दु:ख
लेखनविषय:
काव्यरस
दु:ख माझे देखणे , द्रिष्ट त्या लावू नका
एकटा आहे सुखी मी, सोबती होवू नका..
चांदण्यांचा हा पसारा ,चन्द्र तरीही एकटा
शल्य घेवूनी फिरे तो, तेजावरी जावू नका..
पापण्यांच्या आड पाणी, सागराला लाजवी
हासरा चेहरा बघूनी, गोडवे गावू नका...
साद मिटते अन्तरी, शब्द सारे पोरके
वेदनेची आग उरली, ती तरी मागू नका..
घाव आहे जीवघेणा , तरी ही जिव्हारी राखतो
बेगडी या सान्त्वनाची ,आस मज दावू नका...
वाळवंटासारखा -निष्पर्ण मी, निष्प्राण मी
मॄगजळाची ओढ माझ्या , अंतरी उजळू नका...
वाचने
4856
वाचनखूण
प्रतिक्रिया
12
सुंदर!!
पापण्यांच्या आड पाणी, सागराला लाजवी
हासरा चेहरा बघूनी, गोडवे गावू नका...
आवडले..
खुपच सुंदर फुलवा.."दु:ख माझे देखणे , द्रिष्ट त्या लावू नका "
दु:ख अस पण व्यक्त करता येतं ना !!
छाण गं मस्त गं ... :)
- अद्भुत गुत्ते
अग फुलवा तु फुलवायचं || की नुस्तंच झुलवायचं ||
शिंगरु मेलं हेलपाट्यानं ||असं नाही चालायचं ||
तुका म्हणे ||धृ||
वाळवंटासारखा -निष्पर्ण मी, निष्प्राण मी
मॄगजळाची ओढ माझ्या , अंतरी उजळू नका
वाह... एकेक कडवे सुंदरच....
मांडणी निट केलीत तर अजुनही परीणामकारक होईल.
सुन्दर कविता !!
दु:ख माझे देखणे ...............खूप छान कल्पना !!
सुंदर कविता ..
प्रत्येक शेर जबरदस्त
दु:ख माझे देखणे , द्रिष्ट त्या लावू नका
एकटा आहे सुखी मी, सोबती होवू नका..
चांदण्यांचा हा पसारा ,चंद्र तरीही एकटा
शल्य घेवूनी फिरे तो, तेजावरी जावू नका..
एकदम छानच
वाळवंटासारखा -निष्पर्ण मी, निष्प्राण मी
मॄगजळाची ओढ माझ्या , अंतरी उजळू नका...
क्लास! फार दिवसांनी वाचले!
राघव
छान कविता जमलिये.
मस्त, सुंदर, सुरेख कविता!!!!
माझ्याकडून स्टँडिंग ओवेशन!!!!
जियो!!!
मनापासून धन्यवाद.
पिवळा डांबिस - तुमचा अभिप्राय पाहून छान वाटलं...
परत वाचलं. तेवढीच टोकदार भावना जाणवते. सलाम.
शल्य घेऊनी फिरे तो, तेजावर जाऊ नका
वेदनेची आग उरली ती तरी मागू नका
फक्त अशा एकेक ओळी घेऊन लिहायचे ठरवले तरी कित्येक तरुण हिरव्या पानांचा वृद्ध पाचोळा होईपर्यंत लिहिता येईल.
वरवर जरी वैयक्तिक भावना वाटली तरी ह्यांत प्रत्येक मानव डुंबलेलाही दिसतोय. किंबहुना हे दुःख फार वैश्विक वाटतंय मला. काहीतरी मिरवावं ह्या धाटणीचे धीट शब्द नेमकेपणे काळजात उतरतात.
लिहिणारी व्यक्ती व वाचक यांच्या मनामनांतील अंतर मिटवून टाकून दोघे एकाच कट्ट्यावर बाजूबाजूला बसवून टाकलं या रचनेने. इतकं की आपणच कोणी गुप्तहेर कवी नेमून त्याला स्वतःवरच पाळत ठेवायला सांगितली. त्याने आपलं यथोचित केलेलं वर्णनाचं आपल्याला नवल वाटावं. आणि मग त्या दुःखाचं कौतुक जाणवू लागून ते कोणालाही सांगायचंच नाही, या जाणीवेने ते आपल्याच मुखावाटे नकळत बाहेर पडावं. एकंदरीत हवंहवंसं वाटावं असं हे वेदनेचे शब्दचित्र खूपच भावलं.
एव्हाना कविता आवडली हे वेगळ्याने सांगायला हवंच का? त्या आवडलेपणाच्या भरात वर काहीबाही बरळलो; त्याबद्दल माफ करा.
सुंदर!! पापण्यांच्या आड पाणी,