व्यर्थ न हो त्यांचे बलिदान....
उद्या २१ ऑक्टोबर - पोलिस स्मृति दिन! तसे त्यात नवे काहीच नाही. नेमीची येतो मग पावसाळाच्या धर्तीवर दरवर्षीच पोलिस स्मृति दिन येतो अन जातो.
उद्या सकाळी परत देशभरातील सर्व जिल्हा पोलिस मुख्यालयांच्या (कवायत मैदानांमधे) परेड ग्राऊंडवर निवडक पोलिस अधिकारी कर्मचारी शिस्तबद्ध रांगात उभे रहातील अन संचलन करतील. बिगुलांमधुन निघालेले लास्ट पोस्टचे सुर वातावरण कुंद, शोकार्त करत तरळतील अन काही जणांचे/जणींचे डोळे पाणावतील, प्रियजनांच्या आठवणीनं हुंदके फुटतील. कुणीतरी खड्या पहाडी आवाजात या वर्षी कामगिरीवर असताना धारातिर्थी पडलेल्या वीरांची नावे वाचेल अन शोकशस्त्रचा आदेश खड्या आवाजात घुमेल. बिगुलांच्या काळीज पिळवटुन टाकणार्या सुरावटी च्या तालावर कुणी वरिष्ठ अधिकारी आस्तेकदम जाऊन शहिदांना रिथ अर्पण करेल तेव्हा सलामी देणार्या पोलिसांच्या रायफलींच्या कडकडाट होईल, आपटलेल्या टाचांचा आवाज घुमेल. कवायत मैदानाच्या बाजुला उभारलेल्या शामीयान्यात आरामात बसुन वरिष्ठ अधिकारी ते पहातील तर धरुन आणलेले काही सेलिब्रिटीज कंटाळलेपणानं आपला `लुक' उन्हानं खराब होणार नाही याची काळजी घेत अर्धा चेहरा गॉगलनं झाकुन बसतील. अन ज्यांच्याकरता ते जवानमर्द वीर शहीद झाले ते आपण तेव्हा घरी बेड टी घेत असु किंवा ऑफिसला पळण्याच्या गडबडीत अन्हिकं उरकत असु. हेच तर या दिवशी देशभर गेली ५० वर्षे घडत आलंय ना?
पोलिस स्मृति दिन - आपण सर्वांनी कधीच विस्मृतिच्या गर्तेत भिरकावुन दिलेला अन सरकारकरता अनिवार्य उपचार उरलेला. कायम आपण त्यांना पांडु-सखाराम म्हणुन हिणवतो अन राजकारणी, वरिष्ठ अधिकारी ज्यांना रामा गड्याप्रमाणे राबवतात त्या मर्दांचा दिवस. एका अतुलनीय शौर्याची आठवण!
२१ ऑक्टोबर १९५९ या काळ्या दिवशीच्या पहाटे घडलेल्या एका अमानुष, राक्षसी घटनेत या दिनाची बीजं आहेत. सारे भारतवासी गाढ निद्रेत असताना त्या दिवशी अत्याधुनिक हत्यारांनी सुसज्ज चीनी सैन्याच्या तुकड्यांनी अचानक आपल्या भारतभूच्या स्वातंत्र्यावर घाला घातला - लडाखमधे हॉटस्प्रिंग इथं अचानक घुसखोरी केली.
लडाख हे भारताचं उत्तर टोक, हिमालयाच्या कुशीतलं १८००० फूट उंचीवरचं ठिकाण! भारतभूच्या स्वातंत्र्यदेवीच्या मस्तकावरचा हिमाच्छादित किरिटच जणु. उंच ठिकाणी असल्यानं अन हाडं गोठवणारी थंडी असल्यानं निर्मनुष्य. वावर तिथं असणार तो फक्त सीमेवर गस्त घालणार्या अर्धसैनिक अन लष्करी दलांचाच, बाकी असणार ती नीरव शांतताच. त्यात पुन्हा असे आक्रमण होईल याचाच अंदाज नसल्यानं बहुधा पण गस्तीपथकातही मनुष्यबळ जेमतेमच. प्रचंड लोकसंख्या असणार्या चीनच्या युद्धपद्धतीची खासीतय म्हणजे ह्युमन वेव्ह (मानवी लाटा) पद्धत ज्यामधे चीनी सैन्याच्या एकामागोमाग एक अश्या लाटा समोरच्या सैन्यावर आदळत रहातात अगदी त्यातला शेवटचा सैनिक नामशेष होईपर्यंत. या आक्रमणातही हीच पद्धती वापरली गेली होती.
अन या चीनी सैन्याच्या समोर उभे रहायला होते कोण तर अगदी सीमेलगतच्या चौक्यांवर (बॉर्डर फॉरवर्ड पोस्टवर) तैनात केलेली केंद्रीय निमलष्करी दलाची तुटपुंची साधनसामुग्री अन डी वाय एस पी करमसिंग यांच्या नेतृत्वाखालचे वीस जणांचे गस्तपथक. (ही माहीती मिपाकर चेतन यांच्या सौजन्याने मिळाली. त्यांना अनेक धन्यवाद!) आणि हे आक्रमण तरी कसे लक्षात यावे तर गस्त घालत असताना ही तुकडी हॉट स्प्रिंगच्या पुर्वेस सहा मैलांवर पोहोचली तेव्हा त्यांना काही संशयित हालचाली दिसल्या. आपले जवान त्या हालचाली कोणाच्या आहेत याचा शोध घेत असतानाच अचानक त्याच्यावर बंदुकांच्या फैरींचा वर्षाव झाला.
एकुणच खचुन जावं अन पळ काढावा अशी परिस्थिती. पण नाही! केंद्रीय निमलष्करी दलाचे ते जवान भारताचे वीर सुपुत्र होते. त्यांनी हातपाय नाही गाळले. उपलब्ध साधनसामुग्रीच्या बळावर त्यांनी प्रतिकार सुरु केला अन पेटलं एक अनोखं रणकंदन. तो रणचंडीयाग संपला तो दहा जवामर्दांचा बळी घेऊनच. नऊ जण शत्रुच्या हाती लागले. एकानंही पळुन जाण्याच्या विचारसुद्धा मनी आणला नाही. मारीत मारीत धारातिर्थी पडले ते दहाजण. त्यांची नावं होती - पुरणसिंग, धरमसिंग, इंद्रजित, सुबा, नोरबु लामा, शिवनाथ प्रसाद, त्शेरिंग नोरबु, इमामसिंग, सवनसिंग, बेगराज अन माखनलाल.
त्यापैकी तीन जण प. बंगालचे, दोन जण हरियाणाचे, दोन जण पंजाबचे, दोन जण उत्तर प्रदेशचे तर एकजण हिमाचल प्रदेशचा रहिवासी होता. आक्रमकांचे फक्त त्यांच्या बलिदानानं समाधान झाले नाही तर त्यांनी या वीरांची पार्थिवेही आपल्याच ताब्यात ठेवली. ही बातमी वार्यासारखी पसरली अन देशभर खळबळ माजली. शेवटी १३ नोव्हेंबर १९५९ रोजी या अमर जवानांची पार्थिवे चीनने भारताच्या ताब्यात दिली अन १४ नोव्हेंबर १९५९ रोजी त्यांच्यावर हॉटस्प्रिंग इथं सन्मानानं अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यावेळी त्यांना मानवंदना देण्यासाठी प्रत्येक राज्यातुन पोलिस तुकड्या गेल्या.
त्यानंतर काही दिवसातच पाटणा इथं अखिल भारतीय पोलिस कर्तव्य स्पर्धा झाल्या. या स्पर्धा पोलिसांच्या कार्यक्षमतेची चाचणीच असते अन त्यात देशभरातुन पोलिस दलांची पथके सामील होतात. साहजिकच हॉटस्प्रिंग इथं झालेल्या ताज्या घटनेच्या स्मृति तिथं परत जागवल्या गेल्या अन भारतातील सर्व पोलिस दलांनी तिथुन पुढं दरवर्षी २१ ऑक्टोबरला पोलिस स्मृति दिन पाळण्याची शपथ घेतली.
तेव्हापासुन २१ ऑक्टोबरला त्या शहिदांना अन भारतातल्या जनतेला सुरक्षा देताना धारातिर्थी पडणार्या इतर पोलिस जवानांना मानवंदना देण्यासाठी हा दिन पाळला जातो.
१ सप्टेंबर २००८ ते ३१ ऑगस्ट २००९ या एका वर्षाच्या कालावधीत भारतभरात ज्या ज्या पोलिस अधिकारी व कर्मचार्यांना आपले कर्तव्य बजावत असताना वीरमरण आले त्यांना उद्या मानवंदना दिली जाईल. त्यात महाराष्ट्रातील एकुण ७२ जवान आहेत आणि त्यामधे २६ नोव्हेंबर २००८ रोजी मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ला परतवताना शहीद झालेल्या अधिकारी व कर्मचार्यांचाही समावेश आहे.
या सर्व वीरांनी आपल्याला सुरक्षित आयुष्य जगता यावे यासाठीच प्राण वेचले आहेत हे लक्षात घेता त्यांना आदरांजली वाहणे हे आपले राष्ट्रीय कर्तव्य ठरते. ही आदरांजली वाहण्यासाठी आयोजित केलेल्या कार्यक्रमांना प्रत्यक्ष जाणे जरी आपल्याला शक्य झाले नाही तरी प्रत्येकाला किमान त्यांच्या बलिदानाची आठवण यावी यासाठीच हा लेखप्रपंच!
वाचने
4676
वाचनखूण
प्रतिक्रिया
23
ह्या
छान लेख
In reply to छान लेख by गणपा
+१
+१
+१
असे लेख वाचुन
आदरांजली
In reply to आदरांजली by चेतन
माझ्या माहितीप्रमाणे १९ जणच होते...
माझी ही
आदरांजली
In reply to आदरांजली by विकास
या दिनाबाबतची माहिती...
In reply to या दिनाबाबतची माहिती... by प्रसन्न केसकर
उत्तम माहिती
In reply to उत्तम माहिती by प्रदीप
ज्वलंत विषय!
शहिद
सलाम!
सलाम
आदरांजली
शहीदांना विनम्र श्रद्धांजली
माझी पण
पोलीस दलाला सलाम!
माहितीबद्
माझीही..
सलाम