मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

असेलही वा नसेलही...

प्राची अश्विनी · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
काव्यरस
असेलही वा नसेलही... दोनच या शब्दांवर सारे जगणे अपुले वसेलही... धर्मच गेला देऊन उत्तर शाश्वत वैश्विक प्रश्नाचे. परी न विसरू शकला डोळे कधीच नंतर द्रोणाचे. मनात त्याच्या खंत तयाची रुतून बसली असेलही.... असेलही वा नसेलही दोनच या शब्दांवर सारे जगणे अपुले वसेलही... डोळ्यांमध्ये प्राण आणुनी कुणी विचारी आज तिला, पहा बदललो पुरा राणि मी आवडेन का अता तुला? हसून उत्तर टाळू जाता नयनी पाणी नसेलही... असेलही वा नसेलही दोनच या शब्दांवर सारे जगणे त्यांचे वसेलही...

वाचने 10331 वाचनखूण प्रतिक्रिया 35

अभ्या.. Tue, 10/16/2018 - 12:58
असेलही वा नसेलही हीच कहाणी प्रत्येकाची शब्द वेगळे, वेळ वेगळी प्रत्येकाची व्यथा आगळी कुण्या चुकीची जाणीव कुणाला असेलही वा नसेलही.... असेलही वा नसेलही दोनच या शब्दांवर सारे जगणे त्यांचे वसेलही...

माहितगार Fri, 10/19/2018 - 13:24
चांगली रचना, अर्थात काव्याचा काही भाग समजून घेणे माझ्या बाबतित अद्याप बाकी असावे असे वाटते, पुर्नवाचनात अधिक अर्थ काही लागू शकल्यास बघता येईल. पु.ले.शु.

The truth is not absolute. त्याला(कमीतकमी) दोन बाजू असतात. असं काहीसं म्हणायचं होतं. To be or not to be हा एक शाश्वत प्रश्न आहेच. द्रोणाने विचारलेल्या "अश्वत्थामा मेला का " या प्रश्नाला प्रत्यक्ष धर्माने ( pun intended) सुद्धा नरो वा कुंजरो वा असं गुळमुळीत "असेलही किंवा नसेलही या अर्थाचं उत्तर दिलं. आणि म्हणून द्रोण खचला आणि त्याला मारणं शक्य झालं. हा संदर्भ घेतलाय

In reply to by प्राची अश्विनी

माहितगार Fri, 10/19/2018 - 18:38
डोळ्यांमध्ये प्राण आणुनी कुणी विचारी आज तिला, पहा बदललो पुरा राणि मी आवडेन का अता तुला? हसून उत्तर टाळू जाता नयनी पाणी नसेलही...

In reply to by माहितगार

पहिल्या कडव्याशी लिंक नाही, मूळ कल्पनेशी आहे. भातुकलीच्या खेळामधली ....आठवतंय? काही वर्षांनंतर ते राजा राणी पुन्हा भेटले तर??? आता ते कडवं वाचा.. राणीने उत्तर टाळलंय.

In reply to by प्राची अश्विनी

माहितगार Fri, 10/19/2018 - 20:15
ओह, आता अर्थ लागतोय आणि आता कविता पोहोचली असे नक्कीच म्हणता येते, न कळलेला काही अधिक खोल अर्थ असावा असे वाटतच होते पण नेमका काय असेल हे समजत नव्हते. चांगली विचारात पाडणारी रचना . पु.ले.शु.

चित्रगुप्त Fri, 10/19/2018 - 18:34
जै धर्मात ज्याला 'स्यात' ( .. हिंदीतील 'शायद ?)म्हणतात ते हेच असावे. असेही असेल किंवा तसेही असेल, अंतिम सत्य म्हणून काहीही सांगता येत नाही.... वगैरे. यावर ओशोंचे खूप छान प्रवचन पूर्वी वाचले होते.

सुंदर कविता ! यादृच्छिकपणा आणि अनिश्चितता यांच्यावरची टिप्पणी आवडली. जीवन हे नेहमी 'असेलही-नसेलही'च्या हिंदोळ्यावर झुलत असते... खात्री (असलीच तर,) फार कमी गोष्टींची आणि तीही फार कमी वेळा असते. पण, त्यामुळेच, जीवनात मजा आहे.

कविता लै म्हणजे लैच आवडली बर्‍याच दिवसांनी अशी कविता वाचायला मिळाली की जी पहिल्या वाचनात आवडून गेली. (कवीने / कवयत्रीने १० वीच्या परीक्षेत सुध्दा संदर्भासहीत स्पष्टीकरणाचा प्रश्र्ण सोडवू नये, कविता पुन्हा पुन्हा वाचण्यात जी मजा असते ती त्याने कमी होते, असे आपले माझे मत आहे) पैजारबुवा,

खिलजि Mon, 10/22/2018 - 15:13
सुंदर कविता , अभ्याशेठचे सुंदर शब्दांत निरूपण आणि त्याबरोबर कवितेवर झालेले विवेचन , सारं काही सुंदर .. छान भट्टी जमून आलीय .. दुग्धशर्करा योग

चिगो Tue, 10/23/2018 - 16:43
भावपुर्ण कविता.. आवडली. अवांतर : शिर्षक वाचूनच डोक्यात भीमराव पांचाळेंनी गायलेली 'तुझा तसाच गोडवा... असेलही, नसेलही'ही गझल झरायला लागली..