प्रवासवर्णन - पहिलाच प्रयत्न
लेखनप्रकार
नमस्कार मंडळी !
शाळेत असताना लिहावे लागलेले निबंध यापलीकडे लिखाण न केलेली मी ... पण गेले काही दिवस नियमितपणे मिपावर बागडत असते, त्यामुळे "मी सुद्धा लिहू शकेन" असा काहीसा आत्मविश्वास निर्माण झालेला आहे. तो वापरूनच आज हे धाडस करीत आहे. बघू कसं काय आणि कितपत जमतंय ते !
आम्ही सध्या आहोत अमेरिकेतल्या मिशिगन राज्यात. एकाच हिमवादळात चांगला फुट- २ फुट बर्फ आणणारा हिवाळा आणि कायम शून्याखाली तापमान अशी थंडी चालू होण्याआधी अधाशासारखे फिरून घेणारे लोक आहेत इथे ... २/३ हिवाळे पाहील्याने आम्हीही "आधीच" एखाद्या ठिकाणी जाऊ असा विचार केला. बरं, एक ठिकाण ऐकून माहित होत. Pictured Rocks National Lakeshore. ७ तास जायला न ७ तास परतीच्या प्रवासाला. तरीही शनिवार - रविवार मध्येच जाऊन यायचंच असा चंग बांधला. म्हणजे, चंग मी बांधला आणि तास-न-तास गाडी चालवण्याची जबाबदारी नवऱ्यावर सोपवून मोकळी झाले.
तर हे Pictured Rocks म्हणजे मिशिगनच्या पार वरच्या टोकाला. मिशिगनची भूमी दोन भागांत विभागली गेली आहे. मला 'peninsula' ला नेमका मराठी प्रतिशब्द माहित नाही. त्यामुळे मी 'Upper Peninsula' ला सरळ "वरचं मिशिगन" म्हणतेय. अमेरिकेच्या या दक्षिण-पूर्व भागात पाच (भले) मोठे तलाव आहेत. इतके मोठे की समुद्राचीच आठवण यावी. पण तरीही गोडं पाणी ... तर या पाच तलावांपैकी एक म्हणजे सुपेरीअर (बाकीचे चार - मिशिगन, एरी, ह्युरोन, ओंटारियो). याच सुपेरीअर तलावाच्या किनारी आहेत हे Pictured Rocks.
यापुढची "चित्तरकथा" ... चित्रांच्या सहाय्याने कथा ... म्हणतात ना एक चित्र लाख शब्दांचं काम करून जात, तसंच काहिसं !
खालचं आणि वरचं मिशिगन जोडणारा - २००७ साली पन्नाशी गाठलेला हाच तो, मॅकिनाव ब्रिज.
जवळ जवळ सव्वा पाचशे फूट उंची आहे या ब्रिजची.
हे इथलं यूपी :)
इथून साधारण तीन तासांची बोटीची सफर होती. या अशा बोटीतून ...
"ग्रॅन्ड आयलन्ड" बेटावरचे जुने लाईट हाउस ...
पाण्यात कोसळलेले कडे
इन्द्रधनुसम रंगीबेरंगी
वेगवेगळ्या खनिजांचा हजारो वर्षांपासून दडलेला खजाना
निसर्गाची किमया - वारा आणि पाणी यांचा मारा सहन करत करत या दगडांनी काय काय म्हणून रूपे धारण केली आहेत बघा
याला नाव दिलं आहे "युद्धनौका"
याला म्हणतात "इंद्रधनूची गुहा"
आणि हा म्हणे "तुटलेला फ्लावरपॉट"
एकला जीव सदाशिव
"तग धरून राहणे" याच याहून चांगला उदाहरण कधी पाहिलंय का ?
या झाडाची मुळ अक्षरशः अधांतरी आहेत कारण त्यांना आधार देणारी कमान ४०/५० वर्षांपूर्वी 'पडली' पाण्यात ...
निळशार - हिरवगार पाणी
साधारण ७०/८० फूट उंचीवरून घेतलेली छायाचित्र
अथांग पसरलेला सुपेरीअर तलाव
याच बोटीवरून सफर घडली होती आम्हाला
हे सारं नैसर्गिक सौंदर्य आठवणींचा एक अनमोल खजिना देऊन गेलं.
या सहलीत सहज जाता येता टिपलेले क्षण ...
तुम्हा सर्वांना ही छायाचित्रे आवडतील अशी अपेक्षा करते !
वाचन
11030
प्रतिक्रिया
0