मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

तुळशीबाग - एक अनुभव

मराठमोळा · · जनातलं, मनातलं
लेखनप्रकार
हा लेख एक पुरुष का लिहितोय असा प्रश्न कदाचित तुम्हाला पड्ला असेल, सांगतो. गेल्या आठवड्यात पण तेच झालं. पुण्याबाहेरचे कुणी पाहुणे घरी आले कि त्यांना पुणेदर्शन करायचे असते. त्यात जर महिलामंडळ असेल तर मग विचारायलाच नको. तुळशीबाग म्हणजे तर अविभाज्य भाग. आणी आमचा रोल ठरलेला - "ड्रायवर". जुन्या हिंदी सिनेमाप्रमाणे "शंकर गाडी निकालो" अशी आज्ञा दिली जाते, आम्ही आपले गुमान पाण्याच्या बाटल्या घेतो आणी गाडी तुळशीबागेपर्यंत न्यायची ते पण रविवारी, ह्या विचारानेच धास्तावतो, पण "चिडचिड करायची नाही, पाहुण्यांना काय वाटेल" असा विचार करत गाडी चालवण्यास सज्ज होतो. आमच्या मातोश्री आणी ईतर महिला मंडळास घेऊन ३ वाजता निघायचे होते ते ४ वाजता घरातुन निघालो. सिग्नल, ट्रॅफिक आणी झोपेतुन उठुन रस्त्यावर फिरणार्‍या निरपराध, निरागस लोकांचा जीव वाचवत आम्ही मंडईजवळ पोहोचलो, आता नेहमीप्रमाणे पार्किंग चा त्रास. जुन्या बहुमजली पार्किंग्साठी उपलब्ध असलेल्या बाबु गेनु वाहनतळ ईमारतीपर्यंत पोहोचण्यासाठी गोगलगायीला लाजवेल अशा वेगात वाटचाल करत होतो. एंट्रंसला जागा मिळताच गाडी वळविली आणी समोरचा रखवालदार हाताने खुण करत सांगत होता कि "इकडुन एंट्री नाही, मागच्या रस्त्याने आत आणा" झाली का पंचाईत, माझ्या मागची पीएमपी बस "हॉर्न" नसल्याने नुसतीच गुरगुरत होती आणी आमच्या गाडीमुळे समोरुन बाहेर येणार्‍या मोटारीची कोंडी झाल्याने त्यातील बाजुला बसलेली स्त्री माझ्याकडे मारक्या म्हशीसारखी बघत होती. जो या कोंडीतुन सर्वात पहिले बाहेर पडेल त्याला एक लाखाचे बक्षिस मिळणार आहे अशा आवेशात सर्वजण प्रयत्न करीत होते.काय करावे सुचेना थोडी जागा मिळाली गाडी पुढे घेणार त्यात एका रिक्षावाल्याने चान्स घेतला आणी आता परिस्थिती फारच बिघडली होती आणी नेहमीप्रमाणे माझं डोकं पेटलं होतं. त्यात एक वयस्कर गृहस्थ देवासारखा आला आणी त्याने सर्वांना विनंती करत ती कोंडी मोकळी करुन दिली. मागे बसलेल्या महिला मंड्ळास ह्या सर्व गोष्टींशी काही एक कर्तव्य नव्हत, अखंड गप्पा सुरु होत्या. जेवढी जागा मिळाली त्यात गाडी पुढे मागे घेऊन कसरत करत कशीबशी नव्या वाहनतळापर्यंत पोहोचविली, अर्थात तिथे १५-२० मिनिटे लागणारच होती आणी "तुम्ही जा तुळशीबागेत मी नाही येत" असे म्हणत मी सर्वांना गाडीतुन उतरवले. पाचव्या मजल्यावर जागा मिळाली, आणी परत जाताना गाडीसाठी पाच मजले चढुन यावे लागणार होते ही जाणीव झाली पण काहीही पर्याय नव्हता. गाडी लॉक केली आणी थोडं थंड पाणी प्यायलो, जरा हायसं वाटलं, एक युद्ध मी जि़कल्याची भावना उगाचच स्पर्शुन गेली. खाली उतरलो, आता काय करायचे म्हणुन थोडे फिरुयात असे ठरवले. मागच्या वेळी तुळशीबागेत आत कधी गेलो होतो आठवत नाही, मी शक्यतो आत जायचे टाळतोच, नाहीतरी माझं काय काम तिथे. तरीपण काही नविन मंडळी आहेत, अंगावर सोन्याचे दागिने आहेत म्हणुन मी आत जायचे ठरवले, बॉडीगार्ड म्हणुन. आत जाताच एक वेगळाच अनुभव यायला लागला. असंख्य स्त्रियांचा सागरच जणु लोट्ला होता. चालायची म्हणुन सोय नव्हती. तरी मी त्या चक्रव्युहातुन मार्ग काढत आमच्या लोकांना शोधायला लागलो. कानातले, गळ्यातले, हेअर पिन, पर्स, चपला, बांगड्या, ड्रेस मटेरिअल अशा चमचम्णार्‍या वस्तुंनी बाजार अगदी फुलुन गेला होती आणी त्यांची विक्री करणारे छोटे छोटे असंख्य दुकानदार आणी ह्या सर्व गोष्टींमधे जग विसरलेल्या अगदी पाच वर्षाच्या चिमुरडीपासुन वयोवृद्ध स्त्रिया. प्रत्येकीच्या चेहर्‍यावर एक वेगळाच आनंद, उल्हास आणी जग जिंकल्याचा भाव. दुकानदाराशी हुज्जत घातल्याशिवाय कोणतीही वस्तु घ्यायची नाही असा तुळशीबागेचा एक अलिखित नियम आहे आणी सर्वजणी ह्या नियमाचे काटेकोरपणे पालन करीत होत्या. दुकानदारांचे चेहरे मात्र निर्विकार होते, अर्थात त्यांना ह्या सगळ्या गोष्टींची सवय झाली असावी आणी त्यांनाही या नियमाबद्दल काही आक्षेप नव्हता. २०/- रुपयाची वस्तु आधी ६०/- रुपयांना सांगायची आणी मग निगोशिएट होत होत २५-३० रुपयांना विकुन मोकळं व्ह्यायचं हे सुत्र त्यांना पक्कं माहित असावं, मग स्त्रिया सुद्धा "साठ रुपये सांगत होता शहाणा, २५ रुपयाला घेऊन आले बघ" असे मैत्रिणिंना सांगायला मोकळ्या. अचानक काही परदेशी पर्यटक दिसले, ते सुद्धा पुण्याच्या या अजब दुनियेची मजा बघत होते, फोटो घेत होते, त्यांच्यातल्याच एका ललनेच्या हातात मी लालभडक रंगाच्या बांगड्या पाहिल्या आणी स्त्रिया पृथ्वीतलावर कुठेही गेल्या तरी सारख्याच याची खात्री झाली. अरे हो, मी आमच्या महिला मंडळाला शोधायला आलो आहे हे विसरुनच गेलो. पुन्हा "यु" टर्न घेतला आणी एका दुकानात मला हे सर्व लोकं खरेदी करताना दिसले. मी त्यांच्यासमोर जाऊन उभा राहिलो, तरी माझ्याकडे लक्ष नाही, "मनात म्हंट्लं किती प्रभाव या तुळशीबागेचा यांच्यावर" त्यानंतर मी १५ मिनिटे त्यांच्याबरोबर फिरत होतो आणी खोटं वाटेल पण माझ्याकडे कुणाचही लक्ष गेलं नाही. मी सुद्धा न बोलता चालत होतो. "ही पर्स केवढ्याला?" इति माझी मामेबहिण "१५० रुपये-दुकानदार" "नको मला" . "अरे हे काय - जी वस्तु घ्यायची नाही ती विचारायची कशाला - मी" असो.. स्त्री जातीला प्रत्यक्ष देव समजु शकला नाही तिथे माझी काय कथा. दोन अडीच तासांचा तुळशीबाग महोत्सव एकदाचा संपला, बाहेर पडताना मी त्यांच्याबरोबर आहे याची त्यांना जाणीव झाली. मग पाणीपुरी, भेळ, उसाचा रस यावर यथेच्छ ताव मारुन झाल्यावर पुन्हा ऑर्डर आली "शंकर गाडी निकालो" आपला, मराठमोळा.

वाचन 11640 प्रतिक्रिया 0