भर दुपारी बारा वाजता शनिवारवाड्यापाशी अत्रुप्त आत्म्याची वाट बघत उभा होतो. ट्रॅफिक जाम मध्ये अडकल्याने तसे थोड्याश्या उशिरानेच आत्माजी हजर झाले. कसबा पेठेतील प्राचीन शिल्पसमृद्ध त्रिशुंड गणपती मंदिराला भेट देण्याचा आजच्या भटकंतीचा उद्देश होता. साततोटी हौद चौकापासून अगदी जवळच हे मंदिर आहे. त्रिशुंड गणपती मंदिर हे इ.स १७५४ मध्ये नाथपंथी गोसावींनी बांधलेले आहे. मंदिराला कळस नाही. मंदिर पूर्वाभिमुख असून पुरूषभर उंचीच्या दगडी जोत्यावर उभारलेले आहे. राजस्थानी, माळवा आणि दाक्षिणात्य शैलींचा संमिश्र वापर येथे करण्यात आला आहे. प्रवेशद्वाराच्या चौकटीच्या दोन्ही बाजूंना विष्णूच्या जय-विजय या द्वारपालांच्या प्रतिमा कोरलेल्या आहेत. गणेशपट्टीच्या वर शिल्पसमृद्ध कमान कोरलेली असून सर्वात वरील बाजूस शेषशायी भगवान विष्णू कोरलेला आहे. मंदिराच्या दर्शनी भागावर यक्ष, किन्नर, गंधर्व, मोर, पोपट, भैरव, गजांतलक्ष्मी, मर्कटे अशी अनेक मांगल्यसूचक शिल्पे कोरलेली आहेत. १. त्रिशुंड गणपती मंदिराची दर्शनी बाजू
२ व ३. चौकटीच्या बाजूस कोरलेले द्वारपाल
४. चौकटीवरील कमान N ५. काही नक्षीदार शिल्पे
६. हत्तीशिल्प
७ व ८. भारवाहक यक्ष व गंधर्व प्रतिमा
इथले सर्वात वेगळे आणि एकमेवाद्वितीय असे म्हणता येईल असे जे शिल्प आहे ते एकशिंगी गेंड्याचे. काही शिपाई हे गेंड्याला साखळदंडाने बांधताना दिसत आहेत. हिंदुस्थानच्या तत्कालीन राजकीय परिस्थितीचे चित्रीकरण करणारे हे शिल्प असावे असा काही अभ्यासकांचा कयास आहे. प्लासीच्या लढाईनंतर इंग्रजांनी बंगाल आणि आसाम प्रांतावर आपली सत्ता प्रस्थापित केली लवकरच हिंदुस्थानात इंग्रज आपला पाय रोवतील जणू याची भविष्यवाणीच ह्या शिल्पाद्वारे व्यक्त केलेली आहे. हे शिल्प बहुतेक १७५७ नंतर कोरलेले असावे. ९. एकशिंगी गेंड्याचे एकमेवाद्वितीय असे शिल्प
१०. डाव्या बाजूस कोरलेला गेंडा
११. उजव्या बाजूस कोरलेला गेंडा
मंदिराच्या दर्शनी बाजूच्या डाव्या कोपर्यात रखुमाईचे शिल्प तर डाव्या बाजूच्या प्रदक्षिणा मार्गावर विठ्ठ्लाचे शिल्प कोरलेले आहे. तसेच पुढे जाता एका चौकटीत नटराजाची अतिशय देखणी मूर्ती कोरलेली दिसते. १२ व १३. विठ्ठल रखुमाई
१४. नटराजाची अतिशय रेखीव मूर्ती
मंदिराच्या पाठीमागील बाजूस आगळ्या पद्धतीचे सहसा कुठेही न आढळणारे शिवलिंग आहे. ही लिंगोद्भव शिवप्रतिमा आहे. यात फक्त शाळुंका असून वरच्या दिशेने उडणारा हंस, खाली मुसंडी मारणारा वराह आणि शिवलिंगावर छत्र धरणारा नाग अशा प्रतिमा कोरलेल्या आहेत. पुराणातील एका कथेवर हे शिल्प आधारीत आहे. एकदा ब्रह्मा आणि विष्णू यांत श्रेष्ठत्वावरून वाद निर्माण झाला. तेव्हा एक दैदिप्यमान अग्निस्तंभ प्रकट झाला. याचा आदी आणि अंत जो शोधून काढेल तो श्रेष्ठ असे ठरले. विष्णू हंसाचे रूप घेऊन अंत शोधायला गेला तर ब्रह्माने वराहरूप घेऊन पाताळात मुसंडी मारली. जेव्हा कुणालाही कसलाही थांग लागेना तेव्हा ते दोघेही शिवाला शरण गेले तेव्हा दोघेही आपापल्या परीने श्रेष्ठ आहेत असे सांगून लिंगोद्भव स्वरूपात आपले रूप प्रकट केले. १५. अद्भूत शिवलिंग
१६. शिवलिंग अधिक जवळून
हे सर्व बघूनच मंदिराच्या आत प्रवेश केला. आतमध्येच एक तळघर असून ते फक्त गुरुपौर्णिमेच्या दिवशीच उघडले जाते अशी माहिती मिळाली. तळघरात नेहमीच कंबरभर पाणी असते. गर्भगृहाच्याही दोन्ही बाजूंस द्वारपाल कोरलेले असून वर नक्षीदार कमान आहे. त्याच्यावर तीन शिलालेख कोरलेले आहेत. पैकी दोन संस्कृतात असून एक फारसी भाषेत कोरलेला आहे. पहिल्या शिलालेखात मंदिराच्या स्थापनेचा काल व रामेश्वराची प्रतिष्ठापना केल्याचा उल्लेख असून दुसर्या शिलालेखात गीतेतील नमनाचा श्लोक कोरलेला आहे तर फारसी शिलालेखात हे स्थान गुरुदेवदत्तांचे असलेले नमूद केले आहे. १७. गर्भगृहाच्या प्रवेशद्वारावरील कमानीवरील गजांतलक्ष्मी शिल्प
१८. कमानीवरील संस्कृत आणि फारसी शिलालेख
गाभार्यात गेलो. नावाप्रमाणेच गणेश मूर्तीला तीन सोंडा आहेत. कदाचित ही दत्तस्वरूपातील गणेशमूर्ती असावी म्हणूनही मंदिराच्या बांधणीत ब्रह्मा, विष्णू, शंकराच्या संदर्भातील शिल्पे येथे बरीच कोरलेली दिसतात. एकमुख, तीन सोंडा आणि सहा हात अशीरचना असलेली ही मयुरारूढ मूर्ती मूळची काळ्या पाषाणातील असून आता पूर्णपणे शेंदूरविलेपीत आहे. सत्व, तम आणि रजोगुणांनी युक्त असलेला ह्या गणेशाच्या मांडीवर शक्तीदेवता बसलेली आहे. हातात परशू, अंकुश आदी आयुधे आहेत. मूर्तीच्या पाठीमागच्या भिंतीवर अतिशय रेखीव अशी शेषशायी विष्णूची प्रतिमा कोरलेली असून त्यावरील कमानीवर देखणे गणेश यंत्र कोरलेले आहे. १९. त्रिशुंड गणपती
२०. त्रिशुंड गणपती
२१. गणेशमूर्तीच्या पाठीमागील बाजूस कोरलेला शेषशायी श्रीविष्णू
२२. त्यावर कोरलेले गणेशयंत्र
२३. मंदिरात इतरत्र असलेल्या काही शिल्पप्रतिमा
२४. मंदिरात इतरत्र असलेल्या काही शिल्पप्रतिमा
२५. मंदिरात इतरत्र असलेल्या काही शिल्पप्रतिमा
मंदिराला शिखर नसल्याने बर्याच काळपर्यंत हे तसे दुर्ल़क्षितच होते. शिखराच्या जागी स्वर्गमंडपासारखे सपाट वर्तुळाकार छत आहे. पण हल्ली मंदिराची चांगली निगा राखली जातेय. गणेशाचे दर्शन घेऊन मी आणि अत्रुप्त आत्मा बाहेर पडलो ते आता पुढच्या टप्प्यात पुण्यातली अशीच काही दुर्लक्षित पण शिल्पसमृद्ध मंदिरे बघण्याचे मनावर घेऊनच. पण आता आमची पावले वळली ती मात्र जुन्याबाजाराकडे.
हेरीटेज पुणे: त्रिशुंड गणपती मंदिर
वाचने
32672
प्रतिक्रिया
74
मिसळपाव
प्रतिक्रिया
व्वा ... भारीच !
व्वा ... भारीच !
याच भागात राहिलो,वाढलो पण......
मंदिर समजले ते आज. धन्यवाद.
साततोटी, पवळे चौक घारपुरे हाॅस्पिटल असे रमतगमत खुल्या मुरलीधर मंदिराच्या पुढे असलेल्या पी व्ही जी मधे नेहमी जायचो. इतीहास आता उतारवयात समजतोय.
जबरदस्त फाईंड आहे
प्रचेतस,
अतिशय उत्तम संदर्भमूल्य असलेला लेख आहे. आता हे मंदीर पहायलाच हवे. धन्यवाद.
माहिती.
देवळे दुपारी बंद असली की पाहता येत नाहीत. हे पुण्यातील देवळांबद्दल म्हणत नाही तर सर्वच देवळांबद्दल आहे. हॉटेल रुम मधून तयार होऊन एखादे देऊळ पाहून नंतर नाश्ता करावा तर आणखी एखादेच पाहता येते. नंतर पाच वाजेपर्यंतचा वेळ फुकट जातो.