यु.जी. कृष्णमूर्ती: नो वे आऊट! भाग २
युजींच्या संबंधाने लेखमाला पुढे न्यायची असल्याने इथं युजींची पार्श्वभूमी मांडावी लागत आहे; पुन्हापुन्हा तेच सांगतोय. मलाही ते थोडंसं कंटाळवाणं होतंय. पण हा माणूस कोणत्या पार्श्वभूमीतून आलाय याचा त्रोटक का होईना पण माग काढल्याशिवाय पुढे येणारी “युजी कृष्णमूर्ती” ही चीज नेमकी बनली कशी ते स्पष्ट होऊ शकणार नाही. म्हणून हा चरित्र-चिंतनटाईप पसारा वाढवावा लागत आहे. पण असोच.
व्याख्यानांना भरपूर प्रतिसाद मिळत असताना, चांगली कमाई होत असताना अचानक युजींची व्याख्याने देऊन पैसे कमावण्यातील रूचि निघून गेली आणि घरचा खर्च चालवण्याची जबाबदारी कुसूमकुमारी या त्यांच्या पत्नीवर पडली. कुसूमकुमारी या इंग्रजी आणि संस्कृतातील पदवीधर होत्या आणि वर्ल्ड बुक एनसायक्लोपेडिया च्या कार्यात त्यांना संशोधन सहायक म्हणून काम मिळाले. हे होत असताना श्री. व सौ. युजी या दाम्पत्याला त्यांच्या चौथ्या अपत्याचे वेध लागले होते; म्हणून कुसूमकुमारींना त्या अवस्थेत नोकरी नकोशी वाटत होती. पण पर्याय नव्हता. त्यांची कर्मठ भारतीय पार्श्वभूमी असली आणि इंग्लिशमधील पदवी असली तरी अमेरिकन जीवनशैलीबद्दलचे कुसूमकुमारींचे सुरूवातीचे कुतूहल मावळले आणि नंतर त्यांना अमेरिकन जीवनशैलीशी जुळवून घ्यायला अवघड जाऊ लागले. विचीत्र, दडपण आणणारे अमेरिकन जीवन त्यांना दुरचे वाटू लागले. पण त्या गाडे पुढे रेटू लागल्या आणि ऑफिसचे काम कधी-कधी घरीसुध्दा आणावे लागत असे. त्यांच्या कामाचा भाग म्हणून त्यांना भारतीय सांस्कृतिक आणि धार्मिक संकल्पनांवर टिपणे काढून प्रश्नांची उत्तरे देणे आवश्यक होते. पारंपारिक पध्दतीने युजींना एक “जबाबदार नवरा” म्हणता येणार नसले तरी ते कुसूमकुमारींना आवश्यक असणारी पुस्तके वाचून आणि त्यांच्या शंकाची उत्तरे शोधून त्यांच्या कामात मदत करू लागले.
वसंत या अपंग मुलाची काळजी घेत युजी आता घर सांभाळू लागले. तिथले भारतीय मित्र युजींच्या घरी डोकावण्यास येत आणि भारतीय तत्वज्ञान आणि थिऑसॉफीवर तासन तास चर्चा चालत. अर्थात या चर्चा युजींना काही विशेष मिळाले होते म्हणून नसत तर आपण जशा साध्यासुध्या चर्चा करतो तशाच त्या असत. चौथ्या अपत्याच्या जन्मानंतर कुसूमकुमारींनी पुन्हा एकदा काम सुरू केले तेव्हा घरी “बेबीसिटींग” करण्याचे काम युजी करू लागले. सुमारे दोन वर्षे काम केल्यानंतर कुसूमकुमारींनी अत्यंत निराश होऊन काम सोडले आणि अमेरिका सोडण्याचा निर्णय घेतला. भारतात त्यांच्या बहिणीकडे मागे सोडून आलेल्या त्यांच्या दोन मुलींचा विचार त्यांना सतत अस्वस्थ करू लागला आणि आता त्यांचे चौथे अपत्य अमेरिकेसारख्या परक्या देशात, वडिलधारे, नातेवाईक आणि कुटूंबियांच्या देखरेखीशिवाय मोठे होणार असल्याने आणि वसंतच्याही परिस्थितीत फार मोठी सुधारणा दिसत नसल्याने या दोन्ही मुलांच्या भविष्याबद्दल त्यांना चिंता सतावू लागली. यात अजूनही बिकट परिस्थिती म्हणजे युजी आता सतरा वर्षांपूर्वी लग्न होताना असलेले युजी राहिले नव्हते. त्यांच्यात बदल होत राहिला आणि हा बदल जमीन आसमानचा होत जाऊन आता युजी घरातही अनोळखी माणसासारखे राहू लागले. सन १९५९ च्या शेवटास ती अपरिहार्य गोष्ट घडलीच आणि कुसूमकुमारींनी काहीही झाले, युजी अमेरिकेत राहाणार असले तरी भारतात परतण्याचा निर्णय पक्का केला. युजींना भारतात परतण्यासाठी केलेल्या विनवण्यांचा युजींवर काही परिणाम झाला नाही. युजींनी कुसूमकुमारींसाठी भारताची तिकीटे आणली आणि जवळ होते नव्हते तेवढे पैसे कुसूमकुमारींना देऊन टाकले. कुसूमकुमारी त्यांच्या दोन अपत्यांसह मद्रासच्या दिशेने निघाल्या आणि भारतात आल्यानंतर प्रवासात पुल्ला या रेल्वेस्टेशनच्या जवळ कुठेतरी त्यांची बॅग गहाळ झाली. या बॅगेत महत्वाच्या व्यक्तींनी युजींना लिहीलेली पत्रे, महत्वाची कागदपत्रे होती. हे अगदी युजींचा भूतकाळ ठरवून पुसला जात असल्यासारखे झाले आणि त्यांचे भारतात परतणे जवळजवळ अशक्य बनले.
आता पत्नी भारतात परत गेली असताना आणि युजींना त्या देशात पुढे राहायचे असल्याने त्यांना पुन्हा एकदा आश्रयाची गरज पडली. वर्ल्ड युनिव्हर्सिटीने त्यांना नोकरीची संधी दिल्यानंतर तो प्रश्न निकालात निघाला. युजींची ओळख एक प्रज्ञावान व्याख्याता एवढीच नव्हती तर त्यांना सखोल दृष्टी असलेला वक्ता म्हणूनही त्यांनी अमेरिकेत नाव कमावले होते. युनिव्हर्सिटीला युजींच्या हुशारीची उपयोगीता वाटू लागली कारण युनिव्हर्सिटीकडे जगाच्या विविध भागांत विद्यार्थ्यांकरिता निवासी महाविद्यालये काढायची योजना होती. युजींकडे ही योजना स्वीकारण्यावाचून पर्याय नव्हता; त्यांनी तशी ती स्वीकारली आणि युजींना त्या कामासाठी सर्वप्रथम भारतात पाठविण्यात आले. युजी त्यांचा व्याख्यानाचा “शो” आटोपण्यासाठी मद्रासला आले असताना कुसूमकुमारी त्यांना भेटल्या आणि पुन्हा एकदा कुटूंबात येण्याबद्दल विनवणी केली. ही युजींची त्यांच्या पत्नीसोबतची शेवटची भेट ठरणार होती. किमान मुलांकडे पाहून तरी युजींचे मन पालटेल असा विचार करून कुसूमकुमारींनी सगळ्या मुलांना सोबत आणले होते – पण युजी पत्थराहूनही कठोर होते. आता परतणे नव्हते. त्यांनी स्वत:च्या भूतकाळाशी कायमची फारकत घेतली होती. एका महिन्यानंतर युजी रशियात गेले आणि तिथून पुढे पूर्वी कधीही भेट न दिलेल्या युरोपातील मध्यवर्ती देशांत. असे दिसते या काळात की युजी त्यांना मिळालेल्या कामाबाबत त्रासून गेले होते, त्यांनी युरोपातील अनेक शहरांना भेटी दिल्या “कामाच्या निमित्ताने” नव्हे तर एक पर्यटक म्हणून, जगाच्या नकाशावरील प्रत्येक स्थळावर पावले टाकायची म्हणून. युजींबाबत खरे पाहाता, कोणतीही विशिष्ट योजना नसल्याने पान वार्यावर उडत जावे, भरकटू लागावे तसे झाले होते. शेवटी एकदाचे लंडनमध्ये पाऊल ठेवल्यानंतर ते पूर्णत: खलास झाले!
लंडनमध्ये ते डोके सरकलेल्या माणसासारखे रस्त्यांवरून निरर्थक फिरू लागले. लंडनमधील या कालखंडाला काही लोक त्यांच्या “आत्म्याची काळोखी रात्र” मानतात. युजींनी त्यांना “तो काही एखाद्या नायकाचा संघर्ष नव्हता की आत्म्यासोबत माझी कुस्तीही जुंपलेली नव्हती, त्यात काव्यात्म प्रसंगही नाही – ते फक्त मन मानेल तसे भटकणे होते” अशा शब्दांत फटकारले आहे.
इंग्लंडमध्ये हिवाळा सुरू होऊ लागला तशी त्यांची ही मनमानी थंड व्हायला सुरूवात झाली. त्यांच्याकडे शिल्लक असलेल्या पैशांतून नाईट ब्रिज रोडवरील केडागीन स्क्वेअर अपार्टमेंटस मध्ये त्यांनी जागा शोधली. दिवसभरादरम्यान अंग गोठविणारी थंडी टाळण्यासाठी आणि खोलीच्या चार भिंतीकडे पाहात राहून येणारा कंटाळा घालविण्यासाठी ते ब्रिटीश म्युझियममध्ये शिरत असत आणि कार्ल मार्क्सने ज्या टेबलाशी बसून दास कॅपिटल लिहीले त्या टेबलासमोरच्या टेबलाशी बसून राहात. खरे पाहाता युजींना कोणतेही संशोधन करण्यात किंवा पुस्तक वाचण्यात काहीच रस नव्हता. त्यांनी तत्वज्ञान आणि धर्म यावरील वाचन सोडून देऊन आता खूप वर्षे उलटली होती. पण तरीही काहीतरी वाचण्यासाठी तिथे आलो आहोत असे नाटक वठविण्यासाठी काहीतरी वाचायचे म्हणून ते “अंडरग्राऊंड स्लॅंग (शिवराळ बोली)” हा शब्दकोश घेऊन बसत आणि त्यात तासन तास डोके खूपसून बसत. लंडनच्या रस्त्यांवरील साईनबोर्डसवरील जाहीराती आणि भिंती, टेलीफोन बूथ आणि झाडांच्या खोडांवर लिहीलेले कॉलगर्ल्सचे नंबर आणि नावे वाचत युजी सायंकाळ घालवीत.
हा दिनक्रम चालू असतानाच उन्हे उतरू लागली, हवा तापली आणि दिवसा झक्क सूर्यप्रकाश पडू लागला – उन्हाळा सुरू झाला. उन्हाळा सुरू होताच मरगळलेल्या लंडनमध्ये अचानक प्राण फुंकला गेला. पण युजींमध्ये कोणताही बदल झाला नव्हता, त्यांच्यात काही फरक पडला नव्हता. बिघडत जाणार्या परिस्थितीत आणखी भर म्हणजे युजींचे खिसे रिकामे होऊ लागले. काही करून कशीतरी असलेली परिस्थिती पुढे रेटायची असेल तर पुन्हा एकदा काहीतरी करावे लागणार होते. त्यामुळे संधी मिळेल तेव्हा-तेव्हा ते स्थलांतरीत लोकांचे (यात बहुतांशी भारतीय आणि पाकीस्तानी होते) हात पाहून भविष्य सांगू लागले आणि काहीवेळा तर त्यांनी पैशासाठी पाकशास्त्रावरील धडेही दिले. निश्चितच त्यांना “बेरोजगारी भत्त्या” वर राहाता आले असते पण त्यांनी ते केले नाही. विचित्र परिस्थिती होती. “मी लोकांच्या दातृत्वावर राहाणार्या उपटसुंभासारखा का जगतोय?” हा प्रश्नही त्यांच्या मनाला शिवत नसे. ती निश्चितच डोके फिरल्याची स्थिती होती. पर्याय शोधण्याचीही इच्छा ते गमावून बसले होते असे दिसते. त्यांनी स्वत:ला हवेसोबत इथे, तिथे आणि कुठेही उडत जाणार्या पानासारखे सोडून दिले.
याच काळात भारतात त्यांच्या पत्नीचे निधन झाले; ही बातमी जवळपास सहा महिन्यांनी त्यांच्यापर्यंत पोहोचली. मुले आई गमावून बसली होती; पण त्या कधीही भरून न निघणार्या हानीबद्दल सहानुभूती व्यक्त करणारे पत्र लिहीण्याशिवाय युजी काहीच करू शकले नाहीत. पाहूनही दिसत नसल्यासारखे होत, ऐकू येत असूनही ऐकले जात नसल्याच्या स्थितीत, जवळपास पागलपणाच्याच अवस्थेत युजी भटकत होते. काहीवेळा त्यांना थकवा जाणवत असे, काहीही खाण्याची इच्छा नसे. आणि एके दिवशी त्यांच्या लक्षात आले, खिशात फक्त पाच पेन्स शिल्लक राहीलेत! युजी आटोपले. ते आता कुठेही जाऊ शकणार नव्हते आणि काहीही करता येणार नव्हते. पण दैवयोगाने म्हणा किंवा कसेही लंडन मधील रामकृष्ण मिशनचे मुख्य असलेल्या स्वामी घनानंदांच्या रूपाने त्यांना मदत मिळाली. याच काळात युजींच्या शरीरावर बदल दिसून येऊ लागले. यापूर्वी ऋषिकेशच्या गुहेत असताना आलेले गूढ अनुभव आणि अड्यारमध्ये असताना “मृत्यूशी संमुख” होण्याचा अनुभव त्यांनी सरळसोटपणे उडवून लावला होता. पण आता ते सर्व अनुभव साठत येऊन गळ्यापर्यंत आले होते आणि युजींच्या अस्तित्वातच फेरफार व्हायला सुरूवात झाली होती. पारंपारिक हिंदू दृष्टीकोनातून पाहून याला कुंडलिनी जागरण म्हणता येईल. एके दिवशी रामकृष्ण मिशनच्या ध्यानगृहात बसले असताना त्यांना हा अनुभव आला. ही फक्त सुरूवात होती. त्यांच्याच शब्दांत –
मी काहीही न करता तिथे बसून होतो, ध्यानगृहात असलेल्या लोकांची मला दया येत होती. हे लोक ध्यान करायला बसले आहेत. कशाला जायचेय त्यांना समाधीत? त्यांना काहीही मिळू शकणार नाही – मी गेलोय या सर्व गोष्टींतून – ते स्वत:चीच थट्टा करीत आहेत, हसं करून घेत आहेत. असलाच मूर्खपणा आयुष्यभर करीत राहून आयुष्य मातीत घालविणे त्यांनी टाळावे यासाठी मी काय करू शकतो? हे करून ते कुठेही पोहोचणार नाहीत. मी तिथे बसलो होतो आणि माझ्या मनात काहीही नव्हते – फक्त रिक्तता होती – तेव्हा मला कसलीतरी अनोळखी जाणीव होऊ लागली: माझ्या शरीरात कसली तरी हालचाल होऊ लागली. माझ्या जननेंद्रियातून कसली तरी ऊर्जा डोक्याच्या दिशेने सरकत होती आणि डोक्यात छिद्र असल्यासारखे वाटत होते. ती ऊर्जा घड्याळाच्या काट्यांसारखी उलट आणि सुलट दिशेने वर्तुळाकार फिरत होती. ते विमानतळावर असलेल्या विल्स सिगारेटच्या जाहीरातीत दाखवल्यासारखे होते. माझ्यासाठी ती मजेची गोष्ट होती. पण मी त्या गोष्टीसोबत संबंध जोडू शकत नव्हतो. कुणीतरी मला खाऊ घालत होते, कुणीतरी माझी काळजी घेत होते, उद्याचा विचार नव्हता. तरिही, माझ्या आत खोलवर काहीतरी घडत होते...
निश्चितच “नवा माणूस” घडविल्या जात होता, जसे काही जन्मापासूनच यासाठी त्याची घडण आकाराला आली होती, किंवा कोणतेतरी गूढ बल त्याला मंदपणे पण खात्रीने त्या गोष्टीकडे घेऊन जात होते. पण त्या माणसाला ते जसे होईल, जशी त्याने कल्पना केली होती तसे ते घडणार नव्हते. आणि युजींच्या कथेचा हाच सर्वात विदारक, समजून घ्यायला अत्यंत गुंतागुंतीचा भाग आहे.
काहीही झाले तरी लंडनमधील त्यांचा मुक्काम संपला होता. त्यांनी रामकृष्ण आश्रम सोडला, पुढचा पल्ला गाठला आणि पॅरीसमध्ये येऊन पोचले. त्यांनी स्वत:चे भारतात परत यायचे तिकीट विकले आणि ३५० डॉलर हाताशी आणले. आणखी तीन महिन्यांसाठी ते निवांत झाले आणि पॅरीसमधील एका हॉटेलात त्यांनी मुक्काम ठोकला. पूर्वी लंडनमध्ये केले होते त्याप्रमाणेच त्यांनी पॅरीसचे रस्ते पालथे घालायला सुरूवात केली आणि विविध प्रकारच्या फ्रेंच चीज वर गुजराण सुरू केली, ही सवय ते जाईपर्यंत टिकून होती, पण आहार म्हणून नंतर चीजचे प्रमाण कमी झाले होते.
लंडनमध्ये झाले होते तसेच, पुन्हा एकदा त्यांचे पैसे संपत आले. पण पॅरीसमध्ये मात्र पाकशास्त्रावर धडे देऊन पैसे कमवायला स्थलांतरीत लोक नव्हते किंवा मदत मागायला जाता येईल असे मित्रदेखील नव्हते. पण तरीही खिसे उलटेपालटे करून जे काही पैसे मिळाले त्यात त्यांना जिनेव्हापर्यंत जाता आले. पुन्हा एकदा स्मृतीभ्रंश झालेल्या माणसाप्रमाणे त्यांनी हॉटेलातच खोली घेतली आणि रस्ते पालथे घालायला सुरूवात केली. दोन आठवडे उलटले आणि हॉटेलचे बील भागवून जेवणासाठीदेखील पैसे शिल्लक राहिले नाहीत. सगळ्या परिस्थितीचा कडेलोट झाला आणि भारतीय दूतावासात जाऊन तिथल्या अधिकार्याकडे भारतात पाठविण्याची विनंती करण्याशिवाय कोणताही दुसरा मार्ग शिल्लक राहिला नाही.
सुदैवाने अजूनही त्यांच्याकडे स्वत:चे स्क्रॅपबुक (खरडवही? च्या मारी, मिसळपाववर यामुळेच लोक स्वत:च्या खरडवह्या जपतात वाटते! ;-) ) होते. त्या स्क्रॅपबुकमुळे ते दूतावासातून बाहेर फेकले गेले नाहीत. नॉर्मन कझिन्स, त्याकाळी भारताचे रशियातील राजदूत असलेले सर्वपल्ली राधाकृष्णन यांनी युजींबद्दल उधळलेली स्तुतीसुमने त्या स्क्रॅपबुकमध्ये वाचून निश्चितच व्हॉईस-कॉन्सुलवर छाप पडली. पण तो काहीच करू शकत नव्हता, कारण सरकारी खर्चाने युजींना भारतात पाठवता येणार नव्हते. केवळ एक पर्याय होता, तो म्हणजे युजींनी भारतातील त्यांच्या नातेवाईकांना लिहीणे आणि पैसे मागवणे - तो व्हॉईस कॉन्सुलने युजींना सुचवला. हे चालु होते तेव्हा नेमके जिनेव्हातील रामकृष्ण मिशनचे मुख्य स्वामी नित्यबोधानंद व्हॉईस कॉन्सुलच्या चेंबरमध्ये बसलेले होते. त्यांनी लगेच तिथल्या तिथे युजींच्या हातात त्यांची बीले भागवण्यासाठी ४०० डॉलर ठेवले आणि युजींना सामान्य व्यक्तींसारखे वागवू नये, होता होईल तोवर सढळपणे मदत करावी अशी कॉन्सुलला विनंती केली. युजींच्या सुटकेसाठी पुन्हा एकदा रामकृष्ण मिशनची अदृश्य शक्ती उभी राहिली होती असे म्हणावे वाटते.


![]() |
वाचने
6646
वाचनखूण
प्रतिक्रिया
12
युजींच चरित्र बरंचसं सांगून झालं. पुढचा भाग कधी?
My teaching, if that is the word you want to use, has no copyright. You are free to reproduce, distribute, interpret, misinterpret, distort, garble, do what you like, even claim authorship, without my consent or the permission of anybody.असं म्हणणार्या माणसाबद्दल वाचायची उत्सुकता होतीच. वाचतोय.
अफलातून!! अविश्वसनिय
मस्त जमलाय हा भाग फक्त कंसातला मिसळ्पावचा उल्लेख म्हणजे आंबेमोहोर, साजूक तूप घातलेला मेतकूटभात खाताना , गार दाताखाली यावी तसा वाटला.
In reply to अफलातून!! अविश्वसनिय मस्त by शुचि
हेच म्हणतो.
लेखमाला वाचनीय आहे. वाचतो आहे.
एकूण किती कृष्णमूर्ती आहेत आध्यात्मिक क्षेत्रात?
In reply to प्रश्न by नितिन थत्ते
जे. कृष्णमूर्ती
यु.जी. कृष्णमूर्ती
हे दोनच
आणि ते भविष्यवाले कृष्णमूर्ती आहेत ते वेगळे.
तसंही कृष्णमूर्ती हे दक्षिण भारतातलं सर्वसाधारण आडनाव आहे - त्यामुळं अजूनही बरेच असतील.
~ अत्यंत वाचनीय होत आहे ही मालिका. खरं सांगायचं झाल्यास दोन्ही लेख मध्यरात्रीच्या सुमारास वाचल्यामुळे एक प्रकारची सुन्न करणारी शांतता पसरली आहे रूममध्ये सर्वत्र....अशी भावना निर्माण झाली होती...त्याला जी काही कारणे असतील तीत यु.जीं.च्या पत्नीचे हलाखीतील निधन (त्यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला होता, असा प्रवाद आहे...असो).
"....“युजी कृष्णमूर्ती” ही चीज नेमकी बनली कशी ते स्पष्ट होऊ शकणार नाही....."
तुमची वरील कबुली मला श्री.यु.जीं.चे एक शिष्य श्री.महेश भट्ट [ज्यांनी युजींचे अंत्यसंस्कारही केले] यांच्या याच विषयावरील मनोगताची आठवण करून देते. श्री.भट्ट म्हणतात :
Despite spending endless hours on this biography, I am still miles away from my goal of giving a fair account of this man and his life..."
तुमच्या लिखाणातदेखील नेमकी हीच अडचण तुम्हाला येत असेल. असे असले नि:संशय एक तरी एक चांगला विषय इथल्या सदस्यांसाठी तुम्ही दिला आहे.
वाचतोय.
इन्द्रा
शरीरातून ठिणग्या वगैरे...भारी काम दिसतंय..पुढं ?
येउ द्या आणखी
यांच्याबद्दल बरेच वाचन केले आहे फार पुर्वी, पण यु.जी. कृष्णमूर्ती यांच्याबद्दल त्यांच्या पुस्तकात काही लिहीले आहे किंवा नाही हे निटसे आठवत नाही.
पण तुमची लेखमाला आवडतेय.
यु.जी. कृष्णमूर्ती यांच्याबद्दल जाणुन घ्यायला आवडेल.
चालु द्या.
अध्यात्मातही शरद पवार (ओशो), बाळासाहेब ठाकरे (जे.) आणि नारायण राणे (यु.जी.) आहेत तर :-)
बाकी पापाजी, काकाजी वगैरे मन्डळी विलासराव, कलमाडी ...
(लेखमाला मस्तच चालू आहे. कुलकर्णी साहेब, धन्यवाद!)

यु.जी. कृष्णमूर्ती: नो वे