कथा: पोळी शब्दाच्या इतिहासातील उल्लेखाची

पाषाणभेद's picture
पाषाणभेद in जनातलं, मनातलं
30 Apr 2021 - 8:38 pm

कथा: पोळी शब्दाच्या इतिहासातील उल्लेखाची

चेहरापुस्तकावर पोळी आणि चपाती यापैकी योग्य मराठी शब्द कोणता यावर वाद झडत असतांना इतिहासाची पाने चाळतांना काही ऐतिहासीक पुरावे हाती लागले.

त्यातील एक संदर्भ म्हणजे, संस्कृतग्रंथ "भुकंबलीतम: - वेदोपदेश" (प्राकृतातः भुकबळी) .
सदर ग्रंथ संत पाषाणभेद ( जन्मसाल: उपलब्ध नाही, मृत्यू: शके १६६१ किंवा ६२) यांनी लिहीलेला आहे.
( "भुकंबलीतम: - वेदोपदेश" ग्रंथ प्राकृतात अनुवाद दगडफोड्या यांनी "भुकबळी" या नावाने केला आहे. (रचनाकालखंड उपलब्ध नाही.)
(सदर दोनही ग्रंथांची उपलब्धता अतिशय दुर्मीळ आहे. इच्छूकांनी शोध घ्यावा.‌)

सदर ग्रंथात "पोळीयस्य कारणेन" (पोळीच्या कारणाने) या अध्यायात तत्कालीन भिकारी अन एक साधूजन यांच्या भुकेची तुलना एक धनवान सावकार कसा करतो याचा स्पष्ट उल्लेख आहे. पोळी न मिळाल्याने भिकारी जग सोडतो आणि तो साधू त्या सावकाराकडून पोळी मिळवून ती खाऊ घालण्यासाठी त्या भिकार्यास जीवदान देतो अशी कथा आलेली आहे.

ती कथा येथे थोडक्यात मांडण्याचा प्रयत्न करत आहे.

कथा सुरू होते आहे:

प्राचीन काळी मर्‍हाटी राज्यात जनटक प्रांतात त्रिकंस्थान नावाचे एक गाव होते. गाव तसे लहानच होते. गावाच्या आसपास शेती करणारे आणि त्या अनुषंगाने व्यवसाय करणारे राहत असत. पर्जन्यछायेच्या प्रदेशात हे गाव येत असल्याने दुष्काळ तर गावाच्या पाचवीलाच पुजलेला होता. अनेकदा बियाणे पेरावे अन ते उगवण्याआधीच पक्षांचे अन्न व्हावे अशी परिस्थीती होती. होता येईल तितके अन्न उगवावे अन ते पुरवून पुरवून वापरावे, इतर वरकामे करून जीवन जगावे अशी तेथल्या गावकर्‍यांना सवय झालेली होती.

गावात एक औंदाजी नावाचा गरीब राहत होता. गावाच्या सीमेवर त्याची झोपडी होती. मजूरी करून दिवस कंठत तो म्हातारा झालेला होता. आताशा त्याचेकडून काही काम होत नसे. दिवसभराचे कोरान्न मिळवायला तो काम करण्यासाठी इतरांकडे याचना करत असे पण त्याच्या शारिरीक विपन्नावस्थेकडे पाहून कोणताही स्त्री-पुरूष त्याला दया म्हणून चतकोर शाक भाकरी देत असे. औंदाजी बापडा देखील त्याला आता सरावला होता. एक पाय ओढत तो चारपाच दारी भिक्षा मागे अन आपल्या पोटाची खळगी भरण्याइतके अन्न मिळवून आपल्या झोपडीत जाऊन पडत असे. गेला आठवडा औंदाजीच्या पायाचे दुखणे वाढलेले होते. त्यातच अन्न न मिळाल्याने त्याला ग्लानी येत होती. कसेबसे पाण्यावर दिवस काढत होता बापडा.

त्याच समयाला त्रिकंस्थान गावाच्या दामाजी सावकारांकडे नातवाच्या बारशाच्या समारंभ होता. पंचपक्वान्नाची जेवणे नुकतीच आटोपल्यामुळे मंडळी सुस्तावलेली होती. विडा पान खाऊन वडीलधारे वामकुक्षी घेत होती. स्त्रीया माजघरात आवराआवर करत होत्या. लहान मुले वाड्यातल्या चौकात खेळत होती. अशा समयाला औंदाजी आपला दुखरा पाय सरकत सरकत तेथे भिक्षा मागण्यासाठी आला. त्याने फार काही नको, फक्त चतकोर अर्धी पोळी अन प्यायला पाणी द्या अशी विनंती तेथे केली. सुस्तावलेल्या दामाजी सावकारांनी पाहुण्यांसमोर आपली आब दाखवण्यासाठी औंदाजीला पोळी, भाजी, पाणी देण्यास साफ नकार दिला. इतकेच नव्हे तर त्या वाड्यासमोरून लगेच निघून जाण्यास त्याला फर्मावले.

पोटातली दोन दिवसांची भुक, उन्हाचा त्रास, आजारी शरीर, झालेले वयोमान या सगळ्यांचा एकत्रीत विपरीत परिणाम होवून औंदाजीने सावकाराच्या वाड्याच्या पायरीवरच आपले प्राण सोडले.

हे सर्व पाहुणे अन सावकारासमोर घडले. सावकारासही आपल्या वागण्याचा पश्चाताप झाला व तो त्याने सगळ्यांना बोलून दाखवला. घटना तर घडून गेली होती. आता पश्चाताप करण्यात काही अर्थ नव्हता. कदाचित औंदाजीला तेथेच मरण यावे अशी नियतीची इच्छा असावी.

याच दरम्यान संत पाषाणभेद तेथे अवतिर्ण झाले. काखेत झोळी, हातात कमंडलू, पायी खडावा, अंगात कफनी, डोईस मुंडासे, कपाळी रेखीव चंदनी सूर्य अशा वेशात ते सावकाराच्या वाड्यासमोर उभे ठाकले. आपल्या उंच आवाजात ओमकाराचे स्मरण करून त्यांनी सावकाराकडे कोरडा शिधा मागितला. परंतु सावकार, तेथील पाहुणे, स्त्रीया इत्यादी मंडळी औंदाजीच्या शवाभोवती गोळा झालेली होती. संतांकडे कुणाचेही लक्ष नव्हते. अजून दोन वेळा ओमकार करून भिक्षा मागून जर नाही मिळाली तर पुढल्या घरी जाण्याचा संतांचा विचार होता तितक्यात सावकाराचे लक्ष त्यांच्याकडे गेले. सावकाराने घडलेला सगळा प्रकार पाषाणभेदांच्या कानावर घातला. तसेच थोडी वाट पाहून औंदाजीला पोळी भाजी तसेच गोडान्न देण्याची त्यांच्या मनीची प्रांजळ भावना होती हे देखील सावकार वदले.

संत पाषाणभेदांनी आपल्या ठाई असलेल्या आंतरीक ज्ञानाने सर्व काही आधीच जाणले होते. झालेल्या घटनेत सावकाराची काही चूक नव्हती. भिक्षा देणे न देणे हे सर्वस्वी दात्याच्या मनात असते. त्याला भिक्षेकरी आक्षेप घेवू शकत नाही, तसेच कसलाही श्राप देणे हे देखील उचीत नाही हे ते जाणत होतेच.
त्यांनी सावकारास मानसीक धीर दिला आणि सावकाराने त्यांचे चरण धरले. थोडे मागे सरत लगोलग संत पाषाणभेदांनी औंदाजीचे शव उचलले आणि ओसरीवर ठेवले. शवाच्या बाजूस डोळे मिटून सिद्धासनात त्यांनी बैठक घेत ईश्वराचे स्मरण केले. आपली प्रार्थना संपवत संत पाषाणभेदांनी उपचार म्हणून आपल्या कमंडलूतील पाणी औंदाजीच्या पापण्यांना आणि कपाळाला लावले. पुन्हा एकवार संतांनी ईश्वराचे स्मरण केले. अगदी थोड्या कालाने औंदाजीच्या शरीरात श्वास वास करू लागला. हाती पायी थरथर जाणवली. पुढच्याच क्षणाला औंदाजीने डोळे उघडले. समस्त मंडळींच्या आश्चर्यास पारावार उरला नाही. वयस्कर स्त्रीयांनी आपल्या सुनामुलांना औंदाजीसाठी पोळी भाजी घेवून येण्यास पिटाळले. सावकारांच्या आनंदाला तर पारावार उरला नाही. त्यांनी औंदाजीला बसते केले अन पोळी भाजीचा पहिला घास आपल्या हाताने त्याला भरवला. 'पोट भरून खा अन तुझ्या दुखर्‍या पायाच्या उपचाराची जबाबदारीही मी घेतो', हे सावकारांचे बोलणे ऐकून औंदाजीच्या डोळ्यातून घळाघळा अश्रू वाहू लागले. काय घडले हे तो समजून चुकला होता. मनोमन त्याने संताचे आभार मानले. पाहूणे मंडळीही ते द्रृष्य बघून भावूक झाली होती.

उपस्थित सज्जन भावनेतून सावरत असतांना सावकारांना संत पाषाणभेद भिक्षा मागण्यासाठी आल्याची आठवण झाली. ते सभोवार पाहू लागले. पण संत पाषाणभेद तेथे होतेच कोठे? ते तर तेथून केव्हाच निघून गेले होते. तेथील सज्जनांनी संत पाषाणभेद निघून गेल्याच्या दिशेने श्रद्धेने हात जोडले.

"भुकंबलीतम: - वेदोपदेश" (प्राकृतातः भुकबळी) या ग्रंथातील "पोळीयस्य कारणेन" (पोळीच्या कारणाने) हा अध्याय येथे संपतो.

"पोळी" या शब्दाच्या अर्थाचे विवेचन:
जनटक प्रांत तसेच त्रिकंस्थान नावाचे एक गाव महाराष्ट्रातच नाशिक भागात होते असे विद्वान इतिहासकारांचे मत आहे. "भुकंबलीतम: - वेदोपदेश" (प्राकृतातः भुकबळी) या ग्रंथाची रचना कालखंड हा शके १६६१ च्या आधीचा असावा. तो संत पाषाणभेद ( जन्मसाल: उपलब्ध नाही, मृत्यू: शके १६६१ किंवा ६२) यांनी लिहीलेला आहे. त्याकाळी महाराष्ट्र प्रांतात पाकृतात पोळी हा शब्द असल्याचे या ग्रंथवाचनावरून सिद्ध होते. थोडक्यात 'पोळी' हा अस्सल मराठी शब्द आहे.

तसेच सदर ग्रंथांत अनेक मराठी शब्दांचा उलगडा होऊ शकतो इतके शब्द आलेले आहेत. वेळोवेळी आपण ते अभ्यासू या.

३०/०४/२०२१

संस्कृतीपाकक्रियाइतिहासवाङ्मयकथाभाषाप्रतिशब्दव्याकरणव्युत्पत्तीशब्दक्रीडाशब्दार्थविनोदमराठी पाककृतीशाकाहारीसुकी भाजीमौजमजाप्रकटनप्रतिक्रियासमीक्षालेखसंदर्भविरंगुळा

प्रतिक्रिया

मुक्त विहारि's picture

30 Apr 2021 - 9:25 pm | मुक्त विहारि

आपापल्या पोळीवर तूप ओढणे, असा पण एक वाक्प्रचार आहे ...

चौथा कोनाडा's picture

5 May 2021 - 12:35 pm | चौथा कोनाडा

पोळी शब्दाच्या प्राचिनतेची रोचक कथा !
औंदाजीची "भुकंबलीतम: कहाणी आवडली !