पंगत - २
लेखनप्रकार
(पूर्वसूत्रः "चला सुरू करा!!" देवकाकांनी घोषणा केली. सगळे सिद्धहस्त साहित्यिक समोरच्या पानातील देवकाकाहस्त मेजवानी फस्त करण्यासाठी तुटून पटले.....)
डांबिसकाकांनी एकदा समोरच्या पानावरून नजर फिरवली....
साखरभात, जिलेबी, मोतीचूर, पुरण पोळी! सर्व गोड मेन्यू....
चिंबोरीच्या लालभडक रसरशीत कालवणाला आणि नारळाच्या दुधाने सुरमटलेल्या सोड्याच्या खिचडीला चटावलेल्या डांबिसकाकांना घास काही घशाखाली उतरेना......
मग त्यांनी पंगतीत आजूबाजूला नजर फिरवली....
समोरच्याच रांगेमध्ये बसलेल्या स्त्रियांच्या पंगतीत त्यांना प्राजु दिसली....
"काय पुतणीबाई, बरं आहे ना?" काकांनी पृच्छा केली....
"हो काका, बरं आहे" पुतणी उद्गारली, "पण हे देवकाका आहेत ना, ते अतिशय दुष्ट आहेत!!!"
"का गं बाई?" डांबिसकाका आश्चर्याने विचारते झाले, " अगं इतकी चांगली मेजवानी जुळवून आणलीये देवकाकांनी! आणि तु त्यांना दुष्ट का बरं म्हणतेस?"
"अहो, मी त्यांना सांगितलं होतं की चांगला श्रीखंडपुरीचा बेत ठरवा पण त्यांनी माझं न ऐकता हा जिलेबीचा बेत ठेवला!!!", प्राजु.
"बरं झालं श्रीखंडपुरीचा बेत नाही ठेवला ते!!!", शेजारीच बसलेली पैठणी, आपलं.. रेवती ,नथीआडून म्हणाली, "श्रीखंड केलं असतं तर तू इथेही त्यात तुझ्या चारोळ्या टाकत बसली असतीस!!!!"
प्राजुला काहीतरी खरमरीत प्रत्युत्तर द्यायचं होतं पण जर रेवतीशी वाकडेपणा घेतला तर फर्मास आप्पे कसे खायला मिळणार असा उत्क्रांतीवादी दूरदर्शी विचार करून प्राजु काहीच बोलली नाही....
इतक्यात मुक्तसुनीतांनी आवाज दिला. " मंडळी!!! मी एक श्लोक म्हणतो, ऐका हं...."
"हरीच्या घरी शेवया तूप पोळ्या...
हरी वाढितो ब्राम्हणां वेळोवेळा....
असे ब्राम्हण जेवुनि तृप्त झाले...
विडा दक्षिणा देवुनि बोळविले....
"म्हणजे असं बघा मंडळी, की या मिपारूपी गोकुळात हा देवकाका रूपी हरी आपल्याला आज हे जिलेबीरूपी अमृत.........."
एका साध्या सोप्या श्लोकाचं मुक्तसुनीतरूपी पुराणिकबुवा क्लिष्ट शब्दांत निरूपण करू लागलेले पहाताच समस्त पंगतवासीयांनी त्यांच्याकडे संपूर्ण दुर्लक्ष केलं आणि आपलं चित्त समोरच्या मेन्यूवर केंद्रित केलं......
"मी याच श्लोकाचं विडंबन ऐकवतो, ऐका...", केशवसुमारांनाही आता कंठ फुटला....
आपल्या काव्यगुरूचं विडंबन ऐकण्यास डांबिसकाकाही सिद्ध झाले...
"ऐका हं," केशवसुमारांनी गळा खाकरून सुरवात केली....
"हरीने पळविल्या, राधिकेच्या चोळ्या...."
"पुरे!!!!!!!!!", समस्त पंगतवासीयांनी एका सुरात केशवसुमारांना गप्प केलं......
'सालं या मिपाकरांना काव्य कशाशी खातात ते समजतच नाय!!!!" असा विचार करून आणि बर्लिन इथे होणार्या आगामी मराठी सहित्यसंमेलनात ही कविता वाचून दाखवायचीच असा निश्चय करून केशवसुमार गप्प बसले.....
बराच वेळ डांबिसकाकांनी त्या गोड जेवणाशी लढाई करायचा असफल प्रयत्न केला. शेवटी पानातल्या फक्त जिलेब्या संपवल्या आणि त्यांनी पानावरून उठण्यासाठी देवकाकांची परवानगी मागितली.....
"मठ्ठा!!!!!!!", देवकाका गरजले. आपल्याला मठ्ठ म्हटलेलं पाहून डाबिसकाकाही अस्वस्थ झाले.....
"च्यायला, शेवटी असा मनसुबा होता होय!!! मला जेवायला बोलवून मग भर पंगतीत असा अपमान करायचा डाव होता काय!!!!", डांबिसकाकांच्या मनात हे विचार येतात न येतायत तोवर एका वाढप्याने त्यांच्या समोरच्या वाटीत एक पांढरं पाणी आणून ओतलं....
"मठ्ठा प्याल्याशिवाय कुठे भोजन पूर्ण होतं का?", देवकाका विचारते झाले....
डांबिसकाका बिचारे मुंबईत जन्माला आलेले आणि मुंबईतच वाढलेले! त्यांना मठ्ठा काय माहिती? त्यांनी त्या पाण्याचा वास घेतला.....
त्या आंबूस वासानेच त्यांचं पोट ढवळून आलं....
आता मात्र देवकाकांच्या रागलोभाची पर्वा न करता ते पंगतीतून उठले आणि आंचवायला गेले....
डांबिसकाका हात-तोंड धुतायत तोवर मागून अवाज आला....
"कं? झेवलास नं पोटभर?"
डांबिसकाका एकदम दचकलेच!! मिपावर हा इतका बोल्ड साहित्यिक कोण आलांय असं वाटून त्यांनी मागे वळून पाहिलं!!
बघतात तर मागे ब्रिटिश उभा!!
"अं, हो, हो! तुला 'जेवलास का?' असं म्हणायचंय नाही का? हो, हो, जेवलो!!", डांबिसकाकांनी हुश्श्य केलं, "काय बाल्या, तुला आवडलं की नाही जेवण?"
"जल्लां तं जेवन!!!"
"कां रे? तुला आवडलं नाही जेवण?"
"तसां नाय, पन इचिभनं, सगलां गोड गोड!!! तोंड सगलां गोड झालांय!!!"
डांबिसकाका समजून नुसतेच हसले. बाल्या पुढे म्हणाला, "ए डांबिसदादूस! येतंस काय माज्ये घरला? जरा ताजा जिताडा नं जवल्याची चटनी खावंयात!!!!"
डांबिसकाकांच्या तोंडाला पाणी सुटलं. त्यांनी हळूच आत डोकावून पाहिलं तर देवकाका पुढल्या पंगतीची तयारी करण्यात गुंतले होते.......
"चल चल जाऊया! कुणाचं लक्ष नाही असं बघून इथून सटकूयांत!!", असं म्हणून ते बाल्याबरोबर निघणार तोच त्यांच्या कानावर आवाज पडला....
"काय रे, तुमचं दोघांचं इथे काय गुफ्तगूं चाल्लंय?"
"काय नाय तात्या! ते आपलं... हे आपलं......" बाल्याने उगाच वेड पांघरलं.....
"हो ना! हा बाल्या सांगत होता की देवकाकांनी मेन्यू काय झकास केला होता!!!", डांबिसकाकांनी बाल्याला सहाय्य देण्याचा प्रयत्न केला......
पण तो खमंग तात्या होता!! तो काय एव्हढ्यावर ऐकतोय?
"ते काही नाही!! तुमचा काय बेत चालला होता ते सांगा आधी!!!" तात्या.
आता साक्षात तात्याशी खोटं कसं बोलणार? तेही मिपाच्या मेजवानीत? झालं, सगळा बेत त्याला सांगणं भाग पडलं......
तात्याने क्षणभर विचार केला आणि मग म्हणतो कसा,
"चला, मी पण येतो तुमच्यासोबत!!!"
आता च्याट पडायची पाळी बाल्या आणि डांबिसावर आली.....
"अवो तात्या, अवो तुमी कसं येनार?", बाल्याने कसेबसे उद्गार काढले....
"हो ना! अहो आमचं एक ठीक आहे!!", डांबिसकाका म्हणाले, " आम्ही पसार झालो तर कुणाला पत्ताही लागणार नाही! पण तुम्ही? आणि मग तुमच्या सिद्धहस्तपणाचं काय?"
तात्याने एक नजर या दोघांकडे टाकली. एक नजर पंगतीवरून फिरवली.....
"च्यामारी, सिद्धहस्तपणा मारला फाट्यावर!!" तात्याने आपला पेटंट सिद्धहस्त उद्गार काढला, "चला, जिताडा खायच्या आधी एकेक पेग मारूयात!!"
असं म्हणून त्याने या दोघांच्या खांद्यावर एकेक हात ठेवला आणि ती तिक्कल झमझम बारच्या दिशेने चालू लागली.......
(संपूर्ण)
[डिस्क्लेमरः या कथेतील व्यक्तिरेखा खर्या असल्या तरी प्रसंग कल्पित आहेत. देवकाकांनी आम्हाला खरंच मेजवानी दिली असा जर कुणाचा समज झाला असेल तर तो केवळ योगायोग समजावा (आणि लगेच देवकाकांकडे पार्टी मागायला जाऊ नये!!!). या कथेमध्ये आलेल्या सर्व मिपाकरांना ह. घेतल्याबद्दल धन्यवाद!!! एक महत्वाचा संदर्भ सुचवल्याबद्दल श्री. मुक्तसुनीत यांचे विशेष आभार!!! आम्ही (आईशप्पत!!!) त्यांचे पुढले निरूपण चुपचाप ऐकून घेण्याचा णिश्चय केलेला आहे!!!!]
वाचन
18326
प्रतिक्रिया
0