विडंबनाची भेळपुरी

घाटावरचे भट जे न देखे रवी...
(डिस्क्लेमरसाठी कृपया पहिले कडवे पहा) मिपाकरांनो ऐकून घ्यावे मनातली मांडतो व्यथा कविता माझी पण ह. घेणे, जरी असे ती यथातथा नवखा आहे सदस्य मी वय माझे आहे हप्त्याचे परंतु होई अजीर्ण मजला विडंबनाच्या कवितांचे हसता हसता पोट दुखे मी पोटदुखीने बेजार चहुबाजूंनी चाले मजवर विडंबनांचा भडिमार महान अमुचे केसुगुरुजी महान अन त्यांची शाळा काव्यावरती काव्य प्रसवतो त्यांच्या छात्रांचा मेळा या शाळेचा प्रभाव खासा काव्यापुरता नाही बरे कुठे कुणाचा ग्यासु आणिक कुठे कुणाची बनी फिरे असे विडंबन चविष्ट जैसी गाडीवरची भेळपुरी भेळपुरी पण कितीक खावी सांगा मजला खरोखरी आज जाहल्या भेळपुरीच्या गाड्या त्या जिकडेतिकडे सात्विक थाळी महाग झाली भूक मिटावी कुणीकडे
वर्गीकरण
लेखनविषय:

62 टिप्पण्या 23,591 दृश्ये

Comments

सर्किट (verified= न पडताळणी केलेला) नवीन

सात्विक थाळी हवी असे तर जुनी आपुली स्थळे बरी लोणकढे तुप मुबलक तेथे, जर सोसत नसेल ही तर्री - सर्किट

घाटावरचे भट नवीन

In reply to by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)

मला न ठाऊक जुनी स्थळे ती नाही त्यांचा इतिहास मनात आले दिले ठोकुनि नाही कुणाचा उपहास --आपलेच (आणि घाटावरचे) भट... उत्तिष्ठत, जाग्रत, प्राप्य वरान्निबोधत ~ स्वामी विवेकानंद

सर्किट (verified= न पडताळणी केलेला) नवीन

In reply to by घाटावरचे भट

इतिहासाची तमा नसे तर, भविष्य तममय वाटतसे येथ टिकूनी रहावया मग, कुठलीही चिंताच नसे - सर्किट

मुक्तसुनीत नवीन

In reply to by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)

इतिहासाचे ओझे वाही त्याला ते लखलाभ असो नव्या दमाच्या शूर शिपाया नव्या युगाचे चित्र दिसो !

सर्किट (verified= न पडताळणी केलेला) नवीन

In reply to by मुक्तसुनीत

नव्या युगाचे चित्रच येथे, दिसते जरि आशादायी जुन्या युगातुन तरि ही येते, प्रतिसादांची अंगाई - सर्किट

मुक्तसुनीत नवीन

In reply to by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)

थेसिस आणि अँटीथेसिस सांगून गेला कुणि वेडा सांगावेसे वाटे सकला , सिंथेसिस चा मंत्र पढा !

सर्किट (verified= न पडताळणी केलेला) नवीन

In reply to by मुक्तसुनीत

त्या वेड्याला जाऊन सांगा, थेसिसचा जाणुन अर्थ सिंथेसिस शब्दात बुडाला, बेसिस देखिल हे व्यर्थ! - सर्किट

घाटावरचे भट नवीन

In reply to by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)

कुणा दुखवणे उपमर्दाने नाही मुळी माझा हेतू, डिस्क्लेमर वाचूनही माझा का धरितसा मनी किंतु??? --आपलेच (आणि घाटावरचे) भट... उत्तिष्ठत, जाग्रत, प्राप्य वरान्निबोधत ~ स्वामी विवेकानंद

सर्किट (verified= न पडताळणी केलेला) नवीन

In reply to by घाटावरचे भट

किंतु धरला नाही मनि हा, उगाच तुजला वाटतसे भाड्या करं रे तूही विडम्बन, कोण तुला तो रोकतसे ? - सर्किट

घाटावरचे भट नवीन

In reply to by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)

काश असती ऐसी प्रतिभा जर अमुच्याही गाठीशी लिहिले असते केसुगुरुजीना घेऊन अमुच्या पाठीशी... --आपलेच (आणि घाटावरचे) भट... उत्तिष्ठत, जाग्रत, प्राप्य वरान्निबोधत ~ स्वामी विवेकानंद

मुक्तसुनीत नवीन

In reply to by घाटावरचे भट

मिसळपाववर राजहंस हा : केसु , तुमको मान गये ! , राजहंस तो चाले म्हणुनि , कवणे परि चालूच नये ! ;-)

केशवसुमार नवीन

In reply to by मुक्तसुनीत

जालावरचा सुमार मी हो, राजहंस मज म्हणू नका मारा जोडे तुम्ही हवे तर, असल्या पदव्या देऊ नका (सुमार)केशव

सर्किट (verified= न पडताळणी केलेला) नवीन

In reply to by घाटावरचे भट

प्रतिभेची प्रतिमा दाखवुनी, गंडवले तुज आजवरी संगितातले ज्ञान दावुनी, मामा अजवर तुझा परी एक सांगतो भटा आज तुज, प्रतिमा ही रे नाही बरी हत्तीच्या जरि कानामधली, एकच मी मुंगीच खरी विडंबनातुन सत्यच स्रवते, मूळ प्रकाश कुठे न उरी सगळे पुतणे भाचे येथे, काका मामा जरी हे शिरी - सर्किट

घाटावरचे भट नवीन

In reply to by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)

विडंबनातुनि सत्यच स्रवते मान्य असे मज पूर्णपणे सत्याचा अतिरेक परंतु का उगि कलियुगी वाढविणे? --आपलेच (आणि घाटावरचे) भट... उत्तिष्ठत, जाग्रत, प्राप्य वरान्निबोधत ~ स्वामी विवेकानंद

सर्किट (verified= न पडताळणी केलेला) नवीन

In reply to by घाटावरचे भट

कली सत्य अन त्रेता युग रे, डिफरंसाची जाण नसे विडम्बने ही कालातित रे, कधीपासुनी सांगतसे - सर्किट

घाटावरचे भट नवीन

In reply to by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)

सर्किटकाका माफ करा मज अपुल्या पाया मी पडतो गरमगरम दूधभात खाण्या सत्वर माघारी जातो.... --आपलेच (आणि घाटावरचे) भट... उत्तिष्ठत, जाग्रत, प्राप्य वरान्निबोधत ~ स्वामी विवेकानंद

सर्किट (verified= न पडताळणी केलेला) नवीन

In reply to by घाटावरचे भट

पाया पडणे मान्य नसे मज, हस्तांदोलन आज करू काका म्हणशी का रे मजला, कानाखाली तुझ्या फिरु ? - सर्किट

घाटावरचे भट नवीन

In reply to by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)

काका म्हणणे मान्य नसे जर सर्किटराव तुम्हा म्हणतो हस्तांदोलन मैत्रीसाठी करण्या हात पुढे करतो... --आपलेच (आणि घाटावरचे) भट... उत्तिष्ठत, जाग्रत, प्राप्य वरान्निबोधत ~ स्वामी विवेकानंद

सर्किट (verified= न पडताळणी केलेला) नवीन

In reply to by घाटावरचे भट

नेटावरुनी बॉल टाकुनी, विंबल्डन करुनी थकलो हस्तांदोलन करुनि तुझ्याशी, अंथरुणावर पहूडलो - सर्किट

३_१४ विक्षिप्त अदिती नवीन

In reply to by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)

अंथरूणावरुनी उठूनी पहाटे, आत्ता तर मी नेटावर आले का रे पळशी संकेश्वररावा, आत्ता तर फटका मारू पाहते

घाटावरचे भट नवीन

In reply to by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)

माझ्या सर्व्हिस नंतर तुमचे एस आले सहस्रावधी रॅ़केट खाली टाकून पळतो भटू विम्ब्ल्डनामधी --आपलेच (आणि घाटावरचे) भट... उत्तिष्ठत, जाग्रत, प्राप्य वरान्निबोधत ~ स्वामी विवेकानंद

बेचवसुमार नवीन

In reply to by घाटावरचे भट

हिहाहा हिहाहा हिहाहा... विडंबन आणि विम्बल्डन...नावसाधर्म्य रे तु पहा...! हिहाहा हिहाहा हिहाहा राक्षसी विकट हास्य हासणारा...बेचवसुमार..

मुक्तसुनीत नवीन

सत्त्व, तमो नि रजोगूण , हे सारे अपुले सवंगडी मिसळपाववर सकलही जमती , थांबा येथे दोन घडी !

सर्किट (verified= न पडताळणी केलेला) नवीन

In reply to by मुक्तसुनीत

सत्व कळे हे सुनितांपासुनी, रज अमुचे हे थेंब दिसे तमोगुणातुन कोण उधळतो, च्यामारी प्रतिसाद पिसे ? - सर्किट

मुक्तसुनीत नवीन

In reply to by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)

सत्त्वरजाबरोबर तमाचाही हा झाला सकलां स्पर्श असा , म्हणुनचि कोणी सांगून गेले : पाण्या , रे , तव रंग कसा ?

सर्किट (verified= न पडताळणी केलेला) नवीन

In reply to by मुक्तसुनीत

रंग रंगुनी रंगित झालो, केसु केळूंमुळे जसा चतुरंगाच्या विडंबनांना, कंटाळी हा भट्या कसा ? - सर्किट

विसोबा खेचर नवीन

सात्विक थाळी महाग झाली भूक मिटावी कुणीकडे वा! क्या बात है...!

प्रकाश घाटपांडे नवीन

मैफिलिला मजा आलि बुवा! मराठी पिक्चर मधले सवाल जवाब आठवले. प्रकाश घाटपांडे

मेघना भुस्कुटे नवीन

हुश्श! आता गद्य प्रतिसाद टंकायला हरकत नाही. मजा आली. अगदी श्रीमंत वाटलं. सर्किट, मुक्तसुनीत आणि घाटावरचे भट, तिघांनाही धन्यवाद.

भडकमकर मास्तर नवीन

In reply to by मेघना भुस्कुटे

काय बोलावं सुचत नाहीये... तिघांनी अगदी धमाल आणली... काय सवाल जवाब ..काय आशय ....काय मीटर.... मस्त ... भट, सर्किट आणि मुक्तसुनीत येकदम धन्यवाद... ______________________________ ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

सहज नवीन

In reply to by भडकमकर मास्तर

सहमत. तिघांनी जाम मजा आणली व ही मैफील मगापासुन लाईव्ह एन्जॉय करायला मिळतीय हा आनंद काही आगळाच पहिल्यांदा असे झाले असावे की प्रतिसादांनी इतकी मजा आणली. मुळ विडंबनाकडे लक्षच नाही. :-)

३_१४ विक्षिप्त अदिती नवीन

In reply to by सहज

सही! >> पहिल्यांदा असे झाले असावे की प्रतिसादांनी इतकी मजा आणली. मुळ विडंबनाकडे लक्षच नाही. तसं नाही, पण प्रतिसादांमुळे खूपच मजा आली. (प्रतिसादांमुळे मुळ विडंबनाकडे दुर्लक्ष न केलेली) यमी

भडकमकर मास्तर नवीन

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

टेनिसची मॅचा चाललीया असा वाटतंय.... ..वरती नुकतंच हस्तांदोलन झालंय... आता मॅच संपतेय बहुतेक.... ( मजेत इकडच्या कोर्टातले चेंडू तिकडे टोलवले जाताना मॅच पाहणारा )... भडकमकर मास्तर _____________________________ ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

मुक्तसुनीत नवीन

In reply to by भडकमकर मास्तर

"विंम्बल्डन"चा उल्लेख आलाच आहे वर ! - म्याकेन्रोने फेकलेल्या रॅकेटमुळे कोसळलेला अंपायर ! ;-)

मनस्वी नवीन

>> प्रतिसादांनी इतकी मजा आणली. मुळ विडंबनाकडे लक्षच नाही. मनस्वी * केस वाढवून देवआनंद होण्यापेक्षा विचार वाढवून विवेकानंद व्हा. *

धनंजय नवीन

In reply to by नंदन

असेच म्हणतो

ऋषिकेश नवीन

In reply to by धनंजय

असेच म्हणतो.. खूप सह्ही -('मिसळ'लेला) ऋषिकेश

स्वाती दिनेश नवीन

प्रतिसादांनी इतकी मजा आणली. मुळ विडंबनाकडे लक्षच नाही. सहजरावांसारखेच म्हणते. स्वाती

मृगनयनी नवीन

सात्विक थाळी महाग झाली भूक मिटावी कुणीकडे कोबीची पाने सारखी चावुनी तोंडाचीही चव उडे... ऑप्शन एक, दिला तुम्हा.. पकवा नवल्कोल चे पकोडे... तरी चव ना उरे जिभेला, खाताना आठवा मनी जोशाकडचे वडे... :)
वन्दे त्वां भूदेवी आर्यमार्तरम.......... जयतु जयतु पदयुगुलम ते निरन्तरम.........

घाटावरचे भट नवीन

In reply to by मृगनयनी

काव्य पाडुनि अति मी दमलो विश्रांतीला द्या वेळ उसंत द्या मज जरा घालण्या पुढच्या शब्दांचा मेळ --आपलेच (आणि घाटावरचे) भट... उत्तिष्ठत, जाग्रत, प्राप्य वरान्निबोधत ~ स्वामी विवेकानंद

केशवसुमार नवीन

हे चालय काय? :O काल रात्री इतकी उच्च मॅच झाली आणि आम्ही कुला वर करून झोपलो होतो.. #o छ्या!! इथून पुढे मॅच चालू झाली तर लगेच आम्हाला भ्रमणध्वनीवर संपर्क साधावा ही विनंती मुक्ती सर्किट, भट घाटाचे मॅच खेळले काल म्हणे वरती करूनी कुला केशवा महाग पडले तुज निजणे (एक सुंदर मॅच पहायला मुकलेला) केशवसुमार स्वगतः बर झाले लेका तू झोपला होतास.. 'चेंडू' वर लक्ष ठेवण्यात मान मोडली असती.. घाटावरचे भटशेठ, अतिशय उत्तम कविता.. _/\_ (वाचक निवृत्त)केशवसुमार स्वगतः १. केश्या ह्या भटाच्या कवितेचे कधी तू वाट लावली होतीस का? :? मग का तो विडंबनाच्या जीवावर उठला आहे. २. हा भट दुसर्‍या कुठल्या नावाने कविता करतो शोधायला हवे.. म्हणजे नव्या बॅचच्या अभ्यासक्रमात त्याच्या कविता घेता येतील

घाटावरचे भट नवीन

In reply to by केशवसुमार

साक्षात विडंबनशिरोमणींचा कौतुकाचा खलिता???? हेडमास्तरांकडून कौतुक??? सूर्याकडून काजव्याची स्तुती??? स्वगतः १. भटा, भरून पावलास लेका....या क्षणी मेलास तरी स्वर्गातली शीट पक्की २. च्यामारी पहिल्यांदा कोणीतरी सगळ्यात वर जे खरडलं होतं त्याच्याबद्दल बोललं... --आपलेच (आणि घाटावरचे) भट... उत्तिष्ठत, जाग्रत, प्राप्य वरान्निबोधत ~ स्वामी विवेकानंद

भाऊ ठाकुर नवीन

सर्व कवींचे विशेष अभिनंदन चालु द्या अशीच जुगल्बन्दी अ फ ला तू न , शब्दच नाहित दुसरे.

II राजे II (verified= न पडताळणी केलेला) नवीन

तिघांनी जाम मजा आणली व ही मैफील मगापासुन लाईव्ह एन्जॉय करायला मिळतीय हा आनंद काही आगळाच पहिल्यांदा असे झाले असावे की प्रतिसादांनी इतकी मजा आणली. हेच म्हणतो.... वा ! क्या बात है ! अशी प्रतिभा माझ्या कडे असती ? तर... मी पाडली असती अशीच शेकडो विडंबने मिपा वरती :D राज जैन शुभ कर्मन ते कबहूं न डरो....!

बिपिन कार्यकर्ते नवीन

मूळ विडंबन छानच आहे. पण नंतर जे काही घडलंय, हसूण हसून मेलो.... १० मिनिटांनी प्रतिसाद टंकतोय... तमाश्यामधे सवाल-जवाब चालतात तसाच हा उच्च प्रकार होता. आपण तर बुवा जळलो सर्किट, मुक्तसुनित आणि भटोबांवर. काय प्रतिभा ही.... तुम्हाला तिघांनाही..... _||_ (ही कोपरापासून नमस्काराची 'बाहुली' आहे) बिपिन.

चतुरंग नवीन

केवढा मोठा फड रंगून गेला अन् मी कुठे होतो? घाटावरचे भट, सर्किट अन् मुक्त खेळती सुनीतही हळहळशी बघ मनीच रंग्या कसा सोडशी मॅच 'तू ही' भटोबा उच्च कविता! :) (स्वगत - रंग्या, नको तेव्हा नेटवर भटकत बसतोस आणि नेमका मॅचच्या वेळेला कुठे रे गेलेलास बोंबलत? X( ) चतुरंग

नीलकांत नवीन

हा सवाल जवाब आपल्याला जाम आवडला. सर्कीटराव, मुक्तसुनीत आणि घाटावरचे भट, एकदम जबरा सवाल - जवाब. मस्तच ! नीलकांत

नाखु नवीन

आणी समस्त मिपाकर "गुण्यागोविंदाने" नव्-(झिट) कवितेचा ( विडंबनाच्या सह) आस्वाद घेऊ लागले.... कहाणी सुफळ संपुर्ण.... मिसळ प्रेमी आम्हा सोयरी सह "चरी"

नील_गंधार नवीन

आयच्यान, कसली प्रतिभा म्हणायची याला!! सर्किटशेठ,मुक्तसुनीतसाहेब अन घाटावरचे भट तिघेहि जबरी. लै भारी जुगलबंदी. नील.

तिमा नवीन

इतक्या वर्षांनंतरही वाचायला मजा आली. अफाट प्रतिभा या ज्येष्ठांची.

विटेकर नवीन

खच्चून हाणली जिभल्या चाटत विडंबनाची भेळपुरी कुठे सांडली कुणा न कळली प्रतिभा ही खरीखुरी जुने सांडले नवे पातले दर्जा टिकवून असू जरी मजा चाखुया मनापासुनी काढुनी धागा पुन्हा वरी एक मेळावा जागतिक सा मिप्यावरती घ्यावा का जमवून सारे सखे सोबती करुन दाऊ एक " लिमका" बेडकरासम या मिपाची चव आम्हाला ही स्वर्गीय नका उठवू बाजार आता जर नसाल तुम्ही बेडेकरीय