एखाद्या विशिष्ट व्यक्तीच्या किंवा गटाच्या (उदा: मराठी संकेतस्थळांचे संपादक! सं.मं: ;-) ह. घ्या. बरंका!) विषयी पसरणारे विनोद हे त्यांच्याविषयी जनतेच्या मनात असणाऱ्या रागाचं द्योतक असतीलच असं नाही. उदा: बेल्जिअन लोक मूर्ख असतात असं दाखवणारे पुष्कळ फ्रेंच विनोद लोकप्रिय असूनही बेल्जिअन लोकांविषयी फ्रेंचांना विशेष राग आहे असं दिसत नाही. आपल्याकडेही ‘संता-बंता’सारखे विनोद शीख लोकांना मूर्ख दाखवतात, पण शिखांविषयी फार राग जनमानसात आढळत नाही. उलट एखाद्या व्यक्ती/गटाविषयी असणाऱ्या द्वेषाचं रुपांतर विनोदांमध्ये होईलच असंही नाही. उदा: दुसऱ्या महायुद्धाच्या काळात ब्रिटन आणि अमेरिकेमध्ये जपान्यांविरुद्ध चीड होती, पण जपानी लोकांबद्दल विनोद मात्र निर्माण झाले नाहीत. किंवा आपल्याकडे मुस्लिमांबद्दल राग/द्वेष बाळगणाऱ्या हिंदुत्ववाद्यांमध्ये मुस्लिमांविषयी विनोद ऐकू येत नाहीत.
अनेकदा असे विशिष्ट जमाती/समाजांविषयीचे विनोद सार्वजनिक शिष्टाचारांना सोडून किंवा अभिरुचीहीन असल्याचे मानले जातात आणि म्हणून संपादित होतात. बहुतेक संकेतस्थळांच्या धोरणातच असा उल्लेख केलेला असतो. आणि तरीही असे विनोद अस्तित्वात रहातातच. व्य.नि, खरडी अशा स्वरुपात ते फिरत रहातात. ते जनसंस्कृतीचा एक सच्चा (आणि इरसाल) अविष्कार असतात, म्हणूनच त्यांचं अस्तित्व मुळापासून नष्ट करणं अशक्यप्राय असतं. आणि तरीही, (अगदी इतर वेळी अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे गोडवे गाणारेसुद्धा) अनेक लोक अशा विनोदांच्या अभिव्यक्तीत अडथळे आणताना दिसतात. विनोदाचं लक्ष्य असणाऱ्या व्यक्ती/समूहावर विनोदांतून एक प्रकारे हल्लाच केला जातो असं मानणारे हे लोक असतात.
पण खरं तर विनोदांमुळे सामाजिक/राजकीय उलथापालथ होत नाही. इतकी ताकद खरं तर त्यांच्यात नसतेच. त्यांना अभिव्यक्त होण्यापासून रोखण्यानं काही हशील होत असेल, तर ते एवढंच की ही अभिव्यक्ती रोखणाऱ्याची दमनशक्ती आणि नियंत्रणपिपासू (कंट्रोल फ्रीक) वृत्ती यांचं त्यातून प्रदर्शन होतं. त्यांचे त्या दमनाच्या समर्थनार्थ दिले जाणारे सर्व युक्तिवाद हे अंतिमत: खोटे आणि काहीसे बावळटदेखील ठरतात.
पण म्हणजे विनोद हे अगदी बिनमहत्त्वाचे असतात का? तर अगदी तसंही म्हणता येणार नाही. तो लोकांनी लोकांसाठी आणि लोकांविषयी बनवलेला असा म्हणजेच एक निर्मम लोकशाहीवादी अविष्कार असतो. शब्दांशी, संकल्पनांशी खेळण्याचं लोकांना उपलब्ध असं ते एक साधंसोपं खेळणं आहे. आपल्याकडे गोष्टी सांगण्याची एक फार मोठी मौखिक परंपरा पूर्वीपासून होती. आजच्या डेली सोपच्या गदारोळात ती नष्ट झालेली आहे. पण तरीही ही विनोद पसरवण्याची परंपरा मात्र अजूनही चांगलीच जिवंत आहे. किंबहुना आधुनिक तंत्रज्ञान तिला पोषकच ठरलेलं आहे. जगाच्या एका कोपऱ्यात (उदा: इजिप्त किंवा पुणे) चाललेल्या राजकीय घडामोडींबद्दलचा एखादा विनोद जगाच्या दुसऱ्या एखाद्या कोपऱ्यात (उदा: सिंगापूर) बसलेला कुणीतरी जगाच्या तिसऱ्या कोपऱ्यात बसलेल्या (उदा: डीसी) कुणालातरी पाठवतो, आणि मग चेहरापुस्तक, व्य.नि. वगैरेंद्वारे तो असाच पुढे पसरत जातो. विनोदांमधून मिळणाऱ्या आनंदामुळे हे सर्व होऊ शकतं. थोडक्यात, विनोद तितकाही बिनमहत्त्वाचा नसतो.
पण तरीही, शब्दांचा वापर करणाऱ्या साधनांचा विचार केला असता खरं तर जाहिरात, प्रचारकी थाटाचं लिखाण, गॉसिप किंवा एखादं काळजीपूर्वक पसरवलेलं धादांत असत्य अशांचा राजकीय परिणाम विनोदांहून अधिक घातक असतो. हजरजबाबीपणा किंवा विनोद हे त्या मानानं शस्त्र म्हणून कमी प्रभावी आहेत.
पण मग विनोदांमुळे लोक इतके का चिडतात? आणि त्यांना सेन्सॉर करण्यात इतकी उर्जा आणि वेळ का घालवतात? हुकुमशाही राजवटींत किंवा दमनशाही राजवटींत कुजबुजलेला एखादा विनोदसुद्धा तुमच्या छळाचं कारण का ठरू शकतो?
ज्यांच्या हाती प्रसारमाध्यमांच्या आणि पर्यायानं लोकांच्या अभिव्यक्तीच्या दोऱ्या असतात, अशांना अर्थात विनोदाचे बळी व्हावं लागतं, कारण ज्या सामाजिक वातावरणात विनोद फोफावतो असं वातावरण बनू देणं न देणं त्यांच्याच हातात असतं. उदा. शीतयुद्धाच्या काळातला हा विनोद पहा:
स्टालिन, क्रुश्चेव आणि ब्रेझ्नेव एकदा आगगाडीनं जात असतात. गाडी अचानक थांबते. स्टालिन म्हणतो, “मी गाडीची हालहवाल बघतो.” तो खाली उतरतो. काही वेळानं परत येऊन तो म्हणतो, “आता सर्व काही ठीक होईल. मी ड्रायव्हरला गोळी घालायचा आदेश देऊन आलोय.” पण काहीच होत नाही. मग क्रुश्चेव जातो. काही वेळानं परत येऊन तो म्हणतो, “आता सर्व काही ठीक होईल. मी ड्रायव्हरला रि-हॅबिलीटेट करून आलोय.” तरीही काहीच होत नाही. मग ब्रेझ्नेव उभा राहतो. खिडक्यांवरचे काळे पडदे तो ओढून घेतो. डबा पूर्ण अंधारात जातो. “पहा,” तो म्हणतो, “गाडी चालू झाली आहे.”
(टीप: या तीन नेत्यांच्या कम्युनिस्ट राजवटी ज्यांनी भोगल्या किंवा दुरून पाहिल्या आहेत त्यांना या विनोदाची धार लक्षात येईल. बाकीच्यांना त्या काळाची किमान माहिती असावी लागेल (उदा: http://en.wikipedia.org/wiki/Rehabilitation_%28Soviet%29 हे पहा). नाहीतर, हेटाळणी करायला लायक वाटणार्या आपापल्या फेवरिट संकेतस्थळांवरच्या वेगवेगळ्या व्हिलनना इथं कल्पून, आणि गोळ्या घालण्याऐवजी प्रतिसाद उडवणं, खातं गोठवणं वगैरे कल्पना करून थोडी मजा घेता येईल.)
किंवा हे पहा:
कम्युनिस्ट पार्टी मुख्यालयातून फोन येतो: “काय? या वर्षी पीकपाणी कसं काय आहे?”
शेतकरी: “उत्तम आहे साहेब. बटाटे इतके आले आहेत की त्यांची एकच रास रचली तर ती पार देवाच्या पायांपाशी पोहोचेल.”
पार्टी मुख्यालय: “पण देव तर अस्तित्वातच नाही.”
शेतकरी: “मग बटाटे तरी कुठे आहेत, साहेब?”
हे विनोद सार्वजानिक ठिकाणी सांगतासुद्धा येत नसत. मग ते छापील साहित्यात सापडणं तर अशक्यच होतं. आणि तरीही ते सगळ्यांना माहीत असायचे आणि ते हिरीरीनं एकमेकांना सांगितले जायचे. अगदी त्याचे वाईट परिणाम होऊ शकतात हे माहीत असूनही.
आणि तरीही प्रत्यक्षात सोव्हिएत साम्राज्य कोसळून पाडण्यात या विनोदांचा हातभार शून्य होता. साम्राज्य कोसळण्याच्या पहिल्या दहा कारणांमध्ये कुणीही या विनोदांचा समावेश करणार नाही. विनोद सांगणं हा काही विद्रोह नव्हता. साम्राज्यात सर्वत्र पसरलेल्या परात्मभावाचा (एलिअनेशन) मात्र ते आरसा होते. ते सांगण्यात मजा होती. ते प्रतिबंधित होते यामुळे ती मजा अधिक होती. बाकीच्या कंटाळवाण्या वातावरणात सामान्य माणसाचा तो एक विरंगुळा होता. प्रचंड सत्ता थोड्याच लोकांच्या हातात असण्याच्या परिस्थितीत जनसामान्यांसाठीची ती एक मौज होती. मौजमजेच्या इतर साधनांप्रमाणेच यातही असलेला धोका हा त्या मौजेत भर घालत असे.
लोकांचे विचार किंवा भावना यांवर जेव्हा पोलिसी कारवाईचा बडगा असतो, तेव्हा विनोद सांगणाऱ्यांना अधिक चेव येतो. किंवा अगदी बौद्धिक, सांस्कृतिक उच्चभ्रूपणाच्या बेगडी वातावरणातही जो दंभ असतो, तो देखील अशा चेव येण्यासाठीचं पुरेसं कारण असू शकतो. उदा: कम्युनिस्ट राजवटीत आस्तिकांच्या मूर्खपणाविषयी विनोद करायला परवानगी असे आणि हा एक उच्चभ्रूपणा आहे असा त्यात अंतर्भूत दंभ असे.
ज्या भावना किंवा विचार अधिकृत (state sponsored) असत ते तुमच्यावर सतत आदळत असत. त्यांच्या या कर्णकर्कश साखळदंडांपासून तात्पुरती सुटका मिळवण्याचा विनोद हा एक मार्ग होता.
पण अगदी प्रगल्भ लोकशाहीसुद्धा अशा दमनप्रक्रियेतून मुक्त असेलच असं नाही. काही वर्षांपूर्वी एका अमेरिकन विद्यापीठात घडलेली गोष्ट आहे. ‘गे प्राईड’ दरम्यान एका विद्यार्थ्यानं गंमत म्हणून एक भित्तिचित्र विद्यापीठात डकवलं. त्यावर ‘पशुगमन प्राईड आठवडा’ ('Bestiality Pride Week' – पहा: http://en.wikipedia.org/wiki/Bestiality) असं लिहिलं होतं. समलिंगी समाजाच्या भावना दुखावल्याबद्दल त्या मुलाची विद्यापीठातून हकालपट्टी झाली. आता गंमत म्हणजे ‘गे प्राईड’ दरम्यान निघणाऱ्या परेडमध्ये पुष्कळ विनोदी गोष्टी घडत असतात. उदा: ननच्या पोशाखातले पुरुष स्वत:ला ‘Sisters of Perpetual Indulgence’ म्हणवून घेत परेडमध्ये सहभागी होतात. किंवा S&M लेस्बिअन्स (पहा: http://en.wikipedia.org/wiki/Sadomasochism) ‘काळं-निळं सुंदर असतं’ अशा घोषवाक्यासहित त्यात सहभागी होतात. (पहा: http://en.wikipedia.org/wiki/Black_is_beautiful 'ब्लॅक इज ब्यूटिफुल' या वंशभेदविरोधी घोषवाक्यावरची ही कोटी आहे.) आता ज्या संस्कृतीत या गोष्टींची चेष्टा होते तीत या विद्यार्थ्याला होमोफोबिक म्हणून हाकलून देणं ही एक प्रकारची गळचेपी आहे. थोडक्यात, ज्यांना इतरांवर प्रच्छन्न टीका करायची असते त्यांना ती स्वत:वर झालेली मूग गिळून सहन करून घ्यावी लागते; त्याची तयारी ठेवायला लागते.
ज्यांच्या हाती प्रसारमाध्यमांचं नियंत्रण असतं ते नेहमीच विनोदांच्या तथाकथित ताकदीबद्दल नको तितके गैरसमज बाळगून असतात आणि समाजाच्या नैतिकतेचे आपणच तारणहार असल्याचा उगाचच गैरसमज करून असतात. उदा: १९४८मध्ये बी.बी.सी. मध्ये खालील विषयांवरच्या विनोदांना बंदी होती: मुताऱ्या, स्त्रैण पुरुष, अंजीर-पानं (Fig-leaves पहा http://en.wikipedia.org/wiki/Fig_leaf), स्त्रियांची अंतर्वस्त्रं...
तर १९४९मध्ये या यादीत समाविष्ट झालेले विषय पहा: रंगांचा संदर्भ (पिवळा, निगर, काळा), भारतीय योगी (पण फकीराबद्दलचे विनोद चालतील!)
इतकंच काय, काही काळ ‘काळा बाजार’ या विषयावरसुद्धा विनोद करता येत नसे (काय करता, रंग पडला नं!). दुसऱ्या महायुद्धादरम्यान मार्शल गोअरिंगच्या लठ्ठपणावर विनोद केलेला चालेल का, यावर बी.बी.सी. मध्ये गरमागरम चर्चा झाल्या!
एकंदरीत, ज्यांच्यापाशी अभिव्यक्ती सेन्सॉर करण्याची सत्ता असते ते आपली नैतिकता हीच समाजाची नैतिकता आहे असा दिखावा करत ती इतरांवर लादतात, तर त्या निर्बंधांना न जुमानणारे किंवा अधिकृत नैतिकतेहून वेगळी नैतिकता असणारे आपल्याला उपलब्ध फटींतून त्या लादलेल्या नैतिकतेवर विनोद करत राहतात, आणि अर्थात संपादित होण्याचा धोका पत्करतात. ज्यांच्यापाशी सत्ता असते त्यांचे विनोद जर इतरांना दुखावत असतील तर त्याची फिकीर सत्ताधारी कधीच करत नाहीत. उलट त्यांच्या गैरसोयीचे विनोद एका छोट्याशा खाजगी अवकाशापुरते मर्यादित कसे राहतील आणि तो अवकाश अधिकाधिक संकुचित कसा होईल, याची काळजी ते घेत रहातात. आपण प्रच्छन्न सत्ता उपभोगतो आहोत हे या सत्ताधाऱ्यांना कधीच मान्य होत नाही. अनिर्बंध हुकुमशाहीचं ते एक व्यवच्छेदक लक्षणच आहे. मग कधीतरी याचा कडेलोट होतो आणि लोक म्हणतात, ‘आता बास! आम्हाला जे विनोद करायचे आहेत ते आम्ही करणारच. मग ते तुम्हाला आवडोत न आवडोत, आम्हाला त्याची पर्वा नाही. आमचे मार्ग आम्ही शोधून काढू! गर्जा जयजयकार विनोदाचा आणि विनोद करायच्या हक्काचा!!!’
टीप: कोणत्याही मराठी/अमराठी संकेतस्थळावर घडलेल्या ताज्या/शिळ्या घटनांचा किंवा त्यांच्याशी संबंधित युनिक/डुप्लीकेट आय.डींचा या धाग्याशी सुतराम संबंध नाही. तशी शंका आल्यास तो निव्वळ योगायोग समजावा.
वाचने
38864
प्रतिक्रिया
72
मिसळपाव
प्रतिक्रिया
जबर्या लिवलय
छान
यात
हुकुमशहा आणि विनोद
डॅनिश कार्टूनिस्ट व जेम्स लेन
नक्की काय? >>>
लेख अतिशय आवडला. असंच सकस आणि
वा!
विनोद आणि राग
उत्तम आणि सकस लेख
एकदम झकास लेख चिं
विनोद हे शस्त्रही आहे...
असेच आणखी
In reply to विनोद हे शस्त्रही आहे... by योगप्रभू
शिवसेना
In reply to असेच आणखी by पंगा
सुंदर लेख
मार्मिक लेख
विनोदाचे वावडे...!!
अवांतर माहिती
In reply to विनोदाचे वावडे...!! by इन्द्र्राज पवार
त्याशिवाय व्हेअर इगल्स डेअर
In reply to अवांतर माहिती by योगप्रभू
फिर क्या हुवा?
In reply to अवांतर माहिती by योगप्रभू
हुकुमशहांना विनोदाचं वावडं का असतं?
छान लेख
ट्रान्स्लेशन लोच्या :)
In reply to छान लेख by प्रदीप
लेख आवडला
लेख
हुकूमशाहीतून काही कारूण्य
उत्तम
आमचा जन्म... वगैरे वगैरे
In reply to उत्तम by चित्रा
:)
In reply to आमचा जन्म... वगैरे वगैरे by Nile
>>अभिव्यक्तीस्वातंत्र्याची
In reply to :) by चित्रा
चाचणी
In reply to >>अभिव्यक्तीस्वातंत्र्याची by Nile
अॅडवाईजर अमेरीकन असेल तर.
In reply to चाचणी by विकास
अच्छा!
In reply to अॅडवाईजर अमेरीकन असेल तर. by Nile
अहो मानसिकता हो. आता उदाहरणच
In reply to अच्छा! by विकास
चाचणी
In reply to अहो मानसिकता हो. आता उदाहरणच by Nile
अशीच काहीतरी कारणं देउन दमन
In reply to चाचणी by विकास
मुलभुत प्रश्न
In reply to अशीच काहीतरी कारणं देउन दमन by Nile
विनोदाचे वावडे कोणालाच नसावे...
चांगला लेख
क्षूद्र आणि सत्ताधारी
In reply to चांगला लेख by प्रियाली
कोणत्या सत्ताधार्यांना?
In reply to क्षूद्र आणि सत्ताधारी by चिंतातुर जंतू
>>आपल्याकडे उदाहरणे असल्यास
In reply to कोणत्या सत्ताधार्यांना? by प्रियाली
>>मिसळपावावर मध्यंतरी
In reply to चांगला लेख by प्रियाली
रोगाची लक्षणे
क्षुल्लक क्षुल्लक म्हणून
In reply to रोगाची लक्षणे by चिंतातुर जंतू
जेव्हा राजा किंवा प्रजा नवा
In reply to क्षुल्लक क्षुल्लक म्हणून by प्रियाली
हाहाहा!
In reply to जेव्हा राजा किंवा प्रजा नवा by राजेश घासकडवी
माणूस सुविधा दिलेली नसतानाही
In reply to हाहाहा! by प्रियाली
भुतं
In reply to माणूस सुविधा दिलेली नसतानाही by राजेश घासकडवी
सत्ताधार्यांना लेख फारस
गडबड आहे
In reply to सत्ताधार्यांना लेख फारस by Nile
खरच गडबड आहे.
In reply to गडबड आहे by प्रियाली
मस्त मस्त !
मराठी संकेतस्थळांचे संपादक! सं.मं:
शासनकर्त्याची टिंगल आणि सत्तेची दुर्बलता
(No subject)
वावडे आणि त्याची स्पष्टता
लेख आवडला.
?
In reply to लेख आवडला. by ३_१४ विक्षिप्त अदिती
उदाहरण देता येणार नाही. ...
In reply to ? by पंगा
पटले नाही
In reply to उदाहरण देता येणार नाही. ... by ३_१४ विक्षिप्त अदिती
"Imitation, though often not the sincerest form of flattery, is certainly the cheapest." © 2011.
अभिव्यक्ती आणि कृती
विनोदावरचं एक चांगलं वैचारीक
पुनर्वाचन
आचार्य अत्र्यांनी
लेख आवडला!
चांगला लेख
<<<हुकुमशहांना विनोदाचं वावडं
भन्नाट.
चांगला धागा
माझा मिपा वर चा सगळ्यात आवडता
अतिरेकी मेले त्याचं वाईट