नमस्कार,
बारामती तालुक्यातील उजनी धरणात गेलेले एक गांव आणि त्यातील १००० व्या शतकातील प्राचीन शिवमंदिरासाठी प्रसिद्ध असलेले पळसदेव गांव. दर वर्षी उन्हाळ्यात जेंव्हा धरणातील पाणी कमी होते, तेंव्हा हे मंदिर पाण्याच्या बाहेर येते. ते बघायला बरेच पर्यटक आणि हौशी छायाचित्रकार तेथे गर्दी करतात. बऱ्याच दिवसांपासून हे मंदिर बघण्याची आणि त्याचे छायाचित्र घेण्याची इच्छा माझ्या मनात होती. परंतु काही केल्या मुहूर्त सापडत नव्हता.
अचानक शुक्रवार २६ जून रोजी आमच्या फोटू कट्टा समूहातील रुपेशजी ह्यांनी आवाहन केले की शनिवारी आपण सगळे पळसदेव येथे जायचे आहे. मला धरून १० लोक तयार झाले. माझे शेजारी मकरंद धुरी ह्यांनी सुद्धा यायला तयारी दर्शवली. माझी छोटी मुलगी, आभा हिने सुद्धा हट्ट धरला. अनायासे सुट्टी असल्याने मी पण तिला घेऊन जायला तयार झालो.
मी माझी गाडी घ्यायचे ठरवले. माझ्या सोबत आभा, मकरंद आणि फोटु कट्टा मधील एक सदस्य जयेश दुपारी १ च्या दरम्यान पळसदेव साठी निघालो. बाकीचे लोक रुपेशजींना घेऊन दुसऱ्या गाडीतून येणार होते. २:१५ च्या दरम्यान आम्ही रुपेशजींना भटलो, दुसरी गाडी यायला ट्रॅफिक मुळे उशीर होणार होता. रुपेशजींनी आम्हाला पुढे जायला सांगितले. जयेश एक उत्तम फॉटोग्राफर आहे आणि तो ह्या आधीही पळसदेवला जाऊन आलेला असल्याने त्याला नक्की कुठे जायचे हे माहीत होते. त्यानुसार आम्ही ४ वाजेपर्यंत पळसदेवला पोचलो. एक चहा घेऊन आम्ही मंदिराच्या दिशेने निघालो. पक्की सडक सोडून आम्ही कच्च्या सडकेने धरणाच्या पाण्याजवळ पोचलो.
जयेश म्हणाला की येथे एक भग्नावस्थेतील रामाचे मंदिर सुद्धा आहे. सहसा तेथे कुणी जात नाही. दुसरी गाडी यायला उशीर होता त्यामुळे आम्ही त्या मंदिराला भेट द्यायचे ठरवले. ते भग्न झालेले मंदिर अप्रतिम नक्षीकाम केलेल्या दगडतील कोरीव मूर्त्यांनी वेढलेले होते. त्या मूर्त्यांमधून रामायणातील प्रसंग, जसे की लंका सेतु बांधकाम इत्यादि दर्शवले होते.


तेथे थोडावेळ फोटोग्राफी करून आम्ही बोट घेऊन मुख्य आकर्षण असलेल्या पळसदेव मंदिराकडे निघालो. आकाशात काळे ढग दाटून आले होते. क्वचितच एखादा सूर्यकिरणाचा कवडसा डोकावत होता. बोटीतूनच मंदिराचे काही फोटो घेतले.
बोटीतुन मंदीराचे विहंगम दृश्य.

बोटीतून उतरल्यावर, मी आणि बाकीचे सर्व फॉटोग्राफर आपापले कॅमेरे घेऊन मंदिराचे आणि त्याच्या परिसराचे फोटो काढण्यात गुंग झाले. आभा कडे देखील एक माझा जुना कॅमेरा दिला होता. ती देखील तिच्या परीने जमेल तसे फोटो काढत होती. २ तास कसे निघून गेले काहीच कळले नाही.






शेवटी सर्वांनी एक ग्रुप फोटो काढला आणि परतीच्या मार्गावर लागलो. पुण्यातील ट्रॅफिकचा सामना करत १०:३० ला घरी पोचलो. आभाला एका वेगळ्या ठिकाणी गेल्याचा आनंद होता आणि मला माझ्या बकेट लिस्ट मधील एक ठिकाण पूर्ण केल्याचा. फोटो प्रोसेस करायला काही काळ लागला पण मनाजोगे फोटो मिळाले. फोटोंचा आनंद घ्या आणि अभिप्राय कळवा.
आपलाच,
अनुप कोहळे
मिसळपाव
प्रतिक्रिया
सुंदर !
अतिशय छान माहिती. अप्रतिम फोटोज
/\
अप्रतिम फोटोज.
सुंदर परीचय आणी अप्रतिम फोटो
शेवटच्या फोटोतले सुर्य प्रतिबिंब कॅमेर्यात कसे कैद केलेत का नंतर प्रोसेस के आहे.
हे ठिकाण कसे जायचे यावर दोन ओळी लिहायला हव्या होत्या. असो.
बकेट लिस्ट मधे टाकले आहे.
सुर्याचे प्रतिबिंब हे…
In reply to अप्रतिम फोटोज. by कर्नलतपस्वी
सुर्याचे प्रतिबिंब हे कॅमेऱ्याच्या लेन्स वर अवलंबुन असते. लेन्स चा f नंबर जास्त ठेवायचा.
पळसदेव हे पुणे ते सोलापुर रस्त्यावर, भिगवण पसुन १७ किमी वर आहे. मुख्य रस्त्यापसुन डावीकडे मंदिराकडे रस्ता जातो. मंदिरात जाण्यासाठि बोटी उपलब्ध असतात.
अप्रतिम फोटो!!आता जास्त पाणी…
अप्रतिम फोटो!!
आता जास्त पाणी भरले असणार ना?
शक्यता आहे. आता पूढील वर्षीच…
In reply to अप्रतिम फोटो!!आता जास्त पाणी… by Bhakti
शक्यता आहे. आता पूढील वर्षीच जाता येईल.
छान ठिकाण आहे, दहा वर्षांपूर्वी गेलो होतो. खूप छान अनुभव होता.
एवढं चांगलं मंदिर बुडलं!
बाहेर काढाता येईल पुरातत्व विभागाला.
सुंदर चित्रे
पण ह्या निमित्ताने थोडे वैषम्य पण वाटले. धरणात बुडते आहे म्हणून गाव पुनर्वसन करणे ठीक आहे पण एकंदरीत प्राचीन ऐतिहासिक आणि धार्मिक अस्थेचा विषय असाच मागे सोडणे कुठेतरी पटत नाही. ह्यावेळी प्रकर्षाने आठवण आली ती इजिप्तच्या अबू सिंबेल टेम्पल कॉम्प्लेक्स नावाच्या प्राचीन ऐतिहासिक वारशाची. १९६०च्या दशकात जेव्हा नाईल नदीवर आस्वान धरण बांधले आणि लेक नासर भरू लागला त्यावेळी अबू सिंबेलचे मंदिर ह्या धरणाच्या पाण्या जायची भीती उत्पन्न झाली होती तेव्हा इंजिनियर्सच्या एका आंतरराष्ट्रीय टीमने हे पूर्ण मंदिर संकुल आपल्या मूळ जागेपासून साठ मीटर वर उचलले होते. प्रत्येक पीस काढायचा त्याला कॅटलॉग करायचे, नेमलेल्या जागी ठेवायचे आणि असे परत परत करत जायचे जोवर पूर्ण मंदिर जसेच्या तसे वर नाही उचलले गेले.
तुमच्या चित्रांत असलेली मंदिरे अबू सिंबेल संकुला इतकी अजस्त्र नाहीयेत, त्यामुळे स्थानिक पातळीवर काही निर्णय घेऊन जर ती बाहेर घेता आली तर खरेच बरे होईल आणि त्यांच्या टुरिस्ट इंडेक्स मध्ये पण वाढच होईल.
चावंड ,जुन्नरजवळचं मंदिर ढासळत होतं.
In reply to सुंदर चित्रे by वृषभ खोंडे
ते पूर्ण सोडवून पुन्हा बसवलं.
हो, हंपीला सुद्धा नाही का…
In reply to चावंड ,जुन्नरजवळचं मंदिर ढासळत होतं. by कंजूस
हो, हंपीला सुद्धा नाही का विठ्ठल रथाचे भग्न घोड्याऐवजी हत्ती पुन्हा लावले ज्यामुळे सौंदर्य पुन्हा बहाल झाले. असे अनेक ठिकाणी केले आहे. हे मंदिर पुन्हा दुसरीकडे जोडायला हवे, खुप किचकट आहे अवघड काम आहे मात्र हे 🙏
होय
In reply to हो, हंपीला सुद्धा नाही का… by Bhakti
किचकट आहे खरे पण साध्य आहे, साधले जाऊ शकते.
हा रथ इथे नव्हताच.
In reply to हो, हंपीला सुद्धा नाही का… by Bhakti
पट्टाभिराम मंदिराच्या आवारात होता. तो आणला इकडे.. तिकडे कुणी जात नाही.