रौशनी.. २

विसोबा खेचर's picture
विसोबा खेचर in जनातलं, मनातलं
16 Sep 2007 - 7:18 pm

रौशनी..१
रौशनी..२
रौशनी..३
रौशनी..४

राम राम,

रौशनीचा पहिला व हा दुसरा, हे दोन्ही भाग यापूर्वी मायबोलीवर प्रसिद्ध झाले होते त्याकरता मायबोली प्रशासनाचे अनेक आभार.. तिसरा भागही बराचसा लिहून तयार आहे, आजउद्याकडे इथे प्रसिद्ध करीन..

भाग १ वरून पुढे सुरू..

>>'कोण कुठली रौशनी! मी का जावं तिच्याकडे?' असा विचार करून मी मन्सूरकडे दुर्लक्ष केलं. पण त्यानंतर दोनतीनदा मन्सूरने रौशनी बोलवत असल्याचं पुन्हा सांगितलं. शेवटी 'च्यामारी बघू तरी एकदा ही भानगड तरी काय आहे?' असा विचार करून एके दिवशी मी त्या रौशनीला भेटायला जायचा विचार पक्का केला. <<

...रात्रीचे १० वाजले असावेत. मी मन्सूरला सोबत घेऊन बारच्या बाजुलाच असणार्‍या चाळीमध्ये रौशनीला भेटायला निघालो. त्या चाळीत जाण्याची माझी पहिलीच वेळ! दोन्ही बाजूला परकरपोलकी घातलेल्या, चेहेर्‍यावर रंगरंगोटी केलेल्या वेश्या उभ्या होत्या. त्यातल्या बर्‍याचश्या रंगरुपाने दिसायला केवळ भयानक होत्या. गलीच्छ होत्या. काळ्याकुट्ट देहावर, चेहेर्‍यावर मेकपची पुटं चढवलेल्या! रंगीबेरंगी भडक कपडे घातलेल्या! चेहेर्‍यावर आचकट विचकट भाव अन् हसू! कोण कुठल्या या मुली? इथे कश्या आल्या असतील? कुणी आणल्या असतील? किती रुपायाला विकल्या गेल्या असतील? छे! सगळेच नुसते प्रश्न...! उत्तर एकाचंही माहीत नाही!

मला त्या मुलींची किळसही आली आणि एकिकडे दयाही आली! पाच पंचवीस पन्नास रुपयांकरता फालतूतल्या फालतू, अत्यंत थर्डरेट माणसांसमोर पाय फाकवायचे? आणि त्यानंतर होणार्‍या फक्त यंत्रासारख्या हालचाली! कॉटवर आडवं पडून पाय फाकवणारं फक्त एक यंत्र! आणि यांच्याकडे येणारी गिर्‍हाइकं? ती एवढी भुकेली असतील?? काहीही करून कसंही करून स्त्रीशरीर मिळाल्याशी कारण! आपण नेहमी म्हणतो, 'की काय रे माणूस आहेस की जनावर?' हे म्हणण्यामागे माणसाकडून जनावरापेक्षा निश्चित काहीतरी वेगळ्या अपेक्षा असतात. अहो पण कुत्र्यामांजरांच्या संभोगातदेखील एक वेळ शृंगार सापडेल, प्रेम सापडेल! पण इथे मी खरोखरंच माणसातली जनावरं बघत होतो. कारण माझ्या आजुबाजूला गिर्‍हाइकांचीदेखील वर्दळ, येजा सुरू होती. माणूसरुपी जनावराचा आणि एका माणूसरुपी पाय फाकवणार्‍या यंत्राशी पाच पंचवीस रुपायांच्या बोलीत ठरलेला व्यावहारिक संभोग! तो म्हणणार, 'चल लेट जा. बहुत नखरा कर रहेली है', आणि ती म्हणणार, 'चल, जल्दी कर. आज धंदा कम है साला, जादा टाईम मत ले. धंदे का खोटी मत कर!'

मंडळी, हे सगळंच खूप कठीण होतं. भयानक होतं!

पण मला त्या मुलींची, त्या माहोलची, त्या गिर्‍हाइकांची किळस का येत होती? मी यांच्यापेक्षा वेगळ्या सोसायटीतला, वेगळ्या समाजातला होतो म्हणून??

माझ्या समाजात किंवा माझ्यापेक्षा उच्चभ्रू समाजात नवरा सहा सहा महिने बोटीवर असतो, तुफान पैसा कमावतो. आणि इथे त्याची धर्म(!)पत्नी स्वतःच्या पॉकेटमनीकरता, वरखर्चाकरता पाच, दहा, पंधरा, पंचवीस हजारांची रक्कम घेऊन (तिच्या सुंदरतेनुसार, कमनीयतेनुसार!) अज्ञात ठिकाणी हेच काम करते की! अश्याही आहेतच की काही स्त्रीया! पण त्यांचा कुठे बाजार नसतो! बरीचशी कामं एसएमएस द्वारा चुपचाप होतात! बर्‍याचवेळा मध्यस्थांमार्फत ही कामं होतात, किंवा पेजथ्री मधल्या पार्ट्यांमधून एकमेकांशी ओळख तरी असावी लागते, मैत्री व्हावी लागते! मग कदाचित पैशांचाही प्रश्न येत नाही. सगळंच उच्चभ्रू आणि हायफाय लेव्हलवर चालतं!!

पण तरीही त्यापैकी एखादी बाई समोर आली की नकळत माझ्या तोंडून कदाचित, 'हॅलो मॅडम, हाऊ आर यू?' हेच शब्द बाहेर पडणार! मंडळी, तेव्हा मात्र मला त्या बाईची किळस नाही येणार! कारण ती छान दिसते, पॉश राहते! 'तिचा नवरा सहा सहा महिने बोटीवर असतो ना, अहो मग काय करणार? शेवटी माणूस आहे आणि माणसालाही काही भुका असतात, गरजा असतात!' असा सोयिस्कर विचार मी करणार! 'च्यामारी आपल्यालाही या बाईबरोबर चान्स मिळाला तर काय मजा येईल!' हाही विचार माझ्या मनात येऊ शकतो. पण तेव्हादेखील मी माणूसच असतो बरं का! जनावर नसतो!

मंडळी, माझा एक करोडपती पंजाबी क्लाएंट आहे. बिझिनेस एथिक्स म्हणून मी त्याचं नांव नक्कीच घेऊ शकत नाही. साला भगवान आहे तो आपला! मंडळी, हा माणूस मुळचा चंढीगढचा. पण कामधंद्याकरता नेहमी फिरतीवर असतो. तुफान पैसा कमावतो. त्याचे शेअर्सचे सगळे व्यवहार मी पाहतो. तो एकदा दोन तीन महिन्यांच्या परदेशवारीकरता गेला होता. आल्यावर त्याने मला फोन केला. त्याला त्याच्या शेसर्ससंबंधी मला नित्याची माहिती द्यायची होती, माझ्या फीचे पैसेही त्याच्याकडून घ्यायचे होते.

'अरे तात्यासेठ, कैसा है? एक काम करना तात्या, मै आज शामतकही बंबईमे हू, बाद मे मुझे दिल्ली जाना है. तुम अंधेरीमे फलाना हॉटेलमे मुझे ये ये टाईमपे मिलना. फुरसतमे बात करेंगे. बियर पियेंगे!' असा आमचा फोन झाला.

आपल्याला काय हो, धंदेसे मतलब! मी ठरल्यावेळी अंधेरीला असलेल्या त्या पॉश होटेलात त्याला भेटायला गेलो. स्वागतकक्षात चौकशी करून तो उतरलेल्या खोलीपाशी गेलो, दारावर टकटक केली. माझ्या पंजाबी क्लाएंटने आतून दार उघडलं. 'आओ तात्या, बैठो. स्टेटमेन्ट लाये हो?' मंडळी, मी आत जाऊन क्षणभर उडालोच! आतल्या डबलबेडवर मराठी वाहिन्यांतून, चित्रपटांतून काम करणारी एक प्रसिद्ध प्रतिथयश नटी बसलेली होती! तीदेखील माझ्याकडे पाहून फिल्मी पद्धतीने हसली. त्या पंजाबी माणसाने आमची एकमेकांशी ओळख करून दिल्यावर आम्ही एकमेकांना 'हाय हॅलो' केलं!

'बैठ तात्या. बियर पियेगा?' या प्रश्नाने मी भानावर आलो. पाच दहा मिनिटातच हिशोबाची स्टेटमेन्टस मी त्याच्या हवाली केली, माझे पैसे घेतले अन् तेथून निघालो. तो मला सोडायला खोलीच्या बाहेर आला. मला राहवेना. मी त्याला म्हटलं, 'साब, ये मॅडम तो बहोत फेमस है. आप उन्हे कबसे जानते है?'

अरे जानपेहेचान किस बात की? एक बार टीव्हीपे चॅनल सर्फींग करते हुए मैने देखा इसको. सिरियल लाईनके एक आदमीसे पता किया. साला पैसा फेकनेका! बस! तुझे चाहिये क्या बोल?!!' असं म्हणून तो गडगडाटी हसला आणि खोलीत परत गेला. मी माझे पैसे नीट जपून खिशात ठेवले आहेत याची खात्री करत तेथून रवाना झालो!

ती मालिकानटी मला पॉश वाटली. मी तिच्याशी लाळगळूपणा करत हाय हॅलोही केलं. कारण ती सुरेख होती, पॉश होती, स्वच्छ होती!! पण रोशनीच्या चाळीत उभ्या असलेल्या बायका मात्र मला गलिच्छ वाटत होत्या!!

साला दुनियेचा न्यायच अजब आहे! असो, थोडं विषयांतर होतंय, पण ते आवश्यक आहे. रौशनीचे हे व्यक्तिचित्र लेखन म्हणजे तात्याचा एक जीवनानुभव आहे. हे लेखन म्हणजे तात्याची एक भडास आहे. ओकू दे मला मनमोकळेपणाने!

तर कुठे होतो आपण?

मी निघालो होतो रौशनीला भेटायला. तिच्या वस्तीत, तिच्या चाळीत, रात्री दहाच्या सुमारास! मंडळी, खरं सांगायचं तर माझी क्षणभर जरा फाटलीच होती. 'कुठे चाललोय आपण? आणि का चाललोय? काय काम असेल आपल्याकडे या रौशनीचं?, च्यामारी यातून कुठल्या नवीन भानगडीत तर आपण अडकणार नाही ना?' अशा नाना शंकाकुशंका क्षणभर मनात येऊन गेल्या. पण साला आपला पण स्वभाव, 'जो होगा, वो देखा जाएगा भेंडी..!!', या टाईपचा असल्यामुळे मी त्या शंकाकुशंकांना माझ्या मनात फार वेळ थारा दिला नाही! ;)

मन्सूर अर्थातच माझ्यासोबत होता. आम्ही रौशनीच्या खोलीपर्यंत जात असतांना मन्सूर मात्र मोठ्या सराईतपणे आणि सफाईने त्या आजूबाजूच्या वेश्यांना, 'ए हटो सब एक साईड मे. तात्यासाब आ रहे है. साला गोवमेन्ट का आदमी है. लफडा नही मंगता है. नही तो बंद करेगा सबको!' अशा धमक्या देत मला घेऊन रौशनीच्या खोलीकडे निघाला होता! मी 'गव्हर्नमेन्ट का आदमी' केव्हा झालो हे माझं मलाही माहिती नाही! ;)

शेवटी एकदाचे आलो आम्ही रौशनीच्या खोलीपाशी. खोलीत समोरच सोफ्यावर रौशनी बसली होती! पन्नाशीच्या आसपासची, गोरी, आणि देखणी!!

(क्रमशः )

--तात्या अभ्यंकर.

वाङ्मयअनुभवप्रतिभा

प्रतिक्रिया

घाशीराम कोतवाल १.२'s picture

2 Jul 2009 - 3:54 pm | घाशीराम कोतवाल १.२

एक पण प्रतिक्रिया नाहि
कारण काय बरे ?
ते जाउ दे ओ तात्या रोशनी चे पुढचे भाग दिवाळी नंतर म्हणालात आता गणपती येतील काय करता राव लिहा ना लवकर ;)
**************************************************************
नकार देण ही कला असेल पण
होकार देऊन काम न करण हिच खरी कला !!! ;)