मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

मिसळाख्यान

शैलेश · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
Taxonomy upgrade extras
जय जय मिसळपावा । तूझी किर्ती अमर्यादा । गुणानुक्रम तुझे वर्णीता । विद्वज्जनही थकती ।। १ ।। टोपीकरांचा* प्रभाव पडूनी । कैसे कैसे जन वर्तती । चिंताक्रांतले थोर ज्ञानी । अंतराळी सभेसी ।। २ ।। इतालियन चायनीज भक्षती । नटमोग-या मालिका बघती । आणिक मिरवती फ्याशनी । तयांसी शहाणे करावे ।। ३ ।। मजसी तेथ पाचारण करोनी । मिसळीचे गुण वर्णुनी । वेवस्थित काव्य रचोनी । मिसळपावी प्रकाशना सांगितले ।। ४ ।। त्यांची आज्ञा शिरोधर । मी तो केवळ आज्ञाकार । कवितेचा गंधही ना ठाव । परि प्रयत्न करीतो ।। ५ ।। अहो ही मिसळ अलौकिक । तेणे साधली ओवी मज । आणि श्रोते आपण विद्वान । म्हणूनी धारिष्ट्य करीतो ।। ६ ।। अंतःकरण करावे कुशाग्र । धरावे मिसळीचे संधान । सेवावे आनंदात अमर्याद । मिसळाख्यान हे ।। ७ ।। कथा आहे फार जुनी । म्हणा युगायुगांतरांची । आटपाट नगरी राज्य करी । त्रैलोक्याचा स्वामी ।। ८ ।। रोज पंचपक्वांनांचे सेवन होते । शब्द झेलण्या सेवकांचे ताफे । पंचक्रोशीतील सर्व सुखे । हात जोडूनी होती ।। ९ ।। परी त्या आनंदी कणभर न्यून होते । सदा गूढ खेद बोचत असे । काय करावे या मनाचे असे वाटे । राजा चिंतातूर जाहला ।। १० ।। हळू हळू अन्नावरची वासना उडे । प्रकृती दिवसमासी क्षीण होतसे । राणी प्रधान प्रजाजन घाबरले । काय जाहले हो नृपतीसी ? ।। ११ ।। देशोदेशींचे दूत आले । नानाविध डाग्तर वैद्य जाहले । औषध प्रार्थनांचा पाऊस पडलासे । परि गुण येई ना ।। १२ ।। अखेर राजाने दवंडी पिटविली । जो दूर करेल खेदासी । उचीत सन्मान देऊनी तयासी । राजदरबारी घेईल ।। १३ ।। सुवर्णाचे सहस्त्रविध होन । पांच नगरांची जहागीर । आणि मंत्र्यांसमवे बसायचा मान । देऊ करी ।। १४ ।। ऐकोनी हे वर्तमान । चर्चा करीती समस्त जन । शल्य लाडक्या सम्राटाचे । कोण दूर करील ।। १५ ।। वसुंधरेवर गडबड उडाली । आटपाट नगरी रिघ लागली । तांत्रिक, कुडमुड्या आणि वैदूंची । समालोचकही होते ।। १६ ।। फेकतक, जीजीरे आणि कट्यार टिव्ही । बेसमय तसेच कार्टुनाग्रणी । गिधाडवाहने घेऊन वाहिनीकर निघाले । चला काही काम मिळाले ।। १७ ।। अशाप्रकारे मिसळाख्यानाचे । प्रथम अध्यायाचे पान पहिले । येथेच समाप्त जाहले । आता भेटू विरामानंतरी ।। १८ ।। टोपीकर = इंग्रज

वाचने 4166 वाचनखूण प्रतिक्रिया 8

विसोबा खेचर Wed, 04/02/2008 - 15:51
अशाप्रकारे मिसळाख्यानाचे । प्रथम अध्यायाचे पान पहिले । येथेच समाप्त जाहले । आता भेटू विरामानंतरी ।। १८ ।। मस्त! :) विरामानंतरच्या आख्यानाची वाट पाहतो आहे... तात्या.

प्राजु गुरुवार, 04/03/2008 - 00:02
म्हणते... आवडले आख्यान. - (सर्वव्यापी)प्राजु www.praaju.blogspot.com

चित्रगुप्त Mon, 05/13/2024 - 15:11
आज अचानक गाठ पडे ... सोळा वर्षांपूर्वीचे, मिपाच्या प्रारंभिक काळातले हे मिसळाख्यान आज अचानक सापडले. याचे पुढले भाग आलेले नाहीत का ? 'शैलेश यांचे सर्व लेखन' मधे फक्त एवढेच आहे ? त्याकाळी सक्रीय असलेले बहुतांश मिपाकर आता दिसत नाहीत.