नमस्कार,
आमचे स्नेही तात्या अभ्यंकर यांच्या मिसळपाव ह्या संकेतस्थळाचा सभासद होतांना मला आनंद होत आहे. ह्या संकेतस्थळाला माझ्या मन:पूर्वक शुभेच्छा!
सुधीर काळे, जकार्ता.
शिवसेना पुन्हा उभी राहील? (पूर्वप्रसिद्धी - http://beta.esakal.com/2009/05/25131710/pailteer-sad-pratisad-about-sh.html)
मी एक सामान्य माणूस आहे. मी कुणी "शिवसैनिक' नाही; पण बाळासाहेबांबद्दल खूप आदर असलेला व शिवसेनेला मनोमन मानणारा असा एक मराठी माणूस आहे. रोज इमाने-इतबारे कामावर जाणारा, दहा-बारा तास "पाट्या टाकणारा' व महिन्याच्या एक तारखेला मिळणाऱ्या पगारावर घराचा चरितार्थ चालविणारा! राजकारणी नव्हे; पण राजकारणात रस घेणारा, त्याबद्दल वाचन करून स्वतःला अद्ययावत ठेवण्याचा प्रयत्न करणारा; भारताबद्दल, महाराष्ट्राबद्दल व मराठी माणसांबद्दल अतिशय आस्था असणारा; पण शेवटी एक चारचौघांसारखा सामान्य माणूस. २००५ मध्ये राज ठाकरे शिवसेनेतून बाहेर पडल्यावर मला अतोनात दुःख झाले; पण शिवसेनेच्या अनेक नेत्यांनी प्रयत्न करूनही या दोघांची दिलजमाई आजपर्यंत झाली नाही, ही दुर्दैवाची गोष्ट आहे.
पराभवाच्या दुःखात असलेल्या शिवसेनेचा "पिंजऱ्यामध्ये व्याघ्र सापडे, बायका-मुले मारती खडे' या थाटात अवमान करण्यासाठी हा लेख लिहिलेला नसून, नजीकच्या भविष्यकाळात पुन्हा देदीप्यमान विजय मिळविण्यासाठी शिवसेनेने काय केले पाहिजे याबाबतीत मला जे व जसे सुटले ते व तसे मी खूप कळकळीने इथे लिहिलेले आहे.
१९६४ मध्ये नोकरीनिमित्त मुंबईला आल्यापासून मराठी माणसाची सगळ्या भारतात, विशेषतः मुंबईत होणारी पीछेहाट पाहून मी अतिशय खिन्न होत असे. म्हणून बाळासाहेब ठाकरेंनी शिवसेनेची स्थापना केल्यापासून मी शिवसेनेकडे आकर्षित झालो.
बाळासाहेबांचे कर्तृत्व आचार्य अत्रे यांची आठवण करून देते यात शंका नाही. एकाने मुंबई महाराष्ट्रात आणली, तर दुसऱ्याने तिथे मराठी लोकांना ताठ मानेने कसे राहता येईल याकडे लक्ष पुरविले. दोघांचे कर्तृत्व उत्तुंग आहे व जोवर महाराष्ट्र व मराठी माणूस जिवंत आहे तोवर या दोघांची मधुर आणि आदरयुक्त स्मृती मराठी लोकांच्या हृदयात सदैव ताजी राहील.
संयुक्त महाराष्ट्राची चळवळ चालू होती तेव्हा मी पुण्यात इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये होतो. दै. मराठा "मेस'मध्ये आला रे आला, की त्याच्यावर उड्या पडत! शिवसेनेने जेव्हा मराठी पुनरुत्थान हाती घेतले, तेव्हा "मार्मिक'वरही अशाच उड्या पडत. त्या काळी मी "मार्मिक'चा वर्गणीदार होतो व प्रत्येक अंक नियमितपणे वाचत असे.
"मार्मिक'मध्ये मुंबईतील वेगवेगळ्या केंद्र सरकारच्या व राज्य सरकारच्या कार्यालयांत कशी मराठी माणसांची अवहेलना होत आहे, महाराष्ट्रातही उपरे लोक कसे सरकारी नोकऱ्यांत भरती होत आहेत, याची यादी असे. ती वाचल्यावर प्रत्येक मराठी माणसाला राग न आला तरच नवल! बाळासाहेबांचा व शिवसेनेचा उदय होण्यापूर्वी माझ्यासारख्या मराठी माणसाला वाटायचे, की मुंबईत मराठी माणसाच्या हिताकडे बघणारा मराठी माणसांचा "वाली' असा कोणीही मराठी नेता नाही; पण बाळासाहेबांनी मराठी माणसांची बाजू अतिशय परखड शब्दांत मांडली, त्यात प्रसंगी कधी परप्रांतीयांची थोडी-फार पिटाईही झाली व मराठी माणसांना वाटले, की "आहे, मराठी माणसाचा बाळासाहेबांच्या रूपाने एक तरी तारणहार आहे व हा शिवसेनेचा ढाण्या वाघ आपल्याला मुंबईतली आपली हक्काची जागा मिळवून देईल.'
बाळासाहेबांनी गल्लीपासून सुरवात करून शेवटी दिल्लीवरही शिवसेनेचा ध्वज फडकाविला; पण स्वतः कुठलेही पद स्वीकारले नाही. ते सत्तेपासून अलिप्तच राहिले. तिची भराभर झालेली वाढ व तिची वाढती राजकीय शक्ती यांचे गूढ बाबासाहेबांच्या व्यक्तिमत्त्वापेक्षा किंवा त्यांच्या राजकीय मतांपेक्षा "आपल्यावर अन्याय होत आहे,' या मराठी माणसांच्या मनातल्या भावनेत व रागातच होते व आहे. त्या वेळी बाळासाहेब ही एकच अशी व्यक्ती होती, की जिला मराठी लोकांबद्दल कणव व कदर होती, जिला स्वतः मराठी असल्याचा अभिमान होता व जिला "मी मराठी माणसाच्या कल्याणासाठीच झटेन,' असे म्हणायला संकोच वाटत नसे. त्यांच्या डोक्यात "अखिल भारतीय' दृष्टिकोनाचा वैचारिक गोंधळ नव्हता, तर "मराठी एके मराठी' हा सुटसुटीत पाढाच होता व तोच ते सतत म्हणायचे. कामाच्या दिशेबाबतचे त्यांचे विचारही सुस्पष्ट होते.
म्हणून तर बाळासाहेबांनी "दो कलियॉं'विरुद्ध आंदोलन पुकारले तेव्हा महाराष्ट्रातली तमाम मराठी मंडळी त्यांच्यामागे उभी राहिली. याच कारणास्तव स. गो. बर्वे व त्यानंतर तारा सप्रे यांना निवडून देताना मराठी लोकांनी कृष्ण मेनन यांसारख्या अव्वल मोहऱ्याला मुंबई-ठाण्यात धूळ चारली. शिवसेनेचा पहिला-वहिला आमदार असाच वामनराव महाडिकांच्या रूपाने परळमधून थाटात निवडून आला. त्या विजय सभेलाही मी हजर होतो. हळूहळू बाळासाहेबांनी मुंबई महापालिका जिंकली आणि हा हा म्हणता केवळ मुंबई-पुण्यातच नव्हे, तर मराठवाडा, कोकण, विदर्भ यांसारख्या मुंबईपासून दूर असलेल्या व जिथल्या मराठी माणसाला अवहेलना वाटेल अशी मुंबईसारखी परिस्थिती नसलेल्या ठिकाणीही मराठी मंडळी त्यांच्यामागे उभी राहिली. १९९५ मध्ये महाराष्ट्र राज्यावर शिवसेनेचा भगवा फडकला, "बॉम्बे'ची "मुंबई' झाली व साऱ्या मराठी माणसांना खूप आनंद झाला. तीच गोष्ट मुंबई विमानतळाला छत्रपतींचे नाव देण्याबद्दल. टाटा कितीही थोर असतील; पण छत्रपती कुठे आणि टाटा कुठे? शिवसेना नसती तर टाटांचेच नाव मुंबई विमानतळाला दिले गेले असते यात काहीही शंका नाही.
पण मग असे वाटते, की बाळासाहेबांची काही पावले चुकीची पडली. त्यांच्या हृदयातील मराठीबद्दलच्या आस्थेची जागा काही प्रमाणात तरी हिंदू धर्मीयांनी व्यापली. त्यांना "हिंदुहृदयसम्राट' ही स्वातंत्र्यवीर सावरकरांची पदवी जास्त भावू लागली! मराठीबद्दलच्या निष्ठेत हिंदूंबद्दलच्या निष्ठेची भेसळ झाली आणि मग तेव्हापासून शिवसेनेचे मराठी माणसांच्या हितसंबंधांकडे दुर्लक्ष होऊ लागले व बाळासाहेबांच्या व शिवसेनेच्या यशाला ओहोटी लागू लागली.
खरे तर त्या आधीही त्यांच्या हातून बऱ्याच चुका झाल्या. जनरल करिअप्पांसारख्या उपऱ्याला अनुमोदन दिले गेले व मराठी मंडळी रागावली, "मराठी मराठी मारल्या गप्पा, आता का आणलात करिअप्पा'च्या घोषणा भिंती-भिंतींवर झळकल्या! सुदैवाने बाळासाहेबांना त्यांची चूक वेळेवर समजली व ती त्यांनी दुरुस्तही केली व मराठी मंडळींनीही त्यांना मोठ्या मानाने माफ केले.
जी चूक भाजपने केंद्रात सत्तेवर आल्यावर केली तीच शिवसेनेनेही केली. सत्तेवर आल्यावर जसा भाजप हिंदूंना विसरला व मुस्लिम मतांच्या लोभाने त्यांचा अनुनय करू लागला व स्वतःची "हिंदूंच्या हिताचा एकमेव कैवारी' ही भूमिका विसरू लागला, तशीच चूक बाळासाहेबांनी मराठी माणसांच्या बाबतीत केली. थोड्याफार मतांसाठी त्यांना अमराठी लोकांसाठीही पान्हा फुटू लागला.
संजय दत्तसारख्या पंजाबी संशयित देशद्रोह्यालाही त्यांनी पदराखाली घालून तुरुंगातून सोडवून आणले (आणि आता त्याच संजय दत्तने शिवसेनेच्या उमेदवाराविरुद्ध प्रचार करून स्वतःच्या बहिणीला निवडून आणले.) संजय निरुपमसारख्या बिहारी माणसाला त्यांनी खासदारपदावर बसवले; पण त्यांच्या हाताने दूध प्यायलेला हा साप बाळासाहेबांनाच डसला व राम नाईक यांना पराभूत करून निवडून आला. अशा कितीतरी गोष्टी सांगता येतील.
पण, बाळासाहेबांचा सगळ्यात मोठा पराभव झाला जेव्हा उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे या दोघांमधली एकी ते टिकवू शकले नाहीत. दोघांना सारखे वागवून हे त्यांना टाळता आले असतं किंवा दोघांना दोन वेगवेगळे "सुभे' देऊन, म्हटले तर एकत्र व म्हटले तर वेगवेगळ्या क्षेत्राचे प्रमुख अशी वाटणी करून, हे भांडण मिटविता आले असते; पण असे न करता "एक शेंबडे पोर' अशी श्री. राज ठाकरेंची संभावना करून त्यांची अवहेलना व निर्भत्सनाच त्यांनी केली. त्यांच्या मनात काहीही असो; पण श्री. उद्धव ठाकरेंची शिवसेनेच्या कार्यकारी अध्यक्षपदावर निवड करून त्यांनी स्पष्ट केले, की त्यांच्या पश्चात श्री. उद्धव ठाकरेच शिवसेनाप्रमुख होतील.
हे पद वंशपरंपरागत नाही याचा त्यांना विसर पडला का? जरी त्यांचे वडील (प्रबोधनकार) स्वतः एक श्रेष्ठ पत्रकार असले, तरी बाळासाहेबांना शिवसेनाप्रमुख हे पद काही परंपरागत म्हणून मिळालेले नव्हते, तर त्यांनी ते स्वतःच्या कर्तबगारीवर जिंकले होते!
वारस निवडायचा प्रयत्न करण्याची गरजच नव्हती. तो अधिकार कुणाचाच नसतो. त्यांनी एखाद्याला त्यांचा उत्तराधिकारी म्हणून कार्यकर्त्यांवर जरी लादले असते, तरी मराठी लोकांनी त्यांच्या पश्चात त्या नेत्याला स्वीकारले असतेच असे नाही. वारसा किंवा नेता जनता ठरविते हा मूळ मंत्र ते विसरले आणि शिवसेनेचा ऱ्हास व्हायला लागला.
उद्धव ठाकरे एक आज्ञाधारक पुत्र असतील, बाळासाहेबांचे सहायक म्हणूनही योग्य असतील; पण एखाद्या संघटनेच्या प्रमुखाला (numero uno) ज्या गुणांची आवश्यकता असते (करिष्मा, दूरदृष्टी, धमक, जनतेला आकर्षित करण्याची क्षमता व निर्णय घेण्याची धडाडी इ.) ते गुण उद्धव ठाकरेंकडे असायला हवेत; तसेच ते "संघटनेला कुठे नेऊ इच्छितात' असे एक स्वप्न पाहण्याचे (ज्याला आपण इंग्रजीमध्ये vision म्हणतो) आणि ते स्वप्न प्रत्यक्षात आणण्याचे कर्तृत्व त्यांच्यात असले पाहिजे. असे स्वप्न पाहण्याची पात्रता बाळासाहेबांकडे होती आणि आहे म्हणूनच ते शिवसेनाप्रमुख झाले व इतकी वर्षे त्या पदावर राहिले. उद्धव ठाकरे किंवा राज ठाकरेंकडे ही पात्रता आहे का? बाळासाहेब हयात आहेत तोवर त्यांचा सल्ला सतत मिळत असल्यामुळे व बरेच अवघड निर्णय तेच घेत असल्यामुळे हे गुण आता दिसणार नाहीत, नंतरच दिसतील. ज्याच्याकडे हे गुण आहेत, तो गादीवर बसेल, दोघांतही ते नसल्यास या दोघांना डावलून तिसराच नेता सिंहासनावर बसलेला पाहायला मिळेल.
मध्यंतरी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत शिवसेना निवडून आली त्याची नशा शिवसेनेला जरुरीपेक्षा जास्तच चढली असे वाटते. त्यांना इतके यश मिळेल असे कुणालाच वाटले नव्हते; पण बाळासाहेबांचा प्रत्यक्ष सहभाग असलेली ती शेवटची निवडणूक आहे, असे समजून मराठी जनतेने प्रेमाने शिवसेनेला महापालिकेत सिंहासनावर बसविले; पण उद्धव ठाकरेंच्या कर्तृत्वाबद्दलचा फाजील आत्मविश्वास त्यामुळे निर्मिला गेला आणि इथेच चुकले! त्या निवडणुकीत जर शिवसेनेला इतके भरघोस यश मिळाले नसते, तर उद्धव ठाकरे व राज ठाकरे यांची "युती' तेव्हाच झाली असती व आजचे पानिपत टळले असते. आज मुंबईत कोणता मराठी माणूस चांगल्या पदावर आहे? म्युनिसिपल कमिशनरपदी एक केरळी माणूस आहे. शहरातले अर्ध्याहून अधिक वरिष्ठ पोलिस अधिकारी अमराठी आहेत, यांपैकी कित्येक अमराठी पोलिस अधिकाऱ्यांनी या ना त्या कारणाने नको त्या गुन्हेगारांना संरक्षण दिले असे मानायला जागा आहे. सर्व टीव्ही चॅनेलवरील मुंबईचे जवळजवळ सगळे वार्ताहर अमराठी आहेत! आम्ही राहतो तिथे झी न्यूज हा चॅनेल येतो. या चॅनेलवर पौर्णिमा सूर्यवंशी, नीलेश खरे, कांबळे व विनोद जगदाळे अशी मोजकी मराठी मंडळी सोडल्यास बाकी सर्व अमराठी लोकांचा भरणा आहे. सर्व सिनेनट वा सिनेतारकांच्या मुलाखती घ्यायला सगळे वार्ताहार जणू सिंधी-पंजाबी असले पाहिजेत, असा अलिखित नियम आहे, असे वाटावे अशी परिस्थिती दिसते! आता तर हे लोण पुण्यालाही पोचले आहे! हे बाळासाहेबांना आपणहून दिसले पाहिजे; पण शिवसेनेला व मनसेला लिहिलेल्या माझ्या पत्रात हे सर्व लिहूनही एकानेही (उद्धव किंवा राज) याबाबत काही केलेले नाही. त्या वेळी पुण्याचा वार्ताहार मयूर पारिख होता! तेव्हा "मुंबई फास्ट'ची Anchor सीमा गुप्ता होती. मला वाटायचे, की ही सीमा गुप्ते का नाही? कुमावत का? नौटियाल का? शुक्ला का? शिंदे, चितळे, कर्णिक, राजे, आपटे, मोरे, दराडे का नाहीत? या अमराठी लोकांना मराठी माणसांपेक्षा जास्त काय येते? मुंबईत प्रत्येक चॅनेलचा प्रत्येक वार्ताहार मराठीच असला पाहिजे, असा फतवा का नाही काढत शिवसेना? बाळासाहेबांनी असा फतवा काढला, तर कुणाची "टाप' आहे त्याविरुद्ध जाण्याची? या उलट कोलकत्यात प्रत्येक वार्ताहार बंगाली असतो आणि हिंदी भाषेचा चुकीच्या लिंग-वचनाचा वापर करून रोज खून पडत असतो, तरी तेथे बंगालीच माणूस ठेवावा लागतो, मग मुंबईत का नाही?
माझ्या मते आताची ही परिस्थिती तर १९६४ पेक्षाही गंभीर आहे. अधिकारी वर्ग तर सोडाच; पण गंमत म्हणून सांगतो, की मुंबईत आताशा टॉपचे गुंडही अमराठी आहेत. एखादा अरुण गवळी-राजनसारखा अपवाद वगळता, गुन्हेगारी विश्वाच्या "डॉन'पदावरही कुणी मराठी माणूस नाही आणि असे मुद्दे सोडून बाळासाहेब उद्धव-राजच्या चक्रात का अडकले आहेत? त्यांच्या पश्चात कोण येईल हे कोण सांगणार? कदाचित उद्धव ठाकरे पुढे येतील, कदाचित राज ठाकरे पुढे येतील. बाळासाहेबांची शक्ती, त्याचे वाक्चातुर्य, त्यांची लोकांना आकर्षित करण्याची हातोटी या दोघांतही नसेल, तर कदाचित दोघेही वाऱ्यावर उडून जातील व कुणी तिसराच नेता निवडून येईल! म्हणूनच वारसाबद्दल आतापासून घोळ न घालता मराठी लोकांना न्याय देण्याकडे बाळासाहेबांनी व शिवसेनेने लक्ष द्यावे हे उत्तम.
शिवसेनेचा ऱ्हास किंवा पराजय हा पर्याय मराठी माणसापुढे असूच शकत नाही. मराठी माणसाच्या हितासाठी "शिवसेना' ही संघटना जगलीच आणि वाढलीच पाहिजे. ती मराठी माणसाच्या अस्मितेची व पोटापाण्याची संरक्षक शक्ती आहे. ती पराभूत होऊन कसे चालेल? सर्व मराठी मंडळी कित्येक वर्षे बाळासाहेबांकडे कौतुकाने, आदराने व अपेक्षेने पाहत होती व आजही पाहत आहेत. अशा परिस्थितीत कोता स्वार्थ सोडून शिवसेनेचे पुनरुज्जीवन त्यांनी केलेच पाहिजे. भाऊबंदकीच्या किंवा वारसाच्या संभ्रमात जर शिवसेनेचा पूर्ण ऱ्हास झाला, तर बाळासाहेबांच्या पश्चात कोणीही मराठी माणूस त्यांच्याबद्दल प्रेमाने वा आदराने बोलणार नाही. आजपर्यंत शिवसेनेचा रथ जसा एकछत्री पद्धतीने केवळ मराठी माणसाच्या हिताकडे पाहून त्यांनी चालविला तसाच आताही त्यांनी चालवावा. प्रत्येक निर्णय निःस्वार्थी पद्धतीने केवळ मराठी माणसांच्या हिताकडे पाहूनच घेतला जावा, तरच ते खरोखर मराठी हृदयसम्राट म्हणून इतिहासात गणले जातील. हिंदुहृदयसम्राट ही सावरकरांची पदवी फक्त त्यांच्यासाठीच आहे, ते एकच त्या पदाचे हक्कदार आहेत हे कुणीही विसरू नये. मराठी हृदयसम्राट ही पदवीही झकास आहे, त्यात काहीही कमी नाही. ती बाळासाहेबांनी घाम गाळून मिळविली आहे व तिच्यावर फक्त त्यांचाच हक्क आहे, तीच त्यांनी वापरावी.
शिवसेनेच्या कार्याला स्वतःला वाहून घेणारे किती तरी स्वयंसेवक निघतील; पण जर शिवसेनाच अशा तऱ्हेने संपली तर कसे?
निःस्वार्थी संघटनेसाठी काम करायला लाखो मिळतील, तर पुत्रप्रेमाने आंधळ्या झालेल्या नेत्याला "मोले घातले रडाया, नाही आसू, नाही माया' छापाचेच स्वयंसेवक मिळणार, तरी शिवसेनेने वेळेवरच जागे व्हावे. मराठी माणसाला त्यांच्याशिवाय आज तरी कोणताही पर्याय नाही व म्हणून शिवसेना ही जगलीच पाहिजे व तिची पूर्वीची ताकद तिने मिळविलीच पाहिजे आणि हे फक्त बाळासाहेबच करू शकतील. राणे, भुजबळांसारखे जुने नेते त्यांनी परत शिवसेनेत आणावेत. त्यांच्याशी मोठ्या मनाने दिलजमाई करावी व शिवसेनेला तिचे जुने वैभव परत मिळवून द्यावे. आज राणेंमुळे कोकणात व राजमुळे मुंबई-ठाण्यात शिवसेनेची धूळधाण झाली याकडे दुर्लक्ष करू नये आणि केवळ त्या दोघांना त्याबद्दल जबाबदार धरू नये. टाळी एका हाताने वाजत नाही. २००९ च्या पानिपतात शिवसेनेची वा या दोन व्यक्तींची सारखीच, समान जबाबदारी आहे. म्हणून बाळासाहेबांनी भाऊबंदकीत गुंतून न राहता शिवसेना यशस्वी कशी होईल याकडेच लक्ष दिले पाहिजे. जर बाळासाहेबांनी हे क्रांतिकारक कार्य करायचे टाळले, तर उद्याची पिढी त्यांनाच "सूर्याजी पिसाळ' म्हणून ओळखू लागले व ते इतिहासाआड जातील! ना कुणाला खेद ना खंत अशा परिस्थितीत!! पण इतक्या उत्तुंग कर्तृत्वाच्या बाळासाहेबांनी स्वतःवर अशी वेळ येऊ देऊ नये, ही त्यांना कळकळीची विनंती.
आपला वारस कोण याचा निर्णय मराठी जनतेला निवडणुकीने घेऊ दे. कुठलाही नेता कुठल्याही नावाने त्यांच्यावर लादला जाऊ नये. असे लादलेले नेते कधीच टिकत नाहीत. जनतेने निवडलेले नेतेच यशस्वी होतात. उद्धव, राज, राणे, भुजबळ यांपैकी किंवा या चौघांबाहेरील कुणी, ज्याच्याबद्दल मराठी माणसाला खात्री वाटेल तोच शिवसेनेचा नवा प्रमुख होईल व व्हावा. कुणा येऱ्या-गबाळ्याला नेतेपदाची माळ चढवून सेनेचा सर्वनाश होऊ देऊ नये.
मराठी माणसाला दुहीचा व भाऊबंदकीचा शिवरायाच्या वेळेपासून, पेशवाईपासून शाप आहे व ती परंपरा ठाकरे कुटुंबीयांनी चालू ठेवलेली दिसते. ती वाईट परंपरा नष्ट करून व नेतृत्वपदाच्या निवडणुकीला योग्य ते महत्त्व देऊन, ती गुप्त व निर्भय वातावरणात पार पाडून, बाळासाहेबांनी एक चांगला पायंडा पाडावा जो त्यांचे वारसही चालवतील हीच त्यांना विनंती व हे कार्य त्यांच्या हातून होवो हीच ईश्वरचरणी प्रार्थना.
हुकूमशहांना "लुटपुटी'च्या निवडणुकीत नेहमीच ९०-९५ टक्के मते मिळतात पण अशा निवडणुका या निवडणुका नसतात, तर तो एक देखावा असतो. ट्रक भरभरून माणसे अणून घेतलेल्या संजय गांधी छाप "विराट सभा' निरर्थक असतात. वेळ आली, की असले ९० टक्के नेते भुर्रकन वाऱ्यावर उडून जातात. शिवसेनेचा नेता असा असून चालणार नाही.
लाखो मराठी माणसे सैनिक म्हणून बाळासाहेबांच्या बाजूला उभे राहायला तयार होतील, जर ते उर्वरित आयुष्यात निःस्वार्थीपणे मराठी लोकांची सेवा करणार असतील तर; अन्यथा नाही. मग शिवसेना इतिहासजमाच होईल! केवढा हा दैवदुर्विलास!
- सुधीर काळे, जकार्ता
लय