आठवण हंसाची...
लेखनप्रकार
काळजात (जनरल पब्लिक याला कॉलेज म्हणते!) असताना 'अर्न अँड लर्न' करत असल्याने काळजातल्या कार्यक्रमांमध्ये भाग घेण्याचा जरा कमीच चान्स मिळायचा पण तरीही वेळ काढून शेवटच्या वर्षी सांस्कृतिक कार्यक्रमातल्या अंताक्षरी खेळात भाग घेतला होता. प्रोफेसर विरुद्ध विद्यार्थी असा सामना होता. खेळतखेळत मी अंतिम फेरी गाठली आणि त्यात सामना टाय झाला. खुद्द काळजाचे प्रिन्सिपलच होते विरुद्ध! टायब्रेकर फेरी होती.. आर या पार.. एक शब्द देणार होते जो आपण म्हणायच्या असलेल्या गाण्याच्या पहिल्या दोन ओळीत येणे अपेक्षित होते. काळजातली (कॉलेज या अर्थाने नाही हो!) धडधड वाढली होती...
धडधड आणिक वाढवणारी नको ती भलामण लावून देत शेवटी एकदाचा शब्द ऐकू आला 'हंस'! मी आणि सर जवळपास एकाचवेळी सुरू झालो आमच्या गाण्यांनी.. त्यांचे होते 'दो हंसोका जोडा बिछड गयो रे..' तर माझे होते 'ओ हंसनी, कहा उड चली..'! दिलखेचक शब्दांमुळे की गाण्याच्या तालामुळे किंवा काय माहिती नाही पण सर्वांनी माझेच गाणे उचलून धरले आणि अख्खा हॉल अगदी सरांसकट तेच गाणे म्हणायला लागला. धुंद करणारा अनुभव होता अगदी! स्पर्धेच्या पंचांचा निकाल अर्थातच माझ्याविरुद्ध गेला कारण माझ्या गाण्यात 'हंस' नाही तर 'हंसनी' आली होती!!!
मंचावरून खाली उतरून पुढचे कार्यक्रम बघण्यासाठी प्रेक्षकांमध्ये जाऊन बसायला निघालो तेव्हा सरांनी कौतुकाने म्हटले,"इतकावेळ खेळताना एकही चूक केली नाहीस, मग आता शेवटच्या क्षणीच कशी काय चुकलीस तू?"
रंगेहाथ पकडणाराच प्रश्न होता तो.. गोरीमोरी होऊन मी फक्त 'जीवनतालमें भटक रहा रे मेरा हंसा' इतकेच हलक्याने गायले. सर खळखळून हसतच होते कितीतरी वेळ मग काहीवेळाने म्हणाले,"न जाणो मलाही या पोरीने युनिव्हर्सिटीतून बार केले तर.. या कल्पनेने घाबरला असणार तो तुला म्हणून बसला असेल भटकत..!" आता दिलखुलास हसण्याची वेळ माझ्यावर आली होती.
वाचन
2930
प्रतिक्रिया
0