हंपी: दिवस पहिला- चंद्रशेखर आणि सरस्वती मंदिरं - भाग १

प्रचेतस's picture
प्रचेतस in भटकंती
9 May 2017 - 6:49 pm

पूर्वपिठीका

वर्षानुवर्षे हंपीला जायचं चाललं होतं पण काही ना काही कारणांनी जाणं सतत लांबणीवर पडत होतं. तो योग शेवटी भर उन्हाळ्यात आला. आधी ठिकाणं ठरवण्यात वेळ गेला. सुरुवातीला ठरलं होतं बदामी, ऐहोळे, पट्टदकल. पण कडक उन्हाळ्यामुळे तो बेत मागे पडला, मग ठिकाण ठरत होत ते दांडेली. भर उन्हाळ्यातही जाता येण्याजोगं असं जंगलझाडीत असलेलं काहीसं थंड असलेलं ठिकाण. तिकडच्या जंगललॉजेसमध्ये चौकशी करुन झाली पण ती सगळी फुल असल्याने इतर पर्याय शोधायला लागलो. एक जंगललॉज होतं ते हंपीनजीकच्या दरोजी स्लॉथ बेअर पार्क मध्ये. काहीसं महागच होतं ते, हंपीपासून साधारण१३ किमी. दरोजी अभयारण्याची चौकशी करुन झाली. अभयारण्यात दुपारी २ ते संध्याकाळी ६ इतक्याच मर्यादित वेळेत प्रवेश असतो आणि त्याच वेळेस अस्वलं दिसतात अशी पक्की माहिती मिळाली. मग विचार केला की तिथल्या जंगललॉज मध्ये राहण्यापेक्षा खुद्द हंपीनजीक राहून एक संध्याकाळ दरोजीसाठी राखीव ठेवावी. मग त्या दृष्टीने हंपीनजीक मुक्कामाची ठिकाणे शोधणे सुरु झाले. हंपीतील प्रसिद्ध विरुपाक्ष मंदिरानजीक असलेल्या हंपी बाझार येथे काही होम स्टे'ज आहेत पण तिथे कार पार्किंगची व्यवस्था नाही. हंपीला येणारे पर्यटक मुख्यतः होस्पेटला मुक्काम करुन हंपी दर्शन करतात, होस्पेट मात्र १२ किमी लांब, त्यापेक्षा मग कमलापूर जे हंपी पासून (म्हणजे हंपीच्या मुख्य विरुपाक्ष संकुलापासून) चार किमी लांब आहे तेथील मयुरा भुवनेश्वरी ह्या कर्नाटक राज्य पर्यटन महामंडळाच्या रिसोर्टची माहिती मिळाली. एप्रिल/मे हा हंपीचा ऑफ सीजन असल्याने (कारण अतिशय कडक उन्हाळा) खोल्याही उपलब्ध होत्याच. अर्थात खोल्या उपलब्ध असल्या तरीही आमचं जाणं काही नीट ठरत नव्हतं. मित्रांचं स्केड्युल नीट जमत नव्हतं. शेवटी शुक्रवारी म्हणजे २८ एप्रिलला हंपी़ला जायचं एकदाचं नक्की झालं आणि शनिवारी म्हणजे २९ तारखेला चिंचवडहून दुपारी निघायचं ठरलं. मग लगेच कमलापूरच्या रिसोर्टला एक खोली आरक्षित केली. आणि सर्व काही जमवून शनि दुपारी ३ च्या आसपास पुणं सोडलं.

हंपीला जायचे मुख्य मार्ग दोन. पहिला पुणे-कोल्हापूर-बेळगाव-धारवाड-हुबळी-गदग-होस्पेट-हंपी असा आणि दुसरा पुणे-सोलापूर-विजापूर- बदामी-बागलकोट -होस्पेट - हंपी असा. सोलापूरमार्ग किंचित जवळचा असूनही बेळगाव मार्गे निघालो कारण हा रस्ता अतिशय वेगवान आहे. कोल्हापूरला चहा घेऊन कित्तूरपासून थोडंसं पुढे जेवणासाठी एका ढाब्यावर जेवण्यासाठी थांबा घेतला. एकदा बेळगाव सोडलं तर हुबळी वगळता जेवायची सोय होणे थोडे अवघडच आहे. धारवाडला होते पण त्यासाठी हायवे सोडून शहरात शिरावे लागते. ढाबे अगदी कमी प्रमाणात आहेत. हुबळी सोडल्यावर थेट होस्पेटपर्यंत तर ढाबे अतिशयच कमी आहेत. त्यामुळे ह्या रस्त्यावरुन प्रवास करताना जेवायच्या सोयीसाठी बेळगाव किंवा हुबळी उत्तम. कित्तूरनजीक जेवण करुन १२/१२:३० पर्यंत हुबळीस पोहोचलो. तिथे एका ज्युस सेंटरवर मिल्कशेथ विथ आईसक्रीम खाऊन पुढच्या प्रवासास लागलो. उत्तररात्रीचा प्रवास टाळायचा असल्याने शिरगुप्पीपासून पुढे आणि गदगच्या अलीकडे हुबळीपासून चाळीस/पन्नास किमी प्रवास करुन रात्री दी़डच्या सुमारास एका पेट्रोल पंपावर गाडी लावली आणी गाडीतच आडवे होऊन २/३ तास झोप काढली. पहाटे पावणेपासच्या सुमारास पुन्हा प्रवास सुरु केला. दिडशे किमी अंतर राहिलं होतं. गदग-लकुंडी-कोप्पल असा प्रवास करुन होस्पेटला पोहोचलो तेव्हा सात वाजले होते. गदग, लकुंडीलाही भरपूर मंदिरे आहेत, परतीच्या प्रवासातही वेळेअभावी ती पाहता आली नाहीत.

होस्पेटपासूनच हंपीचे अवशेष दिसायला सुरुवात होतेच. हंपीच्या खडकाळ टेकड्या लक्षवेधी आहेत, तुंगभद्रा धरण, नदीचं मोठमोठ्या खडकांनी युक्त असलेलं पात्र, आजूबाजूला सतत दिसणारी लहानमोठी प्राचीन मंदिरे हे बघत बघतच साडेसातच्या सुमारास कमलापूरला पोहोचलो. कमलापूरच्या अलीकडेच एका रस्त्याच्या एका बाजूला एक बंधारा आहे. बंधार्‍याच्या एका बाजूला उन्हाळ्यात पाणी आटल्याने पूर्ण दलदलीचा प्रदेश आणि दुसर्‍या बाजूला केळीच्या गच्च बागा. आजचा रस्ता ह्या बंधार्‍यावरुनच गेलेला आहे. हा बंधारा विजयनगरच्या राजांनी बांधलेला असून त्याचे पाणी हंपीत खेळवलेले आहे. असे कित्येक बंधारे येथील आसपासच्या प्रदेशात त्या महान राजवटीत बांधले गेलेले आहेत.

कमलापूरला मयुरा भुवनेश्वरीत जाऊन खोली ताब्यात घेतली आणि छानपैकी तासभर झोप काढली आणि आवरुन हंपी बघायला निघालो. हंपी बघायला कशी आणि कुठून सुरुवात करायची ह्याची कसलीही योजना न आखल्याने आणि स्थलदर्शनाचा नकाशाही जवळ नसल्याने मन मानेल तसं भटकायचं असा विचार केला आणि कमलापूर येथील हंपी गेटमधून आत शिरलो.

a

हंपी: दिवस पहिला

हंपी म्हणजे रामायणात उल्लेख असलेले पंपाक्षेत्र. तुंगभ्रद्रा नदीचे पूर्वीचे नाव पंपा, त्याचाच अपभ्रंश होऊन पंपाचे हंपी हे नाव रूढ झाले. इकडील सर्व टेकड्यांची नावेही रामायणात उल्लेख असलेलीच. उदा. मातंग, गंधमादन, अंजनेय टेकड्या. हंपीवर पूर्वी चालुक्यांची राजवट होती हे तिथल्या विरुपाक्ष मंदिरावरुन स्पष्ट होते. हंपीच्या टेकड्यांमध्ये विजयनगर हे शहर वसवले ते हरिहर आणि बुक्कराय ह्या दोघांनी त्यांच्या गुरुंची, स्वामी विद्यारण्यांची प्रेरणा घेऊन. हे हरिहर आणि बुक्कराय होयसळ राजा बल्लाळ ह्याच्या पदरी होते. इस्लामच्या वावटळीत होयसळ राजवट संपुष्टात आल्यावर ह्या दोघांनी होयसळांचे सरदार, आप्त इत्यादिंच्या पाठिंब्याने हिंदू धर्म आणि हिंदू राजवटीच्या पुनरुत्थान करण्याच्या इर्षेने विजयनगर ही राजधानी स्थापन केली. पहिल्या हरिहराचा काळ हा राज्य स्थिरस्थावर करण्यात गेला, ह्याचानंतर गादीवर आला तो ह्याचा भाऊ बुक्कराय. ह्याच्या राजवटीत विजयनगरचा राज्यविस्तार होत जाउन राज्य समृद्ध होत गेले आणि सर्वबाजूंनी घेरुन असलेल्या मुसलमानी सत्तांवर विजयनगरची दहशत बसायला सुरुवात झाली. विजनगरच्या राजकीय इतिहासात ४ घराणी झाली. हरिहर/बुक्करायाचे संगम घराणे, साळुव नरसिंहाचे साळुव घराणे, तुळूव नरसिंहाचे (नरसा नायक) तुळूव घराणे आणि अलिय (जावई) रामरायाचे अराविडू घराणे. तुळूव घराण्यातच विजयनगरचा सर्वश्रेष्ठ राजा होऊन गेला तो म्हणजे कृष्णदेवराय. अर्थात हंपीचा इतिहास सांगणे हा ह्या लेखाचा उद्देश नाही. जयंत कुलकर्णी काकांनी हा इतिहास आपल्या अप्रतिम लेखमालेद्वारे मिपावर ह्याआधीच आणलेला आहे. मी फक्त इथले अल्पसे स्थलदर्शन ह्या लेखमालेद्वारे घडवून आणणार आहे.

आमच्याकडे नकाशा नसल्याने आम्ही मनमुराद भटकत होतो, त्यामुळेच काही वेगळी ठिकाणे पाहता आली. इतरांच्या सोयीसाठी हा मुख्य नकाशा खाली देत आहे त्यानुसार नीट योजना आखल्यास कमी वेळात जास्तीत जास्त ठिकाणे पाहता येतील.

हंपी स्थलदर्शन नकाशा www.hampi.in ह्या संस्थळावरुन साभार.
a

चंद्रशेखर मंदिर

कमलापूर गेट मधून हंपीत प्रवेश करता करताच उजव्या हाताला एक मंदिर लक्ष वेधून घेतं ते म्हणजे चंद्रशेखर मंदिर. तिकडे जाण्यासाठीडांबरी रस्ता सोडून उजवीकडे कच्च्या रस्त्यावर गाडी घेताच एकाएकी असंख्य अवशेष दिसू लागतात आणि हंपीचं विराट, ओसाड, भग्न स्वरुप सामोरे येते.
चंद्रशेखर मंदिर जरी कमलापूरला सर्वात जवळ असलं तरी हे हंपीच्या मुख्य ठिकाणांपासून लांब असल्याने बरेचसे दुर्लक्षित आहे. त्यामुळे इकडे अजिबात गर्दी नसते. हे मंदिर राजवाडा परिसरात (Royal Enclosure)गणले जाते. तरीही ते शाही ठिकाणांपासून लांबच आणि एका कोपर्‍यात असल्याने खूपच दुर्लक्षित आहे. हे मंदिर साधारण १६ व्या शतकात बांधले गेले. इकडील मुख्य मंदिरांवर गोपुरे दिसतात. सम्राट कृष्णदेवरायाने ही गोपुरे बांधवून घेतली असल्याकारणाने त्यांना रायगोपुरे असे म्हटले जाते.

चंद्रशेखर मंदिर

a
इकडील जवळपास सर्वच मंदिरांची शैली एकसारखी आहे. गोपुर, मंदिराचे आवार, वाद्यमंडप, सभामंडप, दोन्ही बाजूंस असलेले अर्धमंडप, अंतराळ आणि गर्भगृह.
गोपुर तसंच कळसांची बांधकामं ही मातीच्या भाजलेल्या वीटांची आहेत. विटकामामुळे त्यांची बरीच हानी झालेली दिसते.

चंद्रशेखर मंदिराचे गोपुर

a

गोपुरांवर विविध मूर्ती कोरलेल्या दिसतात.

a

मुख्य मंदिर परिसर

a

मंदिराचा बाह्यभाग
a

सभामंडपात नक्षीदार स्तंभ असून त्यावर व्याल, बाळकृष्ण, गायी, वानरं, तसंच इतरही अनेक वेगवेगळ्या मूर्ती, नक्षी इत्यादींचे कोरीव अंकन केले गेले आहे.

सभामंडप
a

घोंगडी पांघरलेल्या गुराख्याची मूर्ती लक्षवेधी आहे.

a

एका स्तंभावर गायवासरु कोरलेले आहे. हंपीतल्या बहुतेक सर्वच मंदिरात हे शिल्प दिसते.

a

स्तंभांवरची अजून काही शिल्पे

a--a

ह्या मंदिराच्या बाहेर पडल्यावर समोरच दिसते ते सरस्वती मंदिर

सरस्वती मंदिर

सरस्वती मंदिर

a

हे मंदिर एका अतिशय लहानश्या अशा टेकडीवर किंबहुना दगडाच्या ढिगार्‍यावर वसलेलं आहे. हे एक लहानसे मंदिर असून ते किंचित उंचावर असल्याने येथून राजवाडा परिसराचे कित्येक अवशेष दिसतात.

सरस्वती मंदिराच्या प्रवेशद्वारातून दिसणारे अवशेष
a

सरस्वती मंदिर

a

हे मंदिर मूळचं वैष्णव असून १५५४ सालच्या शिलालेखाप्रमाणे हे तिरुवेंगलनाथ ह्या नावाने ओळखले जात होते. कालांतराने ह्या मंदिराला सरस्वती मंदिर हे नाव पडले. मात्र मुख्य वैष्णव मंदिराची ओळख अजिबात लपत नाही. मंदिरातील स्तंभांवर कृष्ण, विष्णू, दशावतार, गोपिका वस्त्रहरण आदी प्रतिमा कोरलेल्या आहेत तसेच गाभार्‍यातही गरुड मूर्ती कोरलेले एक पीठ आहे, त्यावर विष्णू अर्थात तिरुवेंगलनाथाची उभी मूर्ती असणार हे निश्चित.

गोपिका वस्त्रहरण प्रसंग
a--a--a

मत्स्यावतार

a

गर्भगृहातील विष्णूमूर्तीचे पीठ
a

सरस्वती मंदिरातून बाहेर येताच उजव्या हातास आहे ते अष्टकोनी स्नानगृह

अष्टकोनी स्नानगृह

हे एक अष्टकोनी आकारातलं प्रचंड मोठं स्नानगृह आहे. स्तंभयुक्त मंडप, आत उतरती रचना, पाणी खेळवण्यासाठी बनवलेले दगडी चॅनेल्स. मध्यभागी एक रुंद स्तंभ (ह्यावर पूर्वी कारंजे असावे) अशी याची रचना. चंद्रशेखर मंदिरापासून एका रेषेत हे साधारण पाऊण किलोमीटर अंतरावर आहे.

अष्टकोनी स्नानगृह

a

स्नानगृह जवळून

a

अष्टकोनी स्नानगृहाचा मुख्य भाग
a

स्नानगृह परिसरातून दिसणारा हंपीचा रुक्ष, ओसाड, भग्न प्रदेश

a

ह्यानंतर आम्ही निघालो ते राजवाडा परिसर पाहायला. सरस्वती मंदिरापासूनच पुढे अर्ध्या/पाऊण किलोमीटर अंतरावर हा ठिकाण आहे. तटबंद असलेला हा राजवाडा परिसर (Royal enlcosure) हा जवळपास असंख्य विविध प्रकारच्या इमारतींचा समुच्चय, विजनगरच्या राजधानीचे केंद्र, विजयनगरचा दसरा, दिवाळी तसेच इतरही सण, उत्सव साजरे होणारा महत्वाचा परिसर, त्याविषयी पुढच्या भागात.

क्रमशः

प्रतिक्रिया

उत्सुकता वाढतेय. चंद्रशेखर,सरस्वति मी पाहिले नाही.

यशोधरा's picture

9 May 2017 - 7:35 pm | यशोधरा

वा! वा! अगदी डिटेल्समध्ये लिहा. भरपूर फोटो टाका.

सूड's picture

9 May 2017 - 8:13 pm | सूड

पुभाप्र

डॉ सुहास म्हात्रे's picture

9 May 2017 - 8:50 pm | डॉ सुहास म्हात्रे

अरे वा ! विजयनगर साम्राज्याबद्दल जुजुबी माहिती आहे पण या परिसराबद्दल काहीच वाचलेले नाही. त्यामुळे या मालिकेचे मनःपूर्वक स्वागत ! आणि तेही वल्लींच्या सराईत नजरेने पाहण्याची मजा अजूनच वेगळी !!

मस्तं सुरुवात झालीय. पुभाप्र.

तुषार काळभोर's picture

9 May 2017 - 9:03 pm | तुषार काळभोर

फोटो टाकायला अजिबात हात आखडता घेऊ नका!

तुषार काळभोर's picture

9 May 2017 - 9:04 pm | तुषार काळभोर

फोटो टाकायला अजिबात हात आखडता घेऊ नका!

पैसा's picture

9 May 2017 - 9:32 pm | पैसा

न थांबता लिही पटापट!

पद्मावति's picture

9 May 2017 - 9:40 pm | पद्मावति

क्या बात हैं!
तुमच्या इतर लिखाणाप्रमाणेच ही लेखमाला सुद्धा अप्रतिम होणार नक्कीच. पु.भा.प्र.

जबरदस्त, कडक सिरिज होणार हे नक्की
वाचतोय

अभ्या..'s picture

9 May 2017 - 10:51 pm | अभ्या..

झकास, एकच लंबर

फक्त ते स्तंभ वरची आणि काही शिल्पे मधली वर बाण मारणारी मूर्ति ची इमेज कलर इनव्हर्ट झालीय.
मायनस रिलीफ असु शकते पन स्टोन कलर मैच होत नाही.

प्रचेतस's picture

10 May 2017 - 3:47 pm | प्रचेतस

प्लस बास रिलिफच आहे ते. कदाचित फ्लॅश मारुन हे छायाचित्र काढले असल्याने रंगसंगती तशी वाटू शकते.

दशानन's picture

9 May 2017 - 10:54 pm | दशानन

मस्त लेखन आणि फोटो,
यावरून मला त्रिकोण ही माझी प्रवासवर्णन व फोटो या लेखमालेची आठवण झाली.. 2010 किंवा 2011 ला केली होती, येथे मिपावर असेल लेखन, द्वारसमुद्र, बेल्लूर आणि श्रावणबेगोल प्रवास बेंगलोर वरून केला होता.
छान लिहीत आहात, तसे ही तुम्ही सिद्धहस्त आहात, एक ही बाब सुटू नये अशी तुमच्याकडून अपेक्षा.

अत्यंत आवडतं ठिकाण असल्यामुळे फोटोंची वाट पाहत आहे.

थोडं अवांतर होईल, पण मध्ये एक लेख वाचला होता, त्यात दिले होते की हंपी आणि आसपासचा प्रदेश गोव्याच्या मार्गाने जाण्यात आहे,
म्हणजे ड्रग्ज, रेव्ह पार्टीज, इतर अवैध उद्योग तिथे चालतात, परदेशी नागरिक, रम्य ठिकाणे, आणि असे प्रकार हे कॉम्बीनेशन नेहमी नुकसानदायी
ठरत आलेलं आहे, अशाच एका पार्टीची माहिती मिळाल्यावर पोलीस घटनास्थळी गेले तर ते लोक पटपट पसार झाले, तिथल्या डोंगरांमध्ये,
दगडांत गायब, अदृश्यच.. कुणीही सापडले नाही, कुठल्या जागेचा वापर लोक कशासाठी करतील, काही सांगता येत नाही,

असेच हिमाचल मधील कसोल बद्दलही नुकतेच वाचले, त्यानेही फार अस्वस्थ वाटले, चांगल्या गोष्टी, ठिकाणे कायम तशीच का राहू नयेत,
त्यांना काहीतरी गालबोट का असावं हा प्रश्न नेहमीच पडतो, या सगळ्यामुळे हंपी सारख्या सुंदर ठिकाणाची, दुर्मिळ वारसास्थळाची अजून
नासधूस होऊ नये एवढीच इच्छा,

तुम्ही भर उन्हाळ्यात गेलात त्यामुळे ओसाड, रखरखाट वाटला असेल, मला मात्र तिथलं विनाकाँक्रीट, डोंगराळ लॅन्डस्केप खूप आवडलं,
प्रसन्न वाटलं, हंपी मध्ये शिरतांना ते खडकाळ डोंगर दिसू लागतात, आणि आपण एका लॉस्ट वर्ल्ड मध्ये प्रवेश करत आहोत या जाणिवेने
एक वेगळीच फिलींग येते, ते दृश्य कायमचं मनात साठून राहिलंय.

पुढील भागाच्या प्रतिक्षेत,

अत्रुप्त आत्मा's picture

10 May 2017 - 12:32 am | अत्रुप्त आत्मा

अता मज्जा येणार!
..
.
.
.
.
.

फोटू भरपूर टाक... दुत्त! :p

बॅटमॅन's picture

10 May 2017 - 1:01 am | बॅटमॅन

आत्ताच लेख वाचला. टिपिकल वल्ली शैलीप्रमाणे भरपूर माहिती अन फोटो येणार ही अपेक्षा सार्थ ठरलीच. मजा आली, पुढचे भाग येऊद्यात लवकर.

बायदवे ते विष्णुमूर्तीचे पीठ असे पाटेश्वरच्या शिवलिंगाची आठवण यावी अशा आकारात का बांधले असावे?

गुराख्याचे शिल्प विशेष आवडले.

एस's picture

10 May 2017 - 9:51 am | एस

मला हाच प्रश्न पडला.

पुभाप्र.

प्रचेतस's picture

10 May 2017 - 3:51 pm | प्रचेतस

धन्यवाद.

शाळुंकेसारखे पीठ विष्णूमूर्ती उभारण्यासाठी का बनवले असेल ह्याचे कारण सांगता येणार नाही. कदाचित हे दोन दैवतांचे एकात्मीकरण असावे किंवा येथे विष्णूला प्रमुख देवता म्हणून ठसवण्यासाठीही तसे केले गेले असावे. विजयनगरचे राजे वैष्णव होते हे येथे लक्षात घेण्याजोगे आहे.

वा.. मस्त. पुढचे भाग लवकर येऊ द्या.
गुराख्याची मूर्ती खरंच छान आहे.

इडली डोसा's picture

10 May 2017 - 3:59 am | इडली डोसा

पु भा प्र.

अवांतर - हंपी बोल्डरींग आणि ट्रॅड प्रकारातले रॉक क्लायंबिंग यासाठी देखील प्रसिद्ध आहे.

टवाळ कार्टा's picture

10 May 2017 - 6:58 am | टवाळ कार्टा

भारी

लॉरी टांगटूंगकर's picture

10 May 2017 - 9:40 am | लॉरी टांगटूंगकर

पुढील भाग लवकर टाकणे. मजा आली..

प्रसाद गोडबोले's picture

10 May 2017 - 2:08 pm | प्रसाद गोडबोले

सुंदर लेख !

पण वेरुळ , खिद्रापुर भुलेश्वर , घारापुरी पाहिले असल्याने त्या पुढे ही शिल्पे फारच गरीब वाटत आहेत ... पुढील लेखात काही भारी शिल्पे पहायला मिळतील अशी आषा आहे !

पुलेशु

निव्वळ शिल्पसौंदर्याचा विचार केला तर वेरुळ, खिद्रापूर, भुलेश्वर, घारापुरी येथील शिल्पे सरसच आहेत ह्यात वाद नाहीच. घारापुरीची तर मला सर्वात सुंदर वाटतात. शिल्पांचे. सौंदर्य कमी असण्यामागे हंपीच्या वालुकाश्मांचा हात असावा असे मला वाटते. वालुकाष्मात ठिसूळपणा असल्याने कोरीवकाम करणे अवघड जात असावे. अर्थात येथेही काम उत्तमोत्तम शिल्पे आहेतच. पुढच्या भागात हळूहळू येत जातील. मात्र येथील मंदिरशैली मात्र जबरदस्त आहे.

पाटीलभाऊ's picture

10 May 2017 - 3:29 pm | पाटीलभाऊ

पुढील भाग येऊ द्या लवकर.

किल्लेदार's picture

10 May 2017 - 3:49 pm | किल्लेदार

बरीच नवीन माहिती कळली.
२००९ मध्ये मी हंपी ला एकटाच गेलो होतो ते दिवस आठवले. त्यावेळी या जागेचा थोडक्यात इतिहास माहीत होता. मूळ उद्देश छायाचित्रणाचा असल्यामुळे पूर्ण फोकस त्यावरच होता.

बापू नारू's picture

10 May 2017 - 4:30 pm | बापू नारू

छान फोटो आलेत ,वर्णनही छान केलेत .

वल्लीदा पुन्हा एकदा आमच्यासाठी पर्वणी आली. हा भाग पुन्हा एकदा निंवात वाचतो आणि पु. भा .प्र.

देशपांडेमामा's picture

11 May 2017 - 6:08 am | देशपांडेमामा

भग्नावशेष पण एवढे सुंदर आहेत की आधीच्या वैभवाची कल्पना करु शकतो.

तेथुन निघताना मात्र राजा क्रुष्ण्देवरायाची मुर्ती त्याच्या झालेल्या करुण अंतामुळे मन खट्टु करुन जाते

देश

सस्नेह's picture

11 May 2017 - 3:01 pm | सस्नेह

अखेर कर्नाटकला पाय लागले तर ! :)

शेखरमोघे's picture

11 May 2017 - 4:07 pm | शेखरमोघे

शिल्पांचे सौंदर्य तुमच्या वर्णनाने द्विगुणित झाले आहे. जबरदस्त !! पु. भा. प्र.

शेखरमोघे's picture

11 May 2017 - 4:07 pm | शेखरमोघे

शिल्पांचे सौंदर्य तुमच्या वर्णनाने द्विगुणित झाले आहे. जबरदस्त !! पु. भा. प्र.

तुझ्यासारख्या इतिहासप्रेमी आणि लेणीप्रेमी आणि शिळांवर प्रेम करणार्या सुहृदाला हंपी म्हणजे मेजवानीच. तुझ्यासोबत ही जागा अनुभवतो आहे.

माम्लेदारचा पन्खा's picture

11 May 2017 - 6:51 pm | माम्लेदारचा पन्खा

पुभालटा !

वल्ल्या. पुढचा भाग लौकर पायजे.. आडीबाजी नाय पायजे...

लौ यू.

स्रुजा's picture

11 May 2017 - 11:16 pm | स्रुजा

वाह ! मी वाट च पाहत होते खफ वर तुमची खरड वाचल्यापासून. ढाब्यापासून बारीक सारीक तपशील दिलेत ते फार च आवडलंय. पुर्ण लेखच फार छान झालाय. कोस्टल कर्नाटका आणि हंपी हे दोन यादीमध्ये कधीपासून आहेत. आता तुमच्या लेखमालेमधुन ताकावर तहान भागवता येईल निदान.

आषाढ_दर्द_गाणे's picture

12 May 2017 - 2:10 am | आषाढ_दर्द_गाणे

सुंदर फोटो!
पुढील भागाच्या प्रतीक्षेत आहे!

बाकी तुम्ही तिथे पोचतानाची दिलेली माहिती खूपच उपयुक्त आहे!

राघवेंद्र's picture

12 May 2017 - 2:31 am | राघवेंद्र

वल्लीचा धागा म्हणजे फोटो आणि ऐतिहासिक माहितीचा खजिना !!!

सोलापूर मार्गे जायला हवे होते. अभ्या ला भेटणे झाले असते आणि पहिला भाग फक्त सोलापूरतील खादाडी वरच झाला असता. =D

( सोलापूर जवळ कुडलसंगम इथे ऐतिहासिक मंदिर आहे जे अलीकडेच नदीमध्ये सापडले आहे. नक्की भेट द्या. )

पु. भा. प्र.

निशाचर's picture

12 May 2017 - 5:26 am | निशाचर

मस्त सुरूवात! फोटो सुंदरच.
तीनसाडेतीन वर्षांपूर्वी हंपी, बदामी, ऐहोळे, पट्टदकल अशी सहल केली होती. हंपीसाठी आणखी वेळ द्यायला हवा होता, असं तेव्हा वाटलं होतं. ही दोन मंदिरंही पाहिलेली नाहीत. ती कसर तुमच्या लेखांनी काही अंशी भरून निघेल.
पुभाप्र.

मैत्र's picture

12 May 2017 - 3:12 pm | मैत्र

वल्ली आणि हंपी - मेजवानीच

सुरूवात मस्तच झाली आहे.
हंपी हे फार आवडलेले ठिकाण आहे..

दोन वेळा जाऊनही सरस्वती आणि चंद्रशेखर मंदिर पाहिले नाही. इथेच वल्ली यांच्या तपशीलवार माहिती आणि फोकस चा अंदाज आला.

ते प्रचंड गोटे, मध्येच वैराण पिवळ्या बरड पार्श्वभूमीवर सणसणीत उठून दिसणारी भातशेती आणि केळी च्या हिरव्या गार बागा, पाचशे वर्षे जुनी मंदिरे.. विलक्षण अनुभव आहे..

हजारराम मंदिर शिल्पांसाठी सर्वोत्तम वाटले. त्याची डिटेल माहिती समजली तर बहार येईल.. अष्टभुज कृष्णा मागे काय विचार आहे ते आणि
सर्वत्र दिसून येणारे यली शिल्प का आणि कुठून आले तेही समजून घ्यायला आवडेल.
पुढच्या भागाची वाट बघतोय

प्रचेतस's picture

12 May 2017 - 10:20 pm | प्रचेतस

हजारराम मंदिर शिल्पांसाठी सर्वोत्तम वाटले. त्याची डिटेल माहिती समजली तर बहार येईल

त्यावर एक लेख असणारच आहे. व्याल हे दक्षिणेत सर्वत्र आढळणारे शिल्प. अगदी चालुक्यांपासून ते चालत आलेले आहे. दुष्ट शक्तींना व्याल हे आत येऊ देत नाहीत. एकप्रकारे संरक्षक देवता. म्हणूनच ते सर्वत्र आढळतात.

संजय पाटिल's picture

12 May 2017 - 5:28 pm | संजय पाटिल

सुंदर फोटो आणि माहितीपुर्ण लेख!
पुभाप्र!

चौथा कोनाडा's picture

12 May 2017 - 10:19 pm | चौथा कोनाडा

सुंदर मालिका !
प्रचेतस सारख्या दर्दी वल्लीच्या हाताचं बोट धरून मंदिर-मुर्ती-संस्कृतीची प्रदक्षणा करणं अनोखी मेजवानीच !
सुरेख ओघवती माहिती अन सुंदर प्रचि !
स्नानगृहाची प्रचि विशेस। !

मनराव's picture

24 May 2017 - 6:24 pm | मनराव

सगळं लिहुन झालं कि एकदम वाचेन.........

केडी's picture

29 Aug 2017 - 12:41 pm | केडी

वाह,
सगळी माहिती अगदी व्यवस्थित लिहिली आहे, धन्यवाद! ह्याचा भरपूर फायदा होईल आमच्या ट्रिप साठी!

प्रीत-मोहर's picture

7 Sep 2017 - 9:59 am | प्रीत-मोहर

आम्हीही इथुनच सुरवात केली होती. खुप मस्त भाग आहे हा. कित्येक स्थानिक पक्षीही दिसतात.

टर्मीनेटर's picture

8 May 2018 - 11:42 am | टर्मीनेटर

मस्त सुरुवात. पुढील भागही वाचतो. माझंही काहीसं तुमच्या सारखंच झालंय, अनेक वर्षांपासून हंपीला जायचंय पण होत नाही. ह्या वर्षी तर 30 march ते ३ एप्रिल असे ५ रात्रींसाठी होस्पेट मधील हॉटेलचे बुकिंगही केले होते, पण रद्द करावे लागले. असो आता तुमची लेखमाला वाचून अधिक उत्साहाने आणि बारकाईने हंपी पाहता येईल.