स्वप्नजा!
काव्यरस
बऱ्याच दिवसांनी एक रोमँटिक कविता झाली!! :-)
कोण तू, माझी कुणी आहेस का?
स्वप्नजा.. जागेपणी आहेस का?
त्या सुगंधाचाच दरवळ आज.. अजुनी..
ब्रह्मकमळाची सखी आहेस का?
चाल नुपुरांची किती अलवार.. नाजुक!
चालुनी येते खरी आहेस का?
राग छेडी तार हृदयाचीच माझ्या..
अजुनी तू "रागा"वली आहेस का?
काल मज दिसलीस तू होती म्हणूनी..
आज वाटे, तू उद्या आहेस का?
---
का तुझा मी शोध घेतो पण, निरंतर?
सर्वस्व माझे व्यापुनी आहेस का?
राघव
[१९ जुलै २३]
वाचने
3797
वाचनखूण
प्रतिक्रिया
9
फार छान राघव सर. मनातलं लिहिलंय अगदी.
तेव्हा जशी मज लाभली होतीस तू
तितकी मनस्वी आजही आहेस का..?
In reply to थेट भिडली... by चलत मुसाफिर
वाह! चपखल! :-)
स्वप्नातल्या कळ्यांनो, उमलू नकाच केव्हा
गोडी अपुर्णतेची लावील वेड जीवा
In reply to जबरदस्त!! by राजेंद्र मेहेंदळे
क्या बात! मस्त! :-)
मागू नको सख्या जे माझे न राहिलेले
ते एक स्वप्न होते स्वप्नात पाहिलेले
-विंदा
पण सुरेश भट मात्र हवेतले विमान जमीनीवर आणतात.
घासते घरोघर भांडी स्वप्नांची राजकुमारी
वणवण तो पोटासाठी हा राजपुत्र अलबेला!
वपु मात्र धीर देतात.....
रचना आवडली.
In reply to व्वा मस्तच by कर्नलतपस्वी
सुंदर ओळी! भट साहेब तर लाजवाबच!
साधारणपणे वपु अंगावर येणारं लिहितात असा अनुभव आहे. अगदी थेट भिडणारं त्यांचं लेखन.. माणूस एकदा वाचायला लागला की सुटतच नाही त्या कचाट्यातून! :-)
रोम्यांटिक कविता आवडली, आणि 'स्वप्नजा' वरून जवळ जवळ एक शतकापूर्वीची, खालील कविता आठवली :
सहज तुझी हालचाल मंत्रें जणुं मोहिते -धृ.
सहज चालणेंहि तुझें,
सहज बोलणेंहि तुझें,
सहज पाहणेंहि तुझे
मोहनि मज घालितें. १
संसृतिचा घोर भार
बघतां तूं एकवार
विलया सखि, जाय पार,
देहभान लोपतें. २
देवी, वनदेवि म्हणूं,
स्वप्न, भास काय म्हणूं ?
प्रतिभा कीं भैरवि म्हणूं
मति माझी कुंठते. ३
एकवार बघ हासुन
डळमळेल सिंहासन !
तळमळतिल मनिं सुरगण !
हास्यास्तव खास ते ४
ही अपूर्व शक्ति सगुण
झाडितसे मम अंगण,
हें माझें भाग्य बघुन
जळफळतिल देव ते -
सहज तुझी हालचाल मंत्रें जणुं मोहिते.
(कवी - भा. रा. तांबे. जाति - अरुण. राग - भैरवी. ठिकाण - लष्कर-ग्वाल्हेर. दिनांक - ३ एप्रिल १९२७)
In reply to रोम्यांटिक कविता आवडली, आणि हे आठवले. by चित्रगुप्त
काय लिहिलंय हो भारांनी.. अप्रतीम आहे ब्वॉ.. _/\_
ती प्रतिभाच उच्चतम! आपण केवळ अचंबित होऊन रहायचं!
खूप खूप धन्यवाद!
फार छान !
थेट भिडली...