मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

पाठीला साबण चोळण्याचे सहा प्रकार

विजुभाऊ · · जनातलं, मनातलं
लेखनप्रकार
कोण्या इसमाने "जीवनोन्नत्तीचे सहा सोपान" असे कायसेसे लिहुन ठेवले आहे. भाई काकांच्या गटण्याने ते तोंडपाठ केले होते म्हणे. काल अचानक प्रदीर्घ अभ्यासान्ती मला असेच काही सोपान गवसले. माणसे त्यांच्या स्वभावानुसार अभ्यास करत असतात. पाश्चात्य देशांत तर प्रत्येक गोष्टीमागील विज्ञान शोधले जात. उदा : भरभर चालण्याचे वैज्ञानीक तीन प्रकार शास्त्रीय रित्या आळस कसा द्यावा. जेवताना ढेकर कसा द्यावा. घोरण्याचे शास्त्रीय फायदे ईत्यादी. आंघोळीचेही बरेच प्रकार आहेत. उदा: सचैल स्नान / गोपिचन्द स्नान /मन्दाकिनी स्नान / काकस्नान / अंघोळीची गोळी स्नान वगैरे. या सर्व स्नानात अत्यन्त महत्वाचे आणि अडचणीचे म्हणजे स्नान करताना पाठीला साबण लावणे. पाठीला साबण लावणे हा महत्वाचा अभ्यास आहे. माणसे आपापल्या स्वभावानुसार पाठीला साबण लावत असतात. प्रदीर्घ अभ्यासान्ती असे निदर्शनास आले की पाठीला साबण लावण्याचे एकूण सहा मुख्य प्रकार आहेत. त्यांचे फायदे आणि तोटे असे:- १) सर्वसामान्य : हाताला साबण लावून / हातात साबणाची वडी घेऊन शरीर ( हात खान्द्यावरून मागे घेऊन)गोमुखासनात वळवुन पाठीला साबण लावणे यात पाठीला साबण लागतो परन्तु पाठ नीट चोळली जात नाही. दंड आणि हाताला व्यायाम होतो. २) जानवे / पंचा या साबण गुंडाळुन पाठीला लावणे. या प्रकारात साबण पाठीला लागला जातो नीट चोळलाही जातो परन्तु पंचा ओला झाल्यामुळे अंग पुसण्यासाठी नवा टॉवेल वापरावा लागतो. साबणाचे डाग पंचावर पडण्याची शक्यता असते. ३) काठीच्या टोकाला साबण लावून पाठीला लावणे. या प्रकारात साबण नीट चोळला जातो परन्तु सदर प्रयोग साबण नवीन असतानाच करता येतो.शिवाय साबण गळुन गेल्यास पाठीला काथीने इजा होण्याचा सम्भव असतो. ४) भिन्तीला साबण चिकटवून त्यावर पाठ घासणे. या प्रकारात पाठ मस्त रगडली जाते. साबण फार झिजल्यास नुसती भिन्तही साबणाचे काम करु शकते. हा प्रकार करताना पाठ अनेक ऍन्गल मध्ये वाकवावी लागत असल्याने पाठीच्या कण्यास मस्त व्यायाम होतो. फार जोरात केल्यास घसरून पडण्याची भीति असते. ५) दुसर्‍याकडुन पाठीस साबण चोळून घेणे. मुले किंवा पत्नी यांच्या कडून पाठीस साबण चोळून घेता येतो. पाठीस साबण व्यवस्थित लागतो. अनुभव असा आहे की मुले आपल्या पाठीस साबण लावण्यापेक्षाही स्वतःची अंघोळ झाली की पळून जातात. सावधानता : पत्नीने पाठीस साबण लावताना कोणत्याही विषयावर चर्चा करु नये. विषय भरकटत जातो ६)समाधानी अंघोळ : आयसो कायनेटीक अंघोळ हा प्रकार सर्वात जास्त लोकांकडून केला जातो. यात पाठ आणि साबणाचा अजिबात सम्बन्ध येत नाही. अंघोळ करताना पाठीला साबण लावला आहे अशी भावना मनात व्यक्त करावी आणि डोक्यावरुन पाणी घ्यावे. हे आहेत पाठीला साबण चोळण्याचे सहा मुख्य प्रकार . जिज्ञासुनी यात भर घालावी.....

वाचन 8923 प्रतिक्रिया 0