मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

ते दोन क्षण - भाग १

जे.पी.मॉर्गन · · जनातलं, मनातलं
लेखनप्रकार
पु. लं. च्या 'व्यक्ती आणि वल्ली' मध्ये 'दोन वस्ताद' नावाचा लेख आहे. त्यातल्या टिल्यावस्ताद आणि ज्योतिमामांच्या आयुष्यात एकेक अविस्मरणीय क्षण येऊन गेले. अविस्मरणीय म्हणजे इतके की तो क्षणच ते दोघे खऱ्या अर्थानी 'जगले'. फार कमी जणांच्या आयुष्यात असे क्षण येतात की ज्या वेळी आपण To be one with God; देवाशी (का देवत्त्वाशी?) एकरूप होण्याची अनुभूती घेतो. माझ्या नशीबानी माझ्या आयुष्यात आत्तापर्यंतच असे क्षण दोनदा आले आहेत. त्यातला हा पहिला. २३ डिसेंबर १९९७..... स.प. महाविद्यालयाच्या AKM च्या व्हॉलिबॉल कोर्टसवर रात्री ११ ला चौथी quarter finals call झाली. आमचा जिल्हा प्रशिक्षण केंद्र DCC - B विरुद्ध पुण्यातला सर्वोत्तम आणि सगळ्यांत अनुभवी संघ 'बँक ऑफ महाराष्ट्र'. आमचा 'अ' संघ म्हणजे सीनियर खेळाडू आणि आम्ही 'ब' म्हणजे १९ वर्षांखालचे ! हाडापर्यंत पोचणारी थंडी... कितीही व्यायाम केला तरी 'वॉर्म-अप' होत नव्हता. मॅच पूर्वी दोन्ही संघ समोरासमोर उभे राहिलो तेव्हा लक्षात आलं की त्यांचे चार खेळाडू Senior nationals खेळलेले..... आणि दत्ता मोरे तर छत्रपती award winner! निकाल स्पष्ट होता..... 'जाधव सरांच्या पोरांना' बँकेचे खेळाडू किती मिनिटांत हरवतात हाच प्रश्न होता.... म्हणून उशीर झाला असून् सुद्धा दोन-तीनशे प्रेक्षक अजून ही सामना बघायला होते. मी नेहेमीप्रमाणे zone 4 वरून सूरुवात केली. त्यांचे दत्ता मोरे चार नंबर ला होते. बघता बघता भाऊनी ५ पॉईंटस मिळवले. आमच्या सरांनी "टाईम आऊट" घेतला आणि मला म्हणाले तू counter attack सोडून center block ला खेळ.... भाऊना तू पकडायचं ! मी??? सव्वासहा फूट उंचीच्या छत्रपती ऍवॉर्ड विनरला मी ब्लॉक करायचं ? .... मला जमेल ? सर म्हणाले "आज भाऊना ब्लॉक केलंस तर पुढच्यावेळी सीनियर टीम मध्ये खेळशील". म्हटलं होऊन जाऊ द्या !! पुन्हा मैदानात उतरलो.... आम्ही 'क्लीयर' केलेला बॉल त्यांनी भाऊंसाठी 'सेट' केला. १५ वर्षांचा अनुभव असलेले भाऊ त्या बॉल वर तुटून पडले...त्यांनी दात ओठ खाऊन जोरदार स्मॅश मारला..... इथे मी आणि सच्या मोरे दोघांनी जीवाच्या आकांतानी उडी मारली..... माझ्या दोन्ही हातांवर..त्या थंडीत.... मेणबत्ती विझेपर्यंत जोर घुमवणाऱ्या त्या हातांनी मारलेला तो सणसणीत स्मॅश एखाद्या तोफगोळ्यासारखा आदळला..... आणि...... ....आणि दुसऱ्या क्षणी तो बॉल भाऊंच्या पायात पडलेला होता.... 'service change' ! चला..‌ सुरुवात तर चांगली झाली होती. भाऊ फक्त हसले. सच्या नि सर्व्हिस केली... पुन्हा सेटरनी मुद्दाम भाऊंना बॉल सेट केला...पुन्हा एक जोरदार स्मॅश... ह्यावेळी मी एकटाच ब्लॉक साठी उडी मारली.... आणि पुन्हा मी केलेला ब्लॉक त्यांच्या कोर्ट मध्ये पडला....टाळ्या, शिट्ट्यांनी मैदान दणाणून गेलं....आम्हाला आता जास्तंच चेव चढला होता. आमचा सेटर नीलेशनी मला बॉल सेट केला..... समोरच्यांना नक्की अपेक्षा असणार की मी तो जीव खाऊन मारणार. मग कशाला मारा ??? दोन ब्लॉकर्सच्या उंचावलेल्या हातांवरून अलगद बॉल 'प्लेस' केला....मागचे कोणीच ह्यासाठी तयार नव्हते... लगेच पुढचा बॉल अमित नि 'फिनिश' केला. 'जाधव सरांची पोरं' बँकेच्या कसलेल्या खेळाडूंना जेरीस आणत होती. बँकेच्या खेळाडूंचा अनुभव शेवटी वरचढ ठरला..... पण आम्ही त्यांना पाच सेटपर्यंत जोरदार झुंज दिली. रात्री १ : ३० ला मॅच संपेपर्यंत एकही प्रेक्षक हलला नव्हता. प्रत्येक वेळी ब्लॉक करतांना... सगळी ताकद एकवटून स्मॅश मारताना... तो जल्लोष... प्रेक्षकांच्या टाळ्या ऐकताना... एक वेगळंच feeling येत होतं. लोकांच्या टाळ्या, शिट्ट्या..."come on " च्या आरोळ्या... प्रत्येक वेळी ब्लॉक केल्यावर किंवा चकवून स्मॅश मारल्यावर बँकेच्या खेळाडूंची होणारी चिडचिड...जणू आजूबाजूला काहीच नव्हतं... मी आणि माझा खेळ ! I saw my God ! इतकी वर्षं झाली...पण सगळा प्रसंग काल घडल्यासारखा आठवतो.. अजूनही त्या आठवणींनी अंगावर रोमांच उभे राहतात. पुन्हा ती विलक्षण अनुभूती मिळवण्यासाठी मी धडपडतोय.... एखाद्या प्रसंगाची 'किक' बसावी आणि एखादं व्यसन लागल्यासारखी ती पुनः पुन्हा हवीशी वाटावी तसं झालंय. मी वाटेल ते करायला तयार आहे ते क्षण पुन्हा जगायला !!!!

वाचने 6854 वाचनखूण प्रतिक्रिया 12

जबरदस्त अनुभव... वाचताना त्यावेळच्या थराराची कल्पना येते. छान लिहिलंय. दुसरा भाग लवकर टाका. (एक सूचना: इंग्रजी शब्द टाळता नाही आले तरी देवनागरीत टंकलेले जास्त बरे वाटतील.) बिपिन कार्यकर्ते

टारझन 28/07/2009 - 18:49
वाह वाह @!!! अत्तिशय उत्तम !! चोक्कस लिखाण !! एकावर एक उत्तमोत्तम लेख टाकून राहिलेत मॉर्गन साहेब !! अजुन येउन द्या ११!! वाचतो आहोत (वाचक) टारझन -- मी अवांतर प्रतिसाद मनोरंजण सेवा बंद केली आहे

तर्री 28/07/2009 - 20:22
"डाळ भात" ;) खावून आज कंटाळळो होतो आणि तुम्चा लेख वाचला. झकास... दोनही लेख अती ऊत्तम. हॅट्रिक होऊन जावू द्या म्हणतो.

अनामिक 28/07/2009 - 22:21
तुमचा हा लेख पुर्वी वाचल्याचे लक्षात आहे. उत्तम अनुभव आणि तेवढेच सुंदर लिखाण. -अनामिक

परत वाचायला मजा आली, त्यावेळी अभिप्राय द्यायचा राहून गेला होता तो आत्ता देते. स्वाती

गणपा 25/08/2009 - 17:12
मॉर्गनराव, आख्खी मॅच डोळ्या पुढे उभी राहिली.

वेदश्री 25/08/2009 - 18:10
अत्यंत सुंदर स्मॅशिंग अनुभव.. वाचतानाच मंतरल्यासारखे झाले मला मग प्रत्यक्षात अनुभवताना दैवी अनुभव आल्यासारखे वाटणे सहज शक्य आहे. अर्थात अजून थोडे खोलात जाऊन खेळातले महत्त्वाचे 'पॉईंट्स' रंगवले असतेत तर लेखन अजून परिणामकारक झाले असते असे वाटते. पुभाशु (पुढील भागासाठी शुभेच्छा!)..