Skip to main content

चित्रकथा : गोपाळरावांचे ‘विचित्र विश्व् - नंदनवन’ (भाग १ )

लेखक चित्रगुप्त यांनी बुधवार, 25/11/2026 01:08 या दिवशी प्रकाशित केले.

 गोपाळरावांचे ‘विचित्र विश्व् - नंदनवन’ (भाग १ )

 

त्या दिवशी सकाळचा चहा पिता पिता सुमितने सहजपणे विचारले    -

“बाबा, तुमच्या पेन्शनमधून औषधं आणि बाकीचे खर्च जाऊन दर महिन्याला किती पैसे शिल्लक राहतात?”

गोपाळरावांनी वर्तमानपत्रातून नजर वर केली आणि हसून विचारलं -

– “ का रे ? माझ्या पेन्शनचं ऑडिट करायचं आहे की काय ?  

“ तसं काही नाही बाबा. घराचं बजेट बनवत होतो. सगळ्यांचं उत्पन्न आणि खर्च एकत्र लिहून ठेवावेत, असं वाटलं.”

– “छान आहे. मग कर की तुझं बजेट.”

गोपाळराव पुन्हा वर्तमानपत्र वाचू लागले. पण त्या प्रश्नाने त्यांच्या  मनात कुठेतरी शंकेची पाल चुकचुकली. 

गोपाळराव झाशीच्या रेल्वे लेखा-विभागात ४० वर्षे नोकरी करून निवृत्त झाले होते. लेखा-विभागातले काम जरा रुक्ष असले, तरी फारसे काम नसायचे. आरामशीर नोकरी, भरपूर मोठे सरकारी घर, यामुळे त्यांना भरपूर वाचन, थोडी चित्रकला, जुनी गाणी ऐकत गुणगुणणे, मित्राशी गप्पाटप्पा हे सगळे करता यायचे. 

त्यांच्या  पत्नीचे,  रुक्मिणीचे निधन होऊन आता  काही वर्षे उलटली होती.  त्यानंतर ते एकटेच एवढ्या मोठ्या घरात राहत होते. 

निवृत्तीनंतर जेंव्हा सरकारी घर सोडावे लागले, तेंव्हा गावातच एक खोली भाड्याने घेऊन रहावे, आपल्याला एकट्याला पुरेसे पेन्शन आहे त्यावर मजेत राहता येईल, असा त्यांनी विचार केला होता. 

पण पुण्यात  राहणाऱ्या सुमितनेच त्यांना आग्रह करून त्याच्याकडे आणले होते… त्याच्या आग्रहात जिव्हाळा  होता, म्हणून गोपाळरावही ओढेवेढे न घेता आले. मुलगा सुमित, सून स्नेहा  आणि नात अवनी यांच्यासोबत ते आता रहात होते.

घरखर्चात त्यांच्या परीने ते  हातभार लावत होते.  कधी किराणा, कधी वीजबिल, कधी अवनीची पुस्तकं. मुलांसाठी खर्च करताना त्यांनी कधी हिशेब केला नव्हता.

पण इकडे आल्यानंतरच्या गेल्या काही महिन्यांतले छोटे  छोटे प्रसंग त्यांना जरा विचलित करू लागले होते. 

सुमितकडे आले, त्याच रात्री  झोपण्यापूर्वी ते स्नेहाला म्हणाले - “बाळ, मला किचनमधले चहासाखरेचे डबे, पातेली, सांडशी वगैरे सगळे कुठे आहे ते दाखवून ठेव. मला सकाळी उठल्यावर लगेच चहा लागतो” 

“मी करेनच की सकाळी सगळ्यांसाठी. तुम्ही कशाला त्रास घेता उगीचच ? झोपा आरामात आता. बरीच दगदग झालीय आज.”

“बरं” म्हणून ते झोपायला गेले. 

पहाटे बरोबर साडेचार वाजता त्यांना जाग आली. 

… लहानपणापासूनच त्यांना साडेचारला उठायची सवय होती. शालेय वयात ते पहाटे अभ्यास करायचे, मग साडेसात वाजता शाळेला जायचे, त्यापूर्वी आई त्यांना गरम दूध आणि थोडेसे काही खायला द्यायची, शिवाय मधल्या सुट्टीत खायला व्यवस्थित ताज्या पोळीभाजीचा डबा पण तयार असायचा… कॉलेज आणि नोकरीच्या काळातही त्यांचा दिवस साडेचारलाच सुरु होत असे. आजतागायत त्यात कधीच खंड पडलेला नव्हता.

– करेल सून चहा लवकरच, असा विचार करून आंघोळ वगैरे आटोपून ते दासबोध वाचत बसले.

सहा वाजले, सात वाजले, आठ वाजत आले,  तरी कुणीच उठलेले नव्हते. गोपाळराव अगदी बेचैन झालेले होते. तेवढ्यात घाईघाईने आळोखे पिळोखे देत अवनी बाहेर आली, आणि घड्याळाकडे बघत पटापट तयार होऊन शाळेची बस पकडायला दार जोराने आपटून बंद करत पळाली.

… त्यांनी लहानपणी एकदा जोराने आपटून दार बंद केले होते, तेंव्हाचे त्यांच्या आईचे शब्द आठवले : दारा-खिडक्यांना, घरातल्या वस्तूंना, झाडाफुलांनाही जीव असतो रे गोपाळा,  सगळ्यांशी प्रेमानं वागावं…

“ पोरीनं आंघोळ तरी केली आहे कि नाही, कुणास ठाऊक” … असे पुटपुटत ते घड्याळाकडे बघत बसले. 

शेवटी नऊ वाजता सुमित आणि स्नेहा बेडरुमीतून बाहेर आले. तो त्याचा लॅपटॉप उघडून बसला, आणि स्नेहाने चहा बिस्किटे आणली. 

– “अवनी काही खाऊन नाही गेली ? आणि मधल्या सुट्टीसाठी डबा ?”

“ बाबा, तिकडे शाळेतच कँटीन आहे, ती तिथे पिझा वगैरे खाऊन घेते. वर्षभराचे पैसे आगाऊच भरलेले आहेत.  घरचा डबा  वगैरे तिला नको असतो” - सुमित म्हणाला. 

गोपाळराव थक्कच झाले. हे सगळे त्यांच्या कल्पनेपलीकडले होते.

नऊ वाजेपर्यंत चहा मिळणार नसेल, तर आपले कसे होणार, हा विचार त्यांना दिवसभर त्रस्त करत राहिला. शिवाय ही लहानशी पोर आत्तापासून मैद्याचे पदार्थ रोजच खाऊ लागली आहे, या विचाराने पण ते अस्वस्थ झाले होते.

मग पुढल्या दिवसापासून त्यांनी सकाळी सहाला स्वतःचा चहा बनवून घेणे सुरु  केले. स्वयंपाकघरात शक्यतो कसला आवाज होऊ नये, याची कितीही काळजी घेतली, तरी कधीतरी थोडाबहुत आवाज व्हायचाच, त्याबद्दल त्यांना थोडे अपराधी पण वाटायचे. मात्र  जुन्या सवयीप्रमाणे आपले पहाटेचे स्नान, सूर्यनमस्कार, दासबोध वाचन वगैरे सगळे यथासांग सुरु झाले, याचे त्यांना समाधान वाटले.  

एक दिवस नाश्त्याच्या वेळी ते स्नेहाला म्हणाले -

– “स्नेहा , माझा वाचायचा  चष्मा बदलायला हवाय आता.  अक्षरं धूसर दिसतात. या आठवड्यात नवीन चष्मा करून आणतो.”

ती म्हणाली -

“बाबा, अजून तर दिसतंय ना ? पुढल्या  महिन्यात करून घ्या. या महिन्यात खूप खर्च आहे.”

 – “हो, पण डोळ्यांवर ताण येतोय.”

“मला समजतंय बाबा. पण थोडं थांबता येईल ना?”

गोपाळराव काही बोलले नाहीत.

दोन तीन दिवसांनी सुमितनं  विचारले  ,

“बाबा, चष्मा करून आणलात?”

– “नाही. पुढल्या  महिन्यात बघतो.”

“हो, तेच बरं. सध्या खर्च जरा जास्त आहे.”

गोपाळरावानी  त्याच्याकडे पाहिलं.

– “सुमित, चष्मा ही माझी चैन नाही रे. गरज आहे.”

तो क्षणभर गप्प झाला.

“मला माहिती आहे बाबा. मी फक्त बजेटचा विचार करत होतो.”

– “ठीक आहे. मलाही आता बजेटचा विचार करायला शिकावं लागेल बहुतेक.”

आपल्या आवाजातली खंत त्याला जाणवली की नाही, हे त्यांना समजले नाही.

… हा तोच सुमित का, ज्याचा हात धरून आपण एकेकाळी शाळेत नेले होते - आणि पुढे  बोर्डाच्या परीक्षेत उत्तम गुणांनी पास झाला म्हणून संपूर्ण परिसरात मिठाई वाटली होती ? –  गोपाळरावांना क्षणभर वाटून गेले. 

 

काही दिवसांनी त्यांचे जुने सहकारी मोकाशी यांचा फोन आला.

“काय गोपाळराव ! शनिवारी भेटतोय सगळे तळेगावला आपल्या डॉ. फाटकांकडे. कुलकर्णी आणि दुबेजी पण झाशीहून येणार आहेत . तुम्हीपण नक्की या बरं ”

“अरे वा ! येतो की. अगदी नक्की. ”

… तळेगावचे डॉ. फाटक म्हणजे आपल्या शाळेतला दिनू फाटक. खूप हुशार आणि मेहनती. झाशीतल्या प्रसिद्ध डॉ. फाटकांचा मुलगा. पुढे तोही डॉक्टर होऊन अमेरिकेला गेला, तिकडे पुष्कळ वर्ष राहून आता तळेगावला बंगला बांधून राहतोय पठ्ठा. … गोपाळरावांना जुने सगळे आठवू लागले…. दिनूला पण आपल्यासारखेच वाचनाचे भयंकर वेड. तो आणि आपण तासंतास लायब्ररीत जाऊन वाचत बसायचो… त्यातले ‘विचित्र विश्व्’ मासिक तर दोघांनाही खूप आवडायचे. त्यात एकदा अमेरिकेतल्या ‘डिसने - ल्यांड’ का काहीतरी नावाच्या जागेचे ‘अमेरिकेतले नंदनवन’ असे केलेले वर्णन आपल्याला खूप आवडले होते. आपण दोघांनी मग ठरवले होते, की  पुढे कधी यदाकदाचित आपल्याकडे समजा एक लाख रुपये जमले, तर आपणही तसे खूप मोठे घर बांधायचे, आणि त्याला नाव द्यायचे - ‘विचित्र विश्व् - नंदनवन ’ हे सगळे आठवून त्यांना खूप गम्मत वाटली. दिनूलापण आठवत असेल का ते ? विचारूया आता भेट झाली की .. त्यांनी ठरवले. 

शनिवारी ते निघण्याच्या तयारीत होते, तेंव्हा  सुमितने  विचारले  ,

“ कुठे निघालात बाबा ?”

– “ अरे, मित्रांना भेटायला. सगळे तळेगावला जमणार आहेत.”

“ तळेगावला ? कॅबने जाणार?”

– “ हो. सगळे तिथेच येणार आहेत, दिनू फाटक, माझा लहानपणाचा मित्र. त्यानं सगळ्यांना बोलावलंय आग्रहानं.”

“ पण येण्याजाण्याचा खर्च खूप होईल बाबा. इथे जवळपास कुठे भेटता आलं नसतं का?”

– “ कुठून कुठून सगळे येणारेत रे.  सगळे ठरलेले आहे.”

सुमित थोडा वैतागून म्हणाला -

“बाबा, मी काही तुम्हाला जायला नाही म्हणत नाहीये. पण प्रत्येक वेळी एवढा खर्च कशाला?”

– गोपाळराव त्याच्याकडे पाहतच  राहिले.

– “ सुमित, अरे मी मित्रांना भेटायला जातोय. काही उधळपट्टी करायला नाही.”

“ माझं म्हणणं एवढंच की थोडं जपून खर्च करा.”

– “ किती जपून? मित्रांना भेटायलाही जाणंही आता खर्चाच्या यादीत तपासून पहायचं?”

“ तुम्ही प्रत्येक गोष्टीचा वेगळाच अर्थ काढता!”

– “ आणि तू प्रत्येक गोष्टीचा उगाचच हिशेब करत बसतोस !”

गोपाळराव जरा विषण्ण झाले …. त्यांना त्यांचे झाशीतले दिवस आठवले. त्यांना मिळालेलया  सरकारी क्वार्टरच्या इमारती  ब्रिटिश काळात बांधलेल्या असूनही अजून बुलंद होत्या. मोठमोठ्या खोल्या आणि उंच खिडक्या, प्रशस्त स्वयंपाकघर, भोवताली खूप मोकळी जागा आणि तिथली वडा - पिंपळाची,  चिंचेची, जांभळाची मोठमोठी झाडे, श्रावणात त्यांच्या जाडजूड आडव्या फांद्यांना झोपाळे बांधून उंच उंच झोका घेणाऱ्या पोरीबाळी…  

सुट्टीच्या दिवशी घराच्या प्रशस्त वऱ्हांड्यात किंवा झाडाझाली खुर्च्या टाकून ऑफिसमधल्या आणि इतर मित्रांशी होणाऱ्या गप्पा, चर्चा, हास्यविनोद, कवितापठण, चहापाणी, कोणीतरी येताना आणलेले गरमागरम समोसे, बटाटेवडे, जिलेबी, रबडी, गुलाबजंबू असले पदार्थ. 

पत्ते आणि  कॅरम …  असे सगळे साग्रसंगीत चालायचे. 

अधूनमधून सगळ्या बायका मिळून स्वयंपाक करायच्या, मग जंगी मेजवानी व्हायची. बरेचदा डाळ - बाटी - चुरमा लाडू बनायचे, ते सगळे पुरुषमंडळी करायची.  सगळ्यांची मुले अंगणात धुडगूस घालत झाडावर चढायची, कधी पोहायला जायची, तर कधी ओरछा, दतिया वगैरे भागात लांब सायकलवरून फिरून यायची … 

… आठवणीत रमलेले गोपाळराव कसल्यातरी आवाजाने भानावर आले, आणि कॅब करून तळेगावला फाटकांच्या घरी पोचले. दिनू फाटक एवढा मोठा डॉक्टर असूनही अगदी विनम्र आणि दिलदार स्वभावाचा होता . निवृत्तीनंतर तळेगावात प्लॉट घेऊन बांधलेल्या बंगल्यात आता दोघे  रहात होते. घरासमोरचाच एक खूप मोठा रिकामा प्लॉट पण त्याचाच होता.

– तिथे त्यांचा तो दिवस खूप आनंदात  गेला. फाटक पती-पत्नीने सगळ्यांचे खूप आदरातिथ्य केले. मित्रांसोबत खूप दिवसांनी मनसोक्त गप्पा,  खळखळून हसणे, चेष्टामस्करी, आवडीचे पदार्थ भरपूर खाणे यात दिवस कसा संपला, समजलेही नाही… निघताना समोरच्या प्लॉटकडे हात दाखवत डॉ. फाटक म्हणाले  - “या प्लॉटवर आपण एक मोठ्ठ घर बांधू, त्यात तुम्ही सगळे राहायला या. आता  म्हातारपणी सगळे जवळ राहू, खूप मजा येईल” 

– आणि त्या घराचं नाव काय ठेवायचं ? कुणीतरी प्रश्न  केला.

‘विचित्र विश्व् - नंदनवन ’... एकमेकांना टाळी देत दिनू आणि गोपाळराव एकदमच म्हणाले. हशाचा  गडगडाट झाला, पण  कळले मात्र  कुणाला काहीच नाही. 

– पण घरी परतताना मात्र त्यांच्या मनात आले,  फाटकांसारखे आपणही कधी आपल्या सगळ्या मित्रांना आपल्याकडे बोलावू शकतो का ? की आपल्या आयुष्यातल्या आनंदाच्या सगळ्या गोष्टी आता कोणाच्या तरी बजेटमध्ये अनावश्यक खर्चच ठरणार आहेत ? 

रुक्मिणीच्या स्मरणार्थ गोपाळराव  दरवर्षी तिच्या पुण्यतिथीला जवळच्या वृद्धाश्रमात फळं आणि काही आवश्यक वस्तू देऊन यायचे. तिच्या हयातीतही ती असंच  करत होती.

एक दिवस ते  स्नेहाला म्हणाले,

– “पुढल्या  शुक्रवारी आईची पुण्यतिथी आहे. सकाळी दत्तमंदिरात जायचं आहे. तू येणार का?”  

“हो बाबा, जमलं तर नक्की येईन.”

सुमितने  विचारले -

“आणि वृद्धाश्रमातही जाणार आहात?”

– “हो. दरवर्षी जातो ना.”

“बाबा, एक सांगू? रागावू नका. आता तुम्ही निवृत्त झाला आहात. दरवर्षी एवढा खर्च करण्याची गरज आहे का?”

– “कसला खर्च ? काही फळं आणि थोड्या वस्तूच तर देतो.”

“पण त्याऐवजी ते पैसे एखाद्या गरजेच्या वेळी कामास येऊ शकतात.”

गोपाळरावांनी त्याच्याकडे पाहिले.

– “सुमित, तुझ्या आईच्या स्मरणार्थ चार गरजू माणसांना फळं दिली, तर तो अनावश्यक खर्च आहे?”

“मी तसं म्हणत नाहीये. पण भावना आणि बजेट या दोन वेगळ्या गोष्टी आहेत.”

– “म्हणजे माझ्या भावना मी आता बजेटच्या आधारावर व्यक्त करायच्या ? 

“बाबा, तुम्ही पुन्हा माझ्या बोलण्याचा वेगळा अर्थ घेत आहात.”

– “तसंही असेल कदाचित. पण रुक्मिणी  गेल्यापासून तिच्या आठवणी जपण्याचा हा माझा प्रयत्न आहे, तोही सोडायचा का?”

सुमित काही बोलला नाही.

त्या रात्री रुक्मिणीच्या फोटोसमोर बसून गोपाळराव म्हणाले,

“ रुक्मिणी , तू असतीस तर कदाचित या घरातल्या सगळ्यांचा हिशेब वेगळ्या पद्धतीने केला असतास. मला मात्र आता माझ्या छोट्या छोट्या इच्छांचाही खुलासा द्यावा लागतोय.”

…. त्यांना आठवले, स्नेहाचे सगळे सण, डोहाळजेवण, बाळंतपण, वगैरे सगळे  रुक्मिणीने खूप हौसेने केले होते. तिला दररोज व्यवस्थित तेलाने मॉलिश करणे, सकाळी गरमागरम गुळाचा सांजा, आळिवाचे लाडू आणि इतर कित्येक पौष्टिक पदार्थ करून प्रेमाने खाऊपिऊ घालणे, शिलाई मशीनवर बाळासाठी सुंदर दुपटी - लंगोट शिवणे, शेवरीच्या कापसाची चिमुकली, मऊ मऊ गादी - उशी बनवणे, असे कितीतरी उद्योग तिने  प्रेमाने आणि अभिमानाने केलेले होते. बाळाची ती गादी -उशी तर पुढली कित्येक वर्षे  त्यांनी सांभाळून ठेवली होती. 

(क्रमशः) 

 

 

 

लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 32
प्रतिक्रिया 1

प्रतिक्रिया

छान सुरुवात. क्रमश: नसलं तरी पुढचं समजलं. 

बाकी पेन्शन असूनही बजेटच्या गोष्टींचा विचार करावा लागतोय. पेन्शन नसलेल्यांना (९०% लोकांना) काय अडचणी येत असतील. 

परावलंबित्वाचे बळी.