कारलं माझ्या आवडीचं!

Bhakti पाककृती
जगातील सगळं सुख एकीकडे आणि परफेक्ट कारल्याची भाजी करण्याचं सुख एकीकडे!! 😋 किंचित कडू -गोट-आंबट-ठसकेदार-चमचमीत! जीभेच्या रसना तृप्त करणारी! शरीरालाही गुणकारी! कृती- १.कारल्याच्या गोल चकत्या प्रमाणे फोडी करा.एका कारल्याच्या पाच फोडी होतील.देठ आणि शेंड्याकडचा भाग काढून टाकायचा. २.त्या फोडीतील बिया काढून टाकाव्यात.कारल्याच्या फोडी आता पोकळ असतील. ३.त्या फोडींना हळद,मीठ,लिंबाचा रस(२-३ लिंबाचा)लावून वीस मिनिटे तशाच ठेवाव्या. ४.नंतर उकळी आलेल्या पाण्यात त्या मध्यम शिजवाव्या. ५.मसाला-एक मोठी वाटी दाण्याचा कूट,अर्धी वाटी तिळाचा कूट,दोन चमचे तिखट,एक चमचा कोणताही आवडीचा मसाला,अर्धी वाटी चिरलेला गूळ,चिरलेली कोथिंबीर,मीठ ,किंचित लिंबू पिळावे.हा कोरडा मसाला तेलात एकत्र करावा. ६.कारल्याच्या फोडींत तो भरावा किंवा फोडी या मसाल्यात घोळून घ्याव्यात. ७.तेलात मोहरी जिर्याची तडतडीत फोडणी करावी.त्यात भरलेल्या कारल्याच्या फोडी चांगल्या परताव्यात.अर्धा फुलपात्र पाणी टाकून मंद आचेवर भाजी वाफवून घ्यावी. A कडू कारलं साखरेत घोळले,तुपात तळले तरी ते कडू ते कडू,असं म्हणत उगाच त्याला चिडवू नये 😛 अशी भाजी करून कारल्याविषयक सकारात्मकता पसरवा ;) तुम्ही कारल्याची भाजी कशी करता?😊

43 टिप्पण्या 16,134 दृश्ये

Comments

कांदा लिंबू नवीन

कारलं माझ्या आवडीचं!
माझ्यापण आवडीचं. पाकृ व सांगण्याची पद्धत आवडली.
तुम्ही कारल्याची भाजी कशी करता?
माझी आई कारल्याची भाजी अगदी चविष्ट करते. चिंच, गूळ, शेंगादाण्याची पूड, शेंगादाण्याचं तेल, काळं तिखट, मीठ, तिखट वगैरे घटक असतात. कधी सचित्र पाकृ टाकेन.

कर्नलतपस्वी नवीन

कार्ले धुऊन,पुसून घ्यावे. गोल चकत्या काढाव्या. बिया काढून टाकाव्यात हळद लिंबू मिठ चोळून थोडावेळ बाजूला ठेवा. कढईत तेल गरम करायला ठेवा कांदा गोल कापून त्याच्या रिंग मोकळ्या करा गरम तेलात शेंगदाणे खरपूस लालसर तळून घ्या. कांद्याच्या चकत्या पण लालसर तळून घ्या आता कारल्याच्या चकत्या तेलात टाका चवीनुसार लाल तिखट मीठ घाला कुरकुरीत होईपर्यंत गॅसवर ठेवा कुरकुरीत दाणे,कार्ले आणी मऊसर कांद्याच्या रिंगा ,मस्त लागतात, कडवटपणा नाममात्र, चकणा म्हणून सुद्धा चांगली डिश आहे. तेल माफकच वापरावे. कार्ले पंचामृतातही चांगले लागते. भाजीचा फोटो छान आलाय.

कंजूस नवीन

तुम्ही कारल्याची भाजी कशी करता? १) -गरम तेलात लसूण चटणी परतायची, -कच्च्या हिरव्या टोमॅटोच्या चकत्या आणि कार्ल्याच्या चकत्या (१:१) एकत्र पर्यायांच्या. ( सरळ कार्ल्याच्या चकत्या करायच्या, काहीही सोपस्कार न करता.) २ कार्ल्याच्या चकत्या तिखट मीठ बेसन तांदुळाचं पीठ लावून तेल टाकून तव्यावर कुरकुरीत भाजायच्या. दोन्ही प्रकारात कडूपणा लागत नाही. ___________ पाकृ आवडली. पाहुण्यांसाठी का?

गवि नवीन

कारल्याची परतून सुकी भाजी आणि सोबत आमटी भात हा बेत म्हणजे काही वादच नसतो. भरली कारली पण बरी. पण त्यात पुन्हा कोरडी आणि ग्रेव्हीसदृश असे दोन प्रकार असतात. दोरीने बांधण्याची पद्धत दिसते. ओली भाजी निरुपयोगी. कारण त्यात कारल्याची साल मऊ होऊन त्याच्या texture ची मजा आणि तो विशिष्ट वास निघून जातो. भाजी चांगली झालेली दिसते, साग्रसंगीत. पण फोटो जरा दुरून आणि पूर्ण ताटाच्या सोबत काढला तर बरे होईल.

Bhakti नवीन

In reply to by गवि

ओली भाजी निरुपयोगी. कारण त्यात कारल्याची साल मऊ होऊन त्याच्या texture ची मजा आणि तो विशिष्ट वास निघून जातो.
बरोबर,मला अजून कार्ल्याची कोरडी भाजी नीट येत नाही.

गवि नवीन

In reply to by Bhakti

पण या धाग्यातली ही भाजी ओली या सदरात मोडत नाही. ओली म्हणजे जवळपास उकडलेली साल आणि आत मसाला + आसपास ग्रेव्ही सारखे असे असते.

गवि नवीन

In reply to by Bhakti

लहानपणी मी जवळपास सर्वच भाज्या आवडीने खात असे. जे बनवलेले असेल ते. पण कारले हा एकमेव अपवाद होता. बाकी काहीही चालते पण कारले लोक कसे खात असतील? अशी त्या वेळेला भूमिका होती. मग एकदा पूर्वग्रह बाजूला ठेवून पुन्हा नव्याने खाल्ली. अरे, खाणे शक्य आहे बरं का. आणि हा कडूपणा औषधाच्या गोळी सारखा नसून त्याला एक ताजेपणाचा गंध आहे असे वाटले. मग टेस्ट डेव्हलप झाली आणि मोठेपणी सर्वाधिक आवडीच्या भाज्यांपैकी झाली. फणस ही आणखी एक. मेथीची गोळा भाजी .. अंबाडी देखील. अंबाडीची थोडी घट्टसर भाजी, भरपूर लसूण आणि लाल मिरचीच्या फोडणीवर, आणि वरून घ्यायला पुन्हा लसणाची फोडणी.. सोबत बाजरी भाकरी गरम गरम, कांदा. पु लंनी म्हटले आहे की अंबाडीची भाजी भाकरी खाताना यमदूत जरी आला तरी तो आपला "खाणाऱ्या"वरचा हात "खाण्या"वर नेईल.. असो आवरतो अवांतर..

Bhakti नवीन

In reply to by गवि

पण फोटो जरा दुरून आणि पूर्ण ताटाच्या सोबत काढला तर बरे होईल. उशीर झाला होता खुप भूक लागली होती नेहमीप्रमाणे भक्तीघाईत फोटो घेतला 🤣 डबघाईनुसार भक्तीघाई शब्द उमजून घ्यावा🤣

Bhakti नवीन

In reply to by प्रचेतस

हॉट चिप्समध्ये मिळणारे कारल्याचे चिप्स मात्र आवडतात.
मग ठीक आहे, कार्ले चीप्स खात खात मिळेल तुम्हाला कार्ले लेण्यांना प्रवेश 😀

प्रसाद गोडबोले नवीन

In reply to by प्रचेतस

कारल्याची भाजी अजिबात आवडत नसल्याने आपला पास.
+1 म्हणूनच वल्ली सर आणि आमची मैत्री आहे. कारले , शेपू , आंबडी , आंबट चुका... हर हर... ह्या भाज्या खाणे म्हणजे अघोरी तपस्यापेक्षा कमी नाही . त्यापेक्षा मी उपवास करणे पसंत करेन. आणि आईने त्यात चाकवत आणि पोरांनी पालक-पनीर हे आवडत असल्याने इतके वेळा करून अक्षरशः वीट आणला आहे. ह्या दोन भाज्या अजून त्या लिस्ट मध्ये add करा. =))))

हणमंतअण्णा शंक… नवीन

मलाही प्रचंड आवडते. कारल्यांच्या चकत्या करायची आमची आळशी पद्धत म्हणजे : चकत्या करुन त्या पार्चमेंट वर पसरून हलके तेल लावून घेतो सगळ्यांना आणि ओव्हन मध्ये भाजून घेतो.

नगरी नवीन

चकणा जरूर करणार,तसा काही वाईट वाटत नाही

नगरी नवीन

बाकी त्या दुर्दैवी कारल्याची एवढी वाट कोणी लावली नसेल

टर्मीनेटर नवीन

कारले आवडत नसले तरी आमच्याकडे आई किसलेले सुके खोबरे, तीळ आणि कारल्याच्या फोडी परतून जी सुकी भाजी करते तेवढीच फक्त आवडीने खातो! कारल्याची ओली भाजी मात्र मला अजिबात खाववत नाही 😀

Bhakti नवीन

**भरली कारली भरली अख्खे कारले करून पाहिले.तो दोरा गुंडाळायचा राहिला पण पुढच्यावेळी छोटी कारली मिळाली की परत निगुतीने भरली कारली करेन. १ यात आधी स्वच्छ धुतलेल्या कारले सोलून वरील खडबडीत आवरणही मसाला करताना वापरले. साहित्य:कारले सोलून, बिया काढून,मधोमध कापून त्यात मीठ,लिंबू रस,हळद लावून वाफवून घेतले. मसाला - सोललेले कारल्याचे वरचे खडबडीत हिरवे आवरण, एक वाटी शेंगदाणे,पाच सहा हिरव्या मिरच्या,तीळ, लसूण पाकळ्या, ३ चमचे लाल मिरची पावडर - १ चमचा धने पावडर - १ चमचा जिरे पावडर - १ चमचा गरम मसाला - १ चमचा तेल - मीठ - स्वादानुसार लिंबाचा रस - (ऐच्छिक) चिरलेली कोथिंबीर) सर्व परतून मिक्सरमधून बारीक केले. गूळ -४ चमचे कृती:वाफवलेल्या कारल्यांना हलके दाबून त्यांच्यातील पाणी काढून घ्या. कारल्यात भरायला तयार केलेला मसाला, चिरलेला गूळ थोडे तेल टाकून कारले भरून घ्या. नंतर तुम्ही याला दोऱ्याने बांधूनही टाकू शकता.नॉन-स्टिक कढईत तेल गरम करा. भरलेली करले त्यावर मंद आचेवर शिजवून घ्या, दोन्ही बाजूंना सोनेरी रंग येईल आणि मसाला नीट शिजेल. शिजल्यानंतर कोथिंबीर पेरून सर्व्ह करा.भाकरीसोबत गरमागरम खा. भरली कारली भरपूर चविष्ट लागते.

कर्नलतपस्वी नवीन

आज आमच्या घरी चिंचगुळ घालून कारल्याची रस भाजी आहे पण मला भरवां करेला आणी कार्ले तवा सब्जी खुप आवडते. उत्तर भारतात ही खुप चविष्ट बनवतात.

कर्नलतपस्वी नवीन

In reply to by Bhakti

आपला प्रांत नाही. विरोधी पक्षाला विचारले तर साशंक नजरेने बघतात ,वाटते की मी त्यांचा प्रांत काबीज करण्याचा प्रयत्न करतो आहे. फक्त दोन कप चहाची रेसिपी सांगू शकतो,आख्ख्या आयुष्यात तेव्हढेच शिकलोय.

विवेकपटाईत नवीन

रेसीपी आवडली. कारल्याच्या बिया कच्च्या असतील तर आमची सौ.काढत नाही. जास्त तेलात केलेल्या गोल छोट्यांच्या भाजीत बिया खायला मस्त लागतात.