मोह मोह के ' धागे..' (संपादकीय)
मोह मोह के ' धागे..'
२०१२ साली हे सुरू झालं. हे म्हणजे मिपा दिवाळी अंकाचं वार्षिक प्रकाशन. एरवी वर्षभर धाग्याधाग्यातून चालणारी दिवाळी वर्षातून एकदा अर्करूपात सर्वांसमोर आणावी, हा मूळ उद्देश. मग त्यासाठी संपादक मंडळातले लोक दोनेक महिने आधीपासून गडबड सुरू करतात आणि अगदी ऐन दिवाळीत स्वत:चं स्नान चुकवून, नरकाची भीती न बाळगता, प्रसंगी पारोश्याने अंक पुरा करतात. यंदा 'संपादक मंडळातील' निवडक खलपुरुष पहिल्या राउंडला बसले आणि नेहमीप्रमाणे खालीलनुसार खल सुरू केला. "अंकाची थीम काय असावी?" "थीम असावी का?" "थीम का असावी?" "कशाला थीम वैग्रे?" शेवटी 'थीम असावी' यावर आठवड्याभराने एकमत झालं. एकमत याचा अर्थ किमान एकाचं मत तसं बनणं. तर ते असो. शेवटी एका ज्येष्ठ वयस्क अनुभवी सदस्याने 'प्रेम, शृंगार, रोमान्स टिंब टिंब टिंब' अशी थीम घोषित करून टाकली. अंहं. कोणी ते नाही सांगणार. मुळात प्रेम हा विषय फारच धूसर आहे. अतिशय कन्फ्यूजिंग. बटाट्याच्या चाळीतला 'बटाटे', शा. चापशी मुळशीतला 'चापशी' आणि मिसळपाववरील 'नीलकांत' यांप्रमाणेच प्रेम ही एक अध्याहृत संज्ञा आहे. तिचं फक्त अस्तित्व जाणवतं. ती प्रत्यक्ष दिसत नाही. शिवाय 'प्रेमाला उपमा नाही'.. आणि प्रेमाला 'कांदेपोहे'ही नाहीत. (ना समझे वो अनाडी है..) त्यामुळे प्रेमाला किमान मिसळपाव तरी पोटभर लाभावी, या उद्देशाने ही थीम यंदा दिवाळी अंकाला 'लावली'. शृंगार या शब्दामुळे लेखकांकडून नेमका काय कंटेंट येईल, याची पाकपूक होती. पण मिपाकर लेखक संयमशील आहेत. त्यांनी शृंगार आणि बीभत्सता यातली सीमारेषा अचूक जाणून ती उत्कृष्टरित्या पाळली. सर्वात आधी या लेखकमंडळींचे आभार. त्यानंतर आभार वाचकमंडळींचे. तुम्ही आहात, म्हणून मिपा आहे, म्हणून दिवाळी अंक आहे. देखो मगर प्यारसे.. 'असा मी असामी' धोंडो भिकाजी जोशी यांना जसा 'फ्रेंडस ओन बॅडमिंटन क्लब'च्या चेअरमनपदाचा बसल्याजागी आपसूक लाभ झाला, तसाच मला या अंकाच्या संपादकपदाचा. ("अंकल, तुम्हीच व्हा नं चेअरमन. शिवाय तुम्ही किती वयोवृद्ध आहात.".. वगैरे.) बाकी प्रत्यक्ष काम साहित्य संपादक टीमनेच पूर्ण केलं. नव्या-जुन्या सदस्यांनी अगदी सुरुवातीपासून श्रम केले. साहित्य मिळवणं, फॉलोअप, साहित्यनिवड, संपर्क, डिझाईन, तांत्रिक बाजू या प्रत्येक बाबतीत आपापला वाटा या लोकांनी उचलला. अगदी पुष्पगुच्छाचीही अपेक्षा न ठेवता काम करत असलेल्या लोकांची अकारविल्हे नावं खालीलप्रमाणे.. (टीप: 'अ'कारविल्हे नावं, बरं का.. 'आकार'विल्हे नव्हेत. नाहीतर सर्वात वर सदैव मुख्य संपादकांचंच नाव चिकटून राहायचं.) अमोल गवळी - व्यंगचित्रे चिनार टर्मीनेटर - अंक सजावट तुषार काळभोर पियुशा पैजारबुवा प्रशांत महासंग्राम वाग बोंद्रे - मुखपृष्ठ संदीप चांदणे सुधांशुनूलकर - मुद्रितशोधन अंकात प्रेम शृंगार रोमान्स आहेच. शिवाय इतरही बरंच काही आहे. तेव्हा हे 'मोह मोह के धागे' तुमच्या बोटांत गुंतवून मी मोकळा होतो. सर्वांना हार्दिक शुभेच्छा. कोंडून पडलेल्या आशाआकांक्षांना आणि स्वप्नांना नवी पालवी फुटो.. दिवाळी..!!!
वाचने
20581
वाचनखूण
प्रतिक्रिया
21
वा !
संपादकांचे आणि अंकात लेखन
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- J&K: Indian Army Retaliates Against Pakistan Over Ceasefire Violation At LoC [ नापाकिस्तान दरवर्षी आपली दिवाळी खराब करतो आणि आपल्या काही सैनिकांना वीरगती प्राप्त होते. :( ]सॉल्लीड !
खुसखुशीत.
सर्वांना दिपावलीच्या हार्दिक
एकदम शॉल्लेट संपादकीय झालंय,
संपादक आणि साहित्य संपादक
'शाॅर्ट & स्वीट' संपादकीय.
नर्मविनोदी संपादकीय आवडले
सुटसुटीत, नेमक, व्यापक
सर्व टीमचे आभार
दिवाळी अंक झकास झाला आसे.
सुंदर संपादकीय
झक्कास संपादकीय!
तसा प्रेम, शृंगार वगैरेचा सांगोवांगी विदा -
मोह मोह के धागे
सुरेख आणि नेमके
छान
दिवाळी शुभेच्छा
व्वा, मस्तच !
अंक देखणा झालाय. संपादक मंडळ,