला दोन दिवस उशीर झाला ;-)

चिगो's picture

28 Aug 2012 - 3:31 pm | चिगो

गावठी स्त्री-सबलीकरण झिंदाबाद.. खंग्री लेख, पैसाताई..

जयनीत's picture

28 Aug 2012 - 4:02 pm | जयनीत

एकदा मन मरून गेल्यावर माणसे अजुन कशी वागणार?

छान लिखाण.

इरसाल's picture

31 Aug 2012 - 9:33 am | इरसाल

कोणीही हा प्रकार घरी /बाहेर्/ऑफिसमधे करण्याचा प्रयत्न करु नये. केल्यास प्रतिसाद लेखक त्यास जबाबदार नाही.

साहित्य : मद्रास गुळ्/काळा गुळ ( ह्यालाच गोटा असेही नाव आहे साधारण गुळापेक्षा हा अधिक गोड असतो), मोहाची सुकवलेली फुले, नवसागर वडी (अमोनियम क्लोराइड ), पाणी, १५ किलो तेलाचे रिकामे डबे, चाटु, २५/३० लिटर कपॅसिटीचे अल्युमिनियम्चे पातेले, जुना टॉवेल्/धोतर, कापसाची लांब वात, बियरची रिकामी बाटली, चुल, लाकुड-फाटा, ५ लिटर प्लास्टिक कॅन.

कृती : सुरुवातीला पहिला १५ लिटर कपॅसिटीचा तेलाचा रिकामा डबा घेवुन त्याला निरमाने स्वच्छ धुवुन घ्यावा. त्यात अन्दाजे ४/५ किलो मद्रास गुळ, १५० ग्रॅम सुकलेली मोहाची फुले, एक नवसागर वडी (२५० ग्रॅम) टाकुन तो पाण्याने १३/१४ लिटर पर्यंत भरुन त्याचे तोंड हवाबंद करावे. आता हा डबा उबदार जागी कमीत कमी ९/१० तास ठेवुन द्यावा.
९/१० तासाने आतले मिश्रण आंबुन डबा पुर्ण भरला जाइल व त्यास आंबुस वास यायला लागेल. आता हे मिश्रण दारु बनविण्यास तयार आहे.

दुसरा १५ लिटर कपॅसिटीचा तेलाचा रिकामा डबा घेवुन त्याला निरमाने स्वच्छ धुवुन घ्यावा. ह्या डब्याचा वरचा पत्रा पुर्णपणे काढलेला असावा.
हा डबा बाहेरुन मातीचा लेप देवुन पेटवलेल्या चुलीवरच्या रसरशीत जाळावर ठेवावा. त्यात ते आंबवलेले मिश्रण १/३ भरावे.तसेच डब्याच्या वरच्या एका बाजुस गोल छिद्र पाडुन त्यात चाटु अडकवावा. चाटु हा साधारणपणे टेबल्टेनिसच्या बॅट प्रमाणे दिसतो. त्याची एक बाजु व मुठ ही खोलगट असते. तर चाटु हा पसरट भाग मधे व दांडा बाहेर तसेच खोलगट भाग वरच्या बाजुस ह्याप्रमाणे डब्यास लावावा.
या नंतर डब्यावर अ‍ॅल्युमिनियमचे पातेले पाण्याने पुर्ण भरुन ठेवावे.तसेच जुना टॉवेल्/धोतर हे ओले करुन पातेले व डब्याचा मधे पातेल्याला रिंग सारखे अडकवावे. डब्यातील वाफ निसटु नये म्हणुन.
कापसाची लांब वात ही चाटुच्या बाहेर असलेल्या दांड्यात अर्धी आत अर्धी बाहेर अशी अडकवावी म्हणजे बाहेर पडणारा द्रव का नीट धारेने पडेल. त्या वाती खाली बियरची रिकामी बाटली ठेवावी.
चुलीचा जाळ/धग हा/ही व्यवस्थित मेंटेन करावा/करावी.जास्त जाळ बाहेर पडणार्‍या द्रवाला गढुळ करतो, तर कमी जाळ उत्पादकतेवर परिणाम.
अशाप्रकारे आतील द्रावण उकळु लागल्यावर ते वाफेत परिवर्तीत होते, ती वाफ वर पाणी असलेल्या पातेल्याला जावुन लागल्याने थंड होउन चाटुवर थेंबथेंबाने पडते व चाटुमार्गेच बाहेर वात धरुन पडते. ती धार बाटलीमधे अ‍ॅडजस्ट करावी.
वरच्या पातेलीतील पाण्यावर लक्ष असु द्यावे ते गरम झाल्यास त्वरीत बदलावे.
बाहेर पडणारी धार एकदम कमी झाल्यास डब्यातील द्रावण बदलायची वेळ झाली असे समजुन द्रावण बदलावे.
बाटली भरली की ५ लिटर कॅनमधे रिकामी करावी. अन्यथा आग लागण्याचा धोका संभवतो.

बाटलीमधे पडणारी धार म्हणजेच .............पहिल्या धारेची...........

निनाद's picture

31 Aug 2012 - 11:34 am | निनाद

अगदी इरसाल आहात...
आमचा नमस्कार घ्यावा!

ह्या...! बम कडक हाय! अरे तेज तर्रार चखन्याची रेश्पी टायपा रे कोन्तरी लवकर.

तर्री's picture

31 Aug 2012 - 10:23 am | तर्री

१.तो.प.सु .
२.फोटो कुठे आहे ?
३.हया विकांताला करून बघेन हं !
४.आमच्याकडे हयाला सोमरस म्हणतात.
५.नवसागर "७-११ " किंवा "टेस्को" मध्ये मिळेल का ?

इरसाल : आज आयडी धान्य झाला !

पैसा's picture

31 Aug 2012 - 10:39 am | पैसा

बर्याच जणांना कुतुहल होते म्हणून ही पाक्रु इरसाल यांनी दिली आहे. क्रु.ह.घे. :-)

विकास's picture

1 Sep 2012 - 4:42 pm | विकास

बर्याच जणांना कुतुहल होते म्हणून ही पाक्रु इरसाल यांनी दिली आहे. क्रु.ह.घे.

मला वाटते, पैसाताई तो प्रतिसाद हलके घ्यायला सांगत आहेत, पाकृप्रमाणे करून त्या हातभट्टीतील द्रव्य हलेक घेण्यास सांगत नाही. ;)

निनाद's picture

31 Aug 2012 - 11:46 am | निनाद

मी थक्कच झाले. नवर्‍याच्या पाठीमागे हिंमतीने मुलांना शिकवल्याच्या वगैरे कहाण्या आपण खूप ऐकतो. पण ज्या दारूने नवर्‍याचा बळी घेतला, तिचाच धंदा करून पैसे कमवायचे आणि त्या धंद्यातल्या आधीच्या लोकांना घरी बसवायचं हे प्रकरण जबरदस्तच! अशा प्रकारे वसंती भाटकर यशस्वी उद्योजक झाली आणि तिच्यापुरती बसणीत झाली एकदाची स्त्रीमुक्ती!

झकास!

ज्ञानराम's picture

2 Sep 2012 - 2:20 pm | ज्ञानराम

अप्रतिम... लेख , उत्तम सादरी करण.. स्त्री मुक्ती अशी सुदधा असू शकते..
जबरदस्त ---

मस्त लेखन !
च्यामारी डायरेक्ट पहिल्या धारेची रेसेपी सुद्धा मिळाली या धाग्यामुळे. ;)
बाकी लहानपणी लोकल मधुन प्रवास करताना दिवा स्टेशनला काही आगरी बायका टायर ट्युब मधे भरलेली दारु घेउन चढत ते आठवले.

भिकापाटील's picture

5 Sep 2012 - 10:18 am | भिकापाटील

वासंतीने तीच्या परिने साधलेली मुक्तीच ही...........

पैसातै लै झ्यॅक लिवलय.. कं लिवलय... कं लिवलय...... :)

ऋषिकेश's picture

5 Sep 2012 - 11:59 am | ऋषिकेश

मस्त किस्सा!

आमच्या गावी एक प्राणी असाच त्याच्या बायकोस मारहाण करी. काही दिवसात ती बाई बिचारी वैतागली. अगदीच भारी शक्कल लढवली तिने. नवऱ्याच्या दुप्पट प्रमाणात दारू पिऊन, तीच त्याला मारहाण करू लागली. जवळपास रोज संध्याकाळी या दोघांचा WWF चा कार्यक्रम ठरलेला. लोक पण मौजेने बघत राहायचे.
एक दिवस (थोड्याफार तरी शुद्धीत असलेल्या) त्या नवरोबालाच थोडी लाज वाटली. मग आषाढी ला पंढरपूर ला जाऊन माळा घालून आले जोडीने. आता सुखात राहत आहेत.

शैलेन्द्र's picture

6 Sep 2012 - 11:35 am | शैलेन्द्र

एकदम अस्साच किस्सा, फक्त पात्र नवरा बायको नसुन वडील- मुलगा असे होते..

शिल्पा ब's picture

7 Sep 2012 - 11:42 am | शिल्पा ब

है शाब्बास !

तु शेर तो मैं सवाशेर प्रमाणे तु पेताड तो मैं डब्बल पेताड मामला तर !

शैलेन्द्र's picture

6 Sep 2012 - 11:47 am | शैलेन्द्र

धम्माल लेख..