वरील पैकी कोणीही नाही
कालच मुस्लिम सत्यशोधक समाजाच्या राष्ट्रीय एकात्मता व धर्मनिरपेक्षता या विषयावरील परिसंवादाला गेलो होतो. प्रा शमशुद्दीन तांबोळी, असगर अलि इंजिनियर (इस्लामचे अभ्यासक) व माधव गोडबोले (निवृत्त केंद्रिय वित्तसचिव व विचारवंत) ही मंडळी परिसंवादात बोलत होती. माधव गोडबोले म्हणत होते कि निवडणुकित लोकप्रतिनिधी म्हणुन निवडुन येण्यासाठी मतदानाच्या किमान ५१ टक्के मते त्याला मिळाली तरच तो निवडुन आला असे घोषित करणे योग्य आहे. तसे विधेयक संसदेत मंजुर झाला पाहिजे. त्यासाठी जनमताचा दबाव लोकप्रतिनिधींवर आला पाहिजे. अन्यथा हे होणे नाही. सद्यस्थितीत जास्तीत जास्त मते ज्याला पडतात तो लोकप्रतिनिधी म्हणुन निवडुन येतो. मतदारांच्या जाती धर्म च्या विभागणी नुसार तो आपली निवडणुक तंत्राची आखणी करतो. मात्र जर असा कायदा झाला तर त्याला फक्त आपल्या समाजाचा विचार न करता इतरांचाही विचार करावा लागेल. धर्मनिरपेक्ष मूल्य राखायला मदत होईल. अशा आशयाचे प्रतिपादन त्यांनी केले. कार्यक्रम संपल्या नंतर मी त्यांना पुणेरी पद्धतीने गाठले व माझा एकच प्रश्न आहे असे म्हणुन त्यांचे लक्ष वेधुन घेतले.
" बोला"
"निवडणुकीत समजा मला ' वरील पैकी कोणीही उमेदवार लोकशाहीत लोकप्रतिनिधी म्हणुन लायक नाही' असे मत नोंदवायचे आहे तर?"
"एक विशिष्ट फॊर्म मतदान अधिका-याकडे भरुन देता येतो."
"मागच्या निवडणुकित तशी सुविधा असल्याचे आयत्या वेळी पेपर मध्ये आले होते. कित्येक मतदान अधिका-यांना या विषयी माहिती नव्हती. त्यांनाही पेपर मधे वाचुनच समजले होते. माझे म्हणणे हे कि एवढा द्राविडी प्राणायाम करण्यापेक्षा आताच्या निवडणुकीत आणि सध्याच्या तंत्रज्ञान युगात मतदान यंत्रावर वरील पैकी कोणीही नाही असे मत दर्शवणारे शेवटचे बटण ठेवता येणे काय अशक्य आहे?"
"हो सहज शक्य आहे. पण तसे झाले तर लोक त्याचाच वापर जास्त करतील."
"मला तेच म्हणायच आहे कि तुम्ही मांडलेला ५१ टक्क्याचा मुद्दा हा लांबचा आहे. सध्या तर आपल्याला हा पर्याय उपलब्ध आहे. समजा त्याचा वापर करुन वरील पैकी कोणीही नाही असा वापर करणा-या लोकांची संख्या किती आहे याचा अंदाज येईल व जर तो घटक प्रभावी ठरु लागला तर नव्याने मतदारांचे व उमेदवारांचे विश्लेषण होईल व मतनोंदणी निकषांचा फेर विचार करता येईल. मग ५१ टक्क्याचा विचार विधेयकासाठी पुढे आणता येईल "
"ओ तोही मुद्दा आहेच."
तेवढ्यात आम्ही त्यांच्या गाडीजवळ पोहोचलो व त्यांना माझा निरोप घ्यावा लागला. ( हे वाक्य असे ही म्हणता आले असते कि मला त्यांचा निरोप घ्यावा लागला ) माझे पुढचे मुद्दे हवेतच विरले.
त्या अगोदर शेजारील खुर्चीवरील एका विद्वानाशी माझे हे बोलणे झाले होते. त्यांनी माझे मुद्दे उडवुन लावले होते. अशा लोकांनी मतदान करु नये असे मत त्यांनी व्यक्त केले होते. मी त्यांना म्हणालो, " मतदान न करणे आणि 'वरील पैकी कोणीही नाही' असे मत व्यक्त करणे यात काही मुल्यात्मक फरक आहे कि नाही?" त्यावर त्यांचे म्हणणे असे होते कि मुल्यात्मक फरक आहे पण लोक कुणाला तरी म्हणजे जो आपली कामे करतो त्याला मत देतात. भ्रष्टाचारी असला तरी जो आपली कामे करतो त्याला मत देतात. कोणत्या मार्गाने करतो हे महत्वाचे नाही. अरुण गवळी तुरुंगातुन निवडुन येतो.कारण तो लोकांची कामे करतो.
"मान्य आहे त्यांनी जरुर त्यांचे तसे मत द्यावे. पण माझ्या 'वरील पैकी कोणीही नाही' मुद्द्याचे काय?"
परत अधांतरी.... विचार करत घरी आलो. मतदानकेंद्रात वरील पैकी कोणीहि नाही असे मत दर्शवणारा फॊर्म भरुन देण्यात गुप्तमतदानाचे "गुप्तता" मुल्य रहात नाही त्याचे काय? मतदान न करणा-याच्या नागरिकांच्या उदासीनतेकडे लोकशाहीचे मारक मुल्य अशा नजरेने किती काळ पहाणार? त्याची उदासीनता हा विद्वानांचा चघळण्याचा विषय आहे. त्याच्या नजरेतुन लोकशाहीचे मुल्यमापन करण्याची वेळ केव्हाच आली आहे. दरोडोखोर, भ्रष्टाचारी, साठेबाज, चोर. खुनी,गुंड, भुरटा यातुनच कोणाला तरी निवडुन द्यायचे असेल तर त्यापेक्षा मतदानाला न गेलेले काय वाईट? कुणीही निवडुन आल तरी आपल्याला काय फरक पडतो? त्यांचच राज्य आहे शेवटी. सगळ्याच राजकीय पक्षात गुंड आहेत. सगळेच कमी अधिक प्रमाणात भ्रष्ट आहेत.सज्जन माणुस राजकारणात टिकणार आहे का? मग दगडा पेक्षा वीट मउ या नात्याने दरोडेखोरापेक्षा चोराला मत द्यावे काय? असे अनेक प्रश्न त्याच्या मनात आहेत.
तरी येथे ऋणमतदान (negative voting) प्रकाराचा विचार केला नाही. आपण ज्याला मत दिले तो निवडुन आला नाही तर आपले मत वाया गेले असे समजाणारा खुप मोठा वर्ग इथे आहे. निवडणुकीच्या काळात पैसे / (पुर्वी इंदिरा विकास पत्रे) , धान्य, साड्या, भांडीकुंडी अशा गोष्टींची अमिषे दाखवली जातात. बेरोजगार युवकांची पेट्रोल, वडापाव, क्वार्टर व तदानुषंगिक सोय केली जाते. मतदारही त्याचा वापर करुन घेतो कारण नंतर त्याच्या मताचा तीही किंमत येणार नसते हे तो जाणतो.
राजकीय पक्षाने विद्वानांनाही पाळले आहे. परिसंवाद घडवण्याचा सर्व खर्च ते करतात. त्यांना भरपुर मानधन दिले जाते. प्रवास, राहणे, खाणे, कपडेलत्ते याचा खर्च करायचा. दहा टक्के कोट्यातील सदनिका चांगल्या लोकेशनला देण्याचे आश्वासन द्यायचे. एखादी फॊरेन टुर स्पॊन्सर करायची.त्या बदल्यात विद्वानाने काय करायचे? लोकांचा असा बुद्धीभेद करायचा कि अमुक एक पक्षाला मत दिल्याशिवाय प्राप्त परिस्थितीत पर्याय नाही असे परिस्थितीनुसार आडवळणाने किंवा उघडपणे सुचवायचे. जर तुम्ही तसे केले नाहीत तर अर्थात तुम्ही लोकशाहीचे मारेकरी.
उत्तम