मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

सुरुवात

विशाल कुलकर्णी · · जनातलं, मनातलं
मराठवाड्यातील माळाकोळी या गावातील महिलांनी एकत्र येवुन, आंदोलन करुन गावात यशस्वीरित्या दारुबंदी करवुन आणली. त्या रणरागिण्यांना मानाचा मुजरा करुन त्या घटनेवर आधारीत ही कथा लिहीली आहे. मुळ दुवा : लोकप्रभा / स्त्रीशक्ती विशाल कुलकर्णी ******************************************************************* एक पत्रकार या दृष्टीकोनातून पाहिले तर ही संपूर्ण घटना म्हणजे सॉलीड मालमसाला असलेली जबरदस्त बातमीच होती माझ्यासाठी! पण जेव्हा सुखदेवकाकांबरोबर प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन या रणरागिण्यांना भेटलो, त्यांच्या या जगावेगळ्या संघर्षाची कथा ऐकली तेव्हा थक्कच झालो. सुखदेवकाका आणि भारतीताईंबरोबर त्या दिवशी अंजनाबाईंना आणि त्यांच्या सहकारी भगिनींना भेटलो. त्यांच्याच तोंडून त्यांची कर्मकहाणी ऐकली ........ ........................................................................................................................................ "आता काय करायचं वो यशोदाताई? समदे रस्ते अडवून धरलेत त्यांनी. भरीत भर म्हून शांताक्कासकट इकत्या जनांना पोलीसांनी धरलंय? मला तं कायबी सुचत न्हाय? " राधाबाईंच्या डोळ्यात पाणी उभे होते. केलेले साहस अंगावर तर येणार नाही ना याची भीती होतीच. वर पोलिसांची वक्रदृष्टी आपल्याकडेपण वळली तर? आधीच तर अकरा बायकांना आणि काही पुरूष सहकार्‍यांनासुद्धा अटक झाली होती. त्यात घरची माणसंपण बिथरलेली. "तुला काय करायच्यात गं लष्करच्या भाकरी? म्हणे दारुबंदी करा. लै मजा वाटली होती ना बायका जमवून फुकटच्या घोषणा देयाला. आता कुनी निस्तरायची ही भानगड? आता गुमान घरात बसायचं, पुन्यांदा जर का चळवळीचं नाव काडलंस तर तंगडी मोडून हातात दीन, सांगून ठिवतो", राधाबाईंच्या नवर्‍याने असा हाग्या दम दिलेला. यशोदा शून्यात नजर लावून बसली होती. "अगं, ताये.. म्या काय म्हनतीया?" राधाबाईनं तिला पुन्हा एकदा हलवलं तशी यशोदा भानावर आली. "अं .... काय म्हणलीस गं राधामावशी? अगं, काही सुचेनासं झालंय बघ. हे सगळं अगदीच अनपेक्षित नव्हतं पण अगदी या थराला जाईल असंपण वाटलं नव्हतं. पोलीस दंगलीच्या आरोपाखाली थेट बायकांना अटक करतील असं नव्हतं वाटलं! पण ठीक आहे, असं घाबरुन जावुन नाही चालणार, काही तरी करायलाच हवं." यशोदापण थोडी निराश झाली होती. गेला महिनाभर ती गावातल्या बायकांना भेटत होती. सगळ्यांना हजारवेळा समजावून, धीर देऊन तयार केलं होतं तिनं. पण आता अचानक झालेल्या या अटकांमुळे सगळ्या बायका मुळातूनच घाबरल्या होत्या. साहजिकच होतं.. आयुष्यात नेहमी खाकी कपड्यातल्या पोस्टमनपासूनसुद्धा दोन हात दूर राहणार्‍या या बायकांना थेट अटकेलाच सामोरे जावे लागले होते. "नाही, राधामावशी असं हात पाय गाळून नाही चालणार. काहीतरी करायलाच हवं. काय वाट्टेल ते करु. वेळ पडल्यास एखाद्या वर्तमानपत्राकडे जाऊ, जिल्हाध्यक्षांना जाऊन भेटू पण आपल्या या वाघिणींना आणि वाघासारख्या भावांना सोडवून आणूच." यशोदा तिरिमिरीतच उठली. "आता गं! कुठंशिक चाल्ली आत्ता? भर दोपारची येळ आहे. उलीसक खाऊन घे काय बाय," राधामावशी घाबरून उठली. "नाही मावशी, मला जेवण नाही जायचं अशा परिस्थितीत. मी बघते काय करता येतंय ते. संध्याकाळी सगळ्यांना पुन्हा चावडीवर जमायला सांग. पुढे काय करायचं ते तिथेच ठरवू. आता माघार नाही. या कामासाठी आपल्या माय-माऊल्या, घरची माणसं जेलमध्ये गेली आहेत मावशे. अन्न कसं जाईल पोटात माझ्या. आता माघार घेऊन त्यांचा अपमान नाही करायचा," यशोदा उठली. उंबर्‍यापासली स्लिपर तिने पायात सरकवली आणि क्षणभर त्या उंबर्‍याकडे पाहात उभी राहिली., " खूप झाले तुझे लाड, आता थांबणे नाही." आणि चटाचटा पाय वाजवीत भराभर ग्रामपंचायतीच्या दिशेने चालू लागली. राधाबाई डोळे फाडून तिच्या पाठमोर्‍या आकृतीकडे पाहातच राहिल्या. "जशी माय तशी लेक. यश्वदे, तुजं नाव दुर्गी ठिवायला पायजे हुतं गं अंजाक्कानं. माय ततं जेलात बसलीया चळवळीसाठी आन पोर भायेर लडतीय. न्हाय पोरी, आता मालकांनी तंगडी तोडली तर खुरडत यिन तुझ्या मागं पन मागं न्हाय फिरनार. काय व्हयाचं आसल ते हू दे आता! " राधाबाई तिरिमिरीत उभ्या राहील्या. या क्षणी हातात घेतलेल्या कामासाठी घर, संसार सगळं पणाला लावणार्‍या झाशीच्या राणीचा त्वेष त्यांच्या चेहर्‍यावर होता. गेल्या काही दिवसांतल्या सगळ्या घटना एखाद्या चित्रासारख्या त्यांच्या डोळ्यासमोर तरळायला लागल्या. ...................................................................................................................................... कोळेगाव बुद्रुक, फार - फार तर दहा एक हजाराची वस्ती असलेलं गाव. गाव तसं बर्‍यापैकी सधन. तसा गावचा धंदा हातमागावर कापड विणण्याचा. इथल्या कशिदाकाम केलेल्या शाली सगळ्या देशात जायच्या. प्रचंड मागणी होती देशभरात कोळेगावच्या शालींना. घरटी हातमाग होते पुर्वी. आता त्यांची जागा पॉवरलूमनी (यंत्रमाग)घेतली होती. त्यामुळे गावात बर्‍यापैकी सधनता होती. लोकांच्या हातात पैसा खेळत असायचा. सहाजिकच पैशाला पाय फुटतील अशा गोष्टीही होती. त्यातच बीअरबार, देशी दारुचे गुत्ते यांची भरमार होती. दारुच्या गुत्त्यावर होणारी भांडणे, मारामार्‍या गावाला नवीन नव्हत्या. रोज कुणी ना कुणी दारु पिऊन गोंधळ घालायचा, बायकोला-मुलाबाळांना मारहाण करायचा. पैसा माणसाला कुठे घेऊन जाईल काही सांगता येत नाही! या सगळ्या भानगडीमुळे सगळेच त्रस्त होते, पण पुरुषमंडळी मनावर घेत नव्हती. कारण दारुची दुकाने किंवा बीअरबार बंद होणे त्यांना मानवणारे नव्हते, परवडणारे नव्हते. शेवटी मुरलीतात्यानेच पुढाकार घेतला. मुरलीतात्या म्हणजे मुरलीधर डोकरे, तंटामुक्त गाव समितीचे अध्यक्ष. पाच-सहा महिन्यांपूर्वी गावातील काही सुज्ञ सहकार्‍यांना बरोबर घेऊन गावात दारुबंदी करण्याचा विचार सर्वप्रथम ग्रामपंचायतीसमोर मांडला. ग्रामपंचायतीतील पुरूष सदस्यांनी या प्रस्तावाला हरकतच घेतली, पण महिला सदस्यांनी मात्र प्रस्ताव सहर्ष डोक्यावर घेतला. दुसर्‍याच दिवशी ग्रामपंचायत सदस्या सौ. अंजनाबाई जाधवांनी ग्रामपंचायतीच्या सभेत दारुबंदीचा प्रस्ताव मांडला. ग्रामपंचायतीतील इतर महिला सदस्यांनीदेखील ठरावाला अनुमोदन, पाठींबा दर्शविला. विशेष म्हणजे काही पुरूष सदस्यांनीदेखील आपला पाठींबा दाखवला. खरेतर हा खूप विषम लढा होता. पण अंजनाबाई त्यासाठीच प्रसिद्ध होत्या पंचक्रोशीत. गेली तीन वर्षे ग्रामोपंचायतीच्या राजकारणात सक्रिय असलेल्या अंजनाबाई आणि त्यांची कॉलेजात शिकणारी लेक यशोदा हा गावातील महिलांचा खूप मोठा आधार होता. कुठल्याही छोट्यामोठ्या समस्येसाठी त्यांचे पूर्ण सहकार्य, पूर्ण मदत असायची. एकदा हे ठरले की त्यानंतर लगेचच आठवड्याभरात गावातल्या आणखी काही भगिनींना तयार करुन अंजनाबाईंनी एक दारुबंदी कृती समिती स्थापन केली आणि या समितीतील सदस्यांच्या सह्यांनी जिल्हाधिकारी महोदयांना कोळेगावातील दारुचे गुत्ते, बीअरबार तसेच दारुची दुकाने यावर बंदी आणण्यासाठी सर्व सहमतीचे एक निवेदन देण्यात आले. २५ मार्च २००८च्या शासन कायद्यानुसार गावातील एकूण महिला मतदारांच्या संख्येनुसार त्यांच्या उपस्थितीत साधारण बहुमताने विधीवत ठराव पारीत करुन घेतल्यास संबंधित बार किंवा विक्रेत्याची दारुविक्रीची परवानगी, अधिकार रद्द केला जाऊ शकतो. लढ्याची सुरुवात फारशी कठीण नव्हती..... ! पण ही तर फक्त सुरूवात होती. आज सोमवार, आठवड्याची सुरुवात. आज ग्रामसभा भरणार होती. सकाळी दहाच्या सुमारास गटविकास अधिकारी, दारुबंदी अधिकारी, ग्रामसेवक आणि विस्तार अधिकारी यांच्या उपस्थितीत ग्रामसभेची सुरूवात झाली. गावात महिला मतदारांची संख्या जेमतेम तीन हजाराच्या घरात होती. सरकारी अधिनियमानुसार दारुबंदीचा ठराव पारीत करून घेण्यासाठी किमान दीड हजार महिलांच्या उपस्थितीची आवश्यकता होती. अंजनाबाई आणि यशोदा सकाळपासूनच हजर होत्या. ग्रामपंचायतीच्या कार्यालयाबाहेर गावातल्या भगिनींचा महासागर उसळला होता. ही घटना त्यांच्यासाठी केवढी क्रांतिकारक होती. सगळे आयुष्य रांधा, वाढा आणि उष्टी काढा यात गेलेले. चूल आणि मूल एवढेच काय ते या बायकांचे विश्व! आयुष्य सगळे आधी माहेरी आणि मग सासरी घरच्या पुरूषमंडळींची तळी उचलण्यात आणि राबण्यात गेलेले. त्या पार्श्वभूमीवर आयुष्यात पहिल्याप्रथमच त्या सर्व आपल्या घराचा उंबरठा ओलांडून बाहेर पडलेल्या. आत्तापर्यंत मना-मनांवर पडलेले रुढी, परंपरांचे जोखड झुगारुन स्वत:च्या न्याय्य हक्कासाठी, सुखी संसारासाठी नव्हे आपल्या अस्तित्वासाठी मोकळ्या आणि स्वतंत्र आकाशाखाली एकत्र आलेल्या. मनात एक जिद्द होती, नेहमीच्या रहाटगाडग्यापेक्षा काहीतरी वेगळं, काहीतरी भव्य दिव्य करायची. फार मोठ्या अपेक्षा नव्हत्या त्यांच्या. कुठलेही साम्राज्य जिंकायचे नव्हते किंवा उभेही करायचे नव्हते. फक्त आपल्या संसाराला लागलेली दारुच्या जीवघेण्या विषाची कीड कायमची नाहीशी करायचा हा निर्धार प्रत्येकीच्या मनात आणि चेहेर्‍यावर ठामपणे प्रतिपादीत होत होता. मनात एक हुरहूरही होती. आपला लढा यशस्वी होईल का? जरी यश मिळाले तरी त्यानंतर आपल्याच घरातून कशी वागणूक मिळेल? नवर्‍याची प्रतिक्रिया काय असेल हे तर बहुतेकींना माहीतच होते. काहीजणींनी तर या ठरावानंतर नवर्‍याची मारहाणही सहन केली होती. घरच्यांकडून मिळणारे शाब्दिक अहेर तर नित्याचेच झाले होते पण सगळ्या आपल्या भूमिकेवर ठाम होत्या. कारण या एका निर्णयावर त्यांचे, त्यांच्या चिमुरड्यांचे भवितव्य आधारले होते. प्रत्यक्ष मतदानाला अजून वेळ होता. ग्रामपंचायत कार्यालयात संबंधितांची बैठक चालू होती. ग्रामपंचायतीच्या बाहेर जमलेल्या महिलांच्या विशाल समुदायाकडे बघून यशोदा भारावून गेली होती. स्त्रीशक्तीची ही विलक्षण चुणूक पाहून तिला गहिवरल्यासारखे झाले होते. ऊर अभिमानाने भरुन आलेला. समोरच्या समुदायामधून जोरजोरात दारुबंदीच्या घोषणा दुमदुमत होत्या. शेवटी गटविकास अधिकार्‍यांनी मतदानाला सुरुवात करण्याची सूचना केली. ग्रामसेवक पुढील व्यवस्थेला लागले. थोड्याच वेळात ग्रामपंचायत कार्यालयासमोर एक टेबल मांडण्यात आले. ग्रामसेवक स्वत: काही कर्मचार्‍यासहीत तिथे बसून महिलांच्या मतदानाची नोंद घेणार होते. एकच टेबल मांडलेले पाहिल्यावर मात्र यशोदा थोडी अस्वस्थ झाली. "साहेब, अहो पुढचा घोळका तरी बघा. एकच टेबल कमी पडेल असे नाही वाटत तुम्हांला? हे खूप वेळखाऊ होईल साहेब. बायका आपली घरातली सगळी कामे सोडून इथे आल्या आहेत. निदान अजून एक टेबल तरी मांडायला सांगा ना!" ग्रामसेवकाने अशा काही नजरेने तिच्याकडे बघितले की यशोदा घाबरुनच गेली. "यशोदाबाई, एवढी घरची काळजी होती तर सांगितले कुणी होते या लष्कराच्या भाकरी भाजायला? जे सामान उपलब्ध आहे, जेवढे मनुष्यबळ उपलब्ध आहे त्यानुसार एकच टेबल लावणे शक्य आहे. जमत असेल तर मतदान करा नाहीतर घरी जा, कुणी अडवलेले नाही तुम्हाला, समजले?" यशोदा मनोमन समजून गेली. असहकाराला सुरुवात झाली होती. ती होणारच होती, कारण इथे सगळ्यांचेच हितसंबंध अडकलेले. दारुची दुकानं बंद झाली, गुत्ते थंड पडले तर यांची पण फुकटची आवक बंद होणार होती ना! "तुमी काय बी काळजी करु नगासा ताय, आमी थांबताव ना! कितीबी येळ लागू दे, आज आमी आमचं मत टाकूनच जाणार! हे इख मुळातून उखडलंच पायजे. लागूद्या काय येळ लागायाचा हाये त्यो. काय गं बायांनो?" समोरच्या गर्दीतून एक आवाज आला आणि लगेचच एका मोठ्या प्रतिसादाची ललकारी घुमली. "व्हय, लागू दे काय येळ लागायचा त्यो, आता माघार न्हाय!" यशोदेचे डोळे भरुन आले. स्त्रीशक्तीचा हा महान अविष्कार अनुभवताना आपणही एक स्त्री आहोत याचा अभिमान तिच्या चेहर्‍यावर स्पष्टपणे उमटला. बघता बघता ती भूतकाळात शिरली ......... गेल्या काही दिवसांतले एकेक प्रसंग डोळ्यासमोर यायला लागले. ................... ......................... ............................... "गंगे, सपष्ट सांगतुय तुला. काय मत-बीत द्यायाला जायाचं न्हाय. गपगुमान घरी बसायचं. न्हायतर माझ्याशी गाठ हाय!" "तुमी काय बी म्हना धनी, आता ही दारुची हडळ गावातून कायमची हाकलल्यावाचुन दम नाय पडनार आमास्नी. काय होयाचं हाय ते हू द्या. तुमास्नी काय कराचं हाय ते करा. आता आमी गप बसणार न्हाय. यशोदाताय, मी मत देणारच गं. माझ्या समद्या संसाराची वाट लावलीय या हडळीनं. तिला तडीपार केल्याबगर चैन न्हाय पडनार आता," पन्नाशी ओलांडलेल्या गंगाकाकी ठामपणे सांगत होत्या आणि यशोदेच्या अंगावर खिनभर मास चढत होते. एकच का? अशाच प्रकारच्या अनेक प्रसंगांनी मनात घेर धरला होता. अगदी यशोदेच्या बापानेसुद्धा याला विरोधच केला होता. "अंजे, यश्वदे लै झाली थेरं! आजपातुर झाली ती गावाची शेवा लै झाली. हे अती व्हतंया. अंजे लक्षात ठिव, जर का ही दारुबंदी झाली तर दुसर्‍या दिशी घराभायीर काडीन दोगीनाबी. त्यादिशी आपला संसार सपला समज!" यशोदेच्या बापाने तर अंजनीबाईंना सरळ काडीमोडाचीच धमकी दिली होती. "मालक इकत्या बायकांचं आविष्य जर सुदरणार आसल तर मले त्ये बी मंजुर हाय! आन, म्या बी बगते कसा काडीमोड देतासा त्ये. कायदा काय झोपलेला नाय. आन आज म्या हाये म्हुन घरात हे चार सुकाचे दिस दिसत्यात. फुकट बसून खातायसा, इसरला का ते दिस? पाटलाच्या खळ्यावर दोन-चार रुपड्याच्या बदल्यात दिसभर राबत व्हता समदे. पुन्यांदा त्येच करायचं आसल तर हून जावद्या यकदाचं! माज्या कुकवापरीस गावातल्या बायकांची आविष्यं, त्येंच्या पोरांची भविष्यं लै म्हत्वाची हायेत. आता म्हागारी न्ह्याय फिराची म्या!" यशोदा आपल्या आईकडे पाहातच राहीली होती. आईच्या जागी तिला साक्षात आदिमातेचाच भास होत होता. हे सगळं कमी होतं की काय म्हणून एक वेगळीच अडचण उभी राहिली होती काही दिवसांपूर्वी. ठराव मांडल्यानंतर गावातल्या बायकांना या चळवळीचे महत्त्व समजावुन द्यायचे म्हणुन मुरलीतात्याने गावातल्या निवडक बायकांची एक बैठक घेतली होती. सगळ्या बायका वेळेवर जमा झाल्या. मुरलीतात्या बोलायला उभे राहीले आणि त्यांच्या लक्षात आले की समोर बायकांचे दोन वेगवेगळे घोळके आहेत. एकमेकां- पासून थोडेसे अंतर ठेऊन हे दोन घोळके बसले होते. तात्यांनी या प्रकाराचं कारण विचारलं तर जे बाहेर आलं ते धक्कादायकच होतं. समोर बसलेल्या घोळक्यातल्या सुगंधाबाई म्हटली... "तात्या, आवो त्या खालच्या जातीतल्या बाया हायती. आमी कुणबी, त्ये गावकुसाभायेरचे लोक!" ती बैठक हा भेदाभेद नाहीसा करण्यातच खर्ची पडली होती. शेवटी सुगंधाबाई भरल्या डोळ्यांनी आणि मोकळ्या मनाने गायकवाडाच्या रंगुच्या गळ्यात पडून रडली. ती घटना आठवली आणि नकळत यशोदेच्या डोळ्यात पाणी आले. "रडु नगो पोरी, समदं ब्यास व्हईल बग!" एका म्हातारीने तिच्या गालावरुन आपला खरबरीत सुरकुतलेला तळवा फिरवला आणि यशोदा भानावर आली. "होय गं आज्जे, तसंच होईल! देव आहे आपल्या पाठीशी!" आणि यशोदा कुठल्याशा निर्धाराने मागे वळली आणि मुरलीतात्याकडे जाऊन तिने आपली टेबलाबद्दलची तक्रार मांडली. मुरलीतात्याने हा मुद्दा दारुबंदी अधिकार्‍यांसमोर मांडला. त्यांनी लगेच अजून दोन टेबले मांडण्याच्या सूचना दिल्या. ग्रामसेवकाला नाईलाजाने अजून दोन टेबले मांडावी लागली. त्या घुश्शातच त्याने यशोदेला ऐकवले..... "तुम्ही काहीपण करा, पण शेवटी तेच होणार आहे, जे आम्हाला हवे आहे. समजलं?" तशी यशोदेची काळजी अजून वाढली, हे लोक कुठल्याही थराला जाऊ शकतात याची तिला पूर्ण खात्री होती. आणि तसेच झाले.. साडेबारा वाजता फक्त ९३० बायकांची नोंदणी झाल्याचे जाहीर करण्यात आले. तशा उपस्थित बायका संतापल्या. जवळजवळ १८०० बायका उपस्थित होत्या, ज्यांना मतदानाचा हक्क नाही अशाही काही बायकां-मुलींनी उत्साहाने आपली उपस्थिती नोंदवली होती. मग उपस्थिती एवढी कमी कशी काय भरेल? झाले .....इतके दिवस मनात खदखदत असलेल्या संतापाला तोंड फुटले. संतप्त महिलांनी गटविकास अधिकारी आणि दारुबंदी अधिकार्‍यांना जाब विचारायचा प्रयत्न केला. पण तेवढ्यात अचानक दगडफेक सुरु झाली. ती कोणी सुरु केली याचा विचार न करता पोलिसांनी सरळ महिलावर लाठीमार सुरु केला. "यशोदे, आता गं कसं व्हायचं?", राधाबाई खूप घाबरल्या होत्या. "हे सगळं ठरवून करण्यात आलंय मावशी. इतक्या सहज नाही सोडायचं." यशोदाने सगळ्या बायकांना एकत्र केलं. "माय-मावश्यांनो, बघितलंना! हे पिढ्यान पिढ्या चालत आलेलं आहे. हा अत्याचार आपण, आपल्या कित्येक पिढ्या भोगत आलेलो आहोत. हे थांबायलाच हवं. साथ देणार ना माझी?" या आवाहनाचं उत्तर म्हणून जमलेल्या बायकांनी तिथेच रस्त्यावर बैठक मारली. जवळजवळ दोन तास रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं. पोलीस आणि दारुबंदी अधिकारी यांनी संगनमताने महिलांची कमी उपस्थिती दाखवली आणि सभा उधळून लावली असा आरोप महिला दारुबंदी समितीने केला. झाले.. ठिणगी पडली. चिडलेल्या पोलिसांनी गटविकास अधिकारी आणि दारुबंदी अधिकार्‍यांकडून महिला दारुबंदी समितीविरुद्ध एक तक्रार नोंदवून घेतली. आणि त्याच्या बळावर दंगलीच्या गंभीर आरोपाखाली काही महिलांसकट दारुबंदी समर्थक पुरुषांनाही अटक करण्यात आली. आता मात्र सगळ्यांचाच धीर सुटला. आत्तापर्यंत सगळे ठीक होते. ठराव, मतदान पण आता एकदम अटक म्हणजे...... "यश्वदे, आता गं? अगं अंजाक्कासकट मुरलीतात्यालाबी धरुन नेलंया पुलीसांनी. आन आत्ता कसं व्हयाचं? मला तं काय बी सुचत न्हायी." म्हातार्‍या आवडामावशीनं विचारलं. तशी यशोदापण विचारात पडली. प्रकरण या थराला जाईल याचा तिनं विचारच केला नव्हता. पण काहीतरी करायला हवं होतं. यशोदा पोलीसचौकीत जाऊन आईला भेटली............. "ए येडे, येवड्यावरच हारलीस व्हय, अगं ही तर सुरवात हाये पोरी. अजून लै झगडायचंय. आत्तापासनंच धीर सोडून बसलीस तर त्या बायकांनी कुणाकडं बगायचं. मर्दिणी, डरायचं नाय, आसं कायतरी हुणार हे म्हायतच व्हतं गं मला. ही ठिणगी इझु देवू नगो पोरी. माजी काळजी नगो करु. एक दोन दिसात जामीन मिळंल आमाला. पण या संधीचा फायदा ऊठव पोरी. रान ऊठवा. सगळं गाव पेटून उठू दे. जाऊ दे सगळ्या मराठवाड्यात ही बातमी. तू बघच पोरी आता आपली जीत नक्की हाय. आता आडवी बाटली झाल्याबिगर दम नाय खायाचा." यशोदा आपल्या आईकडे पहातच राहिली. शाळेची चार बुकंही न शिकलेल्या आपल्या आईला ही हिंमत कशाच्या जोरावर मिळाली असावी हेच तिला कळेना. केवळ समाजाबद्दलची आत्यंतिक कळकळ, अन्यायाविरुद्धची मनस्वी चीड आणि प्रचंड आत्मविश्वास ही अंजाक्काची धारदार हत्यारं होती. ग्रामपंचायतीच्या कार्यालयाकडे चाललेल्या यशोदेला हे सगळं सगळं आठवत होतं. आपल्या दुर्गेसारख्या आईचे ते शब्द तिच्या मानसिक शक्तीला आणखी बळ देत होते. यशोदा तशीच तडक ग्रामपंचायतीत येऊन पोहोचली. तिला बघून ग्रामपंचायतीतली माणसं खुसखुसायला लागली. "का गं यशोदे, उतरला का सगळा माज? आलात जमिनीवर? दारुबंदी हवी म्हणे. आता सड म्हणावं आईला जेलात." ग्रामसेवकाने न राहवून पिंक टाकलीच. "साहेब, तुमची मदत मागायला किंवा माफी मागायला नाही आले मी. इशारा द्यायला आले आहे. हे इतक्यात संपणार नाही. मी रान पेटवणार आहे आता. माझ्या माय-माऊल्या साथीला आहेत. वर्तमानपत्रे, स्त्रीमुक्ती संघटना सगळीकडे मदत मागेन. गरज पडली तर मंत्रालयावर पण धडक देईन पण आता थांबणार नाही. तुमची घटका भरली एवढं ध्यानात ठेवा." आणि नव्या निर्धाराने यशोदा मागे फिरली. त्यानंतरचे दिवस जबरदस्त धामधुमीचे होते. दोन दिवसात अटक झालेल्या बायकांना जामिनावर सोडण्यात आले आणि मग सुरू झाली एक नवी लढाई. या रणरागिण्यांचा आणि त्यांच्याबरोबर अटक झालेल्या पुरुष सहकार्‍यांचा जाहीर सत्कार करण्यात आला. गावातल्या महिला दारुबंदी समीतीच्या सदस्य भगिनी नवीन लढ्यासाठी नवे डावपेच आखण्यात मग्न होत्या. एक दिवस..... अंजनाबाई इतर सदस्यांबरोबर पुढची रणनीती ठरवत होत्या. त्यानुसार वर्तमानपत्रे आणि स्त्रीमुक्ती संघटनांची मदत मागण्याचे ठरले. एवढ्यात दारात एक जीप येऊन थांबली आणि जीपमधून दारुबंदी समितीचे जिल्हाध्यक्ष श्री. सुखदेवकाका समेळ उतरले. त्यांच्याबरोबर आणखीही दोन बायका आणि काही पुरुषमंडळी होती. "नमस्कार अंजाक्का, सर्वात आधी तुमच्या धाडसाबद्दल, जिद्दीबद्दल तुम्हा सर्व भगिनींचे मनापासून अभिनंदन. एवढं झाल्यावरदेखील घाबरुन न जाता तुम्ही लढा पुढे चालू ठेवायचा निर्धार कायम ठेवलात हे कौतुकास्पदच आहे. पण आता हा लढा एकट्या कोळेगावच्या भगिनींचा नाही. आता हा लढा आपल्या सर्वांचा आहे. आता थांबणे नाही. अब आर या पार, फांदी तुटो वा पारंबी आता मुळावरच घाव घालायचा. आपण जिल्हापातळीवर, वेळ पडल्यास राज्यपातळीवर धडक मारु. सगळ्या मराठवाड्यात रान पेटवून देऊ. आता आपल्याबरोबर दै. जनसत्ताचे वृत्तप्रतिनिधीदेखील आहेत. या भारतीताई केंजळे, 'सखी स्त्रीमुक्ती संघटने'च्या सदस्यदेखील आपल्यासोबत या लढ्यात उतरल्या आहेत. आता थांबणे नाही, आता आराम तो थेट कोळेगावात दारुबंदी झाल्यावरच. चला कामाला लागू या. अंजनीबाई आणि यशोदेबरोबरच उपस्थित सर्वच बायकांचे चेहरे उजळून निघाले. त्यांच्या प्रयत्नांनी भ्रष्ट शासन यंत्रणेच्या पोलादी कोटांना आता तडे जाणार होते. यशाची कवाडे किलकिली झाली होती. "उठा बायांनो, अगं फाट झालीया, ही तर फकस्त सुरुवात आहे, लै काम पडलंय. आता कंबर कसायलाच हवी." उत्साहाने सळसळलेल्या अंजाक्का नव्या उमेदीने ऊठल्या. कोळेगावच्या या रणरागिण्या एक नवीन इतिहास लिहायला सिद्ध झाल्या होत्या. युद्धाचा बिगुल वाजला होता. एक नवी सुरुवात झाली होती. माझ्या पत्रकार म्हणून आजपर्यंतच्या कारकिर्दीत ही घटना एक नवीन पर्व घेऊन येणार होती. प्रारंभ..... विशाल कुलकर्णी

वाचने 1903 वाचनखूण प्रतिक्रिया 5

बहुगुणी 27/10/2009 - 17:57
..आवडलं. सामाजिक जाणीव असलेले पत्रकार इथे (आणि इतरत्र) अशा घटना मांडताहेत हे नक्कीच आशादायक आहे. तुम्ही पत्रकार आहात तर या वृत्तातील रणरागिण्यांची आणि त्यांच्या सहकार्‍यांची छायाचित्रे मिळवून इथे ओळख करून द्याच, पण तेवढ्यावर न थांबता आज सहा महिन्यांनंतर त्या गावात परिस्थिती काय आहे त्याचाही पाठपुरावा करा. Hopefully, बाटली अजून 'आडवी'च असेल अशी आशा आहे. चांगल्या लिखाणाबद्दल धन्यवाद!

विशाल कुलकर्णी 27/10/2009 - 18:17
दादानु, गैरसमज होतोय. मी पत्रकार नाहीये. एका पत्रकाराच्या लेखणीतुन हे कथानक उतरलेय असा या कथेचा प्लॉट आहे. आणि फोटो च हवा असेल तर वर मी दिलेली लिंक पाहा तिथे आहे. धन्यवाद. सस्नेह विशाल ************************************************************* आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!"

अक्षय पुर्णपात्रे 27/10/2009 - 23:25
श्री कुलकर्णी, कथा चांगली वाटली. महिलांचे अभिनंदन. श्री ॠषिकेश यांनीही नुकतीच एका महिलेची यशोगाथा सांगणार्‍या पुस्तकाची चांगली ओळख करून दिली होती. मूळ लेखास श्रेय देण्याचा प्रामाणिकपणा आवडला. अवांतर: दारूबंदीवर लेखन करणार्‍या एका महिला सदस्यास एका मराठी संकेतस्थळावरून पळवून लावण्यात आले होते. दारुच्या कट्ट्यांच्या व कॉकटेलच्या कृतींच्या कथा येथे चघळल्या जातात. मद्याच्या अंमलाखाली केलेल्या माकडचेष्टांना भरघोस प्रतिसाद मिळतो, मद्य पिऊन बोळे काढण्याचे वर्ग चालवले जातात. त्या पार्श्वभुमीवर तुमचा लेख टीकून राहणे हे चांगल्या बदलाचे लक्षण आहे.

विशाल कुलकर्णी 28/10/2009 - 09:50
धन्यवाद. अक्षयजी तुमच्या प्रतिसादातील खंत आणि आनंद दोन्ही लक्षात आले. पण एक सांगणे आहे... मिपावरील लेखन हे प्रत्येक लेखकाचे वैयक्तिक विचार असतात. त्याच्याशी मिपा व्यवस्थापन सहमत असेलच असे नाही. आणि प्रत्येक लेख हा सिरियसली घ्यायलाच हवा असेही नाही. काही लेख केवळ गंमत म्हणुन लिहीलेले असतात किंवा उपहासात्मकही असतात. बाकी तात्या काय ते स्पष्टीकरण देतीलच. :-) सस्नेह विशाल ************************************************************* आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!"