Skip to main content

त्रिपुरांतक शिव

लेखक Bhakti यांनी मंगळवार, 24/11/2026 10:05 या दिवशी प्रकाशित केले.

कैलास मंदिरातील त्रिपुरांतक शिव

 

 

कैलास मंदिराला मी यापूर्वी सहा वेळा भेट दिली होती. त्यामुळे यावेळीही अगदी आत्मविश्वासाने शिल्पे पाहत पुढे जात होते. मंदिरातील एका शिल्पपट्टिकेमध्ये सुरुवातीला शिवाची विविध रूपे, त्यानंतर विष्णूची रूपे आणि पुढे इतर पौराणिक प्रसंग कोरलेले होते. सुरुवातीला रावणाने कैलास पर्वत उचलण्याचा प्रसंग, त्यानंतर रावणानुग्रह, मग पार्वती-शिव, मार्कंडेय अनुग्रह आणि पार्वती-शिव विवाह अशी शिल्पे पाहत मी पुढे चालले होते.

 

पुढे जाताना अचानक एका शिल्पाजवळ माझी नजर थांबली. पण क्षणभर काहीच आठवेना. हे कोणते रूप? कोणती कथा? मनात प्रश्न निर्माण झाला.पण उत्तर काही केल्या सुचेना. म्हटलं, मोबाईलमध्ये शोधून पाहावं, पण वेरूळला मोबाईलला नेटवर्क मिळणं तसं कठीणच! कधी रेंज नसते, तर कधी इंटरनेट इतकं संथ असतं की काही उघडतच नाही. अशा वेळी शिल्पांची माहिती तिथेच शोधता आली तर किती बरं होईल, असा विचार मनात आला. आता पुढे काय करायचं, या विचारात असतानाच जवळच एक छोटासा पर्यटकांचा गट दिसला. त्यांच्यासोबत असलेले गाईड त्या शिल्पाची माहिती सांगत होते.

 

ते म्हणाले, "बघा, हे शिल्प त्रिपुरासुर वधाचे आहे. शिवाचे वाहन असलेला नंदी ऐवजी घोडे या प्रसंगात शिवाच्या रथाचे भाग आहे. भगवान शिव रथावर आरूढ झालेले असून त्यांच्या हातात धनुष्य आहे. या रथाचे सारथ्य ब्रह्मदेव करत आहेत. ही या शिल्पाची काही प्रमुख वैशिष्ट्ये आहेत."

 

अरेच्या! लगेच लक्षात आलं. हा तर त्रिपुरासुर वधाचा प्रसंग! क्षण संपूर्ण कथा आठवली.

 

त्रिपुर म्हणजे तीन नगरे. या तीन नगरांमध्ये राहणाऱ्या त्रिपुरासुरांचा वध करण्यासाठी भगवान शिवाने धारण केलेले हे रूप म्हणजे त्रिपुरांतक किंवा त्रिपुरारी शिव. या कथेचा संदर्भ आठवताच शिल्पातील प्रत्येक घटकाचा अर्थ उलगडू लागला.

ती कथा अशी...

भगवान शंकराचे पुत्र कार्तिकेय यांनी महाबलाढ्य तारकासुराचा वध केल्यानंतर, आपल्या वडिलांच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी तारकासुराचे तीन पुत्र तारकाक्ष, कमलाक्ष आणि विद्युन्माली यांनी ब्रह्मदेवांना प्रसन्न करण्यासाठी कठोर तपश्चर्या केली. ब्रह्मदेवांनी अमरत्व देण्यास नकार दिल्यावर त्यांनी युक्तीने असा वर मागितला की, अंतराळात फिरणारी सोने, चांदी आणि लोखंडाची तीन अभेद्य शहरे (त्रिपुर) निर्माण व्हावीत आणि दर १,००० वर्षांनी ही तिन्ही शहरे एका विशिष्ट क्षणी (अभिजित नक्षत्रात) एका सरळ रेषेत आल्यावर, जो कोणी एकाच बाणाने त्यांचा भेद करेल, त्याच्याच हातून आमचा मृत्यू व्हावा. ब्रह्मदेवांनी ‘तथास्तु’ म्हटल्यावर असुरांचा शिल्पकार मयासुर याने ही तीन भव्य शहरे निर्माण केली, ज्यामुळे या तिन्ही भावांना एकत्रितपणे ‘त्रिपुरासुर’ असे नाव पडले.

 

वरदानामुळे अजिंक्य झालेल्या त्रिपुरासुराने स्वर्ग, पृथ्वी आणि पाताळ या तिन्ही लोकांत प्रचंड हाहाकार माजवत देवतांना स्वर्गातून हाकलून लावले आणि ऋषीमुनींच्या यज्ञांत विघ्ने आणायला सुरुवात केली. त्यांच्या अत्याचाराला कंटाळून सर्व देव भगवान विष्णू आणि ब्रह्मदेवांसह कैलास पर्वतावर भगवान शंकरांकडे मदतीसाठी गेले. देवांची विनंती मान्य करून शंकरांनी त्रिपुरासुराचा संहार करण्याचे ठरवले. या महायुद्धासाठी संपूर्ण ब्रह्मांडाने शंकरांचे शस्त्र आणि रथ बनण्याचे ठरवले.पृथ्वी रथ बनली, सूर्य व चंद्र चाके बनले, ब्रह्मदेव सारथी झाले, मेरु पर्वताचे धनुष्य आणि वासुकी नागाची प्रत्यंचा बनली, तर भगवान विष्णू स्वतः बाण बनले, ज्याच्या टोकावर अग्निदेव आणि पाठीशी वायुदेव विराजमान झाले.

 

१,००० वर्षे पूर्ण होण्याच्या दिवशी कार्तिक पौर्णिमेचा शुभ योग जुळून आला आणि आकाशात फिरणारी ती तिन्ही शहरे एका विशिष्ट क्षणी एका सरळ रेषेत आली. त्याच क्षणी भगवान शंकरांनी आपल्या दिव्य धनुष्यावरून सोडलेल्या एकाच अमोघ बाणाने तिन्ही शहरांचा भेद केला आणि ती शहरे जळून भस्म झाली. तिन्ही असुरांचा अंत झाल्यामुळे भगवान शंकरांना ‘त्रिपुरारी’ असे नाव पडले. या विजयानंतर तिन्ही लोकांत पुन्हा शांतता प्रस्थापित झाली आणि याचा आनंद साजरा करण्यासाठी सर्व देवी-देवता काशी नगरीत अवतरले व त्यांनी गंगा नदीच्या काठावर लाखो दिवे लावून उत्सव साजरा केला. म्हणूनच दरवर्षी कार्तिक पौर्णिमेला ‘त्रिपुरारी पौर्णिमा’ किंवा ‘देवदिवाळी’ साजरी केली जाते, ज्या दिवशी मंदिरांमध्ये आणि घराबाहेर त्रिपुर वात लावून दीपदान केल्याने जीवनातील अंधकार दूर होतो आणि सुख-समृद्धी लाभते.

 

पुढे अजून एकदा हेच शिल्प जरा थ्रीडी स्वरूपातही येते.

 

विशेष म्हणजे, हेच शिल्प लेणी क्रमांक १५ मध्येही पाहायला मिळते. या विषयाचा पुन्हा एकदा अभ्यास करताना लक्षात आले की, पट्टदकल येथील मंदिरांमध्येही त्रिपुरांतक शिवाची अशी शिल्पे आढळतात. यापूर्वी ती पाहिली होती. मात्र त्या क्षणी त्यांची आठवण झाली नव्हती. या शिल्पात शिवाचा रथ, सारथी म्हणून असलेले ब्रह्मदेव आणि तीन नगरांचे प्रतीक असलेले घटक विशेष लक्ष वेधून घेतात.

 

या सर्व शिल्पांचा मागोवा घेताना कांची येथील शृंगेरी मठाशी संबंधित मंदिरातील त्रिपुरांतक शिवाचे एक अतिशय सुंदर शिल्पही इंटरनेटवर पाहण्यात आले. ते शिल्प पाहून तर कांचीला जाऊन ते मंदिर प्रत्यक्ष पाहण्याची उत्सुकता आणखी वाढली.ज्या शिल्पात कथेतील सर्व प्रसंग, लांछने स्पष्ट प्रगट केलली आहेत.

Credit to-

https://kevinstandagephotography.wordpress.com/2026/03/20/vidyasa%E1%B9%85kara-temple-sringeri

खरंच, एखाद्या शिल्पासमोर उभं राहिल्यावर त्यातील कथा आठवावीच असं नाही. कधी एखाद्या जाणकाराच्या दोन वाक्यांनी संपूर्ण पौराणिक संदर्भ उलगडतो आणि आपण पाहत असलेलं शिल्प नव्याने समजू लागतं. कैलास मंदिरातील त्या एका शिल्पाने मला पुन्हा एकदा याचीच जाणीव करून दिली. इतिहास, पुराणकथा आणि शिल्पकला यांचा अभ्यास कधीच संपत नाही, हेच खरं

लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 66
प्रतिक्रिया 6

प्रतिक्रिया

भक्तीच्या लेखणीला धार येत चालली आहे. 

समयोचित लेख. अप्रतिम फोटो आणी माहिती.

आवांतर-

लहानपणी गावातील चंडिराम महाराज यांच्या वास्तव्याने व समाधी असलेल्या  विष्णू मंदिरात रांगोळी प्रदर्शन ,  आवळ्याचे दिवे आणी त्रिपूर जाळण्याची प्रथा होती. 

 

आमची आई आणी शेजारणी बायका एक हजार  काडवाती बनवण्यासाठी महिनाभर अधीच सुरवात करायच्या. त्या तुपात भीजवून संध्याकाळी शंकराची पुजा केली जायची व त्या काडवातीचा गठ्ठा एकत्रीत जाळयच्या. 

 

आवळ्याच्या झाडा खाली सहभोजन ज्याला आवळी भोजन म्हणले जायच ते ही होत असत. 

झाडावर  आवळे परिपक्व झालेले असायचे. खिशात मिठाची पुरचुंडी व दुसर्या खिशात आवळे,चिंचा,बोरं. हेच खाणे असायचे. लाल चिंच (जंगल जलेबी),राई आवळे हे गावाच्या आवतीभवती फुकटच मिळायचे. मोठे झाल्यावर  कळाले की यात विटॅमिन सी असते. लहानपणी भरपूर खाल्ल्याने त्याचा फायदा आता होत असावा असे वाटते.

 

आवळ्याच्या झाडाची पुजा केली जायची. साफसफाई करून एकत्रीत भोजन केले जायचे. अशी मान्यता कीर्तनातून कळाली होती की कार्तिक शुक्ल नवमी (अक्षय्य नवमी) ते कार्तिक पौर्णिमेपर्यंत आवळ्याच्या वृक्षावर भगवान विष्णू आणि भगवान शंकर यांचा निवास असतो, अर्थातच श्रद्धेची भावना आहे.

 

टि व्ही मोबाईल नसलेल्या लहानपणात हे साधेसुधे उत्सवही फार मोठे वाटत होते.

 

वाटते एकदा त्याकाळातील म्हणजे साठ पासष्ट वर्षापुर्वीचे वार्षिक उत्सव यावर लिहावे. तो काळ संपुर्ण पणे वेगळाच होता.

 

 


रथाखाली बैलाच्या रुपात विष्णू त्रिपुरान्तक शिल्पात दाखवला आहे का?काही संदर्भ  यापूर्वीचा??

 

याबाबत नवी माहिती आज मिळाली, हा खालील संदर्भ देण्यात आला.

शिव पुराण, रुद्र संहिता, युद्ध खंड, अध्याय 9, श्लोक 6 आणि 8. तस्मिन्नारोहित रथं कल्पितं लोकसंभ्रतम् । शिरोभिः पतिता भूमौ तुरगा वेदसंभवः ॥ ६ ॥ अथाधः स रथस्य भगवान्धरणीधरः । वृषेन्द्ररूपी चोत्थाय स्थापयामास वैक्षणम् ॥ ८ ॥ म्हणून

भगवान शिवाने त्या वैश्विक रथावर आरूढ होताच, वेदांपासून जन्मलेले घोडे (तुराग वेद-संभव) त्याच्या वजनाखाली जमिनीवर पडले. त्यानंतर, भगवान विष्णू (धरणीधरह) यांनी मोठ्या बैलाचे (वृषेंद्र-रूपी) रूप धारण केले, रथाच्या खाली उठले आणि क्षणभर त्याला स्थिर केले.


In reply to by Bhakti

>>>रथाखाली बैलाच्या रुपात विष्णू त्रिपुरान्तक शिल्पात दाखवला आहे का?काही संदर्भ  यापूर्वीचा??

नाही, वाहन नंदी हे दाखवले आहे. महाभारतात कर्णपर्वात त्रिपुराख्यान विस्ताराने येते. त्यातही वृषेंद्राचा उल्लेख नाही.

 

 


In reply to by Bhakti

ही कथा खूपच इंट्रेस्टिंग वाटली.

माझ्या डोक्यात असे आहे :


आर्य त्यांचा आवडता प्राणी म्हणजे घोडा, वेदांपासून घोडे जन्मले हे खूपच सयुक्तीक आणि सिम्बोलिक वाटले. 

त्यांना शिवाचा रथ जोडल्यामुळे ते रुतले!! शैवसंस्कृती मला नेहमी अनार्य वाटत आलेली आहे.

आणि पुन्हा वैष्णवांनी बैलाचे (जो अनार्य वाटतो घोड्यांना क्रॉस) रूप घेऊन तो रथ स्थिर केला.

आणि अजून एक सांगायचे म्हणजे तुम्ही स्वत:होऊन जे हे सगळे पाहत उकरत आहत ते खूप लोभसवाणे वाटले.

मस्त भक्तीजी मस्त!


In reply to by हणमंतअण्णा शंक…

💫💫मला म्हणूनच मिपा आवडत, एक से बढकर एक धुरंधर आहेत सगळे 😊👍

काय मस्त ओळखलं हणमंत अण्णा 👍

 तुम्ही!yes हरिहर उपासना बद्दल जे पुस्तकं मिळालेले सांगितले त्यात थेट हिच सुरुवात आहे. वैष्णव -शैव --आर्य -अनार्य संबंध असू शकतो का??पण त्यांचे मिलन कसे झाले.

त्यात खुप छान लिहिले आहे .दुसऱ्या सिस्टिमवर ती pdf आहे. उद्या देते लिंक 👍